तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
फ्लायदुबई : पायलटवरील हल्ल्यापासून लँडिंगपर्यंत, 'त्या' 17 मिनिटांत काय घडलं?
दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका विमानाने उड्डाण केलं. ते विमान तेल अवीवच्या दिशेने निघालं.
पण अचानक हे विमान काही सेकंदांतच ज्या उंचीवरून उडत होतं, त्याच्या साधारण निम्म्या उंचीवर आलं.
हे नेमकं घडलं कसं? चला, हेच समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
फ्लाइट एफझेड1073 मध्ये एका पायलटने अचानक दुसऱ्या पायलटवर हल्ला केला. ज्या पायलटवर हल्ला झाला, ते स्मित मच्छर नावाचे भारतीय नागरिक आहेत.
जखमी असूनही स्मित यांनी कॉकपिटचं दार उघडलं. त्यानंतर प्रवासी आणि विमानात असलेल्या दुसऱ्या पायलटच्या मदतीने मोठी दुर्घटना टळली. या प्रयत्नामुळे विमानातील 174 प्रवाशांचे प्राण वाचले.
आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅप्टन स्मित यांचं कौतुक करत आहेत.
पण या संपूर्ण घटनेत त्या 17 मिनिटांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. या 17 मिनिटांत अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या.
17 मिनिटांत काय घडलं?
फ्लाइट एफझेड1073 ने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 8.30 सुमारास दुबईहून तेल अवीवसाठी उड्डाण केलं. फ्लाइटरडारच्या माहितीनुसार, त्यानंतर सुमारे 2 तास विमानाचा प्रवास नेहमीप्रमाणे सुरू होता.
त्यानंतर अचानक भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10.51 वाजता अचानक विमान वेगाने खाली येऊ लागलं.
अवघ्या 90 सेकंदांत विमान 17 हजार फूटांवरून खाली आलं. म्हणजे ते ज्या उंचीवर उडत होतं, त्याच्या जवळपास निम्म्या उंचीवर आलं.
यानंतर सुमारे 9 मिनिटांनी, म्हणजेच सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, विमानातून एक आपत्कालीन कोड (कोड अलर्ट) पाठवण्यात आला. हा 7700 फ्लाइट कोड होता.
या कोडचा अर्थ विमानात काहीतरी आपत्कालीन (इमर्जन्सी) परिस्थिती निर्माण झाली आहे.
यानंतर साधारण 7 मिनिटांनी, म्हणजेच सकाळी 11.07 वाजण्याच्या सुमारास, फ्लाइट ट्रॅफिक प्लॅटफॉर्म 'फ्लाइटरडार24'ला आणखी एक नवा कोड मिळाला.
हा नवीन कोड 7500 होता. या कोडचा अर्थ विमानात अवैध हस्तक्षेप झाल्याचं मानलं जातं.
साधारणपणे याचा अर्थ विमानाचे अपहरण (हायजॅक) झाले असा असतो.
याच कोडमुळे सुरुवातीला भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये विमान हायजॅक झाल्याची शक्यता असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
बीबीसी व्हेरिफायशी बोलताना एका तज्ज्ञाने सांगितलं की, कोड 7500 आणि कोड 7700 हे दोन्ही कोड पाठवणं आणि विमान अचानक खाली येणं, यावरून विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याचे संकेत मिळतात.
या सर्व घटना सकाळी 10.51 ते 11.7 च्या दरम्यान घडल्या.
या दरम्यान विमानाच्या आत नेमकं काय काय घडलं, याबद्दल प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली माहिती अशी आहे.
एका पायलटने दुसऱ्या पायलटवर हल्ला केला. जखमी पायलट स्मित मच्छर यांनी बेशुद्ध होण्यापूर्वी कॉकपिटचा दरवाजा उघडला.
प्रवासी मदतीसाठी पुढे आले आणि विमानात असलेल्या 'पोझिशनिंग पायलट'ने विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.
'पोझिशनिंग पायलट' म्हणजे असे पायलट जे दुसऱ्या विमानतळावरून विमान उडवण्यासाठी हवाई मार्गाने प्रवास करत असतात.
हे विमानाच्या आत घडलेलं होतं.
रडारवरून काय समोर आलं?
यानंतर बाहेर काय दिसून आलं आणि रडारवरून काय समोर आलं, हे पाहूया.
फ्लाइटरडारच्या माहितीनुसार, विमानाने पूर्ण यू-टर्न घेतला आणि दुसऱ्या दिशेने ते जाऊ लागलं. त्यानंतर ते सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर उतरलं.
यानंतर फ्लाइटरडार24 वर विमानाचा ट्रॅकिंग डेटा दिसणं बंद झालं.
फ्लाइटरडारवर हा डेटा तबुक विमानतळावर विमान उतरण्याच्या काही वेळ आधी दिसला. म्हणजेच भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास.
विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, असं फ्लायदुबईने सांगितलं.
परंतु, दोन पायलटांमध्ये नेमकं काय घडलं, याची ठोस माहिती लवकरच समोर येण्याची अपेक्षा आहे.
पण प्रवाशांचं म्हणणं आहे की, उड्डाणादरम्यान एका पायलटवर धारदार वस्तूने हल्ला करण्यात आला होता.
बीबीसी व्हेरिफायने तपासलेल्या व्हीडिओमध्ये रक्ताने माखलेल्या जमिनीवर दिसणारी व्यक्ती पायलटच्या गणवेशात आहे.
सध्या दोन्ही पायलट्सना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, सध्या सर्वत्र कॅप्टन स्मित मच्छर यांच्या धाडसाची चर्चा होत आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.