तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
किम जाँग उन यांच्या मृत्यूची बातमी आणि त्यानंतर प्रसिद्ध झालेले फोटो- अशा अफवा वरचेवर का पसरतात?
- Author, लॉरा बिकर
- Role, चीन प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांमध्ये किम जाँग उन यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. ब्रेन हॅमरेजमुळे किम जाँग उन यांचा मृत्यू झाल्याच्या अफवा पसरलेल्या असतानाच हे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये त्यांची प्रकृती उत्तम दिसत आहे.
'रोडोंग सिनमन' या सरकारी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये 42 वर्षांचे किम जाँग उन हे आपल्या मुलीसोबत कपडे आणि फुटवेअरच्या (पादत्राणं) प्रदर्शनाला भेट देताना दिसत आहेत.
चिनी सरकारविरोधात असलेल्या आणि अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीने किम जाँग उन कोमात असताना त्यांना बीजिंगमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांचा मृत्यू झाला, असा दावा केला होता. त्यांनी त्यासंबंधीचा कोणताही पुरावा दिला नव्हता.
वानजुन झी असं या व्यक्तीचं नाव आहे. ते स्वतःची ओळख चिनी डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष अशी करून देतात. या पक्षावर चीनच्या अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. यापूर्वीही त्यांनी चीनचे नेते शी जिनपिंग यांच्या मृत्यूविषयी अनेक गोष्टी पसरवल्या होत्या.
उत्तर कोरियातील घडामोडींचा बारकाईने अभ्यास करणाऱ्यांना कल्पना असेल की, किम जाँग उन यांच्याबद्दल अशा अफवा नेहमीच पसरवल्या जातात.
आपल्या अंतर्गत घडामोडींबद्दल प्रचंड गुप्तता पाळणाऱ्या देशांपैकी एक असलेल्या उत्तर कोरियातील घटनांची सत्यता पडताळणं अनेकदा अवघड असतं. त्यामुळेच अशा अफवांना वाव मिळतो.
किम जाँग उन यांना तीव्र ब्रेन हॅमरेज झालं होतं. उपचारासाठीच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा उत्तर कोरियात नसल्यामुळे त्यांना बीजिंगला हलवण्यात आलं असल्याचा दावा झी यांनी केला होता.
झी यांच्या दाव्यानुसार, उपचारादरम्यान किम जाँग उन यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मृतदेह गुप्तपणे उत्तर कोरियात परत आणण्यात आला. मात्र, त्यांच्या मृत्यूची माहिती सरकारने लपवून ठेवली.
मात्र, समोर आलेल्या फोटोंमधून वेगळंच चित्र पाहायला मिळतं.
या फोटोंमध्ये किम जाँग उन प्रदर्शनातील वस्तूंची पाहणी करताना दिसतात. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी किम जू आए आणि नेहमीच्या अधिकाऱ्यांचा ताफाही होता.
हे फोटो नेमके कधी काढले आहेत, हे सांगता येत नसले, तरी किम जाँग उन यांच्या मृत्यूच्या दाव्यावर संशय घेण्यामागे इतरही काही कारणे आहेत.
किम जाँग उन यांच्या प्रकृतीत अचानक गंभीर बिघाड झाला असता, तर उत्तर कोरियाच्या सीमेपलीकडेही त्याची काही चिन्हं दिसली असती.
संभाव्य अस्थिरता किंवा निर्वासितांचा ओघ लक्षात घेऊन चीन उत्तर कोरियाच्या सीमेलगतची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करू शकतो. दक्षिण कोरियात आश्रय घेतलेल्या उत्तर कोरियातील निर्वासितांना अनेकदा चीनच्या सीमेलगतच्या अनौपचारिक संपर्कजाळ्याच्या माध्यमातून माहिती मिळते. मात्र, यापैकी काहीही घडलेले नाही.
दरम्यान, दक्षिण कोरियाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी या वृत्तांना दुजोरा देणारी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे योनहॅप या वृत्तसंस्थेला सांगितले.
या अफवेमुळे यापूर्वी पसरलेल्या अशाच खोट्या दाव्यांची आठवण होते.
2020 मध्ये उत्तर कोरियातून पलायन करून आलेल्या एका प्रसिद्ध व्यक्तीने हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर किम जाँग उन यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. या वृत्ताची आपल्याला 99 टक्के खात्री असल्याचा दावा त्याने केला होता. मात्र, त्यानंतर काही काळातच किम जाँग उन सार्वजनिक ठिकाणी दिसले आणि हा दावा खोटा ठरला.
मग अशा अफवा पुन्हा पुन्हा का पसरतात? यामागचे पहिले कारण म्हणजे उत्तर कोरियातील सत्तेचा वारसदार कोण असेल, हा प्रश्न.
अशा अफवा पुन्हा पुन्हा का पसरतात?
उत्तर कोरियावर गेल्या तीन पिढ्यांपासून किम कुटुंबाची सत्ता आहे. मात्र, किम जाँग उन यांच्यानंतर देशाची सत्ता कोणाकडे जाईल, याबाबतची अनिश्चितता आधीच्या तुलनेत जास्त आहे.
किम इल सुंग यांनी आपला मुलगा किम जाँग इल याला सत्तेवर आणण्यासाठी अनेक दशकं तयारी केली होती. 1994 साली किम इल सुंग यांचे निधन झाले, तेव्हा सत्तांतराची योजना निश्चित झाली होती. त्यामुळे किम जाँग इल यांच्याकडे सत्तेची सूत्रं तुलनेने सहजपणे सोपवण्यात आली.
मात्र, किम जाँग उन यांचा सत्तेपर्यंतचा प्रवास अधिक वेगाने आणि अनिश्चिततेच्या वातावरणात झाला. 2008 मध्ये किम जाँग इल यांना पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्यांच्या धाकट्या मुलाला वेगाने पदोन्नती देत सत्तेत आणण्यात आले.
2011 मध्ये वडिलांचे निधन झाले, तोपर्यंत किम जाँग उन यांना 'उत्तर कोरियाचे भावी नेते' असं जाहीर करण्यात आलं होतं. तरीही, सत्तेवर आल्यानंतर किम जाँग उन यांना आपली पकड मजबूत करण्यासाठी अनेक वर्षे लागली. या काळात त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना सत्तेतून दूर केले आणि आपल्यासाठी संभाव्य धोका ठरू शकणाऱ्यांचा काटा काढला.
दक्षिण कोरियातील गुप्तहेर यंत्रणेच्या मते, किम जाँग उन आपल्या मुलीला उत्तराधिकारी म्हणून तयार करत आहेत. अलीकडच्या काळात ती महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये तसंच लष्करी संचलनांमध्ये ठळकपणे दिसते.
मात्र, तिचं वय केवळ 13 वर्षं असल्याचंच सांगितलं जातं. उत्तर कोरियाचे नेतृत्व आजवर कोणत्याही महिलेने केलं नाही आणि तिला अद्याप अधिकृतपणे उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं नाहीये. कमी वयामुळे सत्तेसाठीच्या संघर्षात तिच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
या सर्व अनिश्चिततेमुळे किम जाँग उन यांच्या प्रकृतीविषयीच्या अफवांना इतके महत्त्व का दिले जाते, हे लक्षात येतं.
या अफवा पुन्हा पुन्हा समोर येण्यामागचे दुसरे कारण म्हणजे किम यांची प्रकृती.
किम जाँग उन यांचे वजन जास्त असून ते खूप धूम्रपान करतात. त्यांच्या जीवनशैलीमुळे त्यांना हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका अधिक असल्याचा इशारा दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेने वारंवार दिला आहे. किम कुटुंबात हृदयविकार आणि पक्षाघाताचा इतिहासही आहे.
किम जाँग उन यांच्याबाबत काही अनपेक्षित घडल्यास शेजारील देशांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठे परिणाम दिसून येऊ शकतात. नेतृत्वात अचानक निर्माण झालेल्या संकटामुळे उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांवरील नियंत्रण कोणाकडे राहील आणि देशात राजकीय अस्थिरता निर्माण होईल का, असे गंभीर प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
सत्तेसाठीच्या संघर्षामुळे कट्टरपंथी नेते आक्रमक पावले उचलण्यास प्रवृत्त होतील का? देशातील अस्थिरतेमुळे चीनच्या सीमेलगत निर्वासितांचे संकट निर्माण होऊ शकते का? हे प्रश्न केवळ बीजिंग आणि सोल यांच्यासाठीच नव्हे, तर दक्षिण कोरियात सुमारे 28 हजार सैनिक तैनात असलेल्या अमेरिकेसाठीही चिंतेचे आहेत.
किम जाँग उन यांच्याबाबतची कोणतीही बातमी मिळाल्यास त्यासाठी सज्ज राहता यावे, यासाठी गुप्तचर यंत्रणा त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवतात.
उत्तर कोरिया हा माहितीच्या दृष्टीने अत्यंत बंदिस्त देश असल्यामुळे त्याच्याबाबत खोट्या बातम्या पसरवणेही सोपे जाते. देशाच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत नियमितपणे पोहोचू शकणाऱ्या लोकांची संख्या अत्यंत कमी आहे. गुप्तचर यंत्रणांनाही विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे समोर येणाऱ्या अनेक माहितीबाबत ती अद्याप पडताळलेली नसल्याचे किंवा संबंधित दाव्याची शक्यता अधिक असल्याचे नमूद केले जाते.
उत्तर कोरियातील राजवटीकडूनही देशात नेमकं काय घडत आहे, हे लपवण्यासाठी जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा संशय आहे. त्यामुळेच दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचंही मानलं जातं.
त्यामुळे वानजुन झी यांना अशी महत्त्वाची बातमी अचानक कळली, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. उत्तर कोरियातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या लोकांनाही ही माहिती मिळाली नव्हती.
झी यांना कदाचित केवळ प्रसिद्धी हवी असावी किंवा प्योंगयांगशी असलेले बीजिंगचे संबंध अधोरेखित करून चीनला अडचणीत आणण्याचा त्यांचा हेतू असावा. मात्र, चीन आणि उत्तर कोरिया यांच्यातील हे संबंध जगजाहीर आहेत.
झी यांचा नेमका हेतू काहीही असो, उत्तर कोरियाच्या नेतृत्वाबाबत असलेल्या अनिश्चिततेचा फायदा घेणारे ते पहिलेच व्यक्ती नाहीत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)