तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू, 4 जखमी
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या मध्यवर्ती भागात गोळीबार होण्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याला "सक्रिय गोळीबार" (Active Shooter) घटना म्हणून संबोधलं आहे. यात एका व्यक्तीचा घटनास्थळी मृत्यू झाला असून अन्य चार जण जखमी झाले आहेत, अशी माहिती वॉशिंग्टन डीसी पोलीस विभागाचे अंतरिम प्रमुख जेफ्री डब्ल्यू. कॅरोल यांनी दिली.
कॅरोल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांना तातडीनं घटनास्थळी पाठवण्यात आलं आणि ते अवघ्या 30 सेकंदांत तिथं पोहोचले.
गोळीबारात जखमी झालेल्या चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून उर्वरित तिघांच्या जखमा गंभीर नसल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे.
ही घटना एका जिमच्या आत आणि तिथल्या परिसरात झाला. ही घटना पाहाणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं की, सुरुवातीला त्यांना व्यायामासाठी वापरल्या जाणाऱ्या बॉलचा स्फोट झाल्याचा आवाज वाटला. मात्र नंतर कोणाला तरी गोळी लागल्याचं समजलं.
ही घटना 15 व्ही आणि पी स्ट्रीट नॉर्थ-वेस्ट परिसरात घडली. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये मोठ्या संख्येनं पोलीस तैनात असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी सांगितलंय की, घटनेनंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.
घटनास्थळी उपस्थित होते बीबीसीचे प्रोड्युसर
वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या गोळीबाराच्या वेळी बीबीसीचे एक प्रोड्युसर जोनाथन चापो हे त्याच इमारतीत होते. त्यांनी त्या क्षणांचा थरारक अनुभव सांगितला.
"इमारतीत आग लागल्याचा अलार्म वाजत असल्यानं मी आग लागल्यावर वापरायच्या जिन्यावरून खाली उतरत होतो. मी बाहेर पडत असतानाच माझ्या अगदी जवळ गोळीबार झाला.
मला बंदुकीच्या गोळीबारामुळे उठलेला धूर दिसत होता. त्यानंतर आम्ही सर्वजण पळू लागलो.
आम्ही तात्काळ धावत जाऊन इमारतीजवळ असलेल्या विटांच्या छोट्या आडोशामागे लपलो.
थोड्याच वेळात इमारतीच्या व्यवस्थापकांनी आम्हाला एका सुरक्षित कक्षात नेण्यासाठी पुन्हा इमारतीत प्रवेश करण्यास सांगितलं. तोपर्यंत अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते, कारण सुमारे तीन मिनिटांपासून आग लागल्याचा अलार्म वाजत होता.
आणि मग सगळीकडून लोकांच्या किंचाळण्याचे आवाज येऊ लागले," असे चापो यांनी सांगितलं.
एका घटनेनंतर सक्रिय झालं 30 हून अधिक यंत्रणांचं जाळं
बीबीसीचे व्हाईट हाऊस वार्ताहर बर्न्ड डेबुसमन ज्युनिअर यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
ते सांगतात, गोळीबाराच्या घटनेनंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये घटनास्थळी विविध पोलीस आणि संरक्षण संस्थांचे कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात असल्याचं दिसतं. यात एफबीआय (FBI) आणि होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन्स (HSI) यांचाही समावेश होता.
अशा प्रकारची मोठी 'सुरक्षा प्रतिसाद मोहीम' वॉशिंग्टनमध्ये नवीन नाही. विशेषतः गोळीबाराच्या घटनांमध्ये परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत अनेकदा मोठ्या प्रमाणात संरक्षण यंत्रणा घटनास्थळी पोहोचतात.
शहरातील दैनंदिन कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी मेट्रोपॉलिटन पोलिस डिपार्टमेंटची (MPD) असते. उच्च जोखमीच्या घटनांना सामोरे जाण्यासाठी या विभागाकडे स्वतःचं 'विशेष आपत्कालीन प्रतिसाद पथक'ही आहे.
मात्र, एकूणच पाहिल्यास वॉशिंग्टनमध्ये 30 हून अधिक कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्था कार्यरत आहेत.
यामध्ये मोठ्या आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पाचारण केल्या जाणाऱ्या अनेक फेडरल संस्थांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, सीक्रेट सर्व्हिसची युनिफॉर्म्ड डिव्हिजन, यूएस पार्क पोलीस, कॅपिटॉल पोलीस, तसेच एफबीआय आणि HSI.
याशिवाय, शहरातील विशिष्ट भागांमध्ये काम करणारी काही छोटी फेडरल पोलीस यंत्रणाही आहेत. त्यात सुप्रीम कोर्ट पोलीस आणि फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिस यांचा समावेश होतो. तसेच अनेक विद्यापीठांकडे स्वतःची कॅम्पस पोलीस व्यवस्था आहे.
गेल्या वर्षी ट्रम्प प्रशासनानं शहरात 'अतिरिक्त कायदा अंमलबजावणी यंत्रणा' तैनात केल्या आणि नॅशनल गार्डही तैनात केलं. त्यानंतर अशा संरक्षण दलांची उपस्थिती काही प्रमाणात वाढली आहे.
उदाहरण म्हणून, 2022 मध्ये व्हॅन नेस परिसरातील एका निवासी इमारतीत गोळीबाराची घटना घडली होती. एका बंदूकधाऱ्यानं पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमधून शेकडो गोळ्या झाडून जवळच्या शाळेलाही लक्ष्य केलं होतं.
त्या वेळी काही मिनिटांतच परिसरात डझनभर फेडरल पोलीस वाहनं दाखल झाली होती. लष्करी शैलीची उपकरणं आणि शस्त्रसज्ज फेडरल अधिकारी तसेच मोठी सशस्त्र वाहनंही तिथं पोहोचली होती. लॉगन सर्कल परिसरात आज दिसलेल्या वाहनांसारखीच ही वाहने होती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमतर्फे प्रकाशित.