मराठवाड्यातल्या 100 महिला सौर ऊर्जेवर दूध व्यवसाय कसा चालवतात?

    • Author,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, धाराशिव
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"आधी आम्ही मिस्टरांना विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नव्हतो, पण आता आमच्या अकाऊंटला पैसे येत असल्याने मिस्टरसुद्धा आम्हाला विचारल्याशिवाय कोणती गोष्ट करत नाहीत."

जनाताई रणखांब या बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होत्या. त्या धाराशिव जिल्ह्यातील जहागिरदारवाडी गावात सौरऊर्जेवर चालणारी दूध डेअरी चालवतात.

त्यांच्या डेअरीवर गावातील शेतकरी दूध घेऊन येतात. या दुधाचं वजन, त्यातील फॅट आणि इतर घटक त्या स्वत: तपासतात. त्यानंतर दूध थंड ठेवण्यासाठी मिल्क चिलरचा वापर केला जातो. या संपूर्ण प्रक्रियेसाठी लागणारी वीज आता सौरऊर्जेतून मिळते.

त्यामुळे वीजेचं बिल येत नाही आणि ग्रामीण भागातील लोड शेडिंग प्रश्न भेडसावत नाही.

फक्त जनाताईच नाही तर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील सुमारे 100 गावांमध्ये महिला शेतकरी सौरऊर्जेवर चालणाऱ्या दूध डेअरी चालवत आहेत.

या महिला आर्थिक पातळीवर स्वावलंबी होतायत आणि त्यांच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल होताना दिसतायत.

दूध हा नाशवंत पदार्थ आहे. गायी-म्हशींचं दूध काढल्यानंतर ते वेळेत थंड करणं महत्त्वाचं असतं. वाहतुकीला उशीर झाला किंवा वीजपुरवठा खंडित झाला तर दुधाची गुणवत्ता घसरण्याची आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

त्यामुळे गावातच दूध थंड ठेवण्याची व्यवस्था असणं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं ठरतं.

"सोलार मिल्क चिलरचं युनिट ऑटोमॅटिक चालतं. कुलिंग होतं आणि पाणी खाली पडतं. त्यामुळे दूध थंड होतं. कधी दुधाच्या टेम्पोला उशीर झाला, तर दूध चिलरमध्ये ठेवावं लागतं. त्यामुळे सोलरची गरज आहे," असं जनाताई सांगतात.

ऊसतोड कामगार ते दूध डेअरीच्या मालकीण

लहान वयातच लग्न झाल्यानंतर जनाताई ऊसतोड कामगार म्हणून काम करत होत्या.

नंतर शेतीचं काम सुरू केलं. पण फक्त शेती करूनच प्रपंच चालत नाही हे जनाताईंना समजलं. तेव्हा त्या स्वयं शिक्षण प्रयोग म्हणजे SSP या संस्थेशी जोडल्या गेल्या.

SSP ने CSRच्या माध्यमातून धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात सौर ऊर्जेवर चालणार्‍या दूध डेअरींचा उपक्रम राबवला आहे. त्यापैकी एक डेअरी जनाताई चालवतात.

तसंच प्रोमिथियन पॉवर सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून त्यांना तंत्रज्ञान सहाय्य होत आहे.

अशा 100 महिला दूध डेअरीच्या माध्यमातून मराठवाड्यात स्वतः उत्पन्न मिळवत आहेत. यातून घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करण्याची क्षमता त्यांच्यात आली आहे.

या उपक्रमाचं वैशिष्ट्य केवळ महिलांनी डेअरी चालवणं एवढंच नाही. तर डेअरीत दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरातील महिलेच्या बँक खात्यात दुधाचे पैसे जमा केले जातात.

दूध कलेक्शन सेंटरमध्ये दूध आणल्यानंतर त्याचं वजन आणि फॅट तपासलं जातं. त्यानुसार दुधाची किंमत निश्चित होते. या व्यवहाराची माहिती महिलांना त्यांच्या मोबाईलवर SMSद्वारे मिळते. तर दर महिन्याला दुधाचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होतात.

जनाताई सांगतात, "महिलांना बोलावून त्यांच्या नावाने आम्ही अकाऊंट उघडतो. त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात. आधी पैसे पुरुषांच्या हातात जायचे. आता पुरुषांना विचारायची गरज नाही की, मी अमुक गोष्ट खरेदी करू का. स्वतः जाऊन गोष्टी करू शकता. मी स्वतः माझ्या पैशांची मालकीण आहे."

महिलांच्या हाती पैसे आल्यावर काय बदलतं?

महिलांच्या हातात थेट पैसा आल्याने कुटुंबातील आर्थिक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग वाढल्याचं स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेचं म्हणणं आहे.

पूर्वी जनावरांची देखभाल करण्यापासून दूध काढण्यापर्यंतची बहुतांश कामं महिला करत होत्या. मात्र, दुधाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांवर त्यांचा थेट अधिकार नसायचा. पण आम्ही उभारलेल्या व्यवस्थेमुळे महिलांच्या श्रमाचे दाम त्यांच्या बँक खात्यावर जमा होतेय, असं SSPच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नसीम शेख यांनी सांगितलं.

स्वयं शिक्षण प्रयोग (SSP) ही संस्था स्थानिक शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत आहे.

या उपक्रमाचा सुमारे 3 हजार महिलांना लाभ होत असल्याचं संस्थेने नमूद केलं आहे.

प्रत्येक केंद्रात सुमारे 3 किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनेल असून त्यामध्ये दिवसभर 250 लिटर दूध साठवण्याची क्षमता आहे.

या केंद्रांमधून दररोज सरासरी 10 हजार लिटर दूध संकलित केलं जातं.

एका महिलेच्या किंवा महिलांच्या गटाच्या माध्यमातून केंद्र चालवलं जातं, असं या संस्थेच्या फिल्ड ऑफिसर आणि मंजिरी सखी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालिका दिपाली थोडसरे सांगतात.

या व्यवस्थेचा नेमका काय फायदा झाला हे विचारलं असता थोडसरे सांगतात, "सोलार मिल्क चिलरमुळे वीजेवर कोणताही खर्च न करता सकाळचं आणि संध्याकाळचं दूध एकाच ठिकाणी थंड करून साठवणं महिलांना शक्य झालं आहे. त्यामुळे दूध वाहून नेण्यासाठी दिवसातून दोनदा गाडी पाठवण्याची गरज कमी होते. दूध खराब होण्याचा धोका कमी होतो आणि वाहतुकीचा खर्चही वाचतो."

'पैसा आणि आत्मविश्वास दोन्ही वाढू लागला'

SSPने CSRच्या माध्यमातून या उपक्रमाच्या सुरुवातीला दूध थंड करण्यासाठी लागणारी यंत्रं आणि इतर उपकरणं महिलांना देण्यात आली होती.

पण सुरुवातीची यंत्रं विजेवर चालत असल्याने वीजबिलाचा खर्च व्यवसायासाठी अडचणीचा ठरत होता.

दिपाली थोडसरे सांगतात की, सुरुवातीला चिलिंग युनिट, फॅट आणि एसएनएफ तपासण्याची मशीन, दुधाचे कॅन अशी उपकरणं महिलांना दिली जात होती. मात्र, या उपकरणांमुळे दरमहा सुमारे 1,500 ते 1,800 रुपयांचं वीजबिल येत होतं. त्यामुळे महिलांच्या हातात व्यवसायातून अपेक्षित फायदा राहत नव्हता.

यानंतर स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून डेअरी चालवण्यासाठी आवश्यक सौरऊर्जा यंत्रणा महिलांना CSRच्या माध्यमातून विनामूल्य देण्यात आली. त्यामुळे वीजबिलापोटी खर्च होणारी रक्कम वाचू लागली.

दुसऱ्या बाजूला वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दूध तातडीने जिल्हा पातळीवरील केंद्रावर नेण्याची गरजही या व्यवस्थेमुळे कमी झाली आहे, असं दिपाली यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

या व्यवसायातून जनाताईंना केवळ आर्थिक उत्पन्न मिळालं नाही, तर स्वतःकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही बदलला.

त्या सांगतात, "आधी काहीच कळत नव्हतं. लोकांचं बोलणं खायचे. लोक जे काम सांगतील तेच करायचं. पण SSPमध्ये गेल्यावर वेगळा अनुभव आला. लोकांची मजुरी करणं थांबवलं. आता चांगली कामं करायची ठरवलं."

स्वयंशिक्षण प्रयोग ही संस्था महिला उद्योजकता, स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेतीवर काम करते.

महिलांना केवळ व्यवसाय सुरू करून देण्याऐवजी त्यांना व्यवसाय व्यवस्थापन, बाजारपेठेशी जोडणं आणि आर्थिक व्यवहारांचं प्रशिक्षण देण्यावरही संस्थेचा भर आहे.

दुष्काळात दूध व्यवसाय कसा चालणार?

या भागात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ अशी परिस्थिती वारंवार निर्माण होते.

यंदा मराठवाडाच नाही तर महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताला एल-निनोचा फटका बसला आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत जनावरांची विक्री करण्यापासून ते शेतीतील उत्पन्न घटण्यापर्यंत अनेक संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं.

दूध डेअरीमुळे शेतीला जोडधंदा म्हणून महत्त्वाचा ठरतो. पण जनावरांसाठी लागणारा चारा आणि पाणी उपलब्ध असणं तितकंच महत्त्वाचं आहे. यंदा पाणीटंचाईमुळे चाऱ्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे दूध उत्पादनाचा खर्चही वाढल्याचं शेतकरी सांगतायत.

उन्हाळ्यात उष्णतेचा जनावरांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.

याशिवाय दुधाच्या भावातील चढ-उतार, जनावरांच्या औषधोपचाराचा खर्च, दुधाची गुणवत्ता टिकवणं आणि यंत्रांची देखभाल अशी आव्हानंही आहेत.

त्यामुळे या व्यवसायातून महिलांच्या हातात प्रत्यक्ष किती निव्वळ उत्पन्न राहतं, याचाही अभ्यास होणं आवश्यक आहे.

सौरऊर्जा उपलब्ध झाली तरी सौर पॅनेल, इन्व्हर्टर आणि मिल्क चिलर यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे.

सौरऊर्जेमुळे विजेचा खर्च आणि वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी झालं आहे. पण पाणीटंचाई, वाढता चारा खर्च आणि हवामानातील अनिश्चितता ही आव्हानं कायम आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)