तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
जेन्सन हुआंग : कुटुंबवत्सल अशी प्रतिमा ते दोन विवाहबाह्य संबंधांचा खुलासा, Nvidiaच्या सीईओचा प्रवास
शेअरहोल्डर्सच्या मीटिंगसाठी जेन्सेन ते काळ्या लेदरचं जॅकेट घालून यायचे. त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांचे प्रमुख त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला उत्सुक होते. त्यांचे गुंतवणूकदार त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून पाहायचे.
कुटुंबवत्सल व्यक्ती अशी त्यांची प्रतिमा होती. मात्र, खाजगी आयुष्यातल्या त्यांच्या बेधडक वागण्यामुळे त्यांना जगातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या एनव्हीडियाच्या मुख्य कार्यकारी पदाचा राजीनामा द्यावा लागला. जगभरात सध्या याच व्यक्तीच्या नावाची चर्चा आहे. ही व्यक्ती आहे जेन्सन हुआंग.
63 वर्षांचे हुआंग यांचं लग्न 1985 साली झाली होतं. त्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या एनव्हीडिया (Nvidia) कंपनीची स्थापना होण्याच्या आधीपासूनच ते विवाहित होते.
हुआंग हे कामाच्या बाबतीत प्रचंड मेहनती आहेत. आपल्या सहकाऱ्यांकडून त्यांना उच्च दर्जाच्या कामाची अपेक्षा असते, यामध्ये त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या त्यांच्या मुलांचाही समावेश आहे.
मात्र, या आठवड्यात समोर आलेल्या प्रेमसंबंधामुळे त्यांची प्रतिमा पूर्णपणे ढासळली आहे.
या संबंधांबद्दल जी माहिती उघड झाली, त्यामुळे त्यांच्या कामावरील लक्ष आणि निर्णयक्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दोन विवाहबाह्य संबंधांबाबत सलग दोन खुलासे झाल्यानंतर गुरुवारी त्यांनी राजीनामा दिला. पहिला खुलासा एका व्यावसायिक महिलेसोबतच्या त्यांच्या संबंधांबाबत होता. ही महिला चिनी गुप्तहेर असल्याचा आरोप आहे. या वृत्तानं जगभरात खळबळ उडाली. गुंतवणूकदारांसाठीही हा धक्काच होता.
त्यानंतर बुधवारी (11 नोव्हेंबर) तंत्रज्ञान क्षेत्रातील या दिग्गजाचे एनव्हीडियामधील एका सहकाऱ्यासोबतही विवाहबाह्य संबंध असल्याचं वृत्त समोर आलं.
हुआंग यांच्या राजीनाम्यामुळे जागतिक शेअर बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. गेल्या काही आठवड्यात जागतिक शेअर बाजाराला अनेक धक्के बसले होते. चीनशी सुरू असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील वर्चस्वाच्या स्पर्धेत एनव्हीडियाची भूमिका अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
इलॉन मस्क किंवा मार्क झुकरबर्ग यांच्याइतकं जेन्सन हुआंग हे सर्वसामान्यांच्या परिचयाचं नाव नसावं.
मात्र, गेल्या तीन वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात झालेल्या प्रचंड विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, तंत्रज्ञान उद्योगातील त्यांची भूमिका अधिक निर्णायक ठरू शकते. नव्या तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मायक्रोचिपच्या बाजारपेठेवर एनव्हीडियाचे वर्चस्व आहे.
अलीकडच्या घडामोडींनंतरही या कंपनीचे बाजारमूल्य जवळपास चार ट्रिलियन डॉलर (3.02 ट्रिलियन पौंड) आहे. अमेरिका आणि चीन या जगातील दोन प्रमुख तंत्रज्ञान आणि आर्थिक महासत्तांमधील एआय क्षेत्रातील स्पर्धेच्या केंद्रस्थानी ही कंपनी आहे.
'तंत्रज्ञान क्षेत्रातील टेलर स्विफ्ट'
हुआंग यांना राजकीय सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळात प्रवेश मिळाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या दोघांकडूनही त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात होता.
आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर पोहोचलेल्या हुआंग यांना 'तंत्रज्ञान क्षेत्रातील टेलर स्विफ्ट' असंही म्हटलं जातं. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, त्यांची अंदाजित संपत्ती 145 अब्ज डॉलर इतकी आहे.
नेहमी काळ्या रंगाचे वैशिष्ट्यपूर्ण कपडे परिधान करणारे आणि गुंतवणूकदारांसमोर सादरीकरण करताना खेळकर शैलीचा वापर करणारे हुआंग यांनी अनेक वर्षे स्वतःची प्रतिमा एक 'कुटुंबवत्सल व्यक्ती' आणि 'अमेरिकन स्वप्नाचे प्रतीक' म्हणून जपण्याचा प्रयत्न केला.
1963 मध्ये तैवानमध्ये जन्मलेल्या हुआंग यांचे कुटुंब ते नऊ वर्षांचे असताना अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थलांतरित झाले. त्यांनी ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर स्टॅनफर्ड विद्यापीठातून याच विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
महाविद्यालयातच त्यांची भेट त्यांची पत्नी लॉरी मिल्स यांच्याशी झाली. दोघेही प्रयोगशाळेत एकत्र काम करत होते. 1985 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यानंतर आठ वर्षांनी हुआंग यांनी एनव्हीडियाची स्थापना केली.
त्यांना मॅडिसन आणि स्पेन्सर अशी दोन मुलं आहेत. ही दोघंही सध्या एनव्हीडियामध्ये वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत.
सुरुवातीला गेमिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर चिप्स आणि सर्किट्सचा पुरवठा करणारी कंपनी म्हणून एनव्हीडियाने आपले स्थान निर्माण केले. त्यानंतर कंपनीने नव्या क्षेत्रात विस्तार केला. आता वाढत्या एआय तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या प्रोसेसिंग चिप्सची निर्मिती कंपनी करते.
हुआंग यांनी एआयला 'नवी औद्योगिक क्रांती' असं म्हटलं जातं. त्यांच्या मते, ही क्रांती वीजेच्या शोधाइतकीच महत्त्वाची आहे.
एनव्हीडिया ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मूल्य असलेली कंपनी आहे. गुगल, मेटा, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, स्पेसएक्स, टेस्ला, ओपनएआय आणि अँथ्रोपिक यांसारख्या जगातील आघाडीच्या कंपन्या एनव्हीडियाच्या ग्राहक आहेत. या सर्व कंपन्या एनव्हीडियाच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत.
त्यामुळेच व्हाइट हाऊसमध्ये नुकत्याच झालेल्या एआय परिषदेत 42 जणांमधून हुआंग यांची अध्यक्ष ट्रम्प यांच्या सोबत उभं राहण्यासाठी निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत इलॉन मस्कही होते. या दोघांचेही ट्रम्प यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे सर्वश्रुत आहे.
स्टीव्ह जॉब्स यांच्याशी तुलना?
जेन्सन हुआंग यांचे चरित्र लिहिणारे आणि 'थिंकिंग मशीन' या पुस्तकाचे लेखक स्टीफन विट यांनी बीबीसीशी बोलताना त्यांची तुलना दिवंगत अॅपलचे प्रमुख स्टीव्ह जॉब्स यांच्याशी केली.
'स्टीव्ह जॉब्स यांच्याप्रमाणेच जेन्सन हुआंग हे तंत्रज्ञान क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते आहेत,' असं त्यांनी म्हटलं. आज आपण पाहतो त्या स्वरूपातील एआयसाठी आवश्यक हार्डवेअर तयार करण्याचे श्रेयही त्यांनी हुआंग यांना दिले.
विट यांनी हुआंग यांचं वर्णन 'खूप अपेक्षा ठेवणारे बॉस' असं केलं. ते आपल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या क्षमतेच्या मर्यादेपर्यंत काम करून घेतात, असंही त्यांनी म्हटलं.
मात्र, एनव्हीडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी हुआंग हे 'अत्यंत बुद्धिमान' आणि 'जागतिक दर्जाचे कॉम्प्युटर सायंटिस्ट' असले, तरी त्यांच्यात 'काही प्रमाणात अहंकार' असल्याचंही विट यांनी म्हटलं.
हुआंग यांनी स्वतःची 'कुटुंबवत्सल व्यक्ती' अशी प्रतिमा जपण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. ही गोष्ट त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं विट यांनी सांगितलं.
'ते आपल्या पत्नीचं नेहमी कौतुक करतात. तिच्याबद्दल गौरवोद्गार काढतात,' असंही विट यांनी म्हटलं.
"या खुलाशांचा कोणत्याही कुटुंबावर वाईट परिणाम झाला असता. मात्र, स्वतःची कुटुंबवत्सल व्यक्ती अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी ज्यांनी इतके प्रयत्न केले आणि आपल्या मुलांना कायम जवळ ठेवले, अशा व्यक्तीसाठी या घटनांचा परिणाम अधिक गंभीर आहे."
हुआंग यांच्या विवाहबाह्य संबंधांबाबतचे वृत्त 29 ऑक्टोबरला 'न्यूयॉर्क टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाले. त्यांचं अॅलिस हुआंग (नावात साम्य असले तरी नातेवाईक नाहीत) या महिलेसोबत संबंध असल्याचं या वृत्तात म्हटलं होतं.
सिंगापूरमधल्या 'मेगास्पीड' या कंपनीशी संबंधित असलेली ही व्यावसायिक महिला चीनच्या गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा आरोप अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी केला.
या विवाहबाह्य संबंधांबाबत खुलासा झाल्यानंतर हुआंग यांनी पत्नीशी 'प्रतारणा' केल्याची कबुली दिली आणि आपल्या कुटुंबाला झालेल्या दुःखाबद्दल माफी मागितली.
ट्रम्प यांच्यासह एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर नेत्यांनी सुरुवातीला हुआंग यांनी एनव्हीडियाच्या प्रमुखपदी कायम राहावे, अशी भूमिका घेतली होती. ट्रम्प यांनी त्यांचे वर्णन 'सन्माननीय व्यक्ती' असं केलं होतं.
मात्र, एनव्हीडियामध्ये गेल्या 18 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि कंपनीच्या हेल्थकेअर विभागाच्या उपाध्यक्ष असलेल्या किम्बर्ली पॉवेल यांच्यासोबतही हुआंग यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे वृत्त समोर आलं. त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली आणि हुआंग पदावरून पायउतार होत असल्याची घोषणा करण्यात आली.
या वृत्तानंतर ट्रम्प यांनी हुआंग यांनी 'उत्कृष्ट काम' केल्याचं म्हटलं. एनव्हीडियाच्या प्रमुखपदासाठी अॅपलचे टीम कुक यांचं नाव योग्य पर्याय म्हणून सुचवलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)