जेव्हा दिवसाढवळ्या गुलशन कुमार यांची हत्या झालेली; बॉलिवूडमधला अंडरवर्ल्डच्या दहशतीचा 'तो' काळ कसा होता?

फोटो स्रोत, Google
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
12 ऑगस्ट 1997 ची सकाळ, टी-सीरिज कंपनीचे मालक गुलशन कुमार नेहमीप्रमाणे अंधेरीतल्या एका मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन ते बाहेर आले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
त्यांना गोळी लागली. आपला जीव वाचवण्यासाठी ते धावू लागले. जवळच्याच एका सार्वजनिक शौचालयात ते घुसले. पाठोपाठ हल्लेखोरही आले. त्यांनी गुलशनकुमार यांच्यावर 15 गोळ्या झाडल्या.
गुलशन कुमार यांच्यावर एकूण 16 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांचा मृत्यू झाला.
हा गोळीबार सुरू असताना हल्लेखोराने त्याचा सेलफोन चालू ठेवला होता. पलिकडच्या व्यक्तीला सगळं काही ऐकू जात होतं. ते ऐकू यावं असा आदेशच त्याने हल्लेखोराला दिला होता. हा आदेश देणारी व्यक्ती होती गँगस्टर अबू सालेम.
हुसैन झैदी यांच्या 'डोंगरी टू दुबई' या पुस्तकात या सगळ्या प्रसंगाचं सविस्तर वर्णन आहे.
15 ते 20 मिनिटांचा हा थरार ज्याने मुंबई आणि चित्रपटसृष्टी हादरून गेली. खंडणी द्यायला नकार दिला म्हणून घडवून आणलेली ही हत्या थरकाप उडवणारी, चित्रपटसृष्टीवर दहशत बसवणारी होती.
त्याआधीही मार्च 1997 मध्ये निर्माता मुकेश दुग्गल यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचे धागेदोरेही अंडरवर्ल्डसोबत जोडले गेले होते.
हा तोच काळ होता, जेव्हा गुन्हेगारी विश्वाने बॉलिवूडमध्ये 'व्यावसायिक' रस घ्यायला सुरुवात केली होती. त्यातूनच या उद्योगावर आपली दहशत बसवण्याच्या प्रयत्नात धमक्या, हल्ल्यांचं सत्र सुरू झालं होतं.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा हा काळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबारानंतर.
रविवारी (18 ऑक्टोबर) बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर जुहू परिसरात गोळीबार झाला. या प्रकरणी वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 10 संशयितांना ताब्यात घेतलं आहे किंवा अटक केली आहे.
तपासादरम्यान अनेक राज्यांमधून शस्त्रांची कथित वाहतूक कशी झाली, तसेच हल्लेखोरांना करण्यात आलेल्या कथित आर्थिक व्यवहारांचाही तपास केला जात आहे.
या गोळीबाराच्या प्रयत्नामुळे भारतातील कुख्यात गुंडांपैकी एक असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. हल्ल्यानंतर लगेचच सोशल मीडियावरील एका पोस्टचा स्क्रीनशॉट ऑनलाइन प्रसारित झाला. बिश्नोई टोळीच्या कथित साथीदाराने ही पोस्ट केल्याचा दावा करण्यात आला आणि त्यात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती.

फोटो स्रोत, ANI
यानंतर एक ऑडिओ रेकॉर्डिंगही समोर आले. त्यात अनिल पंडित असे स्वतःची ओळख सांगणाऱ्या एका व्यक्तीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा पुन्हा केला. अभिनेता सलमान खानशी कथित संबंध असल्यामुळे टायगर श्रॉफला लक्ष्य करण्यात आल्याचेही त्याने म्हटले.
मात्र, मुंबई पोलिसांनी या दाव्यांची पुष्टी केलेली नाही. या गोळीबाराच्या प्रयत्नामागे बिश्नोई टोळीच होती, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्ल्याचा आदेश कोणी दिला आणि त्यामागचे कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याची ही घटना बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित धमक्या आणि हल्ल्यांच्या मालिकेनंतर घडली आहे. 2024 मध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता, तर याच वर्षाच्या सुरुवातीला चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेरही गोळीबार झाला होता.
या घटनांमुळे चित्रपटसृष्टीत संघटित गुन्हेगारीचे जाळे किती खोलवर पोहोचले आहे, याबद्दल पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच, मुंबईच्या इतिहासातील गुन्हेगारीच्या एका काळ्याकुट्ट पर्वाच्या आठवणीही ताज्या झाल्या आहेत.
काय होता बॉलिवूड आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या संबंधांचा इतिहास?
हाजी मस्तान आणि बॉलिवूड
हाजी मस्तानपासून फिल्म इंडस्ट्री आणि अंडरवर्ल्डच्या जवळीकीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
हाजी मस्तानला मुंबईतील चित्रपटसृष्टीबद्दल खूप आकर्षण होतं. त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केलीच, शिवाय एका 'स्ट्रगलर' अभिनेत्रीशी लग्नसुद्धा केलं होतं.
पत्रकार आणि लेखक हुसैन झैदी यांनी याबद्दल बोलताना म्हटलं होतं, "मस्तान तरुणपणी मधुबालाचे चाहते होते आणि तिच्याशी लग्न करायची त्याची इच्छा होती. पण मधुबालाचं लवकर निधन झालं आणि तसंही ती जिवंत असती तरी मस्तानला तिच्याशी कधीच लग्न करता आलं नसतं."
"त्या काळी मुंबईत मधुबालासारखी दिसणारी एक अभिनेत्री काम करत होती. तिचं नाव होतं वीणा शर्मा उर्फ सोना. मस्तानने तिच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तिने तो तत्काळ स्वीकारला. मस्तानने सोनासाठी जुहूमध्ये एक घर विकत घेतलं आणि तिथे तिच्या सोबत राहू लागला."

फोटो स्रोत, SUNDER SHEKHAR
हळूहळू मुंबईतील 'व्हीआयपी' लोकांच्या वर्तुळात मस्तानचं स्थान स्थिरस्थावर होऊ लागलं आणि त्याचा तस्करीचा कालखंड लोक विसरू लागले. हाजी मस्तानला पहिल्या पत्नीपासून 3 मुली होत्या आणि नंतर त्याने सुंदर शेखर नावाच्या एका मुलाला दत्तक घेतलं.
सुंदर शेखर यांनी सांगितलं होतं, "चित्रपटसृष्टीतील अनेक लोक बाबांच्या जवळचे होते. राज कपूर, दिलीप कुमार आणि संजीव कुमार हे त्यापैकी प्रमुख लोक होते. दिवार चित्रपट तयार होत होता त्या काळात त्या चित्रपटाचे लेखक सलीम आणि अमिताभ बच्चन अनेकदा बाबांना भेटायला येत असत, जेणेकरून त्या पात्राचा सखोल वेध घेता यावा. बाबा केस कायम मागे वळवत असत. कोणी त्यांच्याशी इंग्रजीत बोलायला लागलं तर ते वारंवार 'या-या' असं म्हणत राहत."
अंडरवर्ल्डचा सिनेमातला 'व्यावसायिक' रस
हाजी मस्तानला सिनेमा जगताचं आकर्षण होतं...पण 1990 नंतर अंडरवर्ल्डला सिनेमात व्यावसायिक रस निर्माण झाला. या व्यवसायात पैसा होता आणि तोच अनेक गँगस्टर्सना खुणावत होता.
1999 मधे एक स्पॉटबॉय चित्रपट निर्माता बनला, त्याच्या सिनेमात त्यावेळेचा सुपरस्टार सलमान खान नायक म्हणून काम करत होता. हा स्पॉटबॉय होता भारतातील फरार गँगस्टर आणि दाऊद इब्राहिमचा विश्वासू छोटा शकील याचा विश्वासू हस्तक नझीम रिझवी. सिनेमा होता चोरी चोरी चुपके चुपके.
महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केला होता. त्यांनी आपल्या 'द ब्रह्मास्त्र अनलिश्ड' या पुस्तकात सविस्तरपणे या केसबद्दल लिहिलं आहे.
1999 साली शिवानंदन यांना त्यांच्या सूत्राकडून माहिती मिळाली. या माहितीनुसार, दहशतवादी कारवायांद्वारे मिळवलेल्या पैशांमधून शकील एक हिंदी सिनेमा निर्माण करू इच्छित होता. हा पैसा हवालामार्गे एका कोट्यधीश हिरे व्यापारी आणि व्यावसायिकाकडे पोहोचवला जाईल. तो व्यापारी हा पैसा चित्रपटनिर्मात्यांपर्यंत पोहोचवेल, अशी माहिती होती. हा व्यापारी म्हणजे भरत शहा.
ही माहिती मिळाल्यानंतर शिवानंदन यांनी तत्कालिन अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांना भेटून रिझवीचा फोन टॅप करण्याची परवानगी मिळवली. ती तशी मिळाली.
शकील रिझवीसोबत दररोज संपर्कात असल्याचं लक्षात आलं. या फोनकॉलमधून इतरही अनेक धक्कादायक खुलासे समोर येत होते. यामध्ये शकीलच्या खंडणीच्या मागणीला प्रतिसाद न दिल्याबद्दल निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशनवर हल्ला करण्याच्या योजनेचाही समावेश होता.

फोटो स्रोत, Indus Source Books
दरम्यान, आपल्या सिनेमाची प्रसिद्धी, त्याच्या प्रदर्शनाच्या योजनेबाबतही शकील-रिझवी चर्चा करत होते.
या सगळ्या प्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचने 2000 साली एफआयआर दाखल केली. नझीम रिझवी आणि अब्दुल रहीम खान यांना अटक केली. भरत शहालाही जानेवारी 2001 मध्ये अटक झाली. या प्रकरणात 'मकोका' आणि भारतीय दंडविधान संहिता तसंच भारतीय शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली दोनपेक्षा जास्त आरोपपत्रं दाखल करण्यात आली.
खटल्याच्या दरम्यान तपासण्यात आलेल्या 76 साक्षीदारांपैकी 14 जण बॉलिवूडमधले कलाकार होते. पण प्रीती झिंटा सोडून सर्व साक्षीदार उलटले, त्यांनी गुन्हेगारी जगताविरुद्ध 'ब्र' काढला नाही, असं शिवानंदन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.
2 वर्षं हा खटला चालला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए.पी. बंगाळे यांनी भरत शहाला दोषी ठरवलं. नझीम रिझवी आणि अब्दुल रहीम यांना 6 वर्षं कारावासाची शिक्षा झाली.
गुलशनकुमार हत्या, बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींवरील हल्ले
लेखाच्या सुरुवातीलाच उल्लेख केलेला गुलशनकुमार यांच्या हत्येचा प्रसंग हा गुन्हेगारी जगतावर दहशत बसवण्याचा टोकाचा प्रयत्न होता.
या हल्ल्यात जे नाव समोर आलं ते होतं अबू सालेम याचं.
मूळचा उत्तर प्रदेशच्या आझमगढचा असलेला सालेम 1993 च्या बॉम्बस्फोटांपूर्वी दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम याच्याकडे ड्रायव्हर आणि वस्तू पोहोचवण्याचं काम करत होता.
अनीस फोनवरून अबू सालेमला वेळोवेळी काही ना काही सूचना द्यायचा. दाऊदशी त्यांचा थेट संपर्क नव्हता, मात्र आपण आता कोणीतरी 'मोठे' झालो आहोत असं त्याला वाटू लागलं होतं.
हुसैन झैदी यांच्या मते 1993 साली चित्रपट अभिनेता संजय दत्तने अनीसला फोन करून आपल्याला धमक्या मिळत असल्याचं आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी काही बंदुका हव्या असल्याचं सांगितलं.
त्यानंतर अनीसने अबू सालेमला फोन करून, "जा, संजूकडे मशीनगन पोहोचवून ये," असं सांगितलं. आयुष्यात पहिल्यांदाच अबू सालेमची एखाद्या चित्रपट अभिनेत्याशी भेट झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई बॉम्बस्फोटांनंतर नोंदवण्यात आलेल्या जबाबामध्ये अबू सालेमने अभिनेत्याला प्रत्यक्ष पाहून थक्क झाल्याचं म्हटलं होतं. त्याने संजय दत्तला किमान 3 वेळा मिठी मारली होती.
मात्र, नंतर संजय दत्तने आपल्याला इतक्या बंदुका नको असून एकच बंदूक पुरेशी असल्याचे सांगितले. त्यामुळे सालेमला बंदूक घेऊन परतावे लागले.
माध्यमांनी त्याला 'डॉन' म्हटले, मात्र त्याच्याविरोधात तेव्हा फार मोठे गुन्हे नव्हते. बंदूक पोहोचवणे हाच त्याचा सर्वात मोठा गुन्हा होता. पण दुबईला गेल्यानंतर अनीसच्या हाताखाली काम करताना तो फोनवरून लोकांना धमक्या देऊ लागला. त्यामुळे लोकांना तो 'डॉन' वाटू लागला.
यानंतर अबू सालेमने चित्रपट निर्माते गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचला आणि त्यांची हत्या घडवून आणली. या घटनेनंतर तो कुख्यात झाला.
ज्येष्ठ पत्रकार चंद्रमोहन पुप्पाला यांनी गुलशनकुमार यांच्या हत्येचं वार्तांकन केलं होतं.
या सगळ्याबद्दल बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं, "त्या प्रकरणात अशा प्रकारची घटना घडू शकते, अशी शक्यता दर्शवणारी माहिती मुंबई पोलिसांना आधीच मिळाली होती. त्या काळात वृत्तपत्रांच्या कार्यालयांमध्ये गुंडांचे फोन यायचे. पत्रकारांच्या माध्यमातून आपली बाजू किंवा निवेदन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करायचे."
पुप्पाला यांच्या मते, गुन्हेगारीविषयक बातम्या देणाऱ्या पत्रकारांचे पोलीस अधिकारी आणि गुन्हेगारी जगतातील सूत्रांशी संपर्क असायचे. वेगवेगळ्या स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ते बातम्या लिहायचे.
गुलशन कुमार यांच्या हत्येचा संदर्भ देताना पुप्पाला म्हणाले की, त्यांना धमक्या मिळत असल्याची माहिती समोर आली होती.
"त्या काळात काही लोकांनी या धमक्यांना गांभीर्याने घेऊन स्वतःच्या सुरक्षेची व्यवस्था केली होती. त्यावेळी गुंड एखाद्यावर हल्ला करून आपली दहशत आणि प्रभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचे."

फोटो स्रोत, Getty Images
निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता ऋतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांच्यावर 21 जानेवारी 2000 ला हल्ला करण्यात आला. गँगस्टरच्या खंडणीच्या मागण्या अमान्य केल्यामुळे हा हल्ला झाला होता.
'गुप्त'सारख्या यशस्वी सिनेमाचे दिग्दर्शक राजीव राय यांच्यावरही 1997 साली हल्ला झाला होता. अबू सालेम टोळीशी कथितरीत्या संबंधित असलेल्या 5 हल्लेखोरांनी मध्य मुंबईत राजीव राय यांच्यावर हल्ला केला होता.
राय आपल्या ऑफिसमधून निघाले असताना त्यांच्यावर गोळ्या चालविण्यात आल्या. राय यांना आधीही धमक्या मिळाल्या होत्या.
त्यामुळे त्यांना सुरक्षाव्यवस्था, अंगरक्षक पुरविण्यात आले होते. या अंगरक्षकांनीच हल्लेखोरांना रोखलं. चकमकीदरम्यान एक हल्लेखोर जखमी झाल्याचंही सांगण्यात येतं.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये गँगस्टर्सना रस का?
चित्रपटसृष्टीत अंडरवर्ल्डकडून कथित निधीपुरवठा आणि गुंतवणूक याबद्दल चंद्रमोहन पुप्पाला यांनी सांगितलं की, चित्रपट व्यवसायातून पैसे कमावण्याची शक्यता लक्षात घेता रोख रक्कम गुंतवून त्यातून नफा मिळवता येईल असं गँगस्टर्सना वाटत होतं.
चित्रपट कलाकारांशी संपर्क प्रस्थापित करणे, हेही गुंडांसाठी आकर्षणाचे कारण होते, असे पुप्पाला सांगतात.
एखाद्या सेलिब्रिटीशी जवळचे संबंध असल्याचे दाखवल्याने आपली ओळख वाढू शकते आणि गुन्हेगारी जगतातील आपले स्थान व प्रभाव अधिक मजबूत होऊ शकतो, असंही त्यांना वाटत होतं.
पुप्पाला यांच्या मते, काही गँगस्टर्स चित्रपट कलाकारांना पार्ट्या आणि कार्यक्रमांसाठी आमंत्रित करत असत. त्यांनी चित्रपटांमध्ये गुंतवणूक करण्याच्या प्रयत्नांचाही उल्लेख केला.
अबू सालेमचे उदाहरण देताना पुप्पाला यांनी म्हटलं, त्या काळात चित्रपटसृष्टीत गुंतवणूक करणे, कथित संरक्षण पुरवणे आणि विविध मागण्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले जात असत.
पुप्पाला यांच्या मते, काही गुंड चित्रपटसृष्टीतील गुंतवणूक किंवा संरक्षणाशी संबंधित प्रकरणे आपण हाताळू शकतो, असा दावा करत असत. अशा दाव्यांद्वारे आणि आरोपांद्वारेही ते आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करत असत.
बॉलिवूड पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या दहशतीच्या छायेत?
टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण होत आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
हाच प्रश्न बीबीसी हिंदीने चंद्रमोहन पुप्पाला यांना विचारला. त्यांनी म्हटलं, "पुन्हा एकदा म्हणणं योग्य ठरणार नाही. ठराविक काळाने अशा घटना घडलेल्या पाहायला मिळतात."
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू इथल्या घराजवळ फेब्रुवारी 2026 ला गोळीबार करण्यात आला होता.
हा हल्ला शुभम लोणकर टोळीने केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. या हल्ल्याचा उद्देश खंडणी वसूल करून दहशत निर्माण करणं असल्याचंही पोलिसांनी म्हटलं होतं.
सप्टेंबर 2025 मध्ये उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये अभिनेत्री दिशा पाटनीचे वडील जगदीश पाटनी यांच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळीबार केला होता.
या हल्ल्याची जबाबदारी गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांच्या टोळीने घेतली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपण हा हल्ला केल्याचं म्हटलं होतं.
डी शिवानंदन यांना दहशतीचा 'तो' काळ परतून आला असं वाटत नाही. त्यांच्या मते, ज्या गुन्हेगारांचा त्यांनी पाठपुरावा केला होता, त्यात दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अरुण गवळी आणि इतरांचा समावेश होता. या गुन्हेगारांचे म्होरके परदेशातून कारवाया करत असले, तरी त्यांची पाळेमुळे मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये रुजलेली होती.
"गेल्या 60 वर्षांत मुंबईतल्या ज्या माफियांना आपण पाहिलं, ते हे माफिया नाहीत. हे काहीतरी वेगळं आहे."

फोटो स्रोत, Reuters
या नव्या गुन्हेगारी जगताशी जोडलं गेलेलं नाव आहे लॉरेन्स बिश्नोई. उत्तर भारतात पाळेमुळे असलेल्या आणि अनेक वर्षांपासून तुरुंगात असलेल्या बिश्नोई याच्याभोवती एखाद्या लोककथेतल्या खल पात्रासारखे वलय निर्माण झाले आहे. तो तुरुंगात असूनही विविध देशांतील शूटर्सना आदेश देतो, अशी चर्चा आहे. धमक्या देताना आणि हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारल्याचे दावे करताना त्याचे नाव घेतले जाते. असे ऑनलाइन दावे अनेकदा पसरतात.
काळवीट शिकार प्रकरणावरून लॉरेन्स बिश्नोईने सार्वजनिकरीत्या सलमान खानला धमक्या दिल्या होत्या. 1998 मधील या प्रकरणात चिंकाऱ्याची शिकार केल्याचा आरोप खानवर होता. चिंकारा हा हरणाच्या कुळातील एक प्राणी असून बिश्नोई समुदायात त्याला पवित्र मानले जाते.
एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर 5 गोळ्या झाडल्या गेल्या. त्यानंतर 6 महिन्यांनी सलमान खान आणि इतर चित्रपट कलाकारांशी जवळचे संबंध असलेले राजकारणी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली.
मुंबई पोलिसांनी या दोन्ही हल्ल्यांचा संबंध बिश्नोई टोळीशी जोडला. मात्र, सिद्दीकी यांच्या हत्येत लॉरेन्स बिश्नोईचा वैयक्तिक सहभाग असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही.
बिश्नोईच्या टोळीशी संबंधित काही आरोपांना पोलीस तपासाचा आधार आहे, तर काही आरोपांची अद्याप पडताळणी झालेली नाही. मात्र, या टोळीने प्रत्यक्षात केलेल्या गुन्ह्यांमध्ये आणि तिच्या नावाने केले जाणारे दावे यांमधील फरक लोकांच्या मनात अनेकदा धूसर होतो आणि त्यामुळेच या नव्या टोळीची दहशतही जास्त पसरत जाताना दिसते.
संदर्भ-
दुबई टू डोंगरी- हुसैन झैदी
द ब्रह्मास्त्र अनलिश्ड- डी शिवानंदन
https://ndjeirbsjao.shop/hindi/articles/crz98j121k24o%3C/p%3E%3C/div%3E%3Cdiv dir="ltr" class="css-1k9op6x e17x9cvu0">
https://ndjeirbsjao.shop/news/articles/c6vgjk1lp7njo%3C/p%3E%3C/div%3E%3C/main%3E%3Csection id="topic-discovery-component" aria-labelledby="topic-discovery-heading" class="css-17v4c4s" data-testid="topic-discovery" dir="ltr">





























