तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
एका चुकीमुळे आयुष्यभर लकवा? तरुणांनी स्ट्रोकची 'ही' लक्षणं ओळखायलाच हवी
स्ट्रोक (लकवा) म्हणजे केवळ वृद्धांना होणारा आजार, असा समज अजूनही अनेकांच्या मनात घट्ट बसलेला आहे. त्यामुळे एखाद्या तरुणाला अचानक चक्कर आली, हात किंवा पाय बधीर झाला, बोलताना अडचण निर्माण झाली किंवा काही क्षणांसाठी दृष्टी धूसर झाली, तर त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण अशा प्रकारची निष्काळजी घातक ठरू शकते असा इशारा डॉक्टर देतात.
गेल्या काही वर्षांत स्ट्रोक हा फक्त वृद्धांचा आजार नाही. 15 ते 49 वयोगटातील लोकांनाही स्ट्रोक होऊ शकतो, असं जागतिक आकडेवारीवरून दिसतं वयोगटातील लोकांमध्ये स्ट्रोकची प्रकर वेगानं वाढताना दिसली आहेत..
उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान, झोपेचा अभाव, ताणतणाव आणि सतत खुर्चीत बसून काम करण्याची जीवनशैली यामुळे तरुणांच्या मेंदूवरही याचा ताण येतोय. स्ट्रोकनंतर केवळ जीवाला धोका निर्माण होत नाही, तर आयुष्यभरासाठी अपंगत्व, स्मरणशक्तीतील बिघाड, बोलण्यात अडचणी आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
सर्वात गंभीर बाब म्हणजे स्ट्रोकची लक्षणं दिसल्यानंतर उपचारासाठी झालेला प्रत्येक मिनिटाचा विलंब मेंदूच्या सुमारे काही लाख मज्जापेशींचं नुकसान करू शकतो. म्हणूनच स्ट्रोकच्या उपचारांमध्ये 'Time is Brain' ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
वर्ल्ड स्ट्रोक डेनिमित्त, तरुणांमध्ये वाढणारा स्ट्रोकचा धोका, दुर्लक्षित होणारी सुरुवातीची लक्षणं, वेगवान उपचारांचं महत्त्व आणि प्रत्येकानं आजपासून अवलंबायला हव्या अशा सवयींचा वेध इथं घेऊ.
स्ट्रोक म्हणजे नेमकं काय?
आपल्या मेंदूला सतत ऑक्सिजन आणि पोषणद्रव्यांची गरज असते. ही द्रव्यं मेंदूपर्यंत रक्तवाहिन्यांद्वारे पोहोचतात. जेव्हा एखादी रक्तवाहिनी रक्ताच्या गुठळीमुळे बंद होते किंवा फुटते, तेव्हा मेंदूच्या एका भागाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. या स्थितीला स्ट्रोक किंवा लकवा म्हणतात. रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्यामुळे मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच मरू लागतात आणि त्याचा परिणाम शरीराच्या विविध कार्यांवर होऊ शकतो.
स्ट्रोकचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे इस्केमिक स्ट्रोक, यामध्ये रक्तवाहिनी गुठळीमुळे अडते. दुसरा म्हणजे हेमोरेजिक स्ट्रोक, ज्यामध्ये रक्तवाहिनी फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. या दोन्ही स्थिती गंभीर असतात आणि तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असते.
लक्षणं कोणती आणि उपचाराचा निर्णय कधी?
साधारणपणे तरुणांमधील स्ट्रोकची लक्षणं वृद्धांमधील लक्षणांसारखीच असतात. त्यात फारसा फरक दिसत नाही. मात्र लहान मुलांमध्ये (बालरुग्णांमध्ये) काही वेगळी लक्षणं दिसू शकतात, या रुग्णांची लक्षणं तरुण प्रौढ किंवा वृद्ध रुग्णांच्या लक्षणांपेक्षा भिन्न असतात.
स्ट्रोकबाबत सर्वात काळजी करावी अशी गोष्ट म्हणजे सुरुवातीला होणारं दुर्लक्ष.
यात शरीराच्या एका बाजूला जाणवणारा सौम्य कमकुवतपणा, बोलण्यात किंचित अडथळा किंवा अस्पष्टता, दृष्टीशी संबंधित समस्या किंवा अचानक तोल जाणं. अनेकदा लोकांना वाटतं की हे एखाद्या दुसऱ्या कारणामुळे, स्नायूदुखीमुळे किंवा स्नायूंच्या आकडीमुळे झालं असावं, त्यामुळे ही लक्षणं दुर्लक्षित केली जातात.
पण ही लक्षणं गंभीर आहेत हे कधी ओळखायचं हा प्रश्न राहतोच. याबाबत आम्ही डॉ. दर्शन दोशी यांच्याकडून अधिक माहिती घेतली ते माहीम इथल्या पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये न्यूरोलॉजिस्ट सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "अचानक किंवा तीव्र स्वरूपाची कोणतीही लक्षणं दिसू लागली, जसं की चक्कर येणं, चालण्यात अडचण येणं, चालता न येणं किंवा तोल जाणं, तर तातडीनं वैद्यकीय मदत घ्यावी. अचानक दृष्टीमध्ये बदल झाला, एका डोळ्याची दृष्टी गेली किंवा दृष्टीचा काही भाग कमी झाला, तरीसुद्धा त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच शरीराच्या एका बाजूला बधिरपणा जाणवत असेल, एका बाजूची संवेदना दुसऱ्या बाजूपेक्षा कमी वाटत असेल, तर लगेच वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधावा."
एकूण आजाराची तीव्रता ओळखण्यासाठी FAST चाचणीबदद्ल अनेकदा सांगितलं जातं. त्या चाचणीची माहिती सर्वांना का असली पाहिजे? याबद्दल आम्ही डॉ. दर्शन दोशी यांना विचारलं.
ते म्हणाले, खरं तर याला BE FAST असे म्हटले पाहिजे.
B म्हणजे Balance (तोल) - एखाद्या व्यक्तीचा अचानक तोल जात असेल.
E म्हणजे Eyes (डोळे) - एका डोळ्याची किंवा दोन्ही डोळ्यांतील काही भागाची दृष्टी अचानक कमी झाली असेल.
F म्हणजे Face (चेहरा) - चेहरा एका बाजूला वळलेला किंवा झुकलेला दिसत असेल.
A म्हणजे Arm (हात) - एका बाजूचा हात किंवा पाय कमकुवत झाला असेल.
S म्हणजे Speech (बोलणं) - अस्पष्ट बोलणं, शब्द वापरताना गोंधळणं, समोरच्याचं बोलणं समजण्यात अडचण येणं किंवा अर्थहीन बोलणं.
T म्हणजे Time (वेळ) - अशी कोणतीही लक्षणं दिसताच एक मिनिटही न दवडता जवळच्या रुग्णालयात पोहोचणं.
ही लक्षणं आढळल्यास तातडीनं वैद्यकीय मदत घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे.
स्ट्रोकवरच्या उपचारांसाठी गोल्डन अवर अत्यंत महत्त्वाचा असतो. स्ट्रोकची लक्षणं दिसताच शक्य तितक्या लवकर जवळच्या रुग्णालयात पोहोचलं पाहिजे.
डॉ. दोशी सांगतात, "पहिल्या साडेचार तासांचा कालावधी विशेष महत्त्वाचा असतो, कारण या काळात रक्ताच्या गाठी विरघळवणारं औषध देता येतं, यामुळे रुग्णाची स्थिती सुधारण्याची शक्यता वाढते
मात्र, याचा अर्थ असा नाही की साडेचार तासांनंतर लक्षणं दिसल्यास रुग्णालयात जाण्याची गरज नाही. अशा परिस्थितीतही तातडीनं रुग्णालयात जावं, कारण साडेचार तासांनंतरही अनेक प्रभावी उपचार उपलब्ध असतात. "
तरुणांना स्ट्रोक होऊ शकतो का?
तरुणांना स्ट्रोकचा त्रास होत नाही, तो फक्त वृद्धांना होतो असा एक गैरसमज असतो. हा एक गैरसमज आहे. वय वाढल्यास स्ट्रोकचा धोका वाढतो हे खरं असलं, तरी स्ट्रोक कोणालाही होऊ शकतो.
वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशनच्या 'ग्लोबल स्ट्रोक फॅक्ट शीट 2025'नुसार, जगभरातील नव्या स्ट्रोकच्या सुमारे 15% घटना 15 ते 49 वयोगटातील लोकांमध्ये होतात.
तरुण व्यक्तीला स्ट्रोक झाल्यास त्याचे परिणाम अधिक गंभीर ठरू शकतात. या काळात त्या व्यक्तीच्या करिअरची सुरुवात सुरू असू शकते, कुटुंबाची जबाबदारी असू शकते किंवा भविष्यासाठी योजना सुरू असू शकतात. स्ट्रोकमुळे अचानक काम करण्याची क्षमता, स्वावलंबी जगण्याची क्षमता आणि कुटुंबाची काळजी घेण्याची क्षमता यावर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे तरुणांनीदेखील स्वतःच्या जोखमीच्या घटकांविषयी जागरूक राहून प्रतिबंधात्मक उपाय गांभीर्याने घ्यायला हवेत. यासाठी अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये न्यूरोलॉजिस्ट सल्लागार, न्यूरोमस्क्युलर विकार आणि स्ट्रोकतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. विनया भंडारी यांना काही प्रश्न विचारले. त्यांनी त्याची सविस्तर उत्तरं दिली आहेत.
प्रश्नः दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता तिशी-चाळिशीतील स्ट्रोक रुग्ण अधिक दिसत आहेत का?
डॉ. विनया भंडारीः एका जागतिक अभ्यासानुसार, 1990 ते 2021 दरम्यान 15 ते 49 वयोगटातील लोकांमधील नव्या स्ट्रोकच्या घटनांमध्ये सुमारे 36% वाढ झाली. साध्या भाषेत सांगायचे तर 1990 मध्ये या वयोगटात 100 नवी प्रकरणं असतील, तर 2021 मध्ये ती संख्या सुमारे 136 झाली असती. हे जागतिक आकडे आहेत आणि ते एकूण घटनांबद्दल माहिती देतात, एखाद्या व्यक्तीच्या स्ट्रोकच्या वैयक्तिक जोखमीबद्दल नाहीत.
भारतातील परिस्थिती कशी बदलली आहे हे समजण्यासाठी अधिक माहितीची आवश्यकता आहे. मात्र स्ट्रोक तिशी किंवा चाळिशीतही होऊ शकतो. शरीराच्या एका बाजूला अचानक कमजोरी येणं, बोलण्यात अडचण निर्माण होणं किंवा दृष्टी जाणं अशी लक्षणं दिसल्यास तातडीनं वैद्यकीय मदत घ्यावी, हा संदेश तर आपण देऊच शकतो.
प्रश्नः तरुणांमध्ये स्ट्रोक होण्याची सर्वात सामान्य कारणं कोणती?
डॉ. विनया भंडारीः उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, धूम्रपान आणि हृदयविकार हे तरुणांमधील स्ट्रोकची शक्यता वाढवणारे महत्त्वाचे घटक आहेत. मात्र, एखाद्या तरुणाला स्ट्रोक झाल्यास आम्ही इतर संभाव्य कारणांचाही शोध घेतो. यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनी फाटणं, काही विशिष्ट हृदयविकार, रक्ताच्या गाठी सहज तयार होण्याचे विकार आणि मेंदूतून रक्त बाहेर नेणाऱ्या शिरांमध्ये गाठी होणे यांचा समावेश होतो. काही रुग्णांमध्ये दाहजन्य किंवा आनुवंशिक कारणंदेखील जबाबदार असू शकतात.
महिलांमध्ये गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरचा काळदेखील महत्त्वाचे घटक आहेत.
तरुणांमधील प्रत्येक स्ट्रोक केवळ जीवनशैलीमुळेच झाला आहे, असे गृहीत धरू नये. मूळ कारण शोधणं महत्त्वाचं असतं, कारण त्यावर उपचार आणि पुढील स्ट्रोकचा धोका कमी करण्याचे उपचार अवलंबून असते.
प्रश्नः तरुणांना असलेल्या स्ट्रोकच्या धोक्याशी नियंत्रणात नसलेल्या उच्च रक्तदाबाचा किती संबंध आहे?
डॉ. विनया भंडारीः उच्च रक्तदाब हा स्ट्रोकचा धोका वाढवणाऱ्या घटकांपैकी बदलता येणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
परंतु, अनेकदा उच्च रक्तदाबाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. एखादी तरुण व्यक्ती पूर्णपणे निरोगी असल्यासारखी वाटू शकते आणि दैनंदिन कामे करत राहू शकते, पण तिचा रक्तदाब सातत्याने वाढलेला असू शकतो. काळाच्या ओघात उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होतं आणि रक्तवाहिन्या बंद होण्याचा किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो.
त्यामुळे रक्तदाब तपासण्यासाठी वाट पाहू नका. नियमित रक्तदाब तपासा. आपला रक्तदाब किती आहे हे जाणून घेणं आणि गरज पडल्यास योग्य उपचार घेणं दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतं.
प्रश्नः मधुमेह आणि लठ्ठपणा स्ट्रोकचा धोका कसा वाढवतात?
डॉ. विनया भंडारीः मधुमेह आणि लठ्ठपणामुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो, विशेषतः त्यासोबत उच्च रक्तदाब आणि असामान्य कोलेस्टेरॉलची पातळी असल्यास.
मधुमेहामुळे कालांतराने रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. विशेषतः पोटाभोवती वाढलेली अतिरिक्त चरबी इन्सुलिन प्रतिकार, उच्च रक्तदाब आणि इतर चयापचयाशी संबंधित समस्यांशी निगडित असते.
या समस्या आयुष्याच्या सुरुवातीलाच सुरू होऊ शकतात आणि अनेक वर्षे निदान न होता राहू शकतात, ही चिंतेची बाब आहे.
संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य वजन हे महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. तसेच मधुमेहाचं लवकर निदान आणि त्यासोबतच्या रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉलच्या समस्यांवर योग्य उपचार करणेही गरजेचे आहे.
प्रश्नः धूम्रपान, व्हेपिंग, मद्यपान किंवा अमली पदार्थांचा वापर तरुणांमधील स्ट्रोक वाढवत आहे का?
डॉ. विनया भंडारीः धूम्रपान हा स्ट्रोकसाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपैकी एक घटक आहे. त्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याची शक्यता वाढते.
अतिरिक्त मद्यपान, विशेषतः एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मद्यपान करणं, रक्तदाब वाढवू शकते आणि हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता निर्माण करू शकते. कोकेन आणि मेथअॅम्फेटामिनसारखी उत्तेजक औषधे रक्तदाब अचानक वाढवून स्ट्रोकला कारणीभूत ठरू शकतात.
व्हेपिंगबाबत उपलब्ध पुरावे अजून मर्यादित आहेत. सिगारेटच्या धूम्रपानाइतका त्याचा स्ट्रोकशी दीर्घकालीन संबंध सिद्ध झालेला नाही. मात्र, विशेषतः निकोटीन असलेल्या व्हेपिंगला सुरक्षित समजणं चुकीचं ठरेल.
प्रश्नः अनुवंशिक कारणांमुळे तरुणांना स्ट्रोकचा अधिक धोका असू शकतो का?
डॉ. विनया भंडारीः होय. काही अनुवंशिक विकारांमुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. यात सिकल सेल रोग, रक्तवाहिन्यांशी संबंधित काही दुर्मिळ विकार आणि मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद करणारा मोयामोया रोग यांचा समावेश होतो.
अनेक तरुण नोकरीचा ताण, आर्थिक दबाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि अपुरी झोप यांचा सामना करत असतात.
दीर्घकाळचा ताण स्ट्रोकचा धोका वाढवू शकतो. तो रक्तदाब, झोप, खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींवर परिणाम करू शकतो. काही लोक तणावाखाली धूम्रपान किंवा मद्यपान वाढवतात.
संशोधनात मानसिक ताण आणि स्ट्रोक यांच्यात संबंध आढळला आहे. मात्र याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीमध्ये तणावामुळेच स्ट्रोक होतो असे नाही.
शारीरिक निष्क्रियता हा स्ट्रोकची शक्यता वाढवणारा एक घटक आहे. अनेक लोक दिवसातील बहुतांश वेळ टेबलाजवळ बसून, प्रवासात किंवा संगणकावर काम करण्यात घालवतात. काळानुसार यामुळे वजन वाढणं, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
तरुणांनी सर्वप्रथम आपला रक्तदाब तपासावा. मधुमेह आणि कोलेस्टेरॉलच्या समस्या आहेत का ते जाणून घ्यावं. धूम्रपान टाळावं, सक्रिय राहावं, संतुलित आहार आणि पुरेशी झोप घ्यावी, असा डॉक्टरांचा सल्ला असतो.
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)