दसरा मेळावा : 'रेजिम चेंज'वर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मोहन भागवत काय म्हणाले?

शिवसेना
Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात देशभरातील आंदोलनांच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

"होय, आम्ही रेजिम चेंज करायला उभे राहिलो आहोत," असं स्पष्ट सांगत त्यांनी सत्ताव्यवस्थेत बदल घडवण्याची भूमिका मांडली. पेपरफुटी, मतचोरी आणि आंदोलक तरुणांना शहरी नक्षलवादी ठरवण्याच्या मुद्द्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

न्यायालय, सरकार, पोलीस आणि नोकरशाहीचे दरवाजे ठोठावूनही न्याय मिळत नसेल, तर रस्त्यावर उतरलेल्या लोकांना नक्षलवादी म्हणणार का, असा सवाल त्यांनी केला. आंदोलक तरुणांना झुरळ म्हणणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली.

"क्रांती याच वयाच्या मुलांनी आणली आहे," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी तरुणांच्या आंदोलनांचं समर्थन केलं.

टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. अभिनेता सुरक्षित राहिला आणि नंतर आरोपी पकडले, तरी गोळी लागली असती तर त्याचा काय उपयोग झाला असता, असा सवाल त्यांनी केला. बाहेरून आलेल्या हल्लेखोरांची माहिती पोलिसांना वेळीच कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले.

उद्धव ठाकरे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आंदोलनांमध्ये सभ्यता असावी, असं म्हटलं. त्यावर सभ्यतेची व्याख्या कोण ठरवणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आंदोलकांसोबत पोलिसांनी केलेल्या वर्तनाचा उल्लेख करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सभ्यतेचे धडे देण्याचा अधिकार आहे का? अशी विचारणाही केली.

मतदारयाद्यांमधून मतदारांची नावे वगळली जात असल्याच्या आरोपांवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले आणि १३ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारांबाबत प्रश्न उपस्थित होत असताना गप्प का बसायचं असं उद्धव ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात पार पडला. या मेळाव्यात भाषण करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दुष्काळ जाहीर केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

"तुम्ही मागच्या दारानं आलात आणि मुख्यमंत्री झालात. महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसलात. तुम्ही व्होटचोरीची गोष्ट करता, खरंतर तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊन व्होटचोरी केलीत," अशी टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

एकनाथ शिंदे

"पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या विरोधात बोलता, हे तुमचं देशप्रेम आहे?" असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी विरोधकांना विचारला. शिंदे पुढे म्हणाले, "एकही दिवस सुट्टी न घेणारे पंतप्रधान आहेत आपले, त्यांच्यावर तुम्ही आरोप करता, त्यांच्यावर खालच्या भाषेत बोलता, हे पाहून 140 कोटी जनता तुम्हाला माफ करणार नाही."

"रेजिम चेंज करायचं काही लोक म्हणतात. रेजिम अशी चेंज होत नसते. रेजिम जनता चेंज करत असते. तुम्हाला जनतेनं नाकारलंय. तुम्ही काय करणार रेजिम चेंज? तुमच्या पक्षातील रेजिम चेंज तुम्हाला कळलं नाही," असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

'रेजिम चेंज' वर मोहन भागवत म्हणाले, 'आपल्याला सतर्क राहण्याची गरज'

भारताला तोडण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी (20 ऑक्टोबर) नागपूरमध्ये म्हटलं.

सत्ता बदलल्याने परिस्थिती बदलेल, असा विचार करणं चुकीचं आहे, असं मोहन भागवत म्हणाले. ते म्हणाले, "असं यापूर्वी कधीही झालेलं नाही आणि पुढेही होणार नाही."

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत आंदोलनं सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर मोहन भागवत म्हणाले की, केवळ आंदोलन केल्याने बदल घडत नाहीत. समस्यांवर उपाय समाजातूनच शोधले पाहिजेत.

विजयादशमीनिमित्त नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले, "भारत प्रगती करत असल्याने काही शक्तींचं भारतावर लक्ष आहे. गेल्या काही दशकांत भारताने ठोस धोरणांच्या जोरावर प्रगती केली आहे. भारताची ही वाटचाल रोखता येणार नाही, हे या शक्तींना माहिती आहे. म्हणूनच त्या भारत आणि संघाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत."

मोहन भागवत
फोटो कॅप्शन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) के प्रमुख मोहन भागवत ने नागपुर में विजयादशमी के मौक़े पर आयोजित एक कार्यक्रम को संबोधित किया

जेव्हा आंदोलनं राजकीय हेतूने केली जातात किंवा लोकांना चिथावणी दिली जाते, तेव्हा त्यांचा वापर तणाव आणि गोंधळ निर्माण करण्यासाठी केला जातो. यामुळे सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थाही बिघडू शकते, असा इशारा मोहन भागवत यांनी दिला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीच्या दिवशी नागपूरमध्ये केली. संघाच्या कामाची सुरुवात हेडगेवार यांच्या घरातून झाली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी आपला स्थापना दिवस साजरा करतो. या दिवशी सरसंघचालक स्वयंसेवकांना संबोधित करतात.

या कार्यक्रमात एका मान्यवर व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं जातं. यंदा दैनिक जागरणचे मुख्य संपादक संजय गुप्ता यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडही उपस्थित होते.

'पश्चिमेकडून येत आहे वादळ'

भारताला विकसित देश बनण्याच्या मार्गावरून भरकटवण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत. त्यामुळे भारतीयांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

ते म्हणाले, "हे स्पष्ट आहे की, जगात अशा अनेक शक्ती आहेत, ज्यांना भारताने पराभूत व्हावं असं वाटतं."

ते म्हणाले, "पश्चिमेकडून एक वादळ येत आहे. या शक्तींना संस्कृती, व्यवस्था आणि सुरक्षेचा तिरस्कार आहे. त्यांना या सर्वांचा नाश करायचा आहे."

मोहन भागवत यांनी फ्रान्स, बांगलादेश आणि नेपाळ या देशांचीही उदाहरणे दिली. गेल्या काही वर्षांत या देशांमध्ये सरकारविरोधात आंदोलनं झाली आहेत.

नेपाळमध्ये सप्टेंबर 2025 मध्ये जेन-झींनी केलेल्या आंदोलनानंतर केपी शर्मा ओली यांचं सरकार पडलं. त्याआधी, ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे मोठ्या आंदोलनात रूपांतर झालं. त्यानंतर शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे सरकार सत्तेवरून पायउतार झालं होतं.

ग्राफिक्स

अलीकडेच फ्रान्समध्ये महागाई आणि सरकारी सेवांचा दर्जा घसरल्याच्या निषेधार्थ मोठी आंदोलनं झाली. या आंदोलनांदरम्यान 1 हजारहून अधिक लोकांना अटक करण्यात आली.

भारतातही काही लोक अशा शक्तींचे विचार मांडताना दिसत आहेत, असं भागवत म्हणाले.

ते म्हणाले, "भारतातही काही लोक त्यांच्या विचारांशी सहमत आहेत. ज्यांच्याकडे बुद्धीचा अभाव आणि त्यांना सत्तेची लालसा आहे."

समाजाला सतर्क राहण्याचे आवाहन करताना मोहन भागवत म्हणाले की, समस्यांवर उपाय आंदोलनांतून नव्हे, तर समाजाच्या आतूनच शोधले गेले पाहिजेत.

मोहन भागवत यांनी 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताचा उल्लेख बंगालमधील एकतेचं प्रतीक म्हणून केला. ते म्हणाले की, लॉर्ड कर्झनने बंगालची धार्मिक आधारावर फाळणी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा समाजाने त्याला जोरदार विरोध केला. त्यामुळे ब्रिटिश सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.

परंतु, 1947 मध्ये असं होऊ शकलं नाही. त्यावेळी लोक द्वेषात पूर्णपणे अडकले आणि त्यांना राष्ट्रीय एकतेचा विसर पडला, असं भागवत म्हणाले.

आरएसएस कार्यक्रम
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मोहन भागवत म्हणाले, "लॉर्ड कर्झनने हिंदू आणि मुस्लिमांना वेगळं करण्यासाठी बंगालची धर्माच्या आधारावर फाळणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, एकाच भूमीवर राहणाऱ्या लोकांना धर्माच्या आधारावर वेगळं करण्याच्या या निर्णयाला समाजाने जोरदार विरोध केला. त्यामुळे ब्रिटिश सरकारला बंगालच्या फाळणीचा प्रस्ताव मागे घ्यावा लागला. त्याच काळात 'वंदे मातरम' हे एकता आणि देशभक्तीचं प्रतीक बनलं. अखेर बंगालच्या फाळणीचा प्रयत्न अयशस्वी ठरला."

ते म्हणाले, "मग 1947 मध्ये असाच परिणाम का साधता आला नाही? कारण आपल्याला एकमेकांपासून वेगळं करून अंतर्गत संघर्ष घडवू इच्छिणाऱ्यांनी आपल्या मनात आपण वेगळे आहोत, ही भावना निर्माण केली. आपण एकमेकांपेक्षा वेगळे दिसतो, त्यामुळे आपण प्रत्यक्षातही वेगळं राहिलं पाहिजे आणि एकमेकांपासून दूर असलं पाहिजे, असा विचार त्यांनी आपल्या मनात रुजवला."

"धार्मिक आणि कट्टर विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन आपणही वेगळे दिसतो, म्हणजे आपण एक नाही तर एकमेकांपासून वेगळे आहोत, असं मानू लागलो. वेगळं होण्याची इच्छा, राजकीय वर्चस्व मिळवण्याची लालसा आणि स्वतःचे स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नांमुळे आपण हळूहळू आपल्याला एकत्र ठेवणारी मूलभूत तत्त्वेच नाकारू लागलो. तुष्टीकरणाच्या धोरणानेही या फूट पाडणाऱ्या विचारांना सतत प्रोत्साहन मिळाले. आणि अखेर देशाची फाळणी झाली."

'सत्ता बदला'बाबतच्या वक्तव्यावरून वाद

ग्राफिक्स

दिल्लीतील मतदार यादीच्या एसआयआर प्रक्रियेमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या विरोधात सुरू असलेली आंदोलनं आता 'खऱ्या अर्थाने सत्ताबदलाची लढाई' बनली आहेत, असे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही दिवसांनी मोहन भागवत यांनी ही विधान केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला होता.

भूषण यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं, "सरकार आरोप करत आहे की, विरोधकांना सत्ताबदल हवा आहे. सध्या आम्ही निवडणुका योग्य पद्धतीने व्हाव्यात, यासाठी लढा देत आहोत. मात्र, सरकारची अशीच दडपशाही सुरू राहिली, तर सत्ताबदल नक्कीच होईल."

या वक्तव्याला भाजपने प्रत्युत्तर दिलं. काही गट देशात राजकीय अस्थिरता, अशांतता निर्माण करण्यासाठी तरुणांचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सी. आर. केशवन यांनीही सत्ताबदलाच्या मागणीवर टीका केली. प्रशांत भूषण यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतं की, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात सुरू असलेली आंदोलनं ही सरकार पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न लपवण्यासाठी केवळ एक 'निमित्त' आहे, असा आरोप त्यांनी केला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)