स्पेनमध्ये दोन ट्रेनच्या धडकेत किमान 64 जणांचा मृत्यू; आतापर्यंत ही माहिती आली समोर

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

स्पेनची राजधानी माद्रिदच्या दक्षिणेला आज (28 ऑक्टोबर) सकाळी 2 हायस्पीड रेल्वेंची धडक झाली. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता मोरा आणि ऑर्गाझ या 2 नगरपालिका क्षेत्रांदरम्यान हा अपघात झाला.

या अपघातात किमान 64 जणांचा मृत्यू झाला आहे, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी टोलेडो येथे झालेल्या या भीषण रेल्वे अपघातामुळे आपल्याला 'धक्का' बसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

सांचेज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितलं की, ते परिवहन मंत्री आणि कास्तिया-ला मांचा प्रदेशाच्या प्रमुखांशी सतत संपर्कात आहेत.

त्यांनी सांगितलं की, घटनास्थळी आपत्कालीन पथकांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि त्यांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी सर्व संबंधित सरकारी यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत.

सांचेज म्हणाले, "या अपघातातील सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या कठीण प्रसंगी मी त्यांच्या पाठीशी आहे."

सांचेज आणि स्पेनमधील इतर नेत्यांनी बुधवारी होणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. यात पुढील महिन्यात होणाऱ्या संसदीय निवडणुकीच्या प्रचाराचाही समावेश आहे.

हायस्पीड रेल्वेच्या अपघातात अनेकांच्या मृत्यूची भीती

माद्रिदच्या दक्षिणेला उर्दा येथे आज सकाळी झालेल्या हायस्पीड रेल्वेच्या अपघातातील मृतांची संख्या किमान 64 वर पोहोचली आहे. स्पेनच्या एफे या वृत्तसंस्थेला प्रादेशिक सरकारमधील सूत्रांनी ही माहिती दिली.

कास्तिया-ला मांचा येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, खासगी कंपनी इर्योच्या रेल्वेमध्ये 147 प्रवासी होते, तर दुसऱ्या हायस्पीड रेल्वेमध्ये 397 प्रवासी होते.

आतापर्यंत, उभी असलेल्या इर्यो रेल्वेला दुसऱ्या हायस्पीड रेल्वेने मागून धडक दिली होती का, याची अधिकाऱ्यांनी अद्याप पुष्टी केलेली नाही.

या अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्पेनमधील माध्यमांना सूत्रांनी सांगितलं की, गेल्या जानेवारी महिन्यात अदामुझ येथे झालेल्या रेल्वे अपघातापेक्षाही हा अपघात अधिक गंभीर असू शकतो. त्या अपघातात 46 जणांचा मृत्यू झाला होता.

धावत्या रेल्वेने थांबलेल्या रेल्वेला धडक दिली?

अपघाताबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, विविध वृत्तांनुसार, रुळांवरील काही समस्येमुळे एक रेल्वे उभी होती. त्याच वेळी आलेल्या दुसऱ्या हायस्पीड रेल्वेने या थांबलेल्या रेल्वेला धडक दिली असावी.

परिवहन मंत्रालयाच्या हवाल्याने स्पेनच्या आरटीव्हीई या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, रेन्फे ट्रेनने इर्यो ट्रेनला मागून धडक दिली. त्यामुळे इर्यो ट्रेनचे दोन डबे रुळांवरून घसरले.

रेल्वे सेवा बंद, प्रवाशांची गर्दी

रेल्वे कंपनी रेन्फेने सांगितलं की, माद्रिद, सियुदाद रिअल आणि आंदालुसिया या भागांदरम्यानची रेल्वे सेवा अद्याप बंद आहे. दक्षिण स्पेनमधील सेव्हिया सांता जुस्टा रेल्वे स्थानकावर अधिक माहिती मिळण्याच्या प्रतीक्षेत अनेक प्रवासी थांबल्याचे दृश्य दिसत आहे.

अपघातस्थळी डबे आणि ढिगारा रुळांवर विखुरलेला

अपघातस्थळी अनेक डबे रुळांवरून घसरल्याचे आणि त्यांचे तुकडे व इतर साहित्य आजूबाजूला विखुरल्याचे दिसत आहे.

मोबाईलवर चित्रित केलेल्या व्हीडिओंमध्ये धडकेच्या तीव्रतेमुळे एका डब्याचा मागचा भाग तुटल्याचे दिसते. अपघातानंतर डब्यांच्या अवशेषांमध्ये काही लोक उभे असल्याचेही दिसत आहे.

अपघातग्रस्तांसाठी शस्त्रक्रिया रद्द

स्पेनच्या एफे या वृत्तसंस्थेनुसार, रेल्वे अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी परिसरातील रुग्णालयांनी नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत.

अपघातातील जखमी मोठ्या संख्येने रुग्णालयात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

टोलेडो, सियुदाद रिअल आणि अल्काझार दे सान हुआन येथील रुग्णालयांनीही काही शस्त्रक्रिया रद्द केल्याचे वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.