100 वर्षांत माणसं 10 सेंटीमीटरनं उंच झाली; यामागचं खरं कारण काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, कैथरीन हीटवुड
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
तुम्ही कधी विचार केलाय, की आपण आपल्या आजोबा-पणजोबांपेक्षा थोडे जास्तच उंच का आहोत? कारण उत्तर विज्ञानाकडे आहे!
'अवर वर्ल्ड इन डेटा' या संशोधन करणाऱ्या वेबसाइटनुसार, 100 वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांच्या तुलनेत आज जगभरातील तरुणांची सरासरी उंची तब्बल 10 सेंटीमीटरनं वाढली आहे.
2016 च्या एका संशोधनात 1896 आणि 1996 या वर्षांत जन्मलेल्या लोकांची तुलना करण्यात आली होती.
या अभ्यासात एक रंजक बाब समोर आली. दक्षिण कोरियातील महिला आणि इराणच्या पुरुषांची उंची जगात सर्वात वेगानं वाढली आहे. दक्षिण कोरियन महिलांच्या सरासरी उंचीत तब्बल 20 सेंटीमीटरची तर इराणी पुरुषांच्या उंचीत 17 सेंटीमीटरची वाढ नोंदवली गेली आहे.
स्कॉटलंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ अबेरडीन येथील ग्लोबल हेल्थ विषयाच्या वरिष्ठ व्याख्यात्या डॉ. अरविंदा गुंटुपल्ली यांच्या मते, उत्तम सकस आहार, आरोग्याच्या चांगल्या सुविधा, लसीकरण या सगळ्यांमुळे उंची वाढण्यास मदत झाली आहे. पण याचा अर्थ असा नाही की मानवाची उंची कायम वाढतच गेली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इतिहासकारांचं आणि संशोधकांचं असं म्हणणं आहे की, जेव्हा भूतकाळातील ठोस आकडे किंवा माहिती हाताशी नसते तेव्हा लोकांच्या उंचीवरून त्या काळातल्या राहणीमानाचा एक चांगला अंदाज लावता येतो.
क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टचे प्राध्यापक आणि आर्थिक इतिहासकार डॉ. मथियास ब्लम सांगतात, "माणसाची उंची ही त्या समाजातील समृद्धी आणि राहणीमान मोजण्याचे एक उत्तम साधन आहे."
विविध संशोधनांनुसार माणसाच्या एकूण उंचीपैकी 80 ते 90 टक्के भाग हा थेट त्याच्या जनुकांवर अवलंबून असतो.
उरलेला भाग जरी कमी असला तरी बालपणात मिळालेला सकस आहार, आजारपणांचा प्रादुर्भाव, बालपणीचे वातावरण आणि वैद्यकीय उपचारांची सोय या गोष्टींचा त्यावर मोठा प्रभाव पडतो.
ब्लम सांगतात, "उंची चांगली असणं ही दर्जेदार जीवनशैली आणि समृद्धीचं लक्षण मानलं जातं."
त्यांचं म्हणणं असं आहे की, जनुकीय फरकाचा प्रभाव बाजूला ठेवून अचूक अंदाज घेण्यासाठी संशोधक थेट मोठ्या लोकसंख्येच्या सरासरी उंचीचा अभ्यास करतात.
यामुळे त्यांना समाजातले असे अंतर्गत बदल आणि विषमता समजून घेता येते, जी जीडीपीसारख्या आर्थिक आकड्यांमध्ये कधीच दिसून येत नाही.
शेती सुरू केल्यामुळे माणसांची उंची खरंच कमी झाली होती का?
ब्लम सांगतात की, माणसाच्या उंचीच्या प्रवासात दोन मोठे आणि महत्त्वाचे वळण आले.
यातला पहिला मोठा बदल झाला तो नवाश्मयुगात. हा तो काळ होता जेव्हा जवळपास 10 ते 12 हजार वर्षांपूर्वी माणसाने अन्नासाठी जंगलात भटकणे आणि शिकार करणे सोडून शेती करायला सुरुवात केली.
इतक्या हजारो वर्षांपूर्वी माणसांची उंची कशी बदलत गेली हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना त्या काळातील हाडांच्या सांगाड्यांवरच अवलंबून राहावं लागतं. अर्थात, या सांगाड्यांमधून मिळणाऱ्या माहितीलाही काही मर्यादा असतात.
तरीसुद्धा शेतीची सुरुवात झाल्यानंतर माणसांची उंची घटत गेली या मुद्द्यावर बहुतेक संशोधकांचे एकमत झालेले दिसते.

फोटो स्रोत, Getty Images
वर्ष 2022 मध्ये समोर आलेल्या एका संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली की, जर जनुकीय फरकाचा प्रभाव बाजूला ठेवला तर नवाश्मयुगातल्या लोकांची सरासरी उंची त्यांच्या आधीच्या पिढ्यांपेक्षा 2.8 सेंटीमीटरने कमीच होती.
शेती सुरू झाल्यामुळे अन्नाची एक कायमस्वरूपी सोय नक्कीच झाली. पण याचा अर्थ असा मुळीच नव्हता की लोकांना आधीपेक्षा अधिक सकस आणि पौष्टिक अन्न मिळू लागले होते.
कारण, शिकार करून आणि जंगलातून अन्न गोळा करून जगणाऱ्या त्या आधीच्या माणसांच्या आहारात प्राण्यांपासून मिळणाऱ्या अन्नघटकांचे प्रमाण खूप जास्त होते.
लोकांची उंची कधी वाढली, तर कधी घटली
ब्लम सांगतात की, नेमका हाच मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे.
त्यांच्या मते, "मुद्दा फक्त पोट भरण्याचा किंवा उपाशी झोपण्याचा नव्हता तर शरीराला नक्की काय खायला मिळते याचा होता. या दृष्टीने विचार केला तर प्राण्यांपासून मिळणारे अन्न जास्त पोषक होते कारण त्यात असणारे अमिनो अॅसिड्स शरीरासाठी खरोखर अत्यंत गरजेचे असतात."
उत्तम आहाराव्यतिरिक्त, शिकार करून आणि अन्न गोळा करून जगणारे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज स्थलांतर करू शकत होते. ते आपला कचरा, घाण मागे सोडून पुढे निघून जायचे.
पण शेती करणाऱ्या माणसांसाठी मात्र असं वारंवार जागा बदलणं शक्य नव्हतं.
यांना संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत होता. शिवाय प्रचंड अंगमेहनत, घरांची आणि जनावरांची देखभाल आणि सतत जनावरांच्या सोबतीनेच राहणे, हे त्यांचे रोजचे जगणे झाले होते.
ब्लम यांच्या मते, यानंतरच्या हजारो वर्षांत वेगवेगळ्या भागांतील लोकांची उंची कधी वाढली तर कधी घटली. पण हे बदल फार काळ काही टिकले नाहीत.
त्यांच्या शब्दांत सांगायचं तर, "दीर्घकाळाचा विचार केला, तर उंची सतत वाढत किंवा घटत राहण्याचा असा कोणताही स्पष्ट कल दिसून येत नाही. दुष्काळ पडतात, महायुद्धं होतात पण त्या संकटानंतर लोकं पुन्हा सावरून पूर्वपदावर येतात."
यातल्या काही संकटांचे तर असे अनपेक्षित परिणाम समोर आले ज्यांची कोणी साधी कल्पनाही केली नसेल.

फोटो स्रोत, Getty Images
14 व्या शतकाच्या मध्यात संपूर्ण युरोपात प्लेगची भयंकर साथ पसरली होती जी 'ब्लॅक डेथ' म्हणून ओळखली जाते. या महापुराने जवळपास निम्म्याहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले होते
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या महासाथीनंतरच्या लोकांच्या उंचीचा अभ्यास केला असता त्यांची सरासरी उंची वाढल्याचे समोर आले.
डॉ. गुंटुपल्ली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्लंडमध्ये मिळालेल्या सांगाड्यांवर एक अभ्यास केला.
त्यातून असंत स्पष्ट झालं की, 14 व्या शतकाच्या सुरुवातीला लोकांची सरासरी उंची जवळपास 170 सेंटीमीटर होती. तर 15 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हीच उंची वाढून तब्बल 174 सेंटीमीटरच्या आसपास पोहोचली होती.
गुंटुपल्ली सांगतात की, यासंदर्भात फारशी आकडेवारी उपलब्ध नाही.
तरीही त्यांच्या अंदाजानुसार, लोकांची उंची वाढण्यामागचं एक कारण मजुरीमध्ये झालेली वाढ हे असू शकतं.
कारण काम करणाऱ्या लोकांची मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे मजुरांची घासाघिस करण्याची ताकद वाढली असावी आणि पर्यायाने त्यांच्या राहणीमानातही सुधारणा झाली असावी.
अनेक बदलांचा एकत्रित प्रभाव
ब्लम सांगतात की, माणसाच्या उंचीच्या प्रवासातील दुसरा मोठा टप्पा आला तो औद्योगिक क्रांतीमुळे.
18 व्या शतकात ब्रिटनमधून औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि हळूहळू ती जगभरात पसरली.
औद्योगिकीकरणाच्या या लाटेत अर्थव्यवस्था शेतीकडून कारखान्यांकडे वळली. प्रचंड वेगाने नवीन शहरं उभी राहिली, नवनवीन तंत्रज्ञान दैनंदिन जगण्याचा भाग बनले आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जाळे जगभर विस्तारले.
या सर्व बदलांमुळे अखेर माणसांची उंची वाढली खरी, पण हा बदल काही एका रात्रीत झाला नाही.
गुंटुपल्ली यांच्या मते, औद्योगिक क्रांतीचा सुरुवातीचा काळ लोकांच्या "आरोग्यासाठी अत्यंत वाईट होता."
स्वच्छतेचा अभाव, दाटीवाटीच्या अरुंद खोल्या आणि कारखान्यांमध्ये होणारे अतोनात हाल यामुळे सुरुवातीच्या काही दशकांत वेगवेगळ्या देशांमधील लोकांची सरासरी उंची प्रत्यक्षात घटली होती.

फोटो स्रोत, Getty Images
औद्योगिक शहरांमधील परिस्थिती तर इतकी वाईट होती की, कामगारांना एकाच बिछान्यावर शिफ्टनुसार आळीपाळीने झोपावं लागत होतं.
नंतरच्या काळात लोकांची कमाई वाढली आणि प्रशासनाने सार्वजनिक आरोग्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला सुरुवात केली तेव्हा कुठे लोकांच्या उंचीत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली.
ब्लम यांच्या मते, हा निव्वळ चांगल्या स्वच्छतेचा, राहण्याच्या जागेचा आणि पौष्टिक अन्नाचा परिणाम नव्हता, तर यासोबतच वैद्यकीय उपचारांच्या नवनवीन शोधांचाही यात मोठा वाटा होता.
ते म्हणतात, "अनेक लहान-मोठे बदल एकाच वेळी घडले आणि त्याचाच हा एकत्रित प्रभाव होता."
दक्षिण कोरियामध्ये औद्योगिकीकरण तसं उशिराच सुरू झालं. पण 2016 च्या एका विश्लेषणानुसार, देशाच्या वेगवान आर्थिक प्रगतीसोबतच गेल्या एका शतकात इथल्या लोकांच्या सरासरी उंचीमध्ये जगातली सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली.
दक्षिण कोरियातील पुरुषांची सरासरी उंची तब्बल 15 सेंटीमीटरनं तर महिलांची उंची चक्क 20 सेंटीमीटरनं वाढली.
माणसाची उंची वाढण्याची कमाल मर्यादा आता संपली आहे का?
'आवर वर्ल्ड इन डेटा'च्या आकडेवारीनुसार, वर्ष 1996 मध्ये जन्मलेल्या जगभरातील पुरुषांची सरासरी उंची 171 सेंटीमीटर तर महिलांची सरासरी उंची 159 सेंटीमीटर आहे.
ब्लम यांच्या मते, आजच्या प्रगत देशांमध्ये लोकांचं उत्पन्न वाढले, कामाची क्षमता सुधारली आणि सुखसोयींची रेलचेल झाली तरीही लोकांची सरासरी उंची आता आणखी वाढताना दिसत नाहीये.
असं नक्की का घडतं यामागचं नेमकं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.
काही संशोधकांच्या मते, या देशांमधील लोक कदाचित त्यांच्या जनुकांनुसार शक्य असलेल्या जास्तीत जास्त उंचीपर्यंत पोहोचले असावेत. याशिवाय फास्ट फूड खाण्याचे वाढलेलं प्रमाण आणि एकाच जागी बसून राहण्याची बैठी जीवनशैली हीसुद्धा उंची न वाढण्यामागची कारणे असू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
संशोधक ब्लम सांगतात की, येत्या काळात लोकांचे "बायोलॉजिकल राहणीमान" अचूकपणे समजून घेण्यासाठी आता माणसाच्या उंचीव्यतिरिक्त इतर काही नव्या निकषांचा शोध घ्यावा लागेल.
उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणतात, व्हीगन म्हणजे प्राणीजन्य पदार्थांशिवायचा आहार आणि शाकाहारी खाण्याचा ट्रेंड वाढल्यामुळे लोकांची सरासरी उंची वाढेलच असं नाही.
पण याचे इतर अनेक चांगले फायदे आहेत. असा आहार शरीरासाठी निरोगी ठरू शकतो आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीही अधिक फायदेशीर ठरू शकतो.
जिथे गरिबी जास्त, तिथे लोकांची उंची कमी!
दुसरीकडे, जागतिक परिस्थितीचा विचार करता माणसांची उंची भविष्यात अशीच सातत्याने वाढत राहील, यावर डॉ. अरविंदा गुंटुपल्ली यांना मात्र शंका वाटते.
त्या अन्न आणि इंधनाच्या टंचाईसोबतच आज समाजात असलेल्या "प्रचंड विषमतेकडे" लक्ष वेधतात.
यांच्या मते, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कुपोषणामुळे वयाच्या मानाने मुलांची उंची कमी राहण्याचे प्रमाण खूप जास्त आहे.
आणि अशा देशांमध्ये जे लोक अत्यंत गरिबीत जगतात, त्यांचीच उंची सर्वात कमी भरते.
गुंटुपल्ली यांच्या मते, दुष्काळ आणि महापुरासारख्या हवामान बदलांमुळे अन्नधान्याचे उत्पादन घटते. तसेच दूध आणि प्राण्यांपासून मिळणाऱ्या इतर पौष्टिक पदार्थांच्या उपलब्धतेवरही मोठा परिणाम होतो.
त्या सांगतात, "जगभरात आरोग्य क्षेत्रासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा निधी कमी होत चालला आहे. याचा थेट फटका लसीकरण, पोषण आहार आणि निर्वासितांसाठी राबवल्या जाणाऱ्या अनेक कल्याणकारी योजनांना बसत आहे."
त्यांच्या मते, ही सर्व संकटं एकत्र आल्यामुळे लोकांच्या उंचीमधील तफावत भविष्यात आणखी वाढत जाईल. ही दरी केवळ श्रीमंत आणि गरीब देशांमधली नसेल तर एकाच समाजातल्या वेगवेगळ्या वर्गांमधली दरीसुद्धा अधिक रुंदावत जाईल.
त्या सांगतात, "शेवटी वास्तव हेच आहे की आपण प्रचंड विषमता असलेल्या जगात जगत आहोत."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






















