एखादा सिनेमा सुपरहिट किंवा फ्लॉप कसा ठरतो? जाणून घ्या सिनेमाच्या कमाईचं गणित

फोटो स्रोत, DHURANDHAR THE REVENGE
- Author, उपाला केबीआर
- Published
- वाचन वेळ: 13 मिनिटे
2025 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीनं बॉक्स ऑफिसवरील कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले.
देशभरातील एकूण बॉक्स ऑफिसची कमाई 13,395 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली. 2026 च्या अखेरपर्यंत हा आकडा 15 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज आहे.
पण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपटांची निर्मिती आणि त्याचं मार्केटिंग याचं मॉडेल नक्की कशाप्रकारे काम करतं? चित्रपटसृष्टीला सध्याच्या काळात नक्की कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो आहे?
ऑक्टोबर 2025 आणि 2026 पर्यंतच्या दमदार बॉक्स ऑफिस कमाईवरून असं दिसतं की, हिंदी चित्रपटसृष्टी कोव्हिड -19 महासाथीमुळे आलेल्या मंदीतून मोठ्या प्रमाणात सावरलेली आहे.
पण एखादा चित्रपट नक्की कसा तयार होतो? त्याच्या बजेटमध्ये कोणते घटक समाविष्ट असतात? प्रत्येक चित्रपटाच्या कमाईचं गणित नक्की कसं असतं? एखादा चित्रपट हिट किंवा फ्लॉप कसा ठरवला जातो? सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि रिव्ह्यूज् चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढवण्यासाठी मदत करतात का?

फोटो स्रोत, Indranil MUKHERJEE / AFP via Getty Images
पूर्ण वर्ष धुरंधर चित्रपटाच्या नावे
या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श, थिएटर्सचे संचालक राज बन्सल आणि अक्षय राठी, निर्माते कुमार मंगत पाठक आणि अनुप्रिया नागर यांच्याशी संवाद साधला.
2025 आणि 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये मोठ्या सिक्वेल आणि स्टार-स्टडेड ॲक्शन चित्रपटांचं वर्चस्व होतं.
यापैकी, 'धुरंधर: द रिव्हेंज'नं 1,848 कोटी रुपये, 'धुरंधर'नं 1,350 कोटी रुपये, 'छावा'नं 809 कोटी रुपये, 'सैयारा'नं जगभरात 579 कोटी रुपये आणि 'बॉर्डर 2'नं 464 कोटी रुपये कमावले.
यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'दृश्यम 3' ने आतापर्यंत 490 कोटी रुपये आणि 'हनुमान अंश' ने 435 कोटी रुपये कमावले आहेत.
दुसऱ्या बाजूला, 'वॉर 2', 'सिकंदर', 'सन ऑफ सरदार 2', 'टॉक्सिक' आणि 'बटवारा' यांसारख्या चित्रपटांनी फारच निराशा केली.
एखाद्या चित्रपटाची कमाई कशाप्रकारे मोजली जाते?
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श म्हणतात की, "जर एखाद्या डिस्ट्रीब्यूटरने 10 रुपयांना चित्रपट विकत घेतला आणि सरकारी टॅक्स, थिएटरचं भाडं व इतर खर्च दिल्यानंतर त्याला 10 रुपये मिळाले, तर त्याचा खर्च वसूल होतो."
यानंतर, मिळणारी 10 किंवा 11 रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम ही कमिशन असते. हे 15 किंवा 20 टक्के असू शकते आणि ती निर्मात्यासोबत झालेल्या कराराच्या अटींवर अवलंबून असते.
पुढे ते म्हणतात की, "जर एखादा चित्रपट 10 रुपयांना विकत घेतला आणि त्या चित्रपटानं 12.50 रुपयांचा व्यापार केला, तर याचा अर्थ तुमचं कमिशन त्यातून निघालं. यानंतर नफा सुरू होतो."
काही करारांमध्ये, हा नफा उत्पादक आणि वितरक यांच्यात समसमान पद्धतीनं विभागला जातो. ही गोष्ट त्या दोघांमध्ये झालेल्या करारावर अवलंबून असते.

फोटो स्रोत, TAUSEEF MUSTAFA/AFP via Getty Images
तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, परदेशातील हक्क आगाऊ म्हणजेच आधीच विकले जातात किंवा चित्रपट कमिशनच्या आधारावर प्रदर्शित केला जातो. परदेशात एकूण कमाईतील 40 टक्के वाटा मिळतो.
एप्रिल 2025 ते मार्च 2026 दरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दल बोलताना, तरण आदर्श म्हणतात की 'छावा', 'सैयारा', 'बॉर्डर 2', 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' हे "खऱ्या अर्थानं ब्लॉकबस्टर" आहेत.
"दुर्दैवानं, आम्हाला 'खऱ्या अर्थानं' हा शब्द वापरावा लागतो, कारण काहीवेळा निर्माते त्यांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिस कमाई वाढवून-चढवून सादर करतात," असंही ते सांगतात.
'धुरंधर' चित्रपटानं त्याच्या सिक्वेलसोबत ज्या प्रकारे व्यवसाय केला, त्यानं चित्रच पालटून टाकलं. 'छावा'ला जबरदस्त ओपनिंग मिळाली.
'सैयारा' चित्रपट तर अशा वेळेला आला, ज्या वेळेला एखादी प्रेम कथा अजूनही यशस्वी होऊ शकते की नाही, याबद्दलच लोकांच्या मनात अनेक शंका-कुशंका तयार झालेल्या.
तरण आदर्श सांगतात की, नवीन चेहऱ्यांना घेऊन साकारलेल्या प्रेम कथा याआधीही सुपरहिट ठरलेल्या आहेत. यामध्ये ऋषी कपूर यांचा 'बॉबी' आणि कुमार गौरव यांचा 'लव्ह स्टोरी' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
त्याच्या मते, 'बॉर्डर 2' ला त्याच्या ब्रँड व्हॅल्यू, सनी देओल आणि फ्रँचायझीच्या लोकप्रियतेचा फायदा झाला.
ना गाणी, ना अॅक्शन, ना रोमान्स; तरीही सिनेमा हिट
तरण आदर्श सांगतात, "आज जेव्हा एखादा प्रेक्षक चित्रपट पाहायला जातो, तेव्हा त्याच्यासाठी मनोरंजन सर्वात महत्त्वाचं असतं. प्रेक्षकांना नाट्य, संगीत, अॅक्शन आणि भावना यांचा समावेश असलेलं एक परिपूर्ण पॅकेज हवं असतं."
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना असा चित्रपट हवा असतो जो ते आपल्या कुटुंबासोबत पाहू शकतील. पण जेव्हापासून आपण केवळ मोठ्या शहरातील प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून चित्रपट बनवायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून आपण मोठ्या संख्येनं प्रेक्षक गमावलेले आहेत.
तरण आदर्श म्हणतात, "पण 'दृश्यम 3' सारखा एक असा चित्रपटही आहे, ज्यात गाणी, अॅक्शन किंवा रोमान्स यांपैकी काहीही नाही. चित्रपटाचा मुख्य अभिनेता अजय देवगणचे संवादही खूप कमी आहेत. तो डोळे, चेहऱ्यावरील हावभाव आणि हातवारे करून अभिनय करतो."
त्यांच्या मते, 'हनुमान अंश' हा 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला एक अचानक ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट आहे.
ते सांगतात की, "धुरंधर, हनुमान अंश आणि दृश्यम 3 सारख्या अनेक चित्रपटांनी जुन्या समजुती मोडीत काढल्या आहेत. चित्रपटसृष्टी ज्या गोष्टी चित्रपटाच्या यशासाठी आवश्यक मानते, त्या गोष्टीच आता प्रेक्षक चुकीच्या ठरवत आहेत."
ते सांगतात की, "'टॉक्सिक' या चित्रपटानं आणखी एक रूढ कल्पना मोडली. चित्रपटाला 50 कोटी रुपयांची दमदार ओपनिंग मिळाली, पण त्याचे रिपोर्ट्स इतके वाईट होते की दुसऱ्याच दिवशी त्याची कमाई घटली. त्याची कथासुद्धा कमकुवत होती."
तरण आदर्श यांच्या मते, प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त कौतुकामुळे 'हनुमान अंश' सारखा चित्रपट पुढे सरकला.
"या चित्रपटाचे निर्माते त्यांचा कारकिर्दीतील पहिलाच चित्रपट बनवत होते. मुख्य भूमिका एका नवोदित कलाकारानं साकारली होती. निर्मात्यांकडे निधीची कमतरता असल्यानं, चित्रपटाला ना झगमगाट होता, ना प्रसिद्धीची झालर..."
'सिनेमांच्या मार्केटिंगची पद्धत चुकीची'
चित्रपटगृह चालक राज बन्सल यांना असं वाटतं की, आजकाल निर्माते ज्या प्रकारचं मार्केटिंग करत आहेत ते चुकीचं आहे.
ते सांगतात की, "तुम्ही तुमच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मॉल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये जाता. तुम्ही चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी खाजगी विमानांमधून प्रवास करता, पण त्याचा काही उपयोग होत नाही."
तुम्ही तुमच्या चित्रपटाबद्दल छापील माध्यमांतील आणि टेलिव्हिजनवरील मुलाखतींमधून बोलायला पाहिजे. तुम्ही कपिल शर्माच्या शोमध्ये किंवा इतर तत्सम कार्यक्रमांमध्ये जाता, पण त्यामुळे बॉक्स ऑफिसवर काही फरक पडत नाही.
राज बन्सल म्हणतात की, "टेलिव्हिजन चॅनल्स तुमचा ट्रेलर काही मिनिटांसाठी मोफत दाखवतात. म्हणजे तुम्ही तुमच्या चित्रपटाच्या प्रमोशनचा खर्च वाचवण्यासाठी एक वेगळा व्यावसायिक मार्ग अवलंबला आहे. पण तुम्ही वापरत असलेल्या पद्धतींमुळे चित्रपटसृष्टीचं नुकसान होत आहे."
त्यांच्या मते, आज चित्रपटांच्या मार्केटिंगसाठी सोशल मीडिया हे एक नवं प्रभावी माध्यम बनलेलं आहे.
ते सांगतात की, "सोशल मीडियावर तुमच्या चित्रपटाचा प्रचार करा, पण पैसे देऊन करून घेतलेल्या समीक्षणांमुळे चित्रपट व्यवसायाचंच नुकसान होत आहे."
राज बन्सल यांचा आरोप आहे की, अभिनेते त्यांच्या पीआर एजन्सी, इन्फ्लुएन्सर्स आणि पैसे घेऊन काम करणाऱ्या कथित चाहत्यांमार्फत इतर अभिनेत्यांना खालच्या पात्रतेचं दाखवत आहेत.
ते म्हणतात की, "जेव्हा एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा त्याच्या चित्रपटावर टीका केली जाते किंवा त्याचे जुने व्हिडिओ समोर आणले जातात. यामुळे चित्रपटाच्या विरोधात नकारात्मक प्रचार होतो."
राज बन्सल यांच्या मते, हिंदी चित्रपटसृष्टी तीन आघाड्यांवर अपयशी ठरते आहे.
"आमच्याकडे चांगल्या पटकथा आणि चांगलं संगीत नाही, कारण आम्हाला त्यावर पैसे खर्च करायचे नाहीत," असं ते सांगतात.
"दुसरी गोष्ट म्हणजे, दिग्दर्शक संपूर्ण चित्रपटाचा एकप्रकारे कॅप्टन असतो, पण आपण त्याचा आदर करत नाही. याउलट, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तसं नाही आणि हेच त्यांच्या यशाचं कारण आहे."
ते सांगतात की, "माझा मित्र म्हणतो की आजकाल थिएटरमध्ये चित्रपट पाहणं महाग झालं आहे. त्यामुळे लोक चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहतात किंवा मंगळवारी चित्रपट पाहतात, जेव्हा तिकीट दर खूप कमी झालेले असतात."
'बटवारा' आणि 'सन ऑफ सरदार 2' यशस्वी का झाले नाहीत?
या वर्षी अयशस्वी ठरलेल्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांबद्दल बोलताना राज बन्सल म्हणतात की, 'बटवारा' हा चित्रपट त्याच्या कास्टींगमुळे चालला नाही.
ते सांगतात की, "चित्रपटातील मुख्य भूमिका सनी देओलनं साकारली होती. त्यानं आयुष्यभर आपल्या चित्रपटांमधून पाकिस्तानला लक्ष्य केलं आहे. हेच त्याच्या यशाचं सूत्र राहिलेलं आहे. पण या चित्रपटाची कथा याच्या अगदी उलट होती."
राज बन्सल म्हणतात की, शबाना आझमी यांना या चित्रपटात एका हिंदू महिलेची भूमिका देण्यात आली होती. मात्र, त्यांची प्रतिमा एका मुस्लीम महिलेला साजेशी मानली जाते.
त्यांच्या मते, सनी देओलनं आपल्या मुलाला प्रोत्साहन दिलं आणि प्रिती झिंटाला कास्ट करण्यात आलं कारण तिच्या तारखा सहज उपलब्ध होत्या तसेच ती आघाडीच्या अभिनेत्रींपेक्षा कमी मानधन घेत होती.
ते सांगतात की, "पण खरं तर आजकाल चित्रपट त्याच्या नावावर चालत नाहीत. त्यामुळे कास्टिंगची ही निवड पूर्णपणे अयशस्वी ठरली."
राज बन्सल देखील 'सन ऑफ सरदार 2' ला एक असा बिग बजेट सिनेमा मानतात, ज्यामध्ये कलाकारांची निवड चुकीची होती.
ते म्हणतात की, "तुम्ही संजय दत्तच्या जागी रवी किशनला घेण्याचा विचारसुद्धा कसा करू शकता? त्यामुळेच चित्रपट फ्लॉप झाला."
पुढे ते सांगतात की, 'दृश्यम 3' च्या दिग्दर्शकाला त्याच्या कथेवर आणि पात्रांवर पूर्ण विश्वास होता.
त्यामुळे, दिग्दर्शकानं अक्षय खन्नाला त्याच्या इच्छेनुसार मानधन देऊ केलं नाही. त्याऐवजी त्यानं जयदीप अहलावतची निवड केली, जो आधीच्या पात्रांपेक्षा कथेला अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकत होता.
ते म्हणतात की, "चित्रपट बनला आणि सुपरहिट झाला. हा अजय देवगण आणि दिग्दर्शकाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट आहे."
जर अक्षय खन्ना या चित्रपटात असता, तर त्याच्या यशाचं निम्मं श्रेय त्याला मिळालं असतं.
त्यांच्या मते, आज हिंदी चित्रपटसृष्टीत पुरुष कलाकारांकडून आकारलं जाणारं अवाजवी मानधन हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी होण्याचं एक प्रमुख कारण आहे.
एखादा चित्रपट हिट किंवा फ्लॉप कसा ठरतो?
थिएटर चालक अक्षय राठी यांना असं वाटतं की, गेल्या काही वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीची झपाट्यानं वाढ झाली आहे. भारतात आणि परदेशातही तिची बाजारपेठ विस्तारलेली आहे.
ते म्हणतात की, "100 कोटी रुपये कमावणारा पहिला चित्रपट 'गजनी' होता. त्यानं विक्रम मोडले आणि कमाईचा एक नवीन मापदंड प्रस्थापित केला."
2026 साली आपल्याला 'धुरंधर 2' च्या रूपानं 1000 कोटी रुपये कमावणारा पहिला चित्रपट मिळाला.

फोटो स्रोत, ANI
अक्षय राठी म्हणतात की, एखादा चित्रपट हिट होणार की फ्लॉप, हे त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईपेक्षा गुंतवणुकीवरील परताव्यावरून अधिक ठरवलं जातं.
ते म्हणतात की, "'ट्वेल्थ फेल' सारखा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपये कमावून हिट होऊ शकतो. याउलट, एखादा चित्रपट प्रचंड बजेटमुळे 100 कोटी रुपये कमावूनही फ्लॉप होऊ शकतो."
त्यांच्या मते, गुंतवणुकीवरील परताव्याच्या बाबतीत, 'हनुमान अंश' हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक फायदा कमावलेल्या चित्रपटांपैकी एक ठरू शकतो.
ते म्हणतात की, "चित्रपटसृष्टी टिकून राहण्यासाठी सर्व प्रकारचे चित्रपट बनले पाहिजेत. प्रत्येक चित्रपटाचा स्वतःचा प्रभाव आणि स्वतःचा प्रेक्षकवर्ग असतो."
"सर्व प्रकारचे चित्रपट जवळपास सारख्या संख्येत बनवले जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून भारतातील बॉक्स ऑफिस व्यवसाय दीर्घकाळात मजबूत आणि सुदृढ राहील.
'प्रेक्षकांना गृहीत धरता येत नाही'
हिंदी चित्रपटसृष्टीचा व्यवसाय, मार्केटिंगच्या पद्धती आणि सध्याच्या समस्यांबद्दल बोलताना, 'दृश्यम 3' चे निर्माते कुमार मंगत पाठक म्हणतात की, प्रेक्षक आता पूर्वीपेक्षा खूप विचारपूर्वक चित्रपट निवडतात.
ते म्हणतात की, "आज तुम्ही प्रेक्षकांना गृहीत धरू शकत नाही. त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. एखादा चित्रपट पाहण्यासारखा आहे असं वाटलं तरच ते चित्रपटगृहात येतील."
निर्माता म्हणून आपण चांगल्या कथा, विवेकी विचार करून ठरवलेलं बजेट आणि प्रेक्षकांच्या आवडीनिवडी समजून घेण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
कुमार मंगत पाठक म्हणतात की त्यांच्यासाठी प्रत्येक चित्रपट कथेपासून सुरू होतो.
ते म्हणतात की, "जेव्हा आम्ही 'ओमकारा' बनवला, तेव्हा आम्ही शेक्सपियरच्या 'ऑथेलो'चं हिंदी रूपांतरण करण्याचा धोका पत्करला होता."
तो काही सर्वसामान्य विषय नव्हता, पण आमचा चित्रपटावर आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास होता. त्या अनुभवानं मला शिकवलं की, कधीकधी आपल्याला आपल्या नशिबावर विश्वास ठेवावा लागतो.
दिग्दर्शक, कलाकारांची निवड आणि बजेट यांचाही विचार करावा लागतो, पण माझ्यासाठी कथा ही नेहमीच पहिली पायरी असते.
चित्रपटाचं बजेट कशा-कशामध्ये भागांमध्ये विभागलं जातं?
चित्रपटाच्या बजेटबद्दल कुमार मंगत पाठक म्हणतात की, "त्यामध्ये कलाकारांचं मानधन, दिग्दर्शक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचं वेतन, तसेच चित्रीकरण, निर्मिती आणि चित्रीकरणानंतरच्या कामाचा खर्च या सगळ्याचा समावेश होतो."
त्यानंतर मार्केटिंग आणि प्रमोशनचा खर्च येतो. तुम्ही कोणत्या प्रकारचा चित्रपट बनवत आहात, यावर बजेट अवलंबून असतं.
त्यांच्या मते, 'स्पेशल 26' आणि 'रेड' सारखे चित्रपट बनवताना कथेचा स्तर समजून घेणं आणि त्यानुसार खर्चाचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे.
ते म्हणतात की, "माझा विश्वास आहे की चित्रपटाच्या कमाईच्या क्षमतेनुसार पैसे खर्च केले पाहिजेत, कारण चित्रपट बनवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच गुंतवणूक वसूल करणंही महत्त्वाचं आहे."
एखाद्या चित्रपटाची एकूण आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी, त्याचं बजेट, प्रिंट आणि प्रसिद्धीवरील खर्च, पहिल्या तीन दिवसांची कमाई आणि एकूण कमाई यांचा विचार केला जातो.
कुमार मंगत पाठक म्हणतात की, निर्माते सर्वप्रथम चित्रपटातील एकूण गुंतवणुकीचा विचार करतात. यामध्ये चित्रपट निर्मिती आणि प्रसिद्धीच्या खर्चाचा समावेश असतो.
ते म्हणतात की, "पहिल्या आठवड्यातील कमाईवरून चित्रपट कसा चालला आहे याचा अंदाज येतो, पण त्यातून संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही."
शेवटी, चित्रपटानं त्याच्या संपूर्ण प्रदर्शनादरम्यान किती व्यवसाय केला आणि त्यातून प्रत्यक्षात किती पैसे परत मिळवले, हेच पाहावं लागेल.
ते म्हणतात की, मोठ्या, मध्यम किंवा कमी बजेटच्या चित्रपटाची अशी कोणतीही एकच परिभाषा निश्चित नाही. ही गोष्ट चित्रपटाचा आवाका, कलाकार आणि विषय यावर अवलंबून असते.
पुढे ते म्हणतात की, "प्रेक्षकांशी नातं जोडण्यासाठी चित्रपटाला नेहमीच मोठे बजेट असावं लागत नाही. याचं 'प्यार का पंचनामा' हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे."
दुसरीकडे, मोठ्या स्तरावर बनवलेल्या चित्रपटालाही त्याच्या पातळीनुसार व्यवसाय करावा लागतो. चित्रपटाच्या कमाईची क्षमत किती आहे, त्यानुसार पुरेसा खर्च करून त्याची निर्मिती करणं महत्त्वाचं आहे.

फोटो स्रोत, ANI
बिग बजेटच्या चित्रपटांचं युग संपुष्टात येत आहे का?
मोठे स्टार्स असलेले महागडे चित्रपट आपला खर्च वसूल करू शकत नसल्यामुळे त्यांचं युग संपुष्टात येत आहे का?
या प्रश्नावर कुमार मंगत पाठक म्हणतात की, "नाही, मला वाटत नाही की मोठे बजेट असलेले चित्रपट आता कालबाह्य होतील. प्रेक्षकांना आजही मोठे चित्रपट मोठ्या पडद्यावर बघायला आवडतात."
पण मोठा स्टार किंवा मोठं बजेट चित्रपटाच्या यशाची हमी देत नाही. 'शैतान' चित्रपटानं दाखवून दिलं की एक सशक्त कल्पनासुद्धा प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत आणू शकते. चित्रपट लोकांच्या मनाला भिडणारा असावा आणि त्याचा खर्च व्यावसायिकदृष्ट्या परवडणारा असावा.
कुमार मंगत पाठक म्हणतात की, गेल्या काही वर्षांत मार्केटिंग आणि प्रसिद्धीचा खर्च वाढला आहे, कारण चित्रपटांच्या प्रसिद्धीची वा प्रमोशनची पद्धत पूर्णपणे बदलली आहे.
"आज आपण डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, आउटडोअर जाहिरात, इव्हेंट्स आणि इतर अनेक माध्यमांचा वापर करतो," असं ते म्हणतात.
प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्याची स्पर्धाही पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाली आहे. पण मला असं वाटतं की, जास्त पैसे खर्च केल्यानं नेहमीच उत्तम मार्केटिंग होतंच असं नाही.
त्यांच्या मते, हिंदी चित्रपटसृष्टीची सध्याची समस्या ही आहे की खर्च वाढला आहे आणि प्रेक्षक पूर्वीपेक्षा अधिक विचारपूर्वक चित्रपट निवडत आहेत.
ते म्हणतात की, "कधीकधी चित्रपटाचं बजेट इतकं जास्त असतं की, त्याचा खर्च वसूल करण्यासाठीसुद्धा त्याला विलक्षण व्यवसाय करावा लागतो."
'दृश्यम'सारख्या चित्रपटांवरून आपण पाहिलं आहे की, एक सशक्त कथा आणि आकर्षक पटकथा प्रेक्षकांशी दीर्घकाळ टिकणारं नातं निर्माण करू शकते. आपल्याला चांगल्या आशयावर लक्ष केंद्रित करण्याची आणि खर्चाच्या बाबतीत व्यावहारिक राहण्याची गरज आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीसमोरच्या समस्या कशा सोडवता येतील?
कुमार मंगत पाठक म्हणतात की, चित्रपटसृष्टीला बजेट ठरवताना अधिक शिस्तबद्ध राहावं लागेल आणि प्रत्येक चित्रपटाच्या कमाईच्या क्षमतेकडे प्रामाणिकपणे पाहावं लागेल.
ते म्हणतात की, "प्रत्येक चित्रपट भव्य स्तरावरचं बनवला पाहिजे असं नाही."
आम्ही 'ओमकारा', 'स्पेशल 26' पासून ते 'प्यार का पंचनामा' आणि 'दृश्यम' पर्यंत विविध प्रकारचे चित्रपट बनवले आहेत.
वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे दृष्टिकोन आवश्यक असतात. उत्तम आशय आणि सुनियोजित रणनीती असणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
त्यांच्या मते, चित्रपट निर्मितीचा खर्च अधिक वास्तववादी असायला हवा.
पुढे ते म्हणतात की, "अभिनेत्याचं मानधन चित्रपटाच्या कमाईच्या क्षमतेनुसार योग्य असलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की कलाकारांना चांगलं मानधन मिळू नये. मुद्दा फक्त एवढाच आहे की चित्रपटाची एकूण आर्थिक योजना व्यवस्थित काम करते आहे ना, याची खात्री करणे."
"चित्रपटाला आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्यासाठी प्रत्येकानं योगदान दिले पाहिजे. कारण, गुंतवणुकीची अंतिम जबाबदारी निर्मात्यावर असते."
कुमार मंगत पाठक म्हणतात की, "माझ्यासाठी हिट तो चित्रपट आहे, जो आपला खर्च वसूल करून नफा कमावतो. फ्लॉप तो चित्रपट आहे, जो आपला खर्चसुद्धा वसूल करू शकत नाही."
एखाद्या चित्रपटाचं मूल्यमापन केवळ त्याच्या एकूण कमाईवरून करता येत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाचं बजेट आणि त्यातून मिळालेला प्रत्यक्ष परतावा हीच अधिक महत्त्वाची ठरते.
ते म्हणतात की, "'ओंकारा' पासून 'दृश्यम', 'रेड' आणि 'शैतान' पर्यंत, पॅनोरामामधील आमचा प्रवास हा विविध कथांना पाठिंबा देण्याचा आणि त्यांच्यासाठी योग्य प्रेक्षक शोधण्याचा राहिला आहे."
आमच्या चित्रपटांना 50 हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. ही एक उत्साहवर्धक बाब आहे, पण अखेरीस प्रत्येक चित्रपटाला व्यावसायिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहावं लागतं.

फोटो स्रोत, Satish Bate/Hindustan Times via Getty Images
'बॉक्स ऑफिस कमाई हे निर्मात्याचं उत्पन्न नसतं'
'हनुमान अंश' या यशस्वी चित्रपटाच्या निर्मात्या अनुप्रिया नागर म्हणतात की, केवळ चित्रपटाचा खर्च आणि बॉक्स ऑफिसवरील एकूण कमाई यांची तुलना करून चित्रपटाची आर्थिक स्थिती समजू शकत नाही.
त्या म्हणतात की, "सर्वात आधी चित्रपट बनवण्याचा खर्च येतो. यामध्ये चित्रीकरण, कलाकार, चित्रपट चमू, चित्रीकरणाचं ठिकाण, उपकरणं आणि चित्रीकरणानंतरची कामं यांचा खर्च समाविष्ट असतो."
त्यानंतर छपाई आणि प्रसिद्धीचा खर्च येतो, ज्याला सामान्यतः पी अँड ए (P&A) असं म्हटलं जातं.
यामध्ये ट्रेलर, पोस्टर, डिजिटल मार्केटिंग, मीडिया प्रमोशन, प्रचारात्मक साहित्य आणि चित्रपटगृहांपर्यंत पोहोचवण्याचा खर्च समाविष्ट आहे.
जाहिरात आणि प्रसिद्धी हा स्वतःच एक मोठा अतिरिक्त खर्च असू शकतो. त्यामुळे, चित्रपटाच्या एकूण खर्चाची गणना करताना त्याचा समावेश करणं महत्त्वाचं आहे.
अनुपप्रिया नागर म्हणतात की, जाहीर केलेली एकूण बॉक्स ऑफिस कमाई ही निर्मात्याचं उत्पन्न नसते.
ती म्हणते, "यातून आधी कर कापला जातो. त्यानंतर चित्रपटगृह किंवा प्रदर्शक करारानुसार आपला वाटा ठेवतो."
वितरण खर्च आणि कमिशन देखील वजा केलं जाऊ शकतं. या कपातीनंतर उरलेली रक्कम, विविध करारानुसार, निर्मात्याला किंवा हक्कधारकाला मिळते.
त्याच्या मते, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांतील कमाईवरून लोकांमध्ये त्याबद्दल असलेली जागरूकता आणि तो पाहण्याची सुरुवातीची मागणी दिसून येते.
तर, एकूण प्रदर्शनाचा अवधी हे दर्शवतो की प्रेक्षक चित्रपटाबद्दल काय म्हणत आहेत आणि चित्रपट चित्रपटगृहांमध्ये किती काळ टिकला.
त्या म्हणतात की, "चांगली सुरुवात झाली म्हणजे नफ्याची आपोआप हमी मिळत नाही. त्याचप्रमाणे, माफक सुरुवात झाली म्हणजे चित्रपटाचा प्रवास संपला, असंही होत नाही."
'हनुमान अंश'ची कमाई कशी वाढली?
'हनुमान अंश' हे याचंच उदाहरण असल्याचं अनुप्रिया नागर सांगतात.
"आम्ही चित्रपट मर्यादित स्वरूपात सुरू केला होता. पण जसजसं प्रेक्षकांनी चित्रपट पाहिला आणि इतरांना त्याची शिफारस केली, तसतसा व्यवसाय वाढत गेला," असंही त्या म्हणतात.
मला गोपनीय आर्थिक तपशील किंवा करार उघड करायचे नाहीत. पण मथळ्यांमध्ये दिसणारी बॉक्स ऑफिस कमाई आणि निर्मात्याला मिळणारा प्रत्यक्ष परतावा या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत.
त्यांच्या मते, परदेशातील कमाई, डिजिटल, सॅटेलाइट, संगीत आणि इतर हक्क विकून चित्रपटाचा खर्च वसूल करता येऊ शकतो.
"त्यामुळे, चित्रपटाची संपूर्ण आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी, एकूण खर्च, चित्रपटगृहांमधील वाटा आणि उत्पन्नाचे इतर सर्व स्रोत विचारात घ्यावे लागतील. हिंदी चित्रपटसृष्टी आजारी नाही, ती बदलाच्या टप्प्यात आहे."
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सध्याच्या स्थितीबद्दल अनुपप्रिया नागर म्हणतात की, "हिंदी चित्रपटसृष्टी आजारी आहे हे मला मान्य नाही. माझ्या मते, त्यात एक मोठं परिवर्तन होत आहे."
"आता प्रेक्षकांना जगभरातील चित्रपट आणि इतर प्रकारचा कंटेटही उपलब्ध आहे. ते केवळ एखाद्या मोठ्या स्टारमुळे किंवा मोठ्या जाहिरात मोहिमेमुळे चित्रपटगृहात जात नाहीत.
त्यांना त्यांच्या वेळेच्या आणि पैशांच्या बदल्यात एक दमदार कथा, भावनिक ओढ आणि खऱ्या अर्थानं मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अनुभव हवा असतो.
अनुपप्रिया नागर म्हणतात की, प्रेक्षकांच्या आवडीनिवडी समजून घेण्याऐवजी चित्रपटसृष्टीतील ट्रेंडनुसार चित्रपट बनवले जातात, तेव्हा खऱ्या अर्थानं समस्या सुरू होते.
त्या म्हणतात की, "बऱ्याचदा पटकथा पूर्णपणे तयार होण्याआधीच चित्रपटाचा दर्जा आणि कलाकार ठरलेले असतात. त्यामुळे खर्च वाढतो, पण कथा तितकी प्रभावी होत नाही. प्रेक्षकांना दोष देण्याऐवजी, चित्रपटसृष्टीनं त्यांना पुन्हा समजून घेण्याची गरज आहे."

फोटो स्रोत, Anupriya Nagar
त्यांच्या मते, लहान आणि मध्यम बजेटच्या चित्रपटांनाही त्यांचे प्रेक्षक शोधण्यासाठी पुरेशी चित्रपटगृहे आणि वेळ मिळाला पाहिजे.
त्या म्हणतात की, "प्रत्येक चित्रपटाला पहिल्याच वीकेंडला हिट किंवा फ्लॉप घोषित केल्यानंही नुकसान होतं."
"प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाणं थांबवलेलं नाही. ते फक्त चित्रपट निवडताना अधिक काळजी घेऊ लागले आहेत."
पेड प्रमोशन आणि पेड रिव्ह्यूमध्ये काय फरक आहे?
अनुप्रिया नागर या प्रश्नावर म्हणतात की, सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पैसे देणं आणि चित्रपटाचं परीक्षण करून घेण्यासाठी पैसे देणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
"पैसे देऊन केलेली प्रसिद्धी चित्रपटाला लोकांच्या नजरेत आणू शकते," असं त्या म्हणतात.
डिजिटल जाहिरातीद्वारे चित्रपटाचा ट्रेलर, संगीत, मुलाखती आणि माहिती योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे, हा मार्केटिंगचा एक उत्तम मार्ग आहे.
पण पैसे देऊन मिळवलेला प्रवेश कोणालाही तिकीट खरेदी करण्यास किंवा चित्रपटाचा खऱ्या अर्थानं आनंद घेण्यास भाग पाडू शकत नाही.
त्यांच्या मते, पैसे देऊन लिहिलेली परीक्षणं किंवा हेतुपुरस्सर रचलेली खोटी प्रशंसा थोड्या काळासाठी चर्चा निर्माण करू शकते, परंतु त्यामुळे प्रेक्षकांचा विश्वास तुटू शकतो.
"जर ऑनलाइन तयार झालेली चित्रपटाची प्रतिमा प्रत्यक्ष पाहण्याच्या अनुभवापेक्षा लक्षणीयरीत्या वेगळी असेल, तर नकारात्मक संदेश आणखी वेगाने पसरतात," असंही त्या सांगतात.
"पैसे देऊन तुम्ही लोकांच्या नजरेत येऊ शकता, पण प्रेक्षकांचं प्रेम विकत घेता येत नाही."
अनुप्रिया नागर म्हणतात की, 'हनुमान अंश'च्या प्रवासादरम्यान त्यांना असं दिसून आलं की, चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी प्रेक्षकांची प्रामाणिक शिफारस हे सर्वात प्रभावी माध्यम ठरलं.
"जेव्हा प्रेक्षक स्वतःहून चित्रपटाबद्दल बोलू लागले आणि इतरांना तो पाहण्यास सांगू लागले, तेव्हा खरा बदल सुरू झाला," असंही त्या म्हणतात.
"सोशल मीडिया एखाद्या चित्रपटासाठी पहिलं दार उघडू शकतो. पण त्याची कथा आणि आशय हाच प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणू शकतो आणि त्यांचं समाधान करून घरी पाठवू शकतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)





























