तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
संजय राऊत पत्नी ईडी नोटीस प्रकरण : मी काही ईडीचा प्रवक्ता नाही - देवेंद्र फडणवीस #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही - देवेंद्र फडणवीस
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्याप्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"चांगलं काम केलं तर कुणाला नोटीस मिळत नाही, त्यामुळे जर चांगलं काम केलं असेल आणि कुठलीही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं कारण नाही," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
भाजपाच्या आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप कार्यक्रमानंतर इस्लामपूरमध्ये माध्यमांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर फडणवीस यांनी उत्तर दिलं.
यावेळी फडणवीस म्हणाले, "मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. याबाबत तुम्ही ईडीला विचारलं पाहिजे." लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
दरम्यान, पीएमसी बॅंक कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस पाठवली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
2. शेतकरी नेते राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी
दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांचं आंदोलन सुरू असून भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत त्यात सहभागी आहेत.
राकेश टिकैत यांना निनावी नंबरवरून जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील कौशांबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी फोन करणा-याचा शोध सुरू केला आहे. आज तकनं ही बातमी दिली आहे.
अज्ञात व्यक्तीने फोनवरून टिकैत यांना किती हत्यारे पाहिजेत? असा प्रश्न विचारला. टिकैत यांनी प्रतिप्रश्न केला असता, तुम्हाला मारण्यासाठी किती हत्यारे घेवून यावे लागतील, असं उत्तर या व्यक्तीनं दिलं.
3. नागपूरात महिलेला जिवंत जाळलं
भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका महिलेला भर चौकात जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना नागपूरमधील अंजुमन पॉलिटेक्निक महाविद्यालयाजवळ घडली आहे. त्यानंतर आरोपी फरार झाला. दरम्यान, पीडित महिलेला जळताना पाहून नागरिकांनी धाव घेऊन आग विझवली. तसंच त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मात्र, उपचारादरम्यान आज पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण नागपूर जिल्हा हादरला असून याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
पोलीसनामानं ही बातमी दिलीय.
4. शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये- अशोक चव्हाण
यूपीएचे अध्यक्षपद काँग्रेस नेत्या सोनिया गांधींऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी केली जात आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सामनाच्या अग्रलेखातून यूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार असावेत, असं म्हटलं होतं. त्यावरून आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की, "शिवसेना हा पक्ष यूपीएमध्ये सहभागी नाही. महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरुनच शिवसेनेला पाठींबा दिला आहे. त्यामुळे यूपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये."
दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.
5. पोलीस विभाग लाचखोरीत अव्वल
राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्षभरातील 596 सापळ्यात 814 अधिकारी, कर्मचारी अडकले आहेत. लाचखोरीत विभाग अव्वल आहे, तर महसूल-भूमी अभिलेख विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.
एक जानेवारी ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीत एसीबीनं राज्यात 596 सापळे रचले. त्यात 814 अधिकारी, कर्मचारी अडकले आहेत. यात वर्ग एकचे 41, दोनचे 69, तीनचे 490, चारचे 21, तर इतर लोकसेवक 50 आणि 143 खासगी व्यक्तींचा लाचखोरीत सहभाग आढळून आला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज संध्याकाली 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)