रावणाच्या भूमिकेत यश: खिशात केवळ 300 रुपये घेऊन बाहेर पडलेला बस ड्रायव्हरचा मुलगा कसा बनला 'रॉकिंग स्टार'?

Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

कन्नड चित्रपटसृष्टीत 'रॉकिंग स्टार' या नावाने प्रसिद्ध असलेल्या यशने हिंदी चित्रपटात रावणाची भूमिका का स्वीकारली याची चर्चा होताना दिसत आहे.

यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर रणबीर कपूर अभिनित 'रामायण' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाच्या बजेटपासून ते कलाकारांपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा सुरू आहे.

या चित्रपटात रामाची भूमिका बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर साकारत आहे, तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे.

या संदर्भात आणखी एक नाव विशेष चर्चेत आहे आणि ते म्हणजे कन्नड चित्रपट अभिनेता यश.

यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारत आहेत. तसेच तो या चित्रपटाचा सहनिर्माता देखील आहे.

या चित्रपटाचा पहिला भाग 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

यशच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत. जेव्हा KGF हा चित्रपट संपूर्ण भारतात हिट झाला तेव्हा यश प्रसिद्धीच्या झोतात आला.

8 जानेवारी 1986 ला कर्नाटकातील हासन जिल्ह्यात यशचा जन्म झाला. त्याचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. पण त्याला सर्व जण 'रॉकिंग स्टार यश' या नावानेच ओळखतात.

एकदा बॉलिवूड हंगामाच्या इंटरव्युत यशला विचारण्यात आलं की समजा तुम्हाला कुणी नवीन कुमार गौडा या नावाने हाक मारली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल, त्यावर यशने खेळीमेळीत उत्तर दिले की 'हा कोण आहे?'

ही गोष्ट पण खरीच आहे म्हणा, कारण यशला या नावाने त्याचे चाहते ओळखतच नाहीत.

सर्वांना उत्सुकता आहे की कर्नाटकातल्या एका छोट्या शहरातील युवक आधी कन्नड सिनेमात कसा चमकला, आणि आता त्याचा रावणाची भूमिका करण्यापर्यंतचा प्रवास कसा आहे?

यश चित्रपटात कसा आला?

यश हा काही चित्रपटसृष्टीशी संबंधित कुटुंबात आलेला नाही. त्याचे वडील बस ड्रायव्हर होते. यशने अॅक्टिंगमध्ये करिअर करण्याचे ठरवले आणि शिक्षणानंतर तो थिएटर आणि टीव्हीत गेला.

2014 मध्ये कन्नड कार्यक्रम 'वीकेंड विथ रमेश' यात त्याने सांगितले की लहानपणापासूनच त्याला नाटकात आणि नृत्य स्पर्धात भाग घ्यायची आवड आहे. अगदी लहान वयापासूनच त्याला लोकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या इतक्या आवडू लागल्या की त्याला याची सवयच झाली.

तो सांगतो, जेव्हा माझे शिक्षक मला हिरो म्हणून हाक मारत होते तेव्हा मला छान वाटत होतं. हळूहळू माझ्या मनात हिरो बनण्याचा विचार आला. त्याच वेळी मी विचार केला की मला आता चित्रपट अभिनेताच व्हायचे आहे.

पण आयुष्याचा सुरुवातीचा काळ कठीण होता. इंटरव्यूत त्याने सांगितले की त्याचे वडील बंगळुरू महानगर पालिकेच्या बसवर ड्रायव्हर होते आणि त्यांची दिवसाची कमाई फक्त 14 रुपये इतकी होती. आई, वडील, तो आणि एक छोटी बहीण हे कुटुंबात आहेत.

घरातील जबाबदाऱ्यांमुळे त्याला आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्याला आपल्या कुटुंबीयांसोबत किराणा दुकान चालवले लागत असे.

जेव्हा यशने आपल्याला चित्रपटसृष्टीत जायचंय हे सांगितलं तेव्हा त्याचे कुटुंबीय त्याच्या निर्णयावर खुश नव्हते. त्याच्या वडिलांना वाटत होतं की त्याने सरकारी अधिकारी व्हावं.

घरातून बाहेर पडताना खिशात फक्त 300 रुपये होते

2019 मध्ये द न्यूज मिनिटला इंटरव्यूत त्याने सांगितले होते की जेव्हा तो घर सोडून आपलं नशीब आजमवाण्यासाठी बंगळुरूला पळून आला तेव्हा त्याच्या खिशात फक्त 300 रुपये होते.

त्याने सांगितले की जेव्हा मी बंगळुरूत पोहोचले तेव्हा मी खूप घाबरलो. एवढं मोठं शहर! पण माझ्यात अगदी सुरुवातीपासूनच आत्मविश्वास होता. मला संघर्षाची भीती वाटत नाही. मला हे माहीत होतं की जर मी परत गेलो तर मला माझे आई-वडील इथे कधी येऊ देणार नाहीत.

त्यांनी सांगितलं की त्याच्या आई-वडिलांना त्यांना बजावलं होतं की जर हिरो म्हणून आपलं नशीब आजमावायचं असेल तर ते करण्यासाठी तो स्वतंत्र आहे, पण जर समजा यात यशस्वी नाही झाला तर तेच करावे लागेल जे आम्ही सांगू.

थिएटरमुळे मी एक वेगळा माणूस बनलो

वीकेंड विथ रमेशमध्ये आपला मित्र नंजुंडबद्दल त्याने सांगितले की नंजुंडमुळेच मला थिएटरची ओळख झाली. आधी मला फक्त पौराणिक नाटकांबद्दलच माहीत होतं. ज्यात गदा हातात घेऊन लढलं जात असे. सामाजिक नाटकांसंबंधी मला काही माहीत नव्हतं. थिएटरच्या जगाची ओळख नंजुंडमुळे झाली.

पुढे तो सांगतो, जेव्हा मी पहिल्यांदा बेनका थिएटर ग्रुपशी जोडलो गेलो तेव्हा माझं जगच बदललं. मला वाटतं थिएटरमुळे मी एक वेगळा माणूस बनलो. माझं व्यक्तिमत्त्व घडवण्यात थिएटरची महत्त्वाची भूमिका आहे.

योगायोगामुळे मिळाला पहिला चित्रपट

2007 मध्ये 'जंबाडा हुडुगी' या चित्रपटातून सहायक अभिनेता म्हणून यशचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले.

याआधी त्याने 'उत्तरायण' आणि 'नंदा गोकुला' या टीव्ही शोमध्ये काम केलं होतं.

'नंदा गोकुला' हा एक लोकप्रिय टीव्ही शो होता. यातूनच यशची ओळख निर्माण झाली. यात यश आणि राधिका पंडितची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. हा शो 2004-2007 मध्ये प्रदर्शित झाला होता.

यशला ज्या चित्रपटामुळे ओळख मिळाली तो चित्रपट 'मोगिन्ना मनसू' हा 2008 मध्ये आला होता. विकेंड विथ रमेश मध्ये त्याने सांगितलं की चित्रपटासाठी दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली होती. पण त्या अभिनेत्याला ऐन मुहूर्ताच्यावेळी बाइकहून पडल्यामुळे दुखापत झाली होती आणि तो शूटिंग करू शकला नाही. टीमला दुसऱ्या कलाकाराची गरज पडली आणि हा रोल मला मिळाला.

या घटनेबद्दल डायरेक्टर शशांक आठवण सांगतात की "मी यशला टीव्ही सीरियलमध्ये पाहिलं होतं. त्याचे काम मला आवडत होते. जेव्हा मी मोगिना मनसुचं बनवत होतो तेव्हा या व्यक्तिरेखेसाठी माझ्या मनात यशचं नाव आलं."

ते पुढे सांगतात की "ही भूमिका समजून घेण्यासाठी त्याने भरपूर मेहनत घेतली होती. प्रत्येक शॉटवेळी तो विचारत असे की या पद्धतीनं करायचं की दुसऱ्या पद्धतीने. एकाच सिनसाठी तो माझ्यासमोर अनेक पर्याय ठेवत असे. त्याच्यात अभिनयाबरोबरच डान्स, समर्पण आणि कामाबद्दल आदरही होता."

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. 'मोगिन्ना मनसू' चित्रपटासाठी यशला उत्कृष्ठ सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला आहे.

KGF मुळे संपूर्ण भारतात ओळख मिळाली

आधी चित्रपट समीक्षक आणि आता निर्मात्या बनलेल्या सुनयना सुरेश सांगतात की यशच्या करिअरला महत्त्वाचं वळण देण्यात दोन-तीन चित्रपटांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

त्याचा पहिला महत्त्वाचा चित्रपट 'मोगिन्ना मनसु' होता आणि त्यात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्यासाठी त्याला फिल्मफेअरही मिळाला आणि त्यामुळे ओळख देखील मिळाली.

त्यानंतर गुगली चित्रपट आला. यामुळे ते युवक, विशेषतः कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय बनला. या चित्रपटाने त्याला स्टार बनवले.

त्यानंतर 'मिस्टर अँड मिसेस रामाचारी' या चित्रपटामुळे सुपरस्टार बनण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या चित्रपटातदेखील त्याची पत्नी राधिका पंडित होती. हा चित्रपट कन्नड फिल्म इंडस्ट्रीतला हिट चित्रपट बनला.

यशच्या करिअरमध्ये या दोन मोठ्या चित्रपटांची निर्णायक भूमिका आहे. त्यानंतर आलेल्या केजीएफने त्याला इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळं ठरवलं.

सुनयना सुरेश सांगतात "केजीएफच्या माध्यमातून त्याची हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण झाली, विशेषतः उत्तर प्रदेश-बिहार सारख्या हिंदी भाषक प्रदेशाला असा नायक मिळाला ज्याची त्यांना कमी जाणवत होती."

रावणाच्या भूमिकेबाबत यशने काय सांगितले

कॉमिक कॉन्स 2026 मध्ये यशला रावणाच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्याने सांगितले की ही खूप गुंतागुंतीची व्यक्तिरेखा आहे. जरा विचार करा एक अशी व्यक्तिरेखा, ज्या व्यक्तिरेखेवर लोक इतके चिडतात की दरवर्षी त्याचा पुतळा जाळला जातो. या गोष्टीतून हे लक्षात येतं की त्याने आपली ओळख कोणत्या स्तरावर बनवलेली आहे.

यशने पुढे सांगितले की "अशा भूमिकेबद्दल सर्वांनाच माहीत आहे आणि त्याची प्रतिमा लोकांच्या मनात तयार आहे, त्यावेळी ती भूमिका साकारणे हे आणखी आव्हानात्मक बनते."

तो पुढे सांगतो, "जर नवा चित्रपट आहे आणि तुम्ही त्याची स्टोरी ऐकत आहात, तेव्हा असं असतं की तुम्ही जे काही करताल तीच त्या व्यक्तिरेखेची ओळख बनेल. पण आधीपासूनच लोकांच्या मनात त्या व्यक्तिरेखेबाबतची कल्पना तयार आहे आणि अनेक वेगवेगळ्या अभिनेत्यांनी ती आधी साकारली आहे तर एका अभिनेत्यावर आणखी मोठं ओझं असतं."

यशने सांगितले की त्याने अभिनेता म्हणून हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की रावणाने जे काही केलं ते का केलं. त्यापाठीमागे त्याची भूमिका काय होती.

यशने सांगितले की "मला वाटतं रावणाला पडद्यावर साकारण्याची सर्वांत उत्तम पद्धत हीच असू शकेल की त्याचा विचार आणि कृत्याचं कारण मी समजून घ्यावं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)