तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
रोज सप्लिमेंट्स आणि विटामिन्सच्या गोळ्या खात आहात? तब्येत सुधारण्याऐवजी होऊ शकतं 'हे' मोठं नुकसान!
- Author, रुथ क्लेग
- Role, हेल्थ रिपोर्टर
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
मी जास्त सप्लिमेंट्स घेते, असं मला कधीच वाटत नव्हते. मात्र, जेव्हा मी एक दिवस माझ्या कपाटात डोकावून पाहिलं, तेव्हा मलाच धक्का बसला.
नकळतपणे माझ्या कपाटात क्रिएटिन, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम, कोलेजन, सर्व पोषक घटक असलेलं एकच ग्रीन सप्लिमेंटचं पाकीट आणि मेनोपॉजच्या आधी होणाऱ्या त्रासावरच्या काही गोळ्या, असं बरंच काही होतं.
सोशल मीडियावरील सततच्या जाहिरातींचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही, असा माझा समज होता; पण तो साफ चुकीचा होता, हे मला समजलं.
"या गोळ्या सुरू केल्यापासून मला इतकं भारी वाटतं की, मी सांगूच शकत नाही!" अशा कमेंट्सनी माझ्या मनावर नक्कीच खोलवर परिणाम केला होता.
'व्हिच?' (Which?) या ग्राहक संघटनेने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, विचारणा केलेल्या लोकांपैकी 76 टक्के लोक नियमितपणे किमान एक सप्लिमेंट घेतात. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ओमेगा-3, प्रोबायोटिक्स आणि हर्बल सप्लिमेंट्सचा समावेश आहे.
इतकंच नाही, तर यातल्या जवळपास 20 टक्के लोकांचा असा दिनक्रम आहे की, ते रोज 4 किंवा त्यापेक्षा जास्त प्रकारची सप्लिमेंट्स घेतात.
गरजेच्या वेळी सप्लिमेंट्स आपले आरोग्य सुधारू शकते, परंतु काही तज्ज्ञ असा इशारा देतात की, 'आरोग्य जास्त चांगलं ठेवण्याच्या नादात आपण ते धोक्यात घालत आहोत.'
तज्ज्ञांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, सध्या लिव्हर, किडनी आणि पोटाचे विकार असणारे रुग्ण त्यांच्याकडे मोठ्या संख्येने येत आहेत.
त्यांच्या मते, लोक वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्रमाणापेक्षा जास्त सप्लिमेंट्स घेत असल्यामुळेच या समस्या निर्माण झाल्या आहेत.
एका आहारतज्ज्ञाने मला सांगितलं की, लोक सध्या जितक्या प्रमाणात सप्लिमेंट्स घेत आहेत, ते खरंच वेडेपणाचं आहे.
त्या म्हणाल्या, "काही लोकांना आता असं वाटू लागलं आहे की, जेवण्यापेक्षा एखादी गोळी घेणं जास्त फायदेशीर आहे. पण ते अजिबात तसं नाही."
3 वर्षांपूर्वी जेव्हा जिंजर स्मिथने सप्लिमेंट्स खायला सुरुवात केली, तेव्हा आपण आपल्या तब्येतीसाठी काहीतरी चांगलं करतोय, असंच तिला वाटत होतं.
ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असल्यामुळे सिएटलमधल्या तिच्या घरी वेगवेगळ्या ब्रँड्सकडून मोफत प्रॉडक्ट्सचे बॉक्सच्या बॉक्स येत राहायचे.
ही 30 वर्षांची मुलगी त्या गोळ्या, पावडर आणि जेल्स स्वतः वापरायची आणि नंतर इंटरनेटवर त्यावर व्हीडिओ बनवून त्या गोळ्यांचे किती फायदे आहेत, हे लोकांना सांगायची.
जिंजर सांगते, "मी मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, हळदीच्या गोळ्या आणि पोट साफ ठेवणारं एक खास सप्लिमेंट घेत होते. शिवाय, मी रोज इलेक्ट्रोलाइट्स मिक्स केलेलं पाणीही प्यायचे."
सुरुवातीची 2 वर्षं तिला खूप निरोगी आणि उत्साही वाटत होतं. पण या सगळ्या गोळ्यांमुळे तिच्या किडनीवर किती भयंकर ताण पडतोय, याची तिला थोडीही कल्पना नव्हती.
पुढे जाऊन जेव्हा तिच्या पाठीच्या खालच्या भागात असह्य कळा येऊ लागल्या, तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी काही ब्लड टेस्ट केल्या आणि अवघ्या काही दिवसांतच जिंजरला तातडीने सोनोग्राफी (अल्ट्रासाऊंड) करायला सांगितली.
"मला थोडी काळजी वाटत होती. पण माझ्या किडनीत इतका मोठा मुतखडा (किडनी स्टोन) आहे की तो काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल, असं डॉक्टर सांगतील ही अपेक्षा मला अजिबात नव्हती."
तो मुतखडा 2 ते 3 सेंटीमीटर आकाराचा होता आणि जिंजरला सांगण्यात आलं की, ती दररोज घेत असलेल्या वेगवेगळ्या सप्लिमेंट्समुळे हा मुतखडा तयार झाला होता.
ती सांगते, "स्वतःचे आरोग्य सुधारण्याच्या प्रयत्नात माझी अशी दुरवस्था होईल, असा मी कधी विचारही केला नव्हता. सुदैवाने माझ्याकडे इन्शुरन्स (विमा) होता. तरीही मला साधारण 5 ते सव्वापाच लाख रुपये (6,000 डॉलर) खर्च करावे लागले. अन्यथा हा खर्च जवळपास 30 लाख रुपये (35,000 डॉलर) रुपयांच्या घरात गेला असता."
"आम्ही जेव्हा पेशंटला विचारतो की, तुमची काही औषधं सुरू आहेत का? तेव्हा ते नाही म्हणतात. मग आजाराचं मूळ शोधण्यासाठी आम्हाला इतर गोष्टी तपासाव्या लागतात. जेव्हा सगळं तपासून होतं आणि काहीच सापडत नाही, तेव्हा आम्ही पुन्हा खोदून विचारतो. त्यावर पेशंट म्हणतात, 'हो, औषधं काही नाहीत, पण मी काही सप्लिमेंट्स आणि व्हिटॅमिन्सच्या गोळ्या मात्र घेतो.'"
अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार, लिव्हर डॅमेज होण्याच्या एकूण प्रकरणांपैकी तब्बल 20 टक्के प्रकरणं वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक गोळ्या आणि सप्लिमेंट्स एकत्र खाण्यामुळे होतात.
जर अतिप्रमाणात घेतले, तर लिव्हरसाठी अत्यंत घातक ठरू शकणाऱ्या घटकांमध्ये व्हिटॅमिन ए, ग्लुटामिन, अश्वगंधा आणि ग्रीन टीच्या अर्काचा प्रामुख्याने समावेश होतो. योग्य वेळी काळजी घेतली, तर लिव्हर पुन्हा पूर्वपदावर येऊ शकतं. पण जर या गोळ्यांचा वापर वर्षानुवर्षे सुरूच राहिला, तर लिव्हरचे कायमचे आणि गंभीर आजार जडू शकतात.
'ब्रिटीश लिव्हर ट्रस्ट'चे म्हणणे आहे की, याबद्दलची नेमकी आकडेवारी नसली, तरी सप्लिमेंट्सच्या अतिरेकामुळे लिव्हर निकामी झाल्याची प्रकरणं आता समोर येत आहेत. म्हणूनच या गोळ्यांचे जे काही कमी-अधिक फायदे तुम्हाला मिळतील, त्यासाठी एवढा मोठा धोका पत्करणं कितपत योग्य आहे, याचा लोकांनी विचार करावा.
सोशल मीडियावर आरोग्य आणि विज्ञान या संदर्भात व्हीडिओ बनवणारे एनएचएस सर्जन डॉ. करण राजन म्हणतात, "सप्लिमेंट्समुळे तुमच्या तब्येतीत खूप सकारात्मक बदल घडू शकतात, यात शंका नाही. पण जोपर्यंत एखादी गोळी किंवा सप्लिमेंट खरंच सुरक्षित आणि फायदेशीर आहे, हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याकडे सावधगिरीने आणि संशयानेच पाहिलं पाहिजे."
डॉ. राजन सांगतात की, गेल्या काही वर्षांत सप्लिमेंट्सबद्दलचा त्यांचा विचार खूप बदलला आहे आणि ते याबाबतीत अधिक खुल्या मनाने विचार करत आहेत.
इतकंच नाही, तर त्यांनी स्वतःचा एक फायबर सप्लिमेंट ब्रँडसुद्धा बाजारात आणला आहे.
योग्य विचार करून आणि हुशारीने वापरल्यास या सप्लिमेंट्सचा आपल्या रोजच्या आहारात नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो, असं त्यांना वाटतं.
ते म्हणतात, "वेगवेगळ्या सप्लिमेंट्सच्या बाबतीत संशोधन वाढत असल्याचं मी पाहिलं आहे. आपल्याला माहीत आहे की, आपली माती अनेक दशकांपूर्वी जितकी पोषक तत्त्वांनी समृद्ध होती, तितकी ती आज राहिलेली नाही."
"सोप्या भाषेत सांगायचं तर, 1950 च्या काळातल्या एका गाजरात जितकी पोषक तत्त्वे होती, ती आज 2026 च्या गाजरातून मिळणं कठीण आहे."
म्हणूनच शरीरात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून डॉ. राजन स्वतः व्हिटॅमिन डी, प्रीबायोटिक, प्रोटीन, फायबर आणि क्रिएटिन एकत्र करून घेतात. त्याला ते आपल्या भाषेत 'सप्लिमेंट स्टॅक' म्हणतात.
डॉ. राजन यांच्या मते, त्यांच्या शरीरासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे. परंतु वेगवेगळ्या सप्लिमेंट्स एकत्र करून खाण्यात मोठे धोके असतात. सध्या फॅमिली डॉक्टरांकडे असे अनेक रुग्ण नियमितपणे येत आहेत, जे अनेक सप्लिमेंट्स एकत्र घेत आहेत आणि कोणती सप्लिमेंट्स घ्यावीत याबद्दल सल्ला मागत आहेत.
रुग्णांच्या कदाचित हे लक्षात येत नाही की, ते वेगवेगळ्या नावाखाली एकाच प्रकारचे घटक दोनदा घेत आहेत. गरजेपेक्षा जास्त डोस घेत आहेत किंवा अशी उत्पादने घेत आहेत, ज्यांचा त्यांच्या डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांशी उलट परिणाम होऊ शकतो. प्रत्येक वेळी जास्त प्रमाणात घेणं फायदेशीरच असतं, असं नाही.
उदाहरण द्यायचं झालं, तर जर तुम्ही मल्टिव्हिटॅमिनची गोळी घेत असाल आणि वरून पुन्हा व्हिटॅमिन B6 ची वेगळी गोळी खात असाल, तर शरीरात त्याचा डबल डोस होतो.
दीर्घकाळ शरीरात व्हिटॅमिन B6 जास्त प्रमाणात गेल्यास नसा कमकुवत होण्याचा किंवा डॅमेज होण्याचा धोका असतो.
तसंच आयर्न, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या गोळ्या एकत्र करून खाल्ल्याने शरीर ते नीट शोषून घेऊ शकत नाही आणि त्याचा काहीच फायदा होत नाही. शिवाय व्हिटॅमिन A, D, E आणि K सारखी जीवनसत्त्वे चरबीत विरघळणारी असतात. म्हणजे शरीर ती दीर्घकाळ साठवून ठेवतं. म्हणूनच या गोळ्या रोजच्या रोज खाण्याची अजिबात गरज नसते.
"सोशल मीडिया लोकांना पटवून देत आहे की, उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी त्यांना या सप्लिमेंट्सची गरज आहे," असं यूकेमधील आहारतज्ज्ञ क्रिस्टन स्टाव्रिडिस म्हणतात.
त्यांना वाटतं की, त्या एका निष्फळ लढाईत लढत आहेत. "परंतु बहुतांश वेळा हे अजिबात खरं नसतं."
त्यांच्या मते, ज्या प्रौढ व्यक्तीला कोणताही आजार नाही, तिने फक्त चांगला संतुलित आहार घेतला तरी पुरेसं आहे. फार तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये व्हिटॅमिन D ची गोळी आणि खूपच गरज वाटल्यास एखादी मल्टिव्हिटॅमिन किंवा फिश ऑइलची गोळी घ्यावी.
ज्या महिलांमध्ये आयर्नची (लोहाची) कमतरता असण्याची शक्यता अधिक असते, त्यांच्यासाठी सप्लिमेंट्स फायदेशीर ठरू शकतात. पण तरीही या गोळ्या शरीरातील रक्ताचं प्रमाण नॉर्मल होईपर्यंत, म्हणजेच काही काळापुरत्याच खाल्ल्या पाहिजेत.
स्टॅव्रिडिस यांचा लोकांना एकच महत्त्वाचा सल्ला आहे की, पहिल्यांदा आपल्या जेवणाखाण्याकडे नीट लक्ष द्या. जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की, शरीरात एखाद्या व्हिटॅमिनची कमतरता आहे, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण केवळ सप्लिमेंट घेतल्याने ही समस्या सुटेल, असं गृहीत धरू नका.
त्या पुढे सांगतात की, सप्लिमेंटच्या लेबलवर दिलेलं 'रोजचं आवश्यक प्रमाण' नेहमी नीट वाचून घ्या आणि या गोळ्या तुमच्या इतर नेहमीच्या चालू असलेल्या औषधांमध्ये अडथळा तर आणत नाहीत ना, याची खात्री करा.
जिंजरला किडनी स्टोन काढण्याच्या शस्त्रक्रियेतून पूर्णपणे बरं होण्यासाठी अनेक महिने लागले. आता तिला पुन्हा एकदम फ्रेश वाटत आहे आणि ती कामावरही जाऊ लागली आहे.
ती हसत म्हणते, "सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे मी जेव्हा ते सगळे वेगवेगळे सप्लिमेंट्स घेत होते, तेव्हा मला जितकं उत्साही आणि निरोगी वाटत होतं, अगदी तसंच मला आताही वाटत आहे."
"आता मी दिवसातून फक्त एक मल्टिव्हिटॅमिन घेते आणि मला वाटतं की, तेवढं पुरेसं आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)