एक फोटो पाहून AI सांगणार रुग्णाचं आयुष्य किती उरलंय? संशोधनात काय आढळलं?

    • Author, मिशेल रॉबर्ट्स,
    • Role, डिजिटल हेल्थ एडिटर
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

रुग्णाच्या चेहऱ्याचा केवळ एक फोटो पाहून त्याची प्रकृती किती गंभीर आहे, याचा अंदाज आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने घेता येऊ शकतो, असं अमेरिकेतील संशोधकांनी म्हटलं आहे. त्यांच्या मते, हे तंत्रज्ञान डॉक्टरांना रुग्णाची स्थिती समजून घेण्यासाठी मदत करू शकतं.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या एआय टूलला लाखो निरोगी चेहऱ्यांचे आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांचे 35 हजार फोटो दाखवून प्रशिक्षित करण्यात आलं आहे. हे टूल डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागांचं बारकाईनं निरीक्षण करून रुग्ण आणखी किती काळ जगू शकेल, याचा अंदाज लावू शकतं.

संशोधकांचं म्हणणं आहे की, रुग्णालयांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर सुरू होण्यासाठी आणखी बराच वेळ लागेल. मात्र, डॉक्टरांना रुग्णांसाठी योग्य उपचार निवडता यावेत, हा या तंत्रज्ञानामागचा मुख्य उद्देश आहे.

या संशोधनाचे सुरुवातीचे निष्कर्ष 'लॅन्सेट डिजिटल हेल्थ' या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.

चेहऱ्याचा कोणता भाग आरोग्याबद्दल जास्त माहिती देतो?

या एआय टूलचं नाव 'फेससर्व्हायव्हल' आहे. एखादी व्यक्ती आणखी किती काळ जगू शकते किंवा त्याचं उर्वरित आयुष्य किती असू शकतं, याचा अंदाज लावण्यासाठी डोळ्यांच्या खालचा भाग आणि दोन्ही डोळ्यांमधील नाकाचा वरचा भाग सर्वात महत्त्वाचा असल्याचं हे टूल सांगतं.

एखादा रुग्ण आणखी किती काळ जगण्याची शक्यता आहे, याचा अंदाज लावताना हे टूल चेहऱ्याच्या याच भागांना सर्वाधिक महत्त्व देतं.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कॅन्सर कमी गंभीर असो किंवा जास्त गंभीर, दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी हे निकष लागू होतात. यात कॅन्सर हाडांपर्यंत किंवा मेंदूपर्यंत पसरलेल्या रुग्णांचाही समावेश होता.

हे एआय टूल तयार करण्यासाठी वापरलेल्या कॅन्सरच्या रुग्णांच्या फोटोंपैकी बहुतांश फोटो अमेरिका आणि नेदरलँड्समधील रुग्णांचे होते. या रुग्णांचं वय 50 ते 70 वर्षांदरम्यान होतं. परंतु, यात काही लहान मुलांचे, तर काही 90 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांचेही फोटो होते.

परंतु, रुग्णाची प्रकृती किती गंभीर आहे आणि पुढे त्याची तब्येत कशी असू शकते, हे समजून घेण्यासाठी डॉक्टर आधीच रुग्णाची तपासणी करतात आणि विविध चाचण्याही करून घेतात.

या एआय टूलच्या पेटंटसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सध्या ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हे टूल डॉक्टरांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे, त्यांची जागा घेण्यासाठी नाही.

बोस्टन येथील मॅस जनरल ब्रिघम रुग्णालयातील प्रमुख संशोधक डॉ. रेमंड मॅक यांनी सांगितलं, "लोकांचं वय वाढत असताना त्यांच्यावर रेडिएशन, शस्त्रक्रिया किंवा औषधांद्वारे उपचार करताना डॉक्टरांना योग्य मार्गदर्शन गरजेचं असतं. रुग्णाच्या शरीरात किती ताकद शिल्लक आहे आणि तो किती अशक्त आहे, याचा अंदाज घेण्यासाठी हे एआय टूल डॉक्टरांना मदत करू शकतं."

"चेहऱ्याच्या प्रतिमा किंवा फोटोवरून एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचं अधिक अचूकपणे आणि एकाच पद्धतीने मूल्यमापन करता यावं, हा आमचा उद्देश आहे. यामुळे मोठ्या संख्येनं रुग्णांची तपासणी करणंही शक्य होईल. प्रत्येक रुग्णासाठी योग्य उपचार ठरवताना डॉक्टरांना मदत करू शकेल. डॉक्टरांच्या निर्णयाची जागा घेणं हा उद्देश नाही."

एआयच्या नजरेत तुमचा चेहरा किती तरुण?

डॉ. मॅक आणि त्यांचे सहकारी आणखी एका अशा एआय टूलची चाचणी करत आहेत. हे टूल एखाद्या व्यक्तीचं जैविक वय (बायोलॉजिक एज) किती आहे, याचा अंदाज लावतं. म्हणजेच, जन्मतारखेनुसार व्यक्तीचं वय किती आहे, हे नव्हे, तर ती दिसायला किती वयाची वाटते, हे टूल सांगतं.

या टूलचं नाव 'फेसएज' आहे.

या टूलनुसार, नाकाखाली आणि तोंडाभोवतीची त्वचा पाहून एखाद्या व्यक्तीचं वय किती वेगानं वाढत आहे, याचा अंदाज लावता येऊ शकतो.

यामध्ये नाकापासून ओठांच्या कोपऱ्यांपर्यंत दिसणाऱ्या रेषा आणि तोंडाच्या कोपऱ्यांपासून हनुवटीपर्यंत जाणाऱ्या रेषांचा समावेश होतो.

याव्यतिरिक्त, कपाळावरील सुरकुत्या, डोळ्यांच्या कोपऱ्यांजवळच्या सुरकुत्या, कानशिलाजवळचा भाग आणि गाल यांवरूनही एखाद्या व्यक्तीचं वय किती वेगाने वाढत आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

काही सवयींमुळे वय वाढण्याची प्रक्रिया अधिका वेगाने होऊ शकते. यात जास्त प्रमाणात मद्यपान करणं, अमली पदार्थांचं सेवन आणि धूम्रपानाचा समावेश आहे.

डॉ. मॅक यांच्या म्हणण्यानुसार, दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वेळी काढलेल्या फोटोंमध्येही या टूलचे निष्कर्ष 'आश्चर्यकारकपणे सारखेच' आढळून आले.

फोटो काढण्याची पद्धत, प्रकाश, चेहऱ्यावरील हावभाव आणि मेकअप वेगवेगळा असतानाही या टूलच्या निष्कर्षांमध्ये फारसा फरक दिसून आला नाही.

या टूलची प्लास्टिक सर्जरी केलेल्या लोकांवरही चाचणी घेण्यात आली. यापैकी बहुतेक शस्त्रक्रियांनंतरही टूलच्या निष्कर्षांमध्ये फारसा फरक दिसून आला नाही. परंतु, नाकाची शस्त्रक्रिया केल्यानंतर म्हणजेच राइनोप्लास्टीनंतर निष्कर्षांमध्ये थोडासा बदल दिसून आला.

'ही तर सुरुवातच, अधिक डेटाची गरज'

या सर्व गोष्टींनंतरही संशोधकांनी स्पष्ट केलं आहे की, ही टूल्स किती अचूक काम करतात, हे समजून घेण्यासाठी आणखी मोठ्या संख्येने लोकांचे फोटो आणि अधिक माहिती (डेटा) गोळा करण्याची आवश्यकता आहे.

विशेषतः वेगवेगळ्या वांशिक गटांतील आणि समुदायांतील लोकांचे आणखी फोटो गोळा करण्याची गरज आहे.

ही दोन्ही एआय टूल्स अद्याप पूर्णपणे तयार झालेली नाहीत. त्याला विकसित करण्याचं काम अजूनही सुरू आहे.

या संशोधनामध्ये सर्वसामान्य लोकांनीही सहभागी व्हावं, असं आवाहन संशोधकांच्या टीमने केलं आहे.

लोक आपल्या चेहऱ्याचा फोटो संशोधकांना पाठवून स्वतःच्या जैविक वयाचा अंदाज जाणून घेऊ शकतात.

ब्रिटनमधील सरे विद्यापीठात व्हीडिओ प्रोसेसिंग आणि मशीन लर्निंगचे तज्ज्ञ असलेले प्रा. मिरोस्लाव बोबर म्हणतात की, या टूलच्या मदतीने काळानुसार वयात होणारे बदल किंवा जीवनशैलीतील बदल ओळखता येतात, असं म्हणणं अजून घाईचं ठरू शकेल.

"सुरुवातीच्या टप्प्यावर हा प्रयोग आशा निर्माण करणारा आहे. पण, रुग्णालयांमध्ये वापरण्यासाठी हे तंत्रज्ञान अद्याप तयार झालेलं नाही," असं ते म्हणतात.

"या टूलचे निष्कर्ष डॉक्टरांच्या निकालाशी, अंदाजाशी जुळतात का, हे तपासावं लागेल. तसेच, विविध रुग्णालयांमध्ये आणि वेगवेगळ्या गटांतील रुग्णांवरही या टूलची चाचणी घ्यावी लागेल."

त्यांनी सावध करत म्हटलं की, एखाद्या गोष्टीचा अंदाज वर्तवणं आणि ती गोष्ट का घडते, हे समजावून सांगणं या दोन्ही गोष्टी एकच नाहीत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)