तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
कामात लक्ष लागत नाही? वेफर्स, पिझ्झा आणि डोनट्समुळे एकाग्रता कमी होते? वाचा
- Author, लॉरेन पॉट्स
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
कामावर लक्ष एकाग्र करणं कठीण जातंय का? एकाग्रतेचा पुरेशी झोप, शरीरातील पाण्याचं प्रमाण आणि शारीरिक हालचाली या गोष्टींचा याच्याशी संबंध असतोच.. पण संशोधक आता आणखी एका संभाव्य घटकाचा अभ्यास करत आहेत, तो म्हणजे आपला आहार.
अतिप्रक्रिया केलेले अन्न (अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स - UPFs) जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे हृदयविकार आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढतो हे अनेक अभ्यासांतून आधीच स्पष्ट झाले आहे. मात्र अशा अन्नाचा संबंध थेट मेंदूच्या आरोग्याशी आणि त्याच्या कार्यक्षमतेत होणाऱ्या बदलांशीही असू शकतो, असं हे नवीन संशोधन सुचवतं.
अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाचा तुमच्या एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो का?
असा परिणाम नक्कीच होऊ शकतो, हे नव्या संशोनातून स्पष्ट होतंय.
2026 मध्ये 2,100 हून अधिक लोकांवर झालेल्या एका अभ्यासातून समोर आलंय की, जे लोक अतिप्रक्रिया केलेलं अन्न जास्त खातात, त्यांची एकाग्र होण्याची क्षमता आणि मेंदूचा वेग मंदावलेला असतो.
"जेवणात अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नाचं प्रमाण दर 10% नी वाढलं की व्यक्तीची कामावर लक्ष केंद्रित करण्याची ताकद थेट आणि स्पष्टपणे कमी झाल्याचं आम्हाला दिसलं", असं मत मोनाश युनिव्हर्सिटीच्या प्रमुख संशोधक डॉ. बार्बरा कार्डोसो यांनी मांडलं आहे.
"हे अधिक सोपं करून सांगायचे तर, अन्नात 10% UPFs वाढणं म्हणजे रोजच्या खाण्यात वेफर्सचं फक्त एक पाकीट ॲड करण्यासारखं आहे."
या विषयावरील इतर अभ्यासांप्रमाणेच हा अभ्यासही निरीक्षणावर बेतलेला होता. म्हणजेच संशोधक फक्त या दोन गोष्टींमध्ये काही संबंध आहे का, एवढंच पाहू शकतात. कार्डोसो आणि त्यांची टीम स्पष्ट करते, चिप्स खाल्ल्यामुळेच थेट एकाग्रता कमी झाली, असा अंतिम निष्कर्ष यावरून काढता येत नाही.
जास्त प्रक्रिया केलेल्या अन्नामुळेच मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो किंवा एकाग्रता ढळते, हे या अभ्यासातून थेट सिद्ध होत नसलं, तरी इतर अनेक संशोधनांशी हे निष्कर्ष मिळतेजुळते आहेत.
रोजच्या आहारात अशा अन्नाचे प्रमाण जास्त असणं आणि मेंदूची विचार करण्याची ताकद कमी होणं यांमध्ये संबंध असतो, हे अशा अनेक अभ्यासांतून आधीही स्पष्ट झालंय.
अतिप्रक्रिया केलेल्या अन्नामुळे मेंदूचे आणखी कोणते आजार होऊ शकतात?
या प्रक्रिया केलेल्या अन्नाचा संबंध मेंदूच्या इतरही गंभीर आजारांशी असल्याचा दावा करणारी संशोधनं आता होतायत. एका अभ्यासात असे दिसूनआलं की, दीर्घकाळ असं अन्न खाल्ल्यामुळे डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो.
दुसऱ्या एका अभ्यासात अल्झायमरचा धोका वाढू शकतो असं समोर आलंय. तर इतर काही संशोधनांनुसार अशा अन्नामुळे स्मृती कमी होणं आणि विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता मंदावणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकीने 33,650 लोकांवर केलेल्या संशोधनातून आणखी एक माहिती समोर आली आहे की, जास्त प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्यामुळे मेंदूच्या रचनेत बदल होऊ शकतात. विशेषतः मेंदूतील दोन महत्त्वाच्या भागांवर याचा परिणाम होतो. एक म्हणजे आनंदाची जाणीव करून देणारा 'न्यूक्लियस अकम्बन्स' आणि दुसरा भूक नियंत्रित करणारा 'हायपोथॅलॅमस'.
या अभ्यासाचे संशोधक आर्सेन कान्यामिब्वा यांच्या मते, "आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये हे दोन भाग खूप मोठी भूमिका बजावतात. आपल्याला भूक कधी लागते, पोट कधी भरते आणि खाताना मिळणारे समाधान या सगळ्याचे नियंत्रण याच भागांकडे असते."
"त्यामुळेच यातून एक चक्रव्यूह तयार होऊ शकते, असा अंदाज आम्ही मांडला आहे. या चक्रात नक्की आधी काय सुरू होते हे माहीत नसले तरी एक गोष्ट स्पष्ट दिसते की, तुम्ही जितकं असलं अतिप्रक्रियायुक्त अन्न खाल, तितकं ते पुन्हा पुन्हा खावसं वाटतं."
अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाचं व्यसन लागतं का?
निव्वळ अन्न प्रक्रिया करण्याच्या पद्धतीमुळेच आपल्याला अशा अन्नाची तीव्र इच्छा होते हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा अद्याप उपलब्ध नाही, असे कान्यामिब्वा सांगतात. त्यांच्या अभ्यासातूनही या दोन गोष्टींमध्ये केवळ एक संबंध असल्याचे दिसते. पण प्रक्रिया हेच त्याचे थेट कारण आहे असा निष्कर्ष काढता येत नाही.
मात्र साखर, फॅट आणि मिठाचे प्रमाण जास्त असणारे पिझ्झा किंवा डोनट्ससारखे पदार्थ खाल्ल्यावर मेंदूतील त्याच आनंद निर्माण करणाऱ्या यंत्रणांना उत्तेजित करतात ज्या काही अमली पदार्थांमुळे उत्तेजित होतात. यामुळेच माणूस न थांबता गरजेपेक्षा जास्त खात राहतो, हे सांगणारे अनेक पुरावे संशोधनात सापडतात.
पण अन्नपदार्थ खाणं आणि ड्रग्ज या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, असं ते सांगतात (कारण जिवंत राहण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असतेच) आणि "एखादा पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा झाली म्हणजे त्याचे व्यसन लागलं असं होत नाही."
अन्नाचं व्यसन लागू शकतं का? या मुद्द्यावर संशोधकांमध्ये आजही मोठे वाद आहेत, असे कान्यामिब्वा सांगतात. काही तज्ज्ञांच्या मते, अन्नाला व्यसन ठरवल्यास लोक स्वतःच्या खाण्यावरचे नियंत्रण सोडून देतील किंवा मग त्यांच्या इतर गुंतागुंतीच्या मानसिक सवयींकडे दुर्लक्ष होऊन त्याला उगाच व्यसनाचं लेबल लावलं जाईल.
पण अशी तीव्र इच्छा होण्यामागे या अन्नातील घटक आणि ते तयार करण्याची पद्धत कारणीभूत असू शकते. हे पदार्थ मुळातच जिभेला चटक लावणारे आणि पटकन खाता येतील असे बनवले जातात. यामुळे ते पोटात खूप वेगानं पचतात आणि मेंदूला त्वरित सुखावणारा आनंद देतात.
"असं अन्न वारंवार खाल्ल्यामुळे मेंदूवर असा परिणाम होऊ शकतो की ते खाण्याची माणसाला सवयच जडते. आज एवढे लोक या पदार्थांवर ताव मारताना का दिसतात, यामागे अन्नावर केली जाणारी ही टोकाची प्रक्रिया हे एक मोठं कारण असू शकतं."
घाबरून जाण्याची गरज आहे का?
मुळात घाबरण्यापेक्षा याकडे सजगपणे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे.
कान्यामिब्वा यांच्या मते, या विषयावरील संशोधन अजूनही अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि प्राण्यांवर होणाऱ्या प्रयोगांपेक्षा माणसांवर अधिक संशोधन होण्याची गरज आहे.
शिवाय याची एक व्यावहारिक बाजूही समजून घेतली पाहिजे. 2026 मध्ये अतिप्रक्रिया केलेले अन्न आहारातून पूर्णपणे वगळणे शक्य नाही. हे पदार्थ आपल्या जीवनशैलीत खोलवर रुजले आहेत. तसेच अनेकांसाठी ते खिशाला परवडणारे आणि सोयीचेही आहेत. यूकेमध्ये एका सामान्य व्यक्तीच्या रोजच्या आहारात 50% पेक्षा जास्त कॅलरीज अशाच पदार्थांमधून येतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सगळेच अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ एकसारखे नसतात. बेक्ड बीन्स किंवा होलग्रेन सिरियल्ससारख्या काही पदार्थांमधून शरीराला चांगले फायबर मिळते.
अतिप्रक्रिया केलेलं अन्न आणि मेंदूचे आरोग्य यांमधील संबंध भविष्यात अधिक ठोस पुराव्यांसह स्पष्ट होईल, अशी अपेक्षा कान्यामिब्वा व्यक्त करतात.
ते म्हणतात, "या विषयावर अजूनही ठोस स्पष्टता नसल्यामुळे अधिक मोठे आणि ठोस अभ्यास करणे ही शास्त्रज्ञ म्हणून आमची जबाबदारी आहे. त्यानंतर आरोग्यदायी आहार लोकांना परवडेल आणि सहज मिळेल असे वातावरण तयार करण्यासाठी धोरणकर्त्यांना पटवून देणं आवश्यक आहे."
मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी काय करावं?
'हाऊ नॉट टू ईट अल्ट्रा-प्रोसेस्ड' या पुस्तकाच्या लेखिका आणि आहारतज्ज्ञ निकोला लुडलम-रेन सांगतात की, आपण मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश वाढवू शकतो.
त्या एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरण्याचा सल्ला देतात. यामध्ये पॉलिफेनॉल आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात, ज्यामुळे हृदयविकार आणि मेंदूची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय त्या अक्रोड खाण्याचा सल्ला देतात, ज्याचा संबंध काही संशोधनांमध्ये मेंदूची चांगली क्षमता आणि विचारशक्ती टिकवून ठेवण्याशी जोडला गेला आहे.
प्रत्येक वेळच्या जेवणात प्रोटीन आणि फायबरला जास्त महत्त्व देणं आणि वेळेवर खाणं खूप गरजेचं आहे. यामुळे रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राहते आणि भूक नसतानाही मधेमधे चरण्याची सवय नियंत्रणात येते.
"हाय-रिवॉर्ड" फूड्स म्हणजे आपल्या आवडीच्या आणि जिभेला चटक लावणाऱ्या पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यापेक्षा, त्यांचा योग्य नियोजनाने संतुलित आहारातच समावेश करावा, असं त्या सांगतात. यामुळे बिंज-रिस्ट्रिक्ट सायकल म्हणजे 'काही काळ उपाशी राहून मग एकदम ताव मारण्याचे' चक्र थांबवता येईल.
अतिप्रक्रिया केलेले पदार्थ आहारातून वगळण्यासाठी लुडलम-रेन यांनी काही सोपे आणि आरोग्यदायी पर्याय सुचवले आहेत. जास्त साखर असलेले फ्लेवर्ड योगर्ट आणि बाजारात मिळणारे पॅकेटबंद सिरियल बार्स खाण्याऐवजी, फळे आणि विविध बिया घालून ग्रीक योगर्ट खावे. याशिवाय, केळी आणि नट बटरसोबत ओटकॅक्स खाणे, किंवा नट बटर आणि डार्क चॉकलेट स्टफ केलेले मेदजूल खजूर खाणे हे चांगले पर्याय आहेत.
"शेवटी हा विषय फक्त एखाद्याच्या अधिकाराचा किंवा एकट्या आत्मनियंत्रणाचा नाही," असं त्या सांगतात. हा निव्वळ इच्छाशक्तीचा मुद्दा नाही.
"अतिशय कडक नियम स्वतःवर लादून घेण्यापेक्षा एक समतोल मार्ग निवडणं हे दीर्घकाळ पाळता येण्याजोगं असते. यामध्ये पौष्टिक आहारासोबतच जास्त फॅट, साखर आणि मीठ असलेले पदार्थ जाणीव ठेवून आणि प्रमाणात खाल्ले जातात."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.