मनोज जरांगेंच्या '500 कोटींच्या' क्लिपमुळे राजकीय भूकंप; पण धक्क्याची तीव्रता फॉरेन्सिकच ठरवणार

    • Author, दिग्विजय जिरगे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी (22 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन त्यांना 500 कोटी दिल्याच्या कथित दाव्याचा गौप्यस्फोट केला. पत्रकार परिषदेत त्यांनी एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप जाहीर केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मागील काही दिवसांपासून यावर चर्चा सुरू होती. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (21 ऑक्टोबर) जरांगे यांनी त्यांच्याकडे पुरावे असतील तर द्यावेत, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन या कथित 500 कोटी रुपयांची ऑडिओ क्लिप ऐकवली.

या क्लिपमध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून मनोज जरांगे यांना 500 कोटी रुपये मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांची पुष्टी करणारा हा पुरावा असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.

मनोज जरांगे यांनी ही क्लिप प्रसारमाध्यमांसमोर आणल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. जरांगे यांनी माझ्याविरोधात कोण आर्थिक मदत पुरवतं, हे या क्लिपमधून स्पष्ट होतं, असा आरोप करत यात सहभागी होणाऱ्यांची चौकशी करावी, असं म्हटलं आहे.

तर शिंदेसेनेनं याप्रकरणी चौकशीची मागणी करत सत्य समोर आणण्याचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करावी असं म्हटलं आहे. विरोधकांनीही या निमित्तानं भाजपवर निशाणा साधला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडील क्लिपची एसआयटीमार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली.

जरांगे यांनी ऐकवलेल्या या ऑडिओ क्लिपची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. तसंच बीबीसीनंही या क्लिपची स्वतंत्ररित्या पुष्टी केलेली नाही.

आरोप, प्रत्यारोप आणि शिष्टमंडळ

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी, "ही ऑडिओ क्लिप 14 ऑक्टोबर 2024 ची असेल तर ती दोन-अडीच वर्षं दडवून का ठेवली गेली, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या वेळी ती समोर का आली नाही? या क्लिपमागचं नेमकं कारण आणि वेळ याबद्दलही उत्तरं मिळाली पाहिजेत. मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदेंचं योगदान नाकारता येणार नाही, पण या प्रकरणातील सर्व बाबींचा खुलासा होणं गरजेचं आहे." अशी मागणी काल पत्रकार परिषदेत केली.

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले होते, "माझ्या मते मनोज जरांगे यांचं प्रत्येक वक्तव्य आणि सध्या ते करत असलेलं प्रत्येक आंदोलन हे पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे. ते नेमके कोणाच्या आशीर्वादाने काम करत आहेत, कोणासाठी काम करत आहेत किंवा त्यांच्या पाठीशी कोण आहे, यावर मला भाष्य करायचं नाही. मात्र, मनोज जरांगे आता मराठा समाजासाठी किंवा त्यांच्या हितसंरक्षणासाठी काम करण्यापेक्षा स्वतःचे राजकीय हितसंबंध जपण्याकडे अधिक लक्ष देत आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी घेतलेले निर्णय हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी होते आणि त्यांची अंमलबजावणीही झाली. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या प्रत्येक वक्तव्यामागे मला राजकीय हेतू असल्याची भावना निर्माण होते."

या क्लिपची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार मिलिंद देवरा, खासदार रवींद्र वायकर, माजी खासदार राहुल शेवाळे, माजी मंत्री दीपक सावंत यांचा समावेश होता.

'माझ्याविरोधात मोठं षड्यंत्र', मनोज जरांगे आणखी काय म्हणाले?

आपल्या विरोधात बोलणाऱ्या काही मराठा नेत्यांना, कार्यकर्त्यांना आर्थिक रसद पुरवून आंदोलनाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा जरांगेंनी केला.

या क्लिपची आणि त्यातील सहभागींची सखोल चौकशी करावी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकार थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली.

मनोज जरांगे म्हणाले, "आंदोलन चिरडण्याचा सर्वांचा उद्देश आहे. मराठा समाजावर गरळ ओकायची, मराठा समाज बदनाम करायचा, आंदोलन बदनाम करायचं, यासाठी सलग 3 वर्षांपासून आजपर्यंत सारखं माझ्याविरोधात षड्यंत्र सुरू आहे. हे कोण करतंय, किती मोठं हे प्रकरण आहे. मी किती वेदना सहन करत आहे, हे माझ्या मराठा समाजापर्यंत गेलं पाहिजे."

"मराठ्यांचं आंदोलन अन्याय करून बंद पाडायचं, त्रास देऊन बंद पाडायचं, जाणूनबुजून मराठा समाजाला व्यथा द्यायच्या. मराठा समाजाच्या लेकराबाळांचं वाटोळं कसं होईल, यासाठी कसे प्रयत्न केले जातात, कसे षड्यंत्र रचले जातात, हे आता मराठा समाजासमोर येणार आहे."

"किती स्वरुपाचं मोठं हे षडयंत्र आहे. मराठा समाजाने शब्दाशब्दांवर लक्ष ठेवावं. निवडणुकांच्या काळात ही षड्यंत्र, उपोषणाच्या काळातही षडयंत्र, आंदोलनाच्या काळातही षड्यंत्र. आसपास असणाऱ्या मराठा समाजालाही त्रास द्यायचा, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा, आणि तो त्रास कशा प्रकारचा आणि तो किती भयंकर आहे, किती मोठ्याप्रमाणात डाव रचले जातात, हे सर्वांसमोर मांडणार आहे."

आज 23 ऑक्टोबर रोजी जरांगे यांनी नव्यानं पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले, "फडणवीस आणि शिंदे साहेबांच्या तपास यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करतील. पण तुम्ही माझ्या डोक्याला डोकं लावू नका. तुम्हाला तारीख कशी माहिती झाली, यावरूनच या सगळ्या प्रकारात खूप गौडबंगाल असल्याचं दिसतं. यानंतर माझ्याबद्दल काहीही बोलू नका. मी तुमचा नोकर आहे का, तुम्ही म्हणाल ते ऐकायला? आमचं सर्व काही उघड आहे. रामदासभाई, मी तुमचा आदर करतो, पण तुम्ही आणि तुमच्या मुलाने नीट बोललं पाहिजे. शिंदे साहेबांना संपवायचं असतं तर आम्ही हे बाहेर आणलं नसतं. उलट आम्हाला शिंदेंचा स्वाभिमान होता म्हणून मराठा समाजाने त्यांना डोक्यावर घेतलं. तुम्ही आमचे लोक फोडले का, कोणत्या कोणत्या टीम तुम्ही सांभाळता हेही पुढे येईल. तुम्ही बोलायला सुरुवात केली तर मीही बोलायला सुरुवात करेन. फुसके बार सोडू नका, मर्दासारखं वागा. काही लोकांच्या जळाऊ वृत्तीमुळे शिवसेनेचं नुकसान होईल. फडणवीस साहेब बदनाम झाले पाहिजेत, ही काहींची इच्छा आहे. राज्यात सुरू असलेल्या खोट्या केसेसमागेही कोणाचा हात आहे का, हे तपासलं पाहिजे. शरद पवारांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही, पण तुम्ही तर अन्नात विष कालवलंत. मला तुमचा नौकर समजता का?" असं म्हटलं.

'सगळे खुलासे झाले पाहिजेत, चौकशीतून सत्य समोर आणा'

मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद संपताच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं. त्यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.

ते म्हणाले, "ही क्लिप मनोज जरांगे यांच्यापर्यंत कशी पोहोचली, कशापद्धतीने पोहोचली, याचं रेकॉर्डिंग कुठं झालं, रेकॉर्डिंग कोणी केलं, याच्यामध्ये कोणी विश्वासू माणूस आहे का, की हे रेकॉर्डिंग जाणीवपूर्वक जरांगे यांच्याकडे दिली गेली, म्हणजे शिवसेना आणि मराठा समाज याच्यामध्ये दुही निर्माण होईल. याचे सगळे खुलासे झाले पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे."

"जरांगे आणि आमच्यात मतभेद असतील, ते मतभेद आहेत म्हणून जरांगे यांचं आंदोलन संपवावं किंवा मनोज जरांगे संपवावेत आणि आम्हाला राजकीय फायदा मिळावा अशा प्रकारची भूमिका शिवसेनेची नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यातील कोणताही आवाज भाजपच्या नेत्याचा नाही- शेलार

भाजप नेते आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, "बाजारात अशा ऑडिओ क्लिप्स खूप फिरत असतात. या ऑडिओ क्लिपमधील सत्यता तपासणं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. एखाद्या ऑडिओ क्लिपला त्याच्या पुरक गोष्टी नसतात, तोपर्यंत अशा कुठल्याही तंत्रज्ञानाच्या आधारे गोष्टीला पुरावा मानलाच जात नाही."

"मी भाजपच्या वतीने हे स्पष्ट करतो की, यामधील कोणताही आवाज भाजपच्या नेत्याचा नाही, ही कथित ऑडिओ क्लिप आहे. या कथित ऑडिओ क्लिपची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी. ही क्लिप जरांगे यांच्यापर्यंत कोण पोहोचवली, ती आत्ताच कशी समोर आली? या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणं हेही आम्हाला मान्य नाही," असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, याप्रकरणी जरांगे यांनी तक्रार करावी, सरकार योग्य ती चौकशी करेल असं भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. कोणी जर सरकारला विनंती केली असेल तर चौकशी होईल, तो चौकशीचा भाग आहे. एकनाथ शिंदेंनीही चौकशी करून घ्या, असं म्हटलं आहे. त्यामुळे चौकशी होईल.

फॉरेन्सिक तपासणी करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल असं म्हटलं आहे. शुक्रवारी (23 ऑक्टोबर) नागपूर येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानासाठी आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना ही माहिती दिली.

"या क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होईल. अडीच वर्षांनंतर हे संभाषण आत्ता बाहेर येण्याच्या पाठीमागे नेमके हेतू काय आहेत. कोणाला टार्गेट केलं जातंय, कशाकरिता केलं जातंय, या संदर्भातील अनेक प्रश्न आहे," असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

"मनोज जरांगे, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आणि भाजपनेही हीच मागणी केली आहे. त्यामुळे निश्चितपणे पूर्ण चौकशी करून यातील जे काही सत्य आहे, ते आम्ही बाहेर काढू," अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

हे तर 'शहा काट'शाहाचं' राजकारण दिसतंय- राज ठाकरे

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी याप्रकरणी आपली भूमिका सोशल मीडियावर पोस्ट करून मांडली.

ते लिहितात, "भाजपचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्त्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भाजपच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्यूब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची 'फ्रेंडशिप फाईल' ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

यामध्ये कोणी कोणाला 500 कोटी दिले, इथंपासून ते थेट माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, ते एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लगेच त्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष कसं भरकटवायचं, यासाठी नवीन धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटला पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे याचीही चर्चा ऐकायला येत आहे. भाजप कशा पद्धतीने समाज माध्यमं, माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे, यावर पण चर्चा व्हायला हवी."

"मुख्यमंत्र्यांनी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे, असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हीडिओची तथ्यता याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी मागवला जातो.

यातलं संभाषण ऐकलं तर समजतं की, हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच आहे. म्हणजे जे बोललं आहे, ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे हे बरं झालं. पुराव्यातील तथ्य तपासाच पण यामध्ये बोललं गेलं आहे, याबद्दल तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरु होतं, हे पण तपासा."

"मुख्यमंत्री म्हणाले की, ही क्लिप 2 वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली? खरंतर ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. यांच्यात सरकारमधलं नेहमीप्रमाणे 'शहा काट'शाहाचं' राजकारणच दिसतंय.

फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकता यात महाराष्ट्राला गोल-गोल घुमवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे, ते कळलं आहे, ते तुम्हाला मान्य आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहे, हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरंच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल."

'दूध का दूध, पानी का पानी, झालं पाहिजे'

तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मनोज जरांगे यांच्या आरोपावर भाष्य करताना त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते समोर आणावेत असं आवाहन केलं होतं.

दसरा मेळावा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलताना म्हणाले होते की, आमचे प्रवक्ते आणि नेते त्यावर बोलत आहेत. कोणालाही 500 कोटी दिलेले नाहीत, 500 कोटी घेतलेलेही नाहीत, आणि ते देण्याचाही प्रश्न नाही.

"ज्या आधारावर मनोज जरांगे बोलत असतील तर त्यांनी त्याची शहानिशा आधी करायला हवी होती. त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील, तेही त्यांनी संबंधित यंत्रणांकडे दिले पाहिजेत. त्याची चौकशी झाली पाहिजे, 'दूध का दूध, पानी का पानी' झालं पाहिजे."

एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर जरांगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित करून 500 कोटी पोहोचवल्याच्या उल्लेखाची 2024 ची ऑडिओ क्लिप समोर आणली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.