आनंद महिंद्रांनी केली वचनपूर्ती, 'जुगाड जीप' फेम दत्ताभाऊंना मिळाली नवी कोरी बोलेरो

जुगाड जीप
    • Author, सरफराज सनदी
    • Role, बीबीसी मराठीसाठी, सांगलीहून
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

महिंद्रा कंपनीला आपली जुगाड जिप्सी गाडी घेऊन दत्तात्रय लोहार यांनी महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी देऊ केलेली ऑफर स्वीकारली आहे.

सुरुवातीला दत्तात्रय लोहार यांनी आपण ही जीप देऊ शकत नाही असे म्हटले होते पण ही जीप संशोधनासाठी ठेवण्यात येणार आहे असे म्हटल्यावर कुटुंबाशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतला.

सांगली मध्ये आज महिंद्रा कंपनीच्या शोरूम मध्ये गाडीचा आदान- प्रदान सोहळा पार पडला. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या उपस्थितीत हा गाडी आदान-प्रदान सोहळा संपन्न झाला.

दत्तात्रय लोहार यांनी काही महिन्यांपूर्वी ही जीप तयार केली, तेव्हा त्यांना वाटलंही नव्हतं की. याची चर्चा गावभरच नव्हे, तर अख्ख्या देशात होईल.

'जुगाड जीप'ला किक मारतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर अनेकांनी पाहिला.

जुगाड जीप

तसा नेहमीच अशा जुगाड तंत्रज्ञानावर लक्ष असणाऱ्या महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांच्या पाहण्यात आला. त्यांनी 21 डिसेंबरला आपल्या ट्विटर हँडलवरुन हा व्हीडिओ शेअरही केला. आणि दुसऱ्या दिवशी नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर दत्तात्रय यांना एक नवी कोरी बोलेरो जीप ऑफर केली आहे.

तेव्हापासून दत्तात्रय यांची ही 'जुगाड जीप' पाहायला देवराष्ट्रे गावात अनेकजण भेट देतायत. बीबीसी मराठीने प्रत्यक्ष गावात जाऊन या 'जुगाड मॅन'ची भेट घेतली.

'ही जुगाड जीप प्रेरणा देईल'

आनंद महिंद्रा आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हणतात- "स्पष्टपणे हे कोणत्याच नियमात बसत नाही. पण जिद्द, कल्पकता आणि 'स्वस्तात जास्त' देण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करणं मी कधीच थांबवणार नाही. फ्रंट ग्रीलविषयी बोलायला नको."

व्हीडिओत दिसत असणारं फ्रंट ग्रील महिंद्रा अँण्ड महिंद्राच्या जीप मॉडेलसारखं आहे.

दुचाकीचं इंजिन आणि रिक्षाचे टायर्स

या जुगाड जीपची गोष्ट खूप रंजक आहे.

दत्तात्रय यांचा जन्म लोहार कुटुंबात झाला. घरात परंपरागत कौशल्य होतं आणि जोडीला भन्नाट आयडिया होत्या,.दत्तात्रय यांनी फॅब्रिकेशनचं वर्कशॉप टाकलं. याआधी याच छोटेखानी वर्कशॉपमध्ये त्यांनी शेतातल्या मशागतीसाठी भांगलण तसंच पवनचक्की ही यंत्रं बनवली आहेत.

वर्कशॉपमध्ये भंगारातल्या दुचाकीचं इंजिन घेतलं, त्याला रिक्षाची चाकं आणि जीपचं बोनेट लावलं. अशाच आणखी साठवलेल्या स्पेअरपार्टमधून त्यांनी तीन वर्षांमध्ये स्वतःची अशी खास चारचाकी गाडी बनवली.

ही जुगाड जीप जेव्हा रस्त्यावरुन जाते तेव्हा आतमध्ये ऐटीत कोण बसलंय हे सगळेचजण पाहतात. सर्वांनाच आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही असं गावकऱ्यांनी सांगितलं होतं.

दत्तात्रय लोहार, आनंद महिंद्रा

जीपला 50 ते 60 हजार रुपये खर्च आला होता असं लोहार यांनी सांगितलं, "मी जी काही कमाई करायचो त्यातून बचत करून मी ही जीप बनवत होतो. माझं गावात एक छोटसं दुकान आहे. खुरपी लावणं, धार काढणं, वेल्डिंग अशी काम करतो. जर 500 रुपये कमवत असेन तर त्यातले 300 रुपये घरखर्चाला द्यायचो. आणि उरलेल्या पैशात जीपसाठी साहित्य आणायचो. घरातले म्हणायचे की यावर कशाला इतका खर्च करता?"

दत्तात्रय यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी तीन मुली आणि एक मुलगा आहे. "मुली मोठ्या व्हायला लागल्या तशी त्यांनी वडिलांकडे आपल्याला सगळ्यांना बसायला फोर व्हिलर गाडी हवी अशी इच्छा व्यक्त केली. मला माहित होतं गाडी काही मला घेता येणार नाही. म्हणून म्हटलं आपण तयारच करू". आपल्या छोट्याशा कुटुंबाला सामावून घेईल अशी नॅनो जीपला सुरूवात केली.

मुलांचा हा बालहट्ट असला तरी दत्तात्र्य यांनी तो मनावर घेतला. आणि ध्येयाने पूर्णही केला.

जुगाड जीपचे फिचर्स

गाडीला स्टार्टर नाही, त्यामुळे पायाने किक मारून ही चारचाकी सुरू करावी लागते. विशेष म्हणजे या गाडीचं स्टेअरिंग त्यांनी स्वतःच्या फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये बसवलं आहे.

भारतात गाड्यांमध्ये स्टेअरिंग उजव्या बाजूला असतं पण दत्तात्रय यांनी बनवलेल्या गाडीचं स्टेअरिंग डाव्या बाजूला आहे. कारण दत्तात्रय यांचा डावा हात कमजोर आहे. स्वतःला चालवणं सोपं जाईल या दृष्टीने त्यांनी गाडीची रचना केली आहे.

दत्तात्रय लोहार, आनंद महिंद्रा

या जुगाड जीपचा आकार महिंद्रा जीपपेक्षा लहान आहे. म्हणजे साधारण रिक्षाएवढा. एका वेळी पाच माणसं त्यात बसू शकतात. ही जुगाड जीप असली तरी तिचा वेग पाहिला तर आपण अवाक होऊ. पेट्रोलसाठी 5 लीटरची टाकी बसवण्यात आली आहे. एक लीटर पेट्रोलवर साधारण 40 ते 50 किलोमीटर मायलेज देते. जुगाड जीप ताशी 40 किलोमीटर वेगाने धावते.

जुगाड जीपला रंगरंगोटी करणं बाकी असल्याचं दत्तात्रय सांगतात. पण गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या कुटुंबाच्या आणि लहान-सहान कामांसाठी ते ही गाडी वापरतायत. या गाडीतून त्यांनी पंढरपूर, सांगोला आणि सातारा इथे प्रवास केलाय.

दत्तात्रय लोहार यांची ही फेमस जुगाड गाडी पाहाण्यासाठी त्यांना दिवसभरात शेकडो लोकांचे फोन आले होते.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 डिसेंबरला आनंद यांनी दत्तात्रय यांना उद्देशून आणखी एक ट्वीट केलं. "नियमांचा भंग होतो म्हणून स्थानिक यंत्रणा त्यांना या गाडीचा वापर थांबवायला सांगतील. त्या बदल्यात मी स्वतः त्यांना बोलेरो जीप ऑफर करतोय.

'रिसोर्सफूलनेस' म्हणजेच कमी साधनांमध्ये अधिक निर्मिती करणं. आणि म्हणूनच आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची निर्मिती असलेली गाडी 'महिंद्रा रिसर्च व्हॅली'मध्ये ठेवण्यात येईल."

दत्तात्रय लोहार, आनंद महिंद्रा

भारत हा 'जुगाड चॅम्पियन'चा देश असल्याचा आनंद महिंद्रा यांना अभिमान आहे. ते अनेकदा अशा जुगाड प्रयोगांना जाहीरपणे प्रोत्साहन देत असतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)