तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.

मला मुख्य वेबसाइटवर घेऊन चला

रशिया-युक्रेन संघर्ष : चेर्नोबिल आण्विक केंद्रावर ताबा मिळवण्याचा रशियाचा प्रयत्न, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता युक्रेनची राजधानी कीव्हमधून नागरिकांनी बाहेर पडायला सुरूवात केली आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. युक्रेनने रशियासोबतचे सर्व कूटनितीक संबंध तोडले

    रशियासोबतचे सर्व कूटनितीक संबंध आपण तोडत असल्याची घोषणा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि लढण्यास सक्षम असलेल्या सर्वांना शस्त्र हाती घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

    युक्रेनच्या सरकारी माध्यमांनुसार राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की म्हणाले की शस्त्र उचलण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते उपलब्ध करून देऊ.

  2. जर्मनीचा युक्रेनला पाठिंबा

    जर्मनीतल्या ब्रँडनबर्ग गेटवर युक्रेनियन राष्ट्रध्वजाच्या रंगाची प्रकाशयोजना करण्यात आली आहे.

    युक्रेन-रशिया संघर्षात जर्मनीनं आतापर्यंत संयमाची भूमिका घेतली आहे. पण चिघळती परिस्थिती पाहता बुधवारी जर्मनीनं रशियातून नैसर्गिक वायू आणणाऱ्या नॉर्ड स्ट्रीम गॅस पाईपलाईन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम थांबवलं होतं.

    जर्मनी आता काय भूमिका घेते आहे, यावर युरोपियन युनियनचा निर्णयही बऱ्याच प्रमाणात अवलंबून राहू शकतो. कारण जर्मनी हे युरोपियन युनियनमधलं सर्वात प्रभावशाली राष्ट्र आहे.

  3. युक्रेनमधल्या मराठी विद्यार्थ्यांच्या शहरावर हल्ला, हात जोडून भारताला केली वाचवण्याची विनंती

  4. रशिया-युक्रेन संघर्षामुळे तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं का?

  5. युक्रेनवरचा रशियाचा हल्ला संपूर्ण खंडासाठी धोकादायक - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

    रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला हा संपूर्ण खंडासाठी धोक्याचा असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय. आज ते देशाला उद्देशून भाषणही करणार आहेत.

    यासोबतच बोरिस जॉन्सन जी-7 गटातल्या नेत्यांशीही चर्चा करतील.

    नाटोच्या सगळ्या नेत्यांची त्वरित आपत्कालीन बैठक बोलवण्याचं आवाहन आपण करत असल्याचं बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट केलंय.

    रशियाने उचललेल्या पावलांवर ब्रिटनने याआधीही कठोर आक्षेप घेतला होता. गेल्या काही दिवसांत बोरिस जॉन्सन यांनी रशियावर काही निर्बंध घालत असल्याची घोषणा केलेली आहे. यामध्ये रशियातल्या काही बँक आणि काही अब्जाधीशांचा समावेश आहे.

  6. 'आम्हाला एअरलिफ्ट करा!' युक्रेनमध्ये अडकलेल्या मराठी मुलाची मदतीसाठी हाक...

  7. रशियाने युक्रेनमध्ये कुठेकुठे हल्ला केलाय?

  8. पुतिन आधुनिक युगातले हिटलर - युक्रेनच्या माजी राष्ट्राध्यक्षांची टीका

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आधुनिक युगातले हिटलर असल्याची टीका युक्रेनचे माजी राष्ट्राध्यक्ष पेत्रो पोरोशेन्को यांनी केलीय.

    पोरोशेन्को आता युक्रेनमधले खासदार आहेत. 'आजचा दिवस दुःखद आहे, पण युक्रेनचा विजय होईल,' असं त्यांनी म्हटलंय.

    युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये खासदारांची एक आपत्कालीन बैठक झाली. या बैठकीसाठी जाणाऱ्या पोरोशेन्को यांनी संसदेच्या बाहेर असणाऱ्या पत्रकारांशी बातचीत करताना पुतिन यांचा उल्लेख हिटलर असा केला.

    पोरोशेन्को 2014 ते 2019 युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होते. युक्रेनच्या संसदेत तणावाचं वातावरण असल्याचं युक्रेनमधल्या एका पत्रकाराने बीबीसीला सांगितलं.

  9. युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाकडून नवीन अॅडव्हायजरी

    युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने नवीन अॅडव्हायजरी प्रसिद्ध केली आहे. युक्रेनचं हवाई क्षेत्र (Airspace) बंद करण्यात आल्याने सर्व नियमित आणि विशेष उड्डाणं रद्द करण्यात येत असल्याचं यात म्हटलंय.

    दूतावासाने म्हटलंय, "भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठीची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. ही जुळवाजुळव झाल्यावर त्वरित भारतीय नागरिकांना याविषयी कळवण्यात येईल म्हणजे भारतीय नागरिकांना युक्रेनच्या पश्चिमेकडील भागांत जाता येईल. तुम्ही तुमचा पासपोर्ट आणि महत्त्वाची कागदपत्रं कायम स्वतःजवळ बाळगा."

    यासोबत दूतावासाने हेल्पलाईन नंबर्सही दिले आहेत.

  10. युक्रेनवर रशियाची कारवाई : गेल्या काही तासांमध्ये काय घडलं?

    रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली आणि घडामोडींना वेग आला.

    बीबीसी मराठीवर आम्ही याविषयीचे अपडेस् देत आहोत. रशिया - युक्रेन तणावाबद्दलच्या गेल्या काही तासांतल्या या महत्त्वाच्या घडामोडी.

    • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या दोनबास भागामध्ये लष्करी कारवाई सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. टेलिव्हिजनवरून दिलेल्या भाषणादरम्यान त्यांनी ही घोषणा केली. युक्रेनबाबत संयम बाळगावा असं आवाहन पुतिन यांना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केलं होतं.
    • युक्रेनच्या लष्कराला तिथून हटवणं हे या लष्करी कारवाईचं उद्दिष्टं असल्याचं पुतिन यांनी टीव्हीवरच्या भाषणादरम्यान सांगितलं.
    • युक्रेनच्या अनेक भागांमध्ये क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला झाल्याच्या बातम्या आल्या. कीव्हवरही अशा प्रकारचे हल्ले झाल्याचं सांगण्यात येतंय.
    • रशियाने 'मोठा हल्ला' सुरू केल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलाय. हा हल्ला रोखण्याचे सर्व प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी संयुक्त राष्ट्रांना केलंय.
    • रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निषेध केलाय. यामुळे अनेकांचे जीव जातील आणि सगळ्याच मानवजातीसाठी हे त्रासाचं ठरेल असं बायडन यांनी म्हटलंय.
    • ब्रिटन, युरोपियन युनियन, संयुक्त राष्ट्र आणि नाटोच्या नेत्यांनी रशियाच्या हल्ल्याचा निषेध केलाय.
  11. रशियाच्या युक्रेनवरच्या कारवाईमुळे शेअर बाजार गडगडले, कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईचा थेट परिणाम शेअर बाजारांवर दिसून आला.

    वाढलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलवर गेल्या आहेत. गेल्या सात वर्षांत पहिल्यांदा कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत.

    शेअर बाजारांवरही याचा परिणाम पहायला मिळाला. शेअर बाजारांमध्ये 2 ते 3 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.

    गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळत असल्याचं बीबीसी आशियाचे बिझनेस प्रतिनिधी मॅरिको यांनी म्हटलंय. यामुळे सोन्याच्या किंमती 1 वर्षातल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. याशिवाय अमेरिकन डॉलर आणि जपानी येन ही चलनंही मजबूत झाली आहेत.

    गुरुवारी (24 फेब्रुवारी) भारतात शेअर बाजार ट्रेडिंगला सुरुवात होताच कोसळले.

    सेंसेक्स 1428.34 अंकांच्या घसरणीने 55,803.72वर खुला झाला. तर निफ्टी 413.35 अंकांच्या घसरणीसह 16,647 वर खुला झाला.

    ट्रेडिंगच्या दुपारच्या सत्रातही ही घसरण कायम आहे.

  12. रशियाच्या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू, युक्रेन पोलिसांची माहिती

    रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचं युक्रेन पोलिसांनी म्हटलंय. पोदिल्स्कमधल्या एका लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात 6 जण मारले गेले असून 7 जण जखमी असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. इथले 19 जण बेपत्ता आहेत.

    मेरिओपोलमध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी (24 फेब्रुवारी) सकाळी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली. त्यानंतर युक्रेनच्या अनेक लष्करी तळांवर रशियाने हल्ला केलाय. अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रं डागण्यात आल्याचं युक्रेनने म्हटलंय.

  13. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा

    युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. रशियाचा निषेध करण्यासाठी कोणती पावलं उचलण्यात येणार आहेत याविषयी त्यांनी चर्चा केली.

    झेलेन्स्कीसोबतच्या चर्चेबद्दल बायडन म्हणाले, "जगभरातल्या नेत्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आक्रमकतेच्या विरुद्ध स्पष्टपणे बोलावं आणि युक्रेनच्या लोकांच्या समर्थनार्थ उभं रहावं असं त्यांनी मला स्पष्ट शब्दांत सांगितलं."

    पुतिन यांनी उचललेली पावलं अकारण आणि अयोग्य असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटलंय. पुतिन यांच्या घोषणेला उत्तर देताना बायडन म्हणाले, "सगळ्या देशातल्या लोकांच्या प्रार्थना युक्रेनच्या लोकांसोबत आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युद्धाचा पर्याय निवडलाय ज्यामुळे लोकांचा जीव जाईल आणि सगळ्यांनाच याचा त्रास होईल."

    या सगळ्या घडामोडींवर व्हाईट हाऊस लक्ष ठेवून असल्याचं बायडन यांनी म्हटलंय. जी-7 च्या सदस्य देशांची आज बैठक होईल आणि त्यानंतर रशियाबद्दलची पुढची पावलं उचलली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

  14. युक्रेनमधल्या भारतीय नागरिकांसाठी दूतावासाच्या सूचना

    युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना काही सूचना दिल्या आहेत.

    युक्रेनमध्ये सध्या अनिश्चितता आहे, त्यामुळे शांत राहून असाल त्या ठिकाणी सुरक्षित राहण्याची सूचना युक्रेनमधल्या भारतीयांना देण्यात आलीय.

    याशिवाय जे लोक कीव्हला जाण्यासाठी प्रवास करण्याच्या विचारात आहेत किंवा जे पश्चिम कीव्हकडून येणार आहेत त्यांनी आपापल्या शहरांत परतावं असंही या अॅडव्हायजरीमध्ये म्हटलं आहे.

    भारतीय नागरिकांना दूतावासाकडून यानंतरही माहिती आणि अॅडव्हायजरी देण्यात येणार असल्याचं दूतावासाने म्हटलंय.

    आज सकाळी युक्रेनियन एअरलाईन्सचं एक विमान 182 भारतीय नागरिकांना युक्रेनमधून घेऊन दिल्लीला आलं.

    त्या आधी एअर इंडियाच्या विमानाने 242 भारतीय युक्रेनमधून परतले होते.

  15. ब्रेकिंग, पुतिन यांच्या घोषणेनंतर युक्रेनच्या लष्करी तळांवर जोरदार बॉम्बहल्ले

    युक्रेनच्या लष्करानं एक निवेदनं जारी केलं असून, रशियाच्या लष्करानं त्यांच्या देशातील पूर्व भागात बॉम्बहल्ले केल्याचं म्हटलं आहे.

    या निवेदनानुसार, रशियानं राजधानी कीव्हच्या जवळ असलेल्या बोरिसपिल विमानतळ आणि इतर विमानतळांवर क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला आहे.

    युक्रेनचं हवाई दल रशियाच्या हवाईदलाच्या हल्ल्याच्या सामना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. र

    शियाचे पॅराट्रूप्स दक्षिणेचं बंदर असलेल्या ओडेसा शहरात उतरल्याचं मात्र लष्करानं नाकारलं आहे.

    रशियानं युक्रेनमधल्या शहरांवर हल्ला करत असल्याच्या वृत्ताला नकार दिला आहे. रशिया युक्रेनमधील लष्कराच्या पायाभूत सुविधा, हवाई संरक्षण आणि हवाई दलाला लक्ष्य करत असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

  16. पुतिन इतके आक्रमक का झालेत? त्यांना युक्रेन का हवाय?

    सगळ्या रशियन लोकांना पुन्हा एकत्र आणणारा नेता अशी ओळख निर्माण करण्यासाठी पुतिन उत्सुक आहेत आणि म्हणूनच युक्रेन परत मिळवायच्या विचारानं पुतिन यांना जणू पछाडलं आहे असं निरीक्षण रशियाविषयीच्या अनेक जाणकारांनी नोंदवलं आहे.

    पाहा सोपी गोष्ट

  17. 'आंतरराष्ट्रीय कायद्यांचं गंभीर उल्लंघन'

    नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी रशियाच्या या बेजबाबदार हल्ल्याचा निषेध केलाय.

    याबाबत त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली. "अगणित नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं गंभीर उल्लंघन आहे. तसंच यामुळं युरो अटलांटिक सुरक्षेला धोका आहे," असंही ते म्हणाले.

    रशियाच्या या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी नाटोतील सहकारी देश भेटणार असल्याचंही ते म्हणाले.

  18. ब्रेकिंग, बेलारुसमधून युक्रेनमध्ये येताहेत रशियन तुकड्या

    बेलारुसमध्ये असलेल्या लष्कराच्या तुकड्या रशियाच्या हल्ल्यात सहभागी झाल्या असून त्या बेलारुसमार्गे आत येत असल्याची वृत्तं युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यांनं दिली जात आहेत.

    म्हणजेच युक्रेनच्या उत्तरेकडूनही आता सैन्य येत असल्याचं स्पष्ट आहे. युक्रेनच्या उत्तरेच्या सीमेला असलेला बेलारुस हा देश रशियाचा जुना मित्र आहे.

    अभ्यासक या लहान देशाचा उल्लेख रशियाचा 'क्लायंट स्टेट' असा करतात. उत्तरेकडून झालेल्या या हल्ल्यामुळं रशियाच्या युक्रेनवरील पूर्व बाजूने आणि दक्षिणेत ओडेसाकडून होणाऱ्या लष्करी हालचालींमध्ये वाढ झाली आहे.

  19. युक्रेनची राजधानी कीव्हमधून नागरिकांचं पलायन सुरू

    रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता युक्रेनची राजधानी कीव्हमधून नागरिकांनी बाहेर पडायला सुुुरुवात केली आहे. सामानासह निघालेल्या लोकांनी कीव्हमधली मेट्रो स्टेशन्स गजबजली आहेत.

  20. युक्रेनची हवाई हद्द बंद, भारतीयांना आणण्यासाठी निघालेलं विमान माघारी फिरलं

    युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी निघालेलं एयर इंडियाचं विमान अर्ध्या वाटेतूनच माघारी फिरलं आहे. हे विमान इराणच्या हवाई हद्दीत असताना मागे फिरलं. AIC 1947 हे विमान दिल्लीहून कीव्हला निघालं होतं. सकाळी साडेसात वाजता दिल्ली एअरपोर्टवरून या विमानानं उड्डाण केलं.

    पण कीव्हमध्ये स्फोटांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची हवाई हद्द बंद करण्यात आली असल्यानं हे विमान माघारी फिरलं.