फटाके, धूर आणि दिवाळी! वायू प्रदूषणाचा विळखा दर्शवणारे 10 फोटो

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

सोमवारी (9 नोव्हेंबर) सकाळी दिल्लीच्या अनेक भागांमध्ये प्रदूषणाची पातळी अत्यंत खराब होती.

अनेक भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सुमारे 400 नोंदवला गेला. अनेक भागांमध्ये दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली होती.

नवी दिल्लीत सोमवारी दाट धुराच्या अच्छादनाम मास्क घातलेला एक सुरक्षा अधिकारी विजय चौकाजवळून चालताना.

गेल्या काही दिवसांपासून राजधानी आणि तिच्या आसपासच्या परिसरातील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आणि गंभीर श्रेणीत नोंदवली गेली आहे.

सोमवारी दाट धुरामध्ये एका धातूच्या रेलिंगवर बसलेली कबुतरे.

प्रदूषणाबरोबरच कमी दृश्यमानतेमुळे रेल्वे आणि हवाई सेवांवरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दिल्लीतील 'इंडिया गेट' परिसरातील दृश्य. सरकारच्या वायू गुणवत्ता निरीक्षण पोर्टलवरील आकडेवारीनुसार, सकाळी 6 वाजता दिल्लीचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) 366 होता.

नवी दिल्लीतील लोधी गार्डनमध्ये सोमवारी दाट धुराक्याच्या अच्छादनामध्ये एक व्यक्ती व्यायाम करताना.

दिल्लीतील सर्वाधिक प्रदूषण सोनिया विहारमध्ये नोंदवले गेले. तिथे AQI 449 होता. त्याखालोखाल बुराडी क्रॉसिंग (445), विवेक विहार (441), जहांगीरपुरी (439) आणि नॉर्थ कॅम्पस (437) यांचा क्रमांक होता.

डेटानुसार, दिल्लीतील 55 मॉनिटरिंग स्टेशन्सवर पीएम 2.5 (PM2.5) हे प्रदूषणाचे मुख्य स्रोत होते, तर राजधानीत ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा (GRAP) दुसरा टप्पा अंमलात आहे.

दिल्लीव्यतिरिक्त पुणे, मुंबई, पाटणा आणि अमृतसरमध्येही अशीच काहीशी परिस्थिती पहायला मिळाली. दिवाळीदरम्यान फटाके वाजवण्यामुळे हवेची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात खराब झाली.

रेल्वेच्या आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळी दिल्लीत येणाऱ्या अनेक गाड्या उशिरा धावत आहेत. कमी दृश्यमानतेसह याचा रेल्वे सेवांवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दिल्लीला पोहोचणाऱ्या काही विशेष गाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास, सोमवारी सकाळी बनारसवरून दिल्लीला आलेली वंदे भारत (स्लीपर) एक्सप्रेस गाडी 1 तासाहून अधिक उशिराने नवी दिल्लीला पोहोचली.

द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (TERI) येथील वरिष्ठ संशोधक आणि सहयोगी संचालक डॉ. अंजू गोयल म्हणतात की, हिवाळ्याच्या हवामानामुळे दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावण्याचा धोका दरवर्षी कायम राहील.

वाहने, कारखाने, बांधकाम प्रकल्प आणि कचरा जाळण्यामुळे वर्षभर हवेत धूर आणि धूळ सोडली जाते. तथापि, हे प्रदूषण कमी होण्याचा दर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात सारखा नसतो.

हिवाळ्यात, जमिनीजवळील हवा बहुतेकदा थंड आणि तिच्यावरील हवा उबदार असते. यामुळे खालच्या हवेला सहजपणे वर जाणे अवघड होते.

वाऱ्याचा वेगही कमी असेल तर जमिनीजवळ धूर आणि धूळ जमा होऊ लागते.

वाऱ्याच्या दिशेमुळेही फरक पडतो. जर ज्या भागांमध्ये पिकांचे अवशेष जाळले जात आहेत, तिथून वारा दिल्लीच्या दिशेने वाहत असेल, तर तो त्या भागांमधून धूरही आणू शकतो.

डॉ. गोयल यांच्या मते, हवामान बदलता येत नाही. त्यामुळे, वर्षभर धूर आणि धुळीचे उत्सर्जन होणाऱ्या भागांमधील प्रदूषण सरकारने कमी केले पाहिजे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)