तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
'खेळ कायमचा सोडण्याचाही विचार केला'; शर्यत सुरू असतानाच शौचाला झालेल्या महिला खेळाडूने बीबीसीला काय सांगितलं?
- Author, जेसिका पार्कर, हॅम्बर्ग आणि सायमन ॲटकिन्सन, सिडनी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
ऑस्ट्रेलियाच्या एका महिला खेळाडूने सहनशक्तीची परीक्षा पाहणाऱ्या शर्यतीदरम्यान कपड्यांतच शौच झाल्यानंतरही स्पर्धा सुरू ठेवली. असं करून आपण इतरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केला, अशी कबुली तिने दिली आहे.
खेळात पुन्हा सहभागी होण्यापूर्वी बीबीसीशी विशेष संवाद साधताना जोआना विएत्र्झिक म्हणाली की, सप्टेंबरमध्ये बीजिंगमध्ये झालेली हायरॉक्स स्पर्धा जिंकण्याच्या जिद्दीपोटी तिला योग्य निर्णय घेता आला नाही.
ती म्हणाली, "शर्यत सुरू ठेवण्याचा निर्णय माझा स्वतःचा होता. त्यामुळे त्याची संपूर्ण जबाबदारीही मी स्वीकारते."
शर्यत सुरू का ठेवली, असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली, "माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा त्यावेळी मी विचारच केला नाही. आता मागे वळून पाहताना मला जाणवतं की, मी घेतलेला निर्णय खूपच चुकीचा होता. माझ्या या निर्णयामुळे ज्यांना त्रास झाला, त्या सर्वांची मी मनापासून माफी मागते."
24 वर्षीय जोआनाने सांगितलं की, या घटनेनंतर आणि सोशल मीडियावर झालेल्या टीकेमुळे तिला मोठा 'मानसिक त्रास' झाला.
हा अनुभव तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी असा होता. तिने हा खेळ कायमचा सोडून देण्याचाही विचार केला होता. या खेळात तिच्या नावावर जागतिक विक्रम आहे.
हायरॉक्स स्पर्धेत सहभागी खेळाडूंना 1 किलोमीटर धावावं लागतं. त्यानंतर वेगवेगळे व्यायाम करावे लागतात. यात स्लेड पुश, बर्पी जंप्स, इनडोअर रोइंग मशीनवर व्यायाम करणे आणि खांद्यावर वाळूचे पोते (सँडबॅग) घेऊन लंजेस करणे अशा व्यायामांचा समावेश असतो.
2017 मध्ये जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरात ही स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर तिची लोकप्रियता झपाट्याने वाढली. आता जगभरातील अनेक देशांमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जातं.
गेल्या महिन्यात झालेल्या स्पर्धेत अर्धी शर्यत पूर्ण झाल्यानंतर विएत्र्झिकला जुलाबाचा म्हणजेच अतिसाराचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिच्या शरीरावर विष्ठा लागलेली असल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
अधिकाऱ्यांनी तिला शर्यत थांबवायला हवं होतं का, असं विचारलं असता ती म्हणाली की, त्यावेळी तिला असा कोणीही सल्ला दिला नव्हता.
हायरॉक्सचे सहसंस्थापक मोरित्झ फ्युर्स्टे यांनी याबद्दल माफी मागितली आहे. शर्यतीदरम्यान त्वरीत कारवाई न करणे ही चूक होती, असं त्यांनी मान्य केलं.
हायरॉक्स स्पर्धेसाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. स्पर्धेदरम्यान एखाद्या खेळाडूला उलटी, लघवी किंवा शौच झाल्यास आणि त्यामुळे अस्वच्छता पसरण्याचा किंवा स्वतःच्या अथवा इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास, स्पर्धेच्या आयोजकांना त्या खेळाडूला स्पर्धेतून बाहेर काढता येणार आहे. ही स्पर्धा प्रामुख्याने बंदिस्त ठिकाणी आणि सर्वांसाठी एकच व्यायामाचे साहित्य वापरून घेतली जाते.
सुरुवातीला इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधून विएत्र्झिकने आपली बाजू ठामपणे मांडली होती. परंतु, नंतर ती पोस्ट तिने हटवली. बीजिंगमधील स्पर्धेनंतर आठवडाभरातच तिने माफी मागितली. तसेच, आपण मिळवलेला विजय सोडून देत असल्याचे आणि स्पर्धेतून आपलं नाव मागे घेत असल्याचेही तिने जाहीर केले.
शुक्रवारी (30 ऑक्टोबर) हॅम्बर्गमध्ये होणाऱ्या स्पर्धेत ती पुन्हा सहभागी होणार आहे. या स्पर्धेत पुनरागमन करताना आपण थोडंसं 'अस्वस्थ' असल्याचं तिने सांगितले. तसेच, या चर्चेत राहिलेल्या घटनेमुळेच आपली ओळख निर्माण होऊ नये, अशी आशाही तिने व्यक्त केली.
"या घटनेमुळे लोकांनी मला ओळखू नये, असं मला वाटतं," असं ती म्हणाली.
बीजिंगमधील स्पर्धेनंतर पहिल्यांदाच मुलाखत देताना विएत्र्झिकने सांगितलं की, अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तिला जिवाणूंचा संसर्ग झाला होता. परंतु, स्पर्धेत उतरताना आपल्याला कोणताही त्रास जाणवत नव्हता. आपण अगदी ताजेतवाने आणि खूप उत्साही होतो, असंही तिने म्हटलं.
"हा त्रास अचानक सुरू झाला होता," असं तिने बीबीसीशी बोलताना सांगितलं.
"शर्यत अर्धी पूर्ण होईपर्यंत मला काहीच त्रास झाला नव्हता. त्यानंतर अचानक ही घटना घडली. त्या क्षणी मी एक स्पर्धक आणि उच्च दर्जाची खेळाडू म्हणून केवळ शर्यतीवर लक्ष केंद्रित केलं होतं. जिंकण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे माझं संपूर्ण लक्ष शर्यत पूर्ण करण्यावरच होतं."
"माझ्यामुळे इतरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला, हे मला मान्य आहे," अशी कबुली तिने दिली.
या घटनेनंतर हायरॉक्स चीनने काही स्पर्धकांचे प्रवेश शुल्क परत केल्याचे वृत्त आहे.
शर्यतीनंतर सोशल मीडियावर केलेल्या पहिल्या पोस्टबद्दलही विएत्र्झिकने खेद व्यक्त केला. या पोस्टमध्ये तिने 'पूर्ण ताकदीनिशी लढा किंवा माघार घ्या' आणि 'विजय म्हणजे विजयच' असे शब्द लिहिले होते.
तिने सांगितलं की, रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जात असतानाही ती प्रचंड तणावात होती.
ती म्हणाली, "या घटनेकडे लोक कशारितीने पाहतील, याचा मी त्यावेळी विचारच केला नव्हता."
तिची माफी म्हणजे झालेलं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न आहे का किंवा तिने माफी मागायला उशीर केला का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, या घटनेची इतकी चर्चा होईल आणि ती इतकी लोकांपर्यंत पोहोचेल, अशी तिला अपेक्षा नव्हती.
"या घटनेवर विचार करण्यासाठी आणि जे घडलं ते समजून घेण्यासाठी मला वेळ हवा होता."
उच्चस्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानसिकतेबद्दल बोलताना ती म्हणाली, "अशा खेळाडूंचं संपूर्ण लक्ष जिंकण्यावर आणि सर्वोत्तम कामगिरी करण्यावर असतं. प्रशिक्षणातून मिळवलेली क्षमता प्रत्यक्ष स्पर्धेत दाखवून आपला फिटनेस जगासमोर सिद्ध करण्याची त्यांची धडपड असते."
गेल्या काही आठवड्यांत या घटनेवर विचार केल्यानंतर ती म्हणाली, "आयुष्यात केवळ स्पर्धा खेळणं आणि जिंकणं यापलीकडेही अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत."
विएत्र्झिकची ओळख सोशल मीडियावर उघड झाल्यानंतर हायरॉक्सने स्पष्ट केलं की, या खेळाडूला शिवीगाळ करणाऱ्यांवर किंवा धमक्या देणाऱ्यांवर भविष्यातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली जाईल.
सोशल मीडियावरील टीका आणि तिचे फोटो शेअर करण्याबद्दल बोलताना जोआना विएत्र्झिक म्हणाली की, काही लोकांनी तिची विचारपूस करून ती ठीक आहे ना, याची काळजी घेतली. परंतु, या घटनेमुळे सोशल मीडिया किती 'विषारी आणि त्रासदायक' ठरू शकतो, याचीही तिला जाणीव झाली.
विएत्र्झिकने बीबीसीला सांगितलं की, हा काळ तिच्यासाठी 'मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक' होता. या घटनेची जगभरात इतकी चर्चा होईल, अशी तिला अपेक्षा नव्हती. इतकंच नाही, तर तिच्या कुटुंबीयांनाही धमक्या मिळाल्या होत्या.
"आजच्या काळात सोशल मीडियाचा किती मोठा परिणाम होऊ शकतो, हे या अनुभवातून मला समजलं. हे डोळे उघडणारं ठरलं. विशेषतः केवळ स्पर्धेत भाग घेणाऱ्या माझ्यासारख्या 24 वर्षांच्या खेळाडूला या गोष्टीचा मोठा धक्का बसला."
"हो, मी चुकीचा निर्णय घेतला होता. पण त्यासाठी सोशल मीडियावर माझ्यावर इतकी टीका व्हायला नको होती आणि मला इतकं लक्ष्य करायला नको होतं. शेवटी मीही एक माणूसच आहे."
विएत्र्झिकने सांगितलं की, ती काही काळ सोशल मीडियापासून दूर राहण्याचा आणि जगापासून स्वतःला वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करत होती.
ती म्हणाली, "पण मी असं कायमस्वरूपी करू शकत नाही."
"या खेळामध्ये मला अजून खूप काही साध्य करायचं आहे. त्यामुळे या कठीण काळातून सावरून पुन्हा उभं राहणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझ्या या अनुभवातून आणि मानसिक ताकदीतून इतरांनाही प्रेरणा मिळावी, अशी माझी इच्छा आहे," असंही ती नमूद करते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)