'अर्थातच, तो खूप देखणा होता', राजीव गांधींसोबतच्या प्रेमाची गोष्ट; सोनिया गांधींनी सांगितला किस्सा

फोटो स्रोत, Daniel SIMON/Gamma-Rapho via Getty Images
सोनिया गांधी यांनी शनिवारी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आणि त्यांनी केंब्रिजमधील एका छोट्या ग्रीक रेस्टॉरंटमध्ये सुरू झालेल्या त्यांच्या प्रेमकथेच्या आठवणींना उजाळा दिला.
आपल्या पहिल्याच पोस्टमध्ये, त्यांनी राजीव गांधींसोबतच्या पहिल्या भेटीच्या आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
10 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी, सोनिया गांधी यांनी 'एक्स' या प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे.
त्यांनी एक व्हीडिओ पोस्ट करत पती राजीव गांधी यांच्यासोबतच्या सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला.
या व्हीडिओमध्ये, आपल्या नव्या पुस्तकाची पाने चाळत, सोनिया गांधी छायाचित्रांच्या विभागाकडे बोट दाखवून म्हणताना दिसतात, "अर्थातच, तो (राजीव) खूप देखणा होता. पण त्याचा सौम्यपणा अधिक हृदयस्पर्शी होता."
त्या पुढे सांगतात की, "त्या वेळी इंग्लंडमधील जेवण आजच्याइतकं चविष्ट नव्हतं आणि तितकी रेस्टॉरंट्सही नव्हती. त्यामुळे मी इटालियन चवीचं काहीतरी शोधत होते. त्याच काळात, मला आणि माझ्या मित्रांना एक ग्रीक रेस्टॉरंट सापडलं. तिथं युरोपियन आणि भारतीय विद्यार्थी जेवायला यायचे. तिथंच माझी राजीवशी पहिल्यांदा भेट झाली."
सोनिया गांधी यांनी माध्यमांमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच चर्चा केली आहे. मात्र, त्यांचं वैयक्तिक आयुष्य याआधीही अनेक प्रकारे चर्चेचा विषय ठरलेलं आहे.
त्याच्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्राच्या प्रकाशनापूर्वी, त्यांनी एका व्हीडिओद्वारे आपल्या आयुष्याबद्दलचे काही किस्से सांगितले आहेत.
राजीव गांधींसोबतच्या आपल्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना त्या म्हणतात की, "त्या पहिल्याच भेटीत मला जाणवलं की, हीच ती व्यक्ती आहे जिच्यासोबत मला माझं आयुष्य घालवायचं आहे. आणि नंतर मला कळलं की, त्यांनाही माझ्याबद्दल तसंच वाटत होतं."
त्या पुढे सांगतात की, "मला आठवतं, जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटले, तेव्हा आमच्या एका कॉमन मित्रानं आमची ओळख करून दिली होती. त्यानंतर आम्ही मित्र झालो. मग आम्ही मित्रांसोबत पार्ट्यांना, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागलो."
"आम्ही एका व्हॅलेंटाईन पार्टीलाही गेलो होतो, जिथं अनेक विद्यार्थी उपस्थित होते. तो (राजीव) खूपच देखणा होता, पण त्यांचा सौम्यपणा मला सर्वात जास्त स्पर्शून गेला."
"जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्याच्यामुळे मी इतकी भारावून गेले होते की ती भावना मी कधीच विसरले नाही."
विशेष गोष्ट अशी आहे की, 'एक्स'वर अकाऊंट काढण्याच्या दोन दिवस आधी सोनिया गांधी यांनी इंस्टाग्रामवरही आपलं अकाऊंट उघडलं आहे.
तिथे त्यांनी त्यांच्या पुस्तकाच्या फर्स्ट लूकशी संबंधित एक रील शेअर केली आहे. ही रील आतापर्यंत 57 लाखांहून अधिक युझर्सनी पाहिली आहे.
10 नोव्हेंबरला प्रकाशित होणाऱ्या सोनिया गांधींच्या पुस्तकात काय आहे?
79 वर्षीय सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' 10 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे.
हे पुस्तक अमेरिकेत अल्फ्रेड ए. नॉफ आणि ब्रिटनमध्ये विल्यम कॉलिन्स यांच्याद्वारे प्रकाशित केलं जाईल.
हे पुस्तक भारतात प्रकाशित होण्यापूर्वीच त्यावर बरीच चर्चा सुरू आहे.
अल्फ्रेड ए. नॉफ यांनी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात सोनिया गांधी म्हणाल्या आहेत की, "माझ्या आयुष्यातील आनंद आणि तीव्र निराशा यांचा समावेश असलेल्या माझ्या हृदयाच्या प्रवासाची साक्ष देणारं हे आत्मचरित्र असावं, अशी माझी इच्छा आहे."

फोटो स्रोत, Social Media
विल्यम कॉलिन्सच्या मते, पुस्तकाची सुरुवात 1965 मध्ये केंब्रिजमध्ये होते. त्यावेळी, 19 वर्षीय इटालियन विद्यार्थिनी असलेली सोनिया मानो राजीव गांधीच्या प्रेमात पडते.
प्रकाशकांच्या मते, पुस्तकाच्या या भागातून सोनिया गांधींचं जीवन अत्यंत आपुलकीनं आणि प्रांजळपणे दिसून येतं.
त्यांच्या आयुष्याचा प्रवास इटलीतील एका लहानशा गावातल्या बालपणापासून सुरू होतो आणि मग तो योगायोगानं भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचतो.
मात्र, त्यांचं वैयक्तिक आयुष्य दुःखद घटना आणि चढ-उतारांनी भरलेलं आहे. जेव्हा त्यांच्या सासू इंदिरा गांधी यांची सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली, तेव्हा सोनिया गांधींनीच त्यांना रुग्णालयात नेलं होतं.
या घटनेच्या सात वर्षांनंतर एका आत्मघाती हल्लेखोराकडून त्यांचे पती राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर सोनिया गांधींनी त्यांचं पार्थिव घरी आणलं.

फोटो स्रोत, Sonu Mehta/Hindustan Times via Getty Images
सोशल मीडियावर लोकांची प्रतिक्रिया काय होती?
एक्स (X) वर पदार्पण केल्याच्या काही तासांतच सोनिया गांधींना जवळपास 22 हजार फॉलोअर्स मिळाले.
राजीव गांधींसोबत घालवलेल्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हीडिओ समोर आल्यानंतर, अनेक राजकीय नेत्यांनी आणि पत्रकारांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या.
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी X वर लिहिले, "सोनियाजी आणि राजीवजींची प्रेमकथा 'मिडसमर नाईट्स ड्रीम' सारखी आहे. सुंदर, शांततापूर्ण आणि इतकी परिपूर्ण की त्यावर विश्वास ठेवणं कठीण वाटतं. पण मग दुःखाच्या काळ्या छायेनं सर्व काही बदलून टाकलं."
मात्र, असह्य वेदनांच्या काळातही जबाबदारी, कर्तव्य, निष्ठा आणि त्यागाचा निर्धार अढळ राहिला. सोनियाजी आता एक्सवर दाखल झाल्या आहेत.
त्यांनी त्यांचे पती राजीव गांधी यांच्यासोबतच्या सुरुवातीच्या भेटींमधील काही सुंदर क्षण सांगितले आहेत.
त्यांच्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकात, त्यांनी प्रेमकथा, विरहाचं दुःख आणि अढळ निश्चयाच्या माध्यमातून आपल्या मनातील गहन भावना व्यक्त केल्या आहेत. ही कथा इतक्या प्रभावीपणे सांगितली आहे की ती विसरणं अत्यंत कठीण आहे.
काँग्रेस नेते आणि केरळमधील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीश यांनी सोनिया गांधींच्या व्हीडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिलंय की, "प्रेम, कर्तव्य आणि दृढनिश्चयाने भरलेल्या तुमच्या जीवनप्रवासानं अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे."
10 नोव्हेंबर रोजी, तुम्ही आणि राजीवजींनी निर्माण केलेल्या अनमोल जगाची एक झलक पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभेल.
जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनीही यावर प्रतिक्रिया दिली .
त्यांनी लिहिलंय की, "मला सोनियाजींना अनेकदा भेटण्याचे भाग्य लाभलं आहे आणि प्रत्येक भेटीनंतर त्यांच्या स्नेहपूर्ण स्वभावानं आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वानं मी प्रभावित होऊन परतले आहे."
कठीण परिस्थितीतही ज्या प्रकारे त्यांनी विजय आणि पराजय दोन्ही सन्मानानं आणि शांतपणे स्वीकारले आहेत, ते खरोखरच प्रेरणादायी आहे.
त्यांनी पुढे लिहिलंय की, "एवढा द्वेष आणि विरोध सहन करूनही, सोनिया गांधींनी ज्या प्रामाणिकपणा, सौम्यता, प्रेम आणि उदारतेनं आपली जीवनकथा सांगितली आहे, त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खोली दिसून येते."

फोटो स्रोत, Robert Nickelsberg/Liaison
टीव्ही पत्रकार अजय कुमार यांनीही सोनिया गांधींच्या व्हीडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी लिहिलंय की, "राष्ट्रीय स्तरावरील एक भारतीय राजकारणी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी, नातेसंबंधांविषयी, प्रेमाविषयी आणि कुटुंबाविषयीची माहिती जाहीरपणे देत आहेत, हा एक सुखद बदल आहे."
भारतीय राजकारणात वैयक्तिक भावना आणि स्नेहाची सार्वजनिक अभिव्यक्ती किंवा कबुली दुर्मिळ आहे.
सोनिया गांधी यांच्यावर एक चरित्रही लिहिले गेलं आहे.
प्रसिद्ध पत्रकार रशीद किडवाई यांनी सोनिया यांच्यावर लिहिलेल्या चरित्रात राजीव आणि सोनिया यांच्या केंब्रिज भेटींचा उल्लेखही करण्यात आला आहे.
बीबीसीच्या एका वृत्तानुसार, रशीद किडवाई सांगतात, "दररोज केंब्रिज विद्यापीठाचे विद्यार्थी 'व्हर्सिटी रेस्टॉरंट'मध्ये एकत्र जमत असत. ते सर्वजण बिअर प्यायचे. त्यांच्यापैकी राजीव एकटाच असा होता जो बिअरला साधा स्पर्शही करत नसे. त्याच वेळी सोनियाची नजर त्या उंच, निरागस, सावळ्या डोळ्यांच्या आणि मनमोहक हास्य असलेल्या मुलावर पडली."
दोघांमध्येही परस्पर आकर्षण होते. राजीवने आधी एका नॅपकिनवर तिच्या सौंदर्यावर एक कविता लिहिली आणि ती एका वेटरमार्फत सोनियाला पाठवली.
सोनियाला भेटताना थोडा संकोच वाटत होता, पण राजीवच्या एका जर्मन मित्राने, जो सोनियालाही ओळखत होता, दूताची भूमिका खूप छान निभावली.
रशीद किडवाई पुढे म्हणतात, "विशेष म्हणजे, राजीव यांनी शेवटपर्यंत सोनियांना सांगितले नाही की ते भारताच्या पंतप्रधानांचे पुत्र आहेत."
बऱ्याच दिवसांनी एका वृत्तपत्रात इंदिरा गांधींचा फोटो छापण्यात आला. तेव्हा राजीव गांधींनी सोनिया गांधींना सांगितले की तो त्यांच्या आईचा फोटो आहे.
केंब्रिजमध्ये शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याने तिला सांगितले की इंदिरा भारताच्या पंतप्रधान होत्या. हे कळल्यावर सोनियाला पहिल्यांदाच जाणवले की, ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात होती ती किती महत्त्वाची व्यक्ती होती.

फोटो स्रोत, GERARD FOUET/AFP via Getty Images
सोनियांच्या शेजारी बसण्यासाठी 'लाच'
जेव्हा राजीव गांधी इंजिनिअरिंगचा ट्रायपॉस कोर्स करण्यासाठी केंब्रिजला गेले. तिथे 1965 मध्ये त्यांची भेट इटलीत जन्मलेल्या सोनियांशी झाली.
ते दोघे एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये जायचे.
अश्विनी भटनागर सांगतात, "राजीव गांधींनी रेस्टॉरंटचा मालक चार्ल्स अँटनीला विनंती करून सोनियांच्या शेजारच्या टेबलवर बसण्याची व्यवस्था करून घेतली. एका हुशार ग्रीक व्यापाऱ्याप्रमाणे चार्ल्सनेही या कामासाठी त्यांच्याकडून दुप्पट पैसे घेतले."
"नंतर सिमी गरेवाल यांनी राजीव गांधींवर बनवलेल्या चित्रपटात त्यांनी सांगितलं होते, 'मी याआधी कोणालाही इतकं प्रेमात पडलेलं पाहिलं नव्हतं.'"
"केंब्रिजमध्ये शिकत असताना राजीव स्वतःचा खर्च भागवण्यासाठी आईस्क्रीम विकायचे. सोनिया गांधींना भेटण्यासाठी ते सायकलवरून जायचे. त्यांच्याकडे जुनी फोक्सवॅगन कारही होती. पण तिच्या पेट्रोलचा खर्च त्यांचे मित्र मिळून 'शेअर' करत असत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)





























