तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
दिवाळीनंतर घसा खवखवतोय, खोकला वाढलाय? हवेच्या प्रदूषणाबाबत डॉ. शशांक जोशींचा इशारा
दिल्ली, मुंबई, पुण्यासारखी महानगरं असो की छोटी शहरं... दिवाळीत फुटलेल्या फटाक्यांमुळे सगळीकडेच प्रदूषण वाढल्याचं चित्र पाहायलं मिळालं. मुंबई, पुण्यात एअर क्वालिटी इंडेक्सने (एक्यूआय) धोक्याची पातळी ओलांडली. या खराब हवेचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो आहे.
प्रदूषित हवेमुळे आरोग्यावर नेमका काय परिणाम होत आहे, कोणत्या समस्या निर्माण होत आहेत आणि या सगळ्या वातावरणात आपण काय काळजी घ्यायला हवी अशा मुद्द्यांवर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दिपाली जगताप यांनी डॉ. शशांक जोशी यांच्याशी संवाद साधला आहे.
कोव्हिड काळात डॉ. शशांक जोशी हे राज्य सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सचा भाग होते. आरोग्य क्षेत्रातल्या कामाचा अनेक वर्षांचा अनुभव त्यांना आहे.
त्यांच्या मुलाखतीचा हा संपादित अंश.
प्रश्न : सध्या जी हवेची गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळतीये, त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतोय, तुमची निरीक्षणं काय आहेत?
डॉ. शशांक जोशी : हवामान बदल, एल निनोचा परिणाम सध्या दिसतोय. त्यातच मुंबई हे काँक्रिटचं जंगल झालं आहे, खूप बांधकामं सुरू आहेत. त्यामुळे आधीच हवेतील सूक्ष्म कण (Particulate Matter) वाढले आहेत. त्यातच आपण फटाके वाजवतो, तेव्हा प्रदूषण वाढतं. हे प्रदूषणही वेगवेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे ध्वनी प्रदूषणही असतं, वायू प्रदूषणही असतं. अशावेळी हवेतल्या सूक्ष्म कणांमुळे फुप्फुसांचे आजार वाढतात.
सर्दी खोकला वाढतो. आपल्याला गुदमरून गेल्यासारखं वाटतं. हृदयविकार, रक्तदाबाचे रुग्ण वाढल्याचंही पाहायला मिळतं.
सणासुदीच्या दिवसात तळलेले पदार्थ, फास्ट फूड यांचंही प्रमाण वाढतं. त्यात प्रदूषित हवा. या सगळ्यामुळं शरीराचं संतुलन काहीसं ढासळतं. त्यामुळे रक्तदाब, मधुमेह किंवा फुप्फुसाचे आजार वाढतात.
प्रश्न : आपण या काळात प्रवास करतो किंवा जे रुटीन सुरू आहे, ते सुरू ठेवतो. अनेकांना असं वाटतं की, मला काही त्रास होत नाहीये. थोडासा खोकला येतो आणि नंतर तो आपोआप जातो. अशावेळी लक्षणं दिसत नसली, त्रास नसला तरी शरीरावर काय परिणाम होतो या सगळ्याचा?
डॉ. शशांक जोशी : या सगळ्याचा खूप परिणाम होतो. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, फुफ्फुसाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
त्यामुळे या काळात आरोग्यवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण या सगळ्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. ज्यांना आधीपासूनच आजार आहेत त्यांना त्रास होतोच, पण ज्यांना आजार नाहीत, त्यांनाही त्रास होऊ शकतो. त्यांच्यासाठी आपण आजार निर्माण करायला नको.
आपल्याला अॅलर्जी वाढलेल्या दिसतात. लहान मुलांमध्ये, वयस्कर लोकांमध्ये अॅलर्जी वाढलेली दिसते. त्यामुळे श्वसनमार्गाच्या संसर्गाचं प्रमाण वाढलंय, प्रतिकारशक्ती कमी होताना दिसते.
प्रश्न : ज्येष्ठ नागरिकांवर, ज्यांना श्वसनाचे आजार होतात त्यांच्यावर याचा विशेषतः काय परिणाम होतो? अनेक जण मास्क वापरताना, एअर प्युरिफायर वापरतात. ज्यांना हे परवडत नाही, ज्यांचं रुटीन पूर्णपणे सुरू आहे, त्यांना या सगळ्याचा कसा त्रास होतो, तुम्हाला काय दिसतं?
डॉ. शशांक जोशी : या सगळ्या पेशंट्सना खूप त्रास होतो. ते गुदमरून जातात. त्यांना आपण गुदमरून टाकतो. तसं करू नये. त्यांना आम्ही सतर्कता बाळगायला सांगतो.
त्यांना आम्ही सांगतो की, जिथे प्रदूषणाची घनता खूप जास्त आहे, तिथे जाऊ नका.
एकच चांगली गोष्ट आहे की, वाहनांमुळे होणारं प्रदूषण खूप कमी झालं आहे. कारण गाड्या, ट्राफिक जॅम कमी झाला आहे.
आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं आवश्यक आहे. जसे आपल्या घरी आई-वडील असतात, आजी-आजोबा असतात तसेच इतरांच्याही घरी असतात. सगळ्यांचं आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे.
त्यामुळे आपण थोडंसं जबाबदार बनून दिवाळी साजरी करावी.
शिवाय आपण प्राणायाम करू शकतो, श्वसनाचे व्यायाम करू शकतो. जेणेकरून आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढवू शकतो.
प्रश्न : एरव्ही जेव्हा हवेची गुणवत्ता खालावते ती परिस्थिती आणि आता फटाक्यांमुळे जेव्हा हवेचं प्रदूषण आपल्याला पाहायला मिळतं तेव्हाची परिस्थिती यात काय फरक दिसतो. विशेषतः लहान मुलं फटाक्यांच्या जवळ असतात, धुरात असतात. त्यांच्यावर या धुराचा काय परिणाम होतो, कारण त्यात केमिकल्स असतात.
डॉ. शशांक जोशी : हे हानिकारक आहे आणि त्याच्यामुळे कित्येक ठिकाणी फटाक्यावर बंदी आहे. मुलांना या सगळ्यामुळे अॅलर्जी होऊ शकतात. त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. मुलं पुन्हा पुन्हा आजारी पडतात.
शिवाय दिवाळीत फटाक्यांमुळे अचानक हवेत प्रदूषकांची पातळी वाढते. म्हणजे काल एक्यूआय हा 30-40 असेल तर तो आज एकदम 300-400 वर पोहोचतो. या अचानक होणाऱ्या प्रदूषण स्फोटाचा परिणाम टाळणं महत्त्वाचं आहे.
शिवाय याचे दीर्घकालीन परिणाम नंतर दिसून येतात.
प्रश्न : आपण सगळ्यांनीच जोपर्यंत हवेची गुणवत्ता जोपर्यंत सुधारत नाही किंवा निरोगी आहे असं म्हणता येत नाही, तोपर्यंत काय काळजी घ्यायला हवी?
डॉ. शशांक जोशी : मला असं वाटतं की, संतुलित व्यायाम, आहार, थोडसं जबाबदारीनं वागणं, संयमाने उत्सव साजरा करणं महत्त्वाचं आहे. फुफ्फुसांवर लक्ष केंद्रित करायला हवं.
तुम्ही एअर प्युरिफायरचा उल्लेख केला. पण सगळ्यांकडे एअर प्युरिफायर असू शकत नाही. शिवाय त्याच्याही काही मर्यादा आहेत.
कुठल्याही ठिकाणी जिथे आपण गुदमरून जाऊ किंवा खूप गर्दी आहे, तिथे जाणं टाळावं.
प्रश्न : आपल्याला सोशल मीडियावर तक्रारी पाहायला मिळतात की, घसा सुजलाय किंवा मुंबईत आल्यावरच घसा खराब झाला, नाकामध्ये त्रास होतोय, जळजळतंय. ही कशाची लक्षणं आहेत? शिवाय या हवेचा फटका कोणत्या अवयवाला सर्वांत जास्त बसतो?
डॉ. शशांक जोशी : सगळ्यात जास्त फटका आपल्या हृदयाला आणि फुफ्फुसांना बसतो. ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास होतो.
आपली हवा दिल्लीएवढी दूषित नाहीये. पण आपण तिकडे वाटचाल करू नये. आपल्याला 'यलो सिग्नल' आहे, तो आपण 'ग्रीन' करणं महत्त्वाचं आहे.
प्रश्न : विकास हा लोकांसाठी आहे. पण त्यासाठी आपण जी धोरणं राबवतो, जे निर्णय घेतो; त्याचा फटका आरोग्याला बसतो असं दिसत असेल, तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून तुम्ही त्याकडे कसं पाहता? कारण आरोग्यही विकासाइतकंच महत्त्वाचं आहे.
डॉ. शशांक जोशी : मला वाटतं की, आपली सगळी धोरणं नीट आहेत. तुम्ही जर पाहिलं की, कोणत्याही बांधकाम क्षेत्राच्या बाहेर त्यांना AQI निर्देशांक लावावा लागतो. प्रदूषण मापकं लावली आहेत. नियम घालून प्रदूषण नियंत्रणाचाही प्रयत्न केला आहे.
दुष्काळामुळे अनेक बांधकामं बंद आहेत. त्याचाही फायदा आपल्याला झाला आहे.
त्यामुळे धोरणं आणि कायदे जरी असले, तरी नागरिक म्हणून आपलाही सहभाग हवा, सरकाला सहकार्य हवं.
आपल्याला प्रगतिशील व्हायचं आहे. पण कोणाच्या आरोग्याची किंमत मोजून नाही.
मला असं वाटतं की, अजून झाडं लावणं हे आपल्या हातात पण आहे. झाडं ही शहराची फुफ्फुसं आहेत. त्यांची संख्या कमी व्हायला नको. त्यामुळे आपल्याला सतत नवीन झाडं लावावी लागतील. हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी सरकार आणि नागरिकांमध्येही समन्वय हवा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)