घर पाहायला गेल्यावर तिला 'भूत' दिसलं; तरीही तिनं तेच घर का घेतलं?

- Author, मायकल फिट्झपॅट्रिक
- Reporting from, टोकियो
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
रियू पहिल्यांदा टोकियोमधील तिच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये आली, त्या क्षणापासून तिला ते ठिकाण भुताटकीचं असल्याचा विश्वास होता.
"मी घर पाहण्यासाठी आले होते, तेव्हा एक माणूस तिथं उभा होता आणि माझ्याकडे रोखून पाहत होता," ती सांगते.
"इस्टेट एजंटला तो दिसत नव्हता, त्यामुळे मला कळलं की तो नक्कीच भूत असणार."
अशा वेळी अनेक लोक घाबरून ते घर कायमचं सोडून गेले असते. पण रियूने तिथेच राहायला जाण्याचा निर्णय घेतला.
सूचना- या बातमीतील तपशील काही वाचकांना विचलित करू शकतात.
"मी जरा हटके विचार करणारी आहे, त्यामुळे माझ्याकडे रागाने पाहणाऱ्या त्या पुरुष भुताशी मैत्री करायची, असं मी ठरवलं," असं रियू सांगते. ती एक 'आयडोरू', म्हणजेच तरुण मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आहे आणि तिला तिचं आडनाव सार्वजनिक करायचं नाहीये.
4 वर्षांनंतरही ती त्याच अपार्टमेंटमध्ये राहते आणि तिच्या मते तिला अजूनही दररोज अलौकिक अनुभव येतात. ती सांगते की तिला पावलांचे आवाज ऐकू येतात आणि ते भूत तिच्याशी बोलतं.
अलीकडच्या वर्षांत जपानमध्ये हॅलोविनचा सण अधिक प्रमाणात साजरा होऊ लागला असला तरी अनेक जपानी लोक वर्षभर भुतांवर गंभीरपणे विश्वास ठेवतात. या देशात 'युरेई' हा शब्द आहे, ज्याचा अर्थ मृत्यूनंतरही रेंगाळणारा, अस्वस्थ आत्मा असा होतो.

ज्या लोकांचा हिंसक किंवा दुर्दैवी स्थितीत मृत्यू झाला अशा लोकांच्या भूतांना असे आत्मे म्हटलं जातं.
उदाहरणार्थ, ज्यांची हत्या झाली, ज्यांनी आत्महत्या केली किंवा जे एकटे पडले आणि एकाकी अवस्थेत मृत्यू पावले. अशा व्यक्तीचा मृत्यू घरी झाला असेल, तर त्यांचा युरेई त्या ठिकाणाहून जात नाही, अशी समजूत आहे.
ज्यांना अंधश्रद्धा किंवा अशा गोष्टींची भीती वाटत नाही, अशा घर शोधणाऱ्यांसाठी मात्र यात मोठ्या सवलती मिळू शकतात. अशा घरांसाठी जपानमध्ये एक स्वतंत्र श्रेणी आहे. तिला "जिको बुक्केन" असं म्हटलं जातं, ज्याचा अर्थ "कलंकित" किंवा (काहीतरी अघटित) "घटना घडलेली" मालमत्ता असा होतो.
2021 मध्ये सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जपानमधील इस्टेट एजंटना आत्महत्या, हत्या, आगीत मृत्यू किंवा बराच काळ मृतदेह सापडला नाही अशा कोणत्याही मृत्यूची माहिती उघड करणं बंधनकारक आहे.
भाड्याच्या मालमत्तेच्या बाबतीत मृत्यूची माहिती 3 वर्षांपर्यंत सांगणं बंधनकारक आहे. मात्र, मालमत्ता विक्रीसाठी काढल्यास ही माहिती कोणतीही कालमर्यादा न ठेवता उघड करावी लागते.
याउलट, ब्रिटनमध्ये एखाद्या घरात कोणाचा मृत्यू झाला होता का, याची माहिती देणं कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही.
अमेरिकेतही हे नियम राज्यानुसार बदलतात. उदाहरणार्थ, कॅलिफोर्नियामध्ये एखाद्या घरात मागील 3 वर्षांत मृत्यू झाला असेल तर ती माहिती द्यावी लागते. पण अॅरिझोना आणि ओरेगॉनमध्ये अशी सक्ती नाही.
रियूला सांगण्यात आलं होतं की तिच्या अपार्टमेंटमध्ये एका पुरुषानं आत्महत्या केली होती. त्यामुळे टोकियोच्या फॅशनेबल सेतागाया विभागातील तिच्या केवळ 25 चौरस मीटरच्या छोट्या फ्लॅटचे भाडे तिला जवळपास 30% कमी दरात मिळत आहे. ती सांगते की ती दरमहा 45,000 येन ($285; £213) भाडं देते, जे प्रत्यक्षात 62,000 येन असायला हवं होतं.
जगात कुठेही हत्या किंवा आत्महत्या झालेलं घर विकणं किंवा भाड्याने देणं अवघड असू शकतं. पण टोकियोतील इस्टेट एजंट एरिक ऑस्कॅम्प यांच्या मते जपानी लोक विशेषतः अंधश्रद्धाळू असतात आणि अशा कलंकित मालमत्तांपासून दूर राहतात.
"दफनभूमीच्या शेजारी असलेलं अपार्टमेंटसुद्धा भाड्यानं देणं कठीण असतं, विशेषतः स्वयंपाकघरातून थडगी दिसत असतील तर," ऑस्कॅम्प सांगतात. "सर्वात वाईट म्हणजे अपार्टमेंटमध्ये आत्महत्या झालेली असणं. कुणी छतावरून उडी मारली असेल, तरी अनेक भाडेकरू तिथून निघून जातात. इतर समस्यांमध्ये गंभीर गुन्हा किंवा एकाकी अवस्थेत झालेला मृत्यू यांचाही समावेश होतो."
एखाद्या व्यक्तीचा एकाकी अवस्थेत मृत्यू होणं ही बाब मात्र ब्रिटन किंवा अमेरिकेत साधारणपणे मालमत्तेच्या किंमतीवर परिणाम करत नाही.
परंतु जपानच्या नैर्ऋत्येकडील कागोशिमा या ग्रामीण भागात याच कारणामुळे डायन टिन्चर यांना एक मोठं 3 बेडरूमचं घर अन्यथा असलेल्या किंमतीच्या जवळपास निम्म्या दरात मिळालं.
'जर इथे भूत असेल, तर मी तिचे आभार मानते'
79 वर्षीय अमेरिकन डायन टिन्चर जवळपास 40 वर्षांपासून जपानमध्ये राहतात आणि टूर गाईड म्हणून काम करत आहेत. त्या सांगतात की इस्टेट एजंटनं त्यांना स्पष्ट माहिती दिली होती. एका वृद्ध एकाकी महिलेचा घरात मृत्यू झाला होता आणि त्यामुळे त्या घरावर कलंकच लागला होता.
टिन्चर यांनी हे घर 20 दशलक्ष येन (2 कोटी येन) मध्ये विकत घेतलं. त्याच परिसरात अशीच घरं साधारणपणे 45 दशलक्ष येन (4.5 कोटी येन) पर्यंत विकली जातात.
"मला भुतांवर विश्वास नाही. पण जपानी लोक खूप अंधश्रद्धाळू आहेत, हे मला माहीत आहे," त्या म्हणतात. "जर इथे भूत असेल, तर मी तिचं दररोज आभार मानते... कारण तिच्यामुळे मला इतक्या सुंदर आणि परवडणाऱ्या घरात राहता येतं."

फोटो स्रोत, Diane Tincher
या घराबद्दल संशोधन करताना टिन्चर यांना 'ओशिमालँड' नावाच्या संकेतस्थळावर ही मालमत्ता सापडली. या संकेतस्थळावर जिको बुक्केन मालमत्तांची यादी असते आणि तिथे त्या घरात नेमकी कोणती घटना घडली होती याची माहिती दिलेली असते.
हे संकेतस्थळ 2005 मध्ये टोकियोमध्ये सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर ते संपूर्ण जपानमध्ये आणि पुढे 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारलं.
हे एक क्राउडसोर्स्ड संकेतस्थळ आहे, म्हणजेच सामान्य लोक स्वतः अशा घरांची आणि त्यांच्याशी संबंधित घटनांची माहिती तिथे नोंदवतात.

फोटो स्रोत, Diane Tincher
ओशिमालँडचे संस्थापक तेरू ओशिमा सांगतात की पूर्वी अशा मालमत्ता जपानमध्ये "फारसे आकर्षक पर्याय" मानल्या जात नव्हत्या.
मात्र अलीकडच्या वर्षांत देशात घरांच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्याचबरोबर जीवनावश्यक खर्चातही मोठी वाढ झाली आहे. 2025 मधील एका सर्वेक्षणात असं आढळलं की जपानमधील निम्म्याहून अधिक लोक आता जिको बुक्केन मालमत्ता स्वस्त मिळत असेल तर भाड्यानं घेण्यास तयार आहेत.
सेतागायामध्ये परतल्यावर रियू सांगते की ती तिच्या भुताटकीच्या सहनिवाशासोबत आनंदाने राहते.
"भूतं ही एकेकाळी जिवंत माणसं होती, असा माझा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनाही आदर मिळायला हवा," ती म्हणते.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीनं मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























