तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
युरोपमध्ये सुपरमार्केटमधले फ्रिजर हॅक, इंटरनेटशी जोडलेली उपकरणं कशी येत आहेत हॅकर्सच्या निशाण्यावर?
युरोपमध्ये नुकत्याच झालेल्या संशयास्पद सायबर हल्ल्यात सुपरमार्केटमधले फ्रिज आणि मोठे फ्रिजर हॅक करण्यात आले.
इंटरनेट आणि वायफायशी जोडल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये फ्रिज, वॉशिंग मशीन तसंच सेंट्रल हीटिंग सिस्टिमचाही समावेश होतो.
अगदी रोजच्या वापरातली इलेक्ट्रॉनिक उपकरणंदेखील सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित नसतील तर त्यातून या संपूर्ण व्यवसायातील कमतरता ठळकपणे अधोरेखित होतात.
इंटरनेटशी जोडलेली उपकरणं दूरवरून नियंत्रित करणं सोपं असतं. अनेकदा हॅकर्स याच गोष्टीचा फायदा घेतात.
मात्र, याचा अर्थ हॅकर्सना प्रत्येक उपकरणावर नियंत्रण मिळवता येतं असं नाही. घरगुती उपकरणं बनवणाऱ्या कंपन्या आपलं तंत्रज्ञान सुरक्षित असल्याचा दावा सातत्याने करतात.
यापूर्वीही काही उपकरणांवर अशा प्रकारचे सायबर हल्ले झाले आहेत. 2015 मध्ये सॅमसंगचा एक स्मार्ट फ्रिज हॅक झाल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.
मात्र, सुपरमार्केटमधल्या सायबर हल्ल्याचा घरगुती उपकरणांशी थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही.
ब्रिटनच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरचे (NCSC) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सियारन मार्टिन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "इंटरनेटशी जोडली जाणारी उपकरणं अधिक सुरक्षित बनवण्यासाठी उत्पादकांनी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांकडून जास्त अपेक्षा ठेवायला हव्यात, जेणेकरून त्यांच्याकडून अधिक सुरक्षित उपकरणं आणि उत्पादनं बनवली जातील."
त्यांनी म्हटलं की, "सामान्य ग्राहकांनी आपली उपकरणं नेहमी अपडेट ठेवली पाहिजेत. शक्य असेल तिथे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनही सुरू ठेवलं पाहिजे. हे अपडेट करण्यासाठी काही सेकंदच लागतात."
एप्रिल 2024 पासून ब्रिटनमध्ये लागू झालेल्या कायद्यानुसार, स्मार्ट घरगुती उपकरणं बनवणाऱ्या कंपन्यांना सायबर सुरक्षा नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. यामध्ये पासवर्ड आणि सुरक्षा अपडेटशी संबंधित नियमांचाही समावेश आहे.
सुपरमार्केटशी संबंधित या घटनांचा तपास करण्यासाठी अन्य आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा तसंच उद्योग क्षेत्रातील कंपन्यांसोबत काम करत असल्याचंही एनसीएससीने म्हटलं आहे. मात्र, ब्रिटनवर याचा परिणाम झाला की नाही, याची माहिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
ब्रिटनच्या सायबर संरक्षण क्षेत्रातील संशोधकांनी देशातील रिटेल कंपन्यांशी संबंधित 800 हून अधिक रेफ्रिजरेशन सिस्टिम्स, इमारतींच्या नियंत्रणासाठी वापरले जाणारे इंटरफेस आणि स्मार्ट ऑटोमेशन सिस्टिम्स शोधल्या. या यंत्रणा बाह्य इंटरनेटच्या माध्यमातून नियंत्रित केल्या जाऊ शकतात.
याचा अर्थ या यंत्रणा हॅक केल्या जाऊ शकतात, असा नाही. मात्र, कमकुवत पासवर्ड किंवा सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे त्या हॅकर्सच्या निशाण्यावर येऊ शकतात.
कार, वीज निर्मिती केंद्रं आणि पाणीपुरवठ्याबाबतही चिंता
सुपरमार्केटवर यापूर्वी झालेल्या सायबर हल्ल्यांनंतरच सरकारने मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ पुरवणाऱ्या रिटेलर्सना आपली सायबर सुरक्षा अधिक मजबूत करायला सांगितलं होतं.
ब्रिटिश रिटेल कन्सोर्टियमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हेलेन डिकिन्सन यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना म्हटलं, "अशा प्रकारचे सायबर हल्ले हे या रिटेल क्षेत्रातील कंपन्यांसाठी काळजीचा विषय आहे."
त्यांच्या म्हणण्यानुसार, व्यावसायिक कंपन्या एनसीएससीसोबत माहितीची देवाणघेवाण करून आपली सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी काम करत आहेत.
मात्र, अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वीही हॅकिंगमुळे अन्नपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे या समस्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
मे 2025 मध्ये ब्रिटनमधल्या 'एम अँड एस' या सुपरमार्केटसह 'को-ऑप' या रिटेल कंपनीला हॅकर्सनी लक्ष्य केलं होतं. त्यावेळी या कंपन्यांना ताज्या खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्यात अडचणी आल्या होत्या. सायबर हल्ल्यानंतर दिवसभर ग्राहकांनी दुकानांमध्ये अनेक वस्तू उपलब्ध नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या.
सायबर सुरक्षा क्षेत्रातील 'सेंटिनलवन' या कंपनीतील संशोधक टॉम हेगेल यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना म्हटलं की, अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या कंपन्यांनी सायबर सुरक्षेच्या बाबतीत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
त्यांनी म्हटलं की, "या उपकरणांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे, याचं उत्तर रिटेल कंपन्यांना द्यावं लागेल. केवळ त्यांची दुरुस्ती कोण करतं, एवढंच सांगून भागणार नाही. इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे रोजच्या आयुष्यासाठी लागणारं तंत्रज्ञान अधिक सोयीचं होऊ शकतं. मात्र, त्यासोबत सुरक्षेची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे. हॅकर्सच्या हल्ल्याचा परिणाम केवळ संगणकांवरच होत नाही. एखादं सेटिंग बदलल्याने फ्रिजरमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थही खराब होऊ शकतात."
केवळ घरातच नाही, तर बाहेरही इंटरनेट आणि वाय-फाय तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने औद्योगिक क्षेत्रातील यंत्रं, वाहनं यांवर दूरवरून नियंत्रण ठेवता येते.
सायबर सुरक्षा तज्ज्ञ केन मुन्रो यांनी 2015 मध्ये झालेल्या एका प्रात्यक्षिकाचा उल्लेख केला. यामध्ये संशोधकांनी एका जीपच्या इंटरनेटशी जोडलेल्या एंटरटेनमेंट सिस्टिमच्या माध्यमातून ती गाडी हॅक केली होती. त्यानंतर या वाहनाच्या सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा करण्यात आली.
मुन्रो यांनी म्हटलं की, "सुदैवाने, वाहन उद्योगाने या समस्येकडे लक्ष दिलं आणि त्यावर उपाययोजनाही केल्या."
वीज निर्मिती केंद्रं आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांची देखरेख करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर मोबाइल कनेक्शनचा वापर केला जातो. त्यामुळे अभियंत्यांना या यंत्रणा दूरवरून नियंत्रित करता येतात.
मुन्रो यांच्या मते, ब्रिटनमधील सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या कंपन्या (युटिलिटी कंपन्या) सामान्यतः ही कनेक्शन्स सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षता घेतात. मात्र, जगभरात सायबर सुरक्षेचे निकष वेगवेगळे आहेत.
लहान आणि कमी निधी असलेल्या युटिलिटी कंपन्यांची मुन्रो यांना जास्त चिंता वाटते. अशा कंपन्या अजूनही जुनी यंत्रणा आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असण्याची शक्यता त्यांना वाटते.
'झेडस्केलर' या कंपनीचे सायबर सुरक्षा तज्ज्ञ ऑलिव्हिएर डॅलॉय यांनी म्हटलं की, "योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्यास इंटरनेटशी जोडलेल्या कोणत्याही कारखान्याला किंवा उपकरणाला अशा धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये कार निर्मिती कंपन्यांपासून ते वीज निर्मिती केंद्रे आणि वाहतूक व्यवस्थेपर्यंत सर्वांचा समावेश होतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)