'कधी कधी रडायला येतं, पण लेकरांसाठी जगायचंय', कापूस वेचणाऱ्या शेतमजूर महिलांना दुष्काळाच्या झळा

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"आमचं निभतच नाही ना. लेकराचं दुःख येते, सुख येते. मग कसंतरी चटणी भाकर लेकरांना द्यायला लागते. सरकार तर काहीच देत नाही. कधी कधी रडायला येतं. असं वाटतं की आपण मरून जावं. पण, आता लेकरांसाठी जगणं आहे."

शेतात कापूस वेचताना प्रिया वाघाडे आपली व्यथा मांडत होत्या. प्रिया या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावजवळच्या वरुड गावच्या. या भागाला 'कापसाचा गोल्डन बेल्ट' म्हणतात. याठिकाणी उच्च दर्जाचा आणि लांब धाग्याचा कापूस पिकतो. त्यामुळे इथल्या सगळ्या शेतमजूर महिला म्हणजेच कापूस वेचणाऱ्या महिलांची उपजिविकाच यावर अवलंबून आहे.

पण यावेळी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातच दुष्काळ घोषित झाला. पावसाची देखील 27 टक्के तूट आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम झालाय का? आणि त्याचा या कापूस वेचणाऱ्या शेतमजूर महिलांवर कसा परिणाम होतोय? हे समजून घेण्यासाठी आम्ही पोहोचलो यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात.

(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्हीदेखील तणावात असाल तर भारत सरकारच्या 'जीवनआस्था' हेल्पलाइन 18002333330 ची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी देखील बोललं पाहिजे.)

दुष्काळाचा शेतमजूर महिलांच्या मजुरीवर परिणाम

राळेगावला जातानाच दुष्काळाचा कापसावर परिणाम झाल्याचं नजरेस पडत होतं. वर्धा नदी कोरडी पडलेली दिसत होती. काही शेतांमधला कापूस पूर्णपणे सुकला होता. ते सगळं बघत आम्ही पोहोचलो राळेगावजवळच्या वरुड गावात.

प्रिया वाघाडे तिथल्याच शेतामध्ये कापूस वेचत होत्या. प्रिया या एकल महिला आहेत. त्यांच्या नवऱ्यानं पाच वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्यानंतर एक मुलगा आणि एका मुलीची जबाबदारी पूर्णपणे त्यांच्यावर आली. त्यांच्या घरी एकरभरही शेत नाही. फक्त मजुरीच्या भरवशावर त्यांचं घर चालतं. आपल्या कुटुंबाला घेऊन त्या तुराट्यांच्या झोपडीत राहतात.

पण, यावर्षी आता मुलांचं शिक्षण बंद करावं लागणार की काय? अशी भीती त्यांना वाटतेय. कारण त्यांच्या मजुरीवर आणि त्यामधून मिळणाऱ्यात कमाईवर दुष्काळाचा परिणाम झाल्याचं त्या सांगत होत्या.

प्रिया गेल्यावर्षीपर्यंत एका दिवसाला 600 रुपयांपर्यंत मजुरी कमवायच्या. सकाळी 8 वाजतापासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत जेवढा कापूस वेचला त्यानुसार त्यांना पैसे मिळायचे. त्यांना 20 किलोला 170-200 रुपये मिळत होते. प्रिया दिवसाला 1 क्विंटल कापूस वेचत असल्याचं सांगतात.

पण यावर्षी दुष्काळामुळे त्यांच्या मजुरीवर परिणाम झालाय. यावर्षी त्यांना दिवसाला फक्त 200 रुपये मजुरी मिळत आहे.

कारण, कापूस फुटलेला नाही. एका झाडाला या महिन्यात 50 बोंड असायला हवी त्या झाडाला कुठं 15-20 तर कुठं अगदी 5-10 बोंड दिसतात. कोरडवाहू शेतकऱ्यांचा कापूस तर पूर्णपणे सुकलाय. त्यांचा एक कापसाचा फेर झाला की कापूस संपेल, तर सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडे दोनदा कापूस वेचल्यानंतर तिसरा-चौथा फेर होणार नाही अशी परिस्थिती आहे.

प्रिया सांगतात, "आम्ही गेल्यावर्षी एका दिवसाला 600 रुपयांपर्यंत कमवत होतो. पण यावर्षी पाऊस पडला नाही. त्यामुळे कापूस नाही. शेतकऱ्यालाच काही मिळणार नाही तर आम्हाला कुठून देतील? दोन-तीन दिवस काम मिळतं. त्यानंतर घरीच राहायला लागतं. यावर्षी तर कापसाचा एक फेर झाला की आम्ही महिला घरी राहू. कोणावर कर्ज असतं ते कसं फेडायचं?"

यवतमाळमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त कापसाचं नुकसान

फक्त प्रियाच नाहीतर त्यांच्यासारख्याच इतरही कापूस वेचणाऱ्या शेतमजुर महिलांवर दुष्काळाचा परिणाम होत आहे. कारण यवतमाळ जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक कापसाचं नुकसान असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी मनोज ढगे सांगतात.

ते म्हणतात, "जिल्ह्यात कापसावर एल निनोचा परिणाम दिसतोय. कापसाची उंची चार फूट वाढायला पाहिजे होती. पण, अनेक ठिकाणी कापूस दीड फुटाच्या उंचीवर थांबला. 40-50 बोंड यायला हवी होती तिथं फक्त 10-12 बोंडं दिसतात. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे फक्त एक कापसाचा वेचा करू शकतील. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांचा कापूस थोडा टिकून आहे. जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त कापसाचं नुकसान आहे."

आम्ही प्रियासारख्याच आणखी शेतमजूर महिलांना भेटलो. त्यांची परिस्थिती काही वेगळी नाही.

याच भागातल्या प्रतिभा घोडाम सांगतात, "घरी करायला कोणी नाही. मुली शाळेत जातात. सासू-सासरे म्हातारे आहेत. मजुरी कमी झाली आहे. कारण, पाणी नाही आहे. लोक शेतात तणनाशक मारतात. मजुरीला सांगत नाही. सांगितलं तरी कमी मजुरीनं या म्हणतात. वेळ जास्त आणि पैसा कमी आहे. कापूस वेचणीचं दरवर्षीपेक्षा कमीच झालं आहे. दरवर्षी 170 रुपये 20 किलोला द्यायचे. पण, आता फक्त 150 रुपये म्हणत आहेत. कापूसही नाही. बोंड कमी आहे तर फुटले नाही. दोनच वेचे होणार आहेत."

प्रतिभा यांच्या पतीनं देखील आत्महत्या केली. आता कुटुंबाची सगळी जबाबदारी त्यांच्यावरच आहे. कापूस वेचणीतून मिळणाऱ्या पैशांवर त्या त्यांचं कुटुंब चालवतात.

तर याच भागातल्या सुषमा मेश्राम यांना त्यांची परिस्थिती सांगताना रडू कोसळलं. त्या आईच्या घरी वरुडला राहतात. कारण, त्यांच्या पतीचं निधन झालं.

त्या म्हणतात, "आमची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. इतक्या कमी पैशांत आम्ही जगायचं कसं? सरकारनं आम्हाला काहीतरी काम द्यायला पाहिजे. ते काम देतील तर आम्हाला जगता येईल."

दुष्काळ जाहीर करताना शेतमजूर महिलांचा विचार होतो का?

प्रिया, प्रतिभा आणि सुषमा यांच्यासारख्या आपल्या राज्यात 1.5 कोटींच्या वर शेतमजुर महिला असल्याचं सरकारी आकडेवारी सांगतेय. शेतकऱ्यांना दुष्काळी पॅकेज जाहीर होतात. त्यांना नुकसान भरपाई मिळतेय. पिकविम्यासारख्या योजनाही असतात. पण, दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतमजुरांचा दुष्काळ जाहीर करताना किती विचार होतो? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.

या शेतमजूर महिलांसाठी काम करणाऱ्या राळेगावमधील प्रेरणा विकास संघाच्या सचिव माधुरी खडसे शेतमूजर महिलांना दुष्काळी निधी देण्याची मागणी करतात.

त्या म्हणतात, "मजुरी करणाऱ्या महिलांची नोंद करून घेणं. शेतकऱ्याला तुम्ही दुष्काळी निधी देता तशी तरतूद या महिलांसाठी पण ठेवायला पाहिजे. जसं शेतकऱ्याचं कुटुंब असतं तसं यांचं पण कुटुंब आहे ना. मजुरीच्या भरवाशावर सगळा संसार चालतो. मजुरीच मिळाली नाहीतर यांच्यावर सुद्धा मोठा फटका बसेल. त्यामुळे यांचा विचार व्हायला हवा."

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)