जगभरातील सायबर सुरक्षा यंत्रणा अचानक सतर्क का झाल्या? जाणून घ्या PHP तंत्रज्ञान काय आहे

    • Author, ओसमंड चिया
    • Role, बिझनेस रिपोर्टर
    • Author, लिव मॅकमोहन
    • Role, टेक्नॉलॉजी रिपोर्टर
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

मागील 10 वर्षांहून अधिक काळापासून इंटरनेटवर वापरल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानातील गंभीर त्रुटी कोणाच्याही लक्षात आल्या नव्हत्या. या त्रुटी शोधून काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजेच एआयची मदत झाली. त्यानंतर जगभरात सायबर सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

या त्रुटी PHP (पीएचपी) नावाच्या प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे भाषेत आहेत. 2000 च्या दशकापासून जगभरामध्ये वेबसाइट तयार करण्यासाठी या भाषेचा वापर केला जात आहे.

बुधवारी (21 ऑक्टोबर) या त्रुटी समोर आल्यानंतर जगभरातील सरकारं आणि सायबर सुरक्षा यंत्रणा त्यांचा धोका कमी करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

वेबसाइट चालवणाऱ्यांनी त्वरीत नवीन सुरक्षा अपडेट घ्यावं, अन्यथा आपली वेबसाइट काही काळ बंद ठेवण्याचा विचार करावा, असं आवाहन त्यांना करण्यात आलं आहे.

या त्रुटी शोधून काढणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या विझ या सायबर सुरक्षा कंपनीने एआयच्या मदतीने आतापर्यंत शोधलेल्या त्रुटींमध्ये या 'सर्वात गंभीर' त्रुटी आहेत, असं म्हटलं आहे.

या त्रुटी शोधण्यासाठी ओपनएआयच्या तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली होती. ओपनएआयने म्हटलं की, 'अलीकडच्या काळात समोर आलेल्या सायबर सुरक्षा समस्यांमध्ये ही सर्वात गंभीर समस्यांपैकी एक आहे.'

नेमकी त्रुटी काय आहे?

बहुतांश लोकांनी पीएचपी हे नाव ऐकलंही नसेल, परंतु ते दररोज या तंत्रज्ञानाचा नकळतपणे वापर करत असतात.

पीएचपी हे 'हायपरटेक्स्ट प्रीप्रोसेसर' या नावाचं संक्षिप्त रूप आहे. अनेक वेबसाइट आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स याच तंत्रज्ञानावर चालतात.

ऑनलाइन खरेदीच्या वेबसाइट, विकिपीडिया आणि ब्लॉग तयार करण्यासाठी वापरली जाणारी वर्डप्रेस ही प्रणालीही त्यापैकीच आहे.

गोरिला सायबर सिक्युरिटीचे प्रमुख पॉल स्पेन यांनी बीबीसीला सांगितलं की, आपण विकिपीडियासारखी वेबसाइट उघडतो, तेव्हा पीएचपी ही प्रोग्रामिंग भाषा किंवा कोड असतो जो आपल्याला हवी असलेली माहिती गोळा करतो आणि ती वाचता येईल अशा स्वरूपात दाखवतो.

परंतु, या त्रुटीमुळे हॅकर्स कोणत्याही परवानगीशिवाय संबंधित वेबसाइटचे सर्व्हर ताब्यात घेऊ शकत होते आणि त्यातील गोपनीय किंवा संवेदनशील माहिती चोरू शकत होते. त्यामुळे पीएचपी वापरून तयार केलेल्या सर्व वेबसाइट्सना धोका निर्माण झाला होता.

या त्रुटीचा फायदा घेऊन हल्ले करणं एआयमुळे अधिक सोपं आणि जलद होऊ शकतं, असं स्पेन यांनी सांगितलं. त्यांच्या अंदाजानुसार, या त्रुटीचा लाखो वेबसाइट्सना फटका बसू शकतो.

हॅकर्स किंवा एखाद्या देशाने या त्रुटीचा गैरवापर करून वेबसाइटवरील खासगी माहिती चोरली, तर ते 'विनाशकारी' ठरू शकेल, असं अ‍ॅडलेड विद्यापीठातील सायबर सुरक्षा संशोधक जिल स्ले यांनी म्हटलं आहे.

या त्रुटीमुळे कोणत्या वेबसाइट्सला धोका आहे?

या इशाऱ्यामुळे जगभरातील ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म्स, सरकारी वेबसाइट्स आणि ऑनलाइन चर्चा मंचांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

ऑनलाइन विश्वकोश विकिपीडिया चालवणाऱ्या विकिमीडिया या संस्थेनेही खबरदारी म्हणून आपल्या काही यंत्रणा बंद केल्या आहेत.

फिनलंड सरकार, एडिनबर्ग कौन्सिल आणि बीबीसीनेही खबरदारी म्हणून आपल्या काही वेबसाइट्स आणि वेबपेज बंद केले आहेत. नेदरलँड्सच्या सायबर सुरक्षा यंत्रणेनेही आपली वेबसाइट बंद केली आहे.

स्कॉटलंडमधील स्थानिक प्रशासनाच्या संस्था आणि आरोग्य विभागांसह अनेक सरकारी संस्थांनीही खबरदारी म्हणून आपल्या वेबसाइट्स बंद केल्या आहेत.

काही तज्ज्ञांच्या मते, ज्या वेबसाइटची सुरक्षा व्यवस्था किंवा देखभाल नीट केली जात नाही, त्यांना या त्रुटीचा अधिक धोका आहे.

विशेषतः सायबर सुरक्षेसाठी कमी साधनं आणि पैसा असलेल्या छोट्या संस्थांच्या वेबसाइटला याचा मोठा फटका बसू शकतो.

या त्रुटींबाबतची तांत्रिक माहिती आता सार्वजनिक होत असल्याने, येत्या काही आठवड्यांत त्यांचा गैरफायदा घेण्याचे प्रयत्न वाढण्याची शक्यता आहे, असं सिडनीतील यूएनएसडब्ल्यूचे सायबर सुरक्षा संशोधक सलील कान्हेरे यांनी सांगितलं.

त्रुटी समोर आल्यानंतर काय घडलं?

पीएचपी तयार करणाऱ्या प्लॅटफॉर्मने बुधवारी या त्रुटी दूर करण्यासाठी नवीन सुरक्षा अपडेट जारी केलं. त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक वर्षांपासून असलेल्या या त्रुटी आता दुरुस्त करण्यासाठी हे अपडेट देण्यात आलं आहे.

"पीएचपी वापरणाऱ्या सर्वांनी तातडीने नवीन सुरक्षा अपडेट करून घ्यावं," असं कंपनीने आवाहन केलं आहे.

जगभरातील सरकारी यंत्रणा आणि सायबर सुरक्षा संस्थांनीही वेबसाइट्स चालवणाऱ्यांना आपल्या वेबसाइट सुरक्षित करण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनएसए) पीएचपी वापरणाऱ्या सर्व संस्थांना इशारा दिला आहे. ज्या संस्थांना तातडीने सुरक्षा अपडेट करता येणार नाही, त्यांनी आपली यंत्रणा काही काळ बंद ठेवावी, असं सांगण्यात आलं आहे.

या त्रुटीमुळे हॅकर्सना थेट वेबसाइटच्या डेटाबेसमध्ये शिरकाव करून माहिती मिळवण्याची संधी मिळू शकते, असंही एनएसएने म्हटलं आहे.

"हे धोके इतके गंभीर आहेत की, अमेरिकेतील सर्व सरकारी विभाग आणि यंत्रणांनी तातडीने सुरक्षा अपडेट करून या त्रुटी दूर करणं आवश्यक आहे," असं या संस्थेनं म्हटलं आहे.

युकेच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्रानेही असाच इशारा दिला आहे. 'हॅकर्सनी वेबसाइटमध्ये घुसण्यासाठी गुप्त मार्ग' (बॅकडोअर्स) तयार केला आहे का, याची तपासणी करण्याचं आवाहन या केंद्राने संस्थांना केलं आहे.

युरोपीय युनियन, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियातील सायबर सुरक्षा संस्थांनीही अशाच प्रकारचे इशारे दिले आहेत.

जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी लोकांना आपल्या सार्वजनिक वेबसाइट पीएचपीवर चालतात का, हे तपासून पाहण्याचं आवाहन केलं आहे.

ताकाइची यांनी 'एक्स'वर लिहिलं, "आज रात्रीच सर्वांनी तातडीने आवश्यक ती पावलं उचलावीत, असं आम्ही आवाहन करतो."

"सुरक्षा अपडेट (फिक्स पॅच) तातडीने करणं शक्य नसेल, तर धोका कमी करण्यासाठी वेबसाइट्स काही काळ बंद ठेवणे किंवा अशाच प्रकारचे इतर उपाय योजण्यासारखे उपाय करता येऊ शकतात," असं त्यांनी सांगितलं.

तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्याही आपापली यंत्रणा सुरक्षित करण्यासाठी तातडीने पावलं उचलत आहेत.

ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी अ‍ॅमेझॉनने सांगितलं की, पीएचपीमधील त्रुटी सार्वजनिक होण्याच्या काही दिवस आधीच कंपनीवर अनेकदा सायबर हल्ले करण्याचे प्रयत्न झाले होते. परंतु, हल्लेखोरांना या त्रुटीबद्दल आधीच माहिती कशी मिळाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

एआय सायबर सुरक्षेतील त्रुटी कसं शोधतं?

या त्रुटी कॅलिफ आणि विझ या सायबर सुरक्षा कंपन्यांमधील संशोधकांनी शोधून काढल्या.

संशोधकांनी प्रगत एआय साधनांचा वापर केला. ही साधनं संगणक प्रोग्रामचा कोड तपासून त्यातील त्रुटी मानवापेक्षा किंवा जुन्या प्रणालींपेक्षा खूप वेगाने शोधू शकतात.

"आधुनिक सॉफ्टवेअर्स खूप गुंतागुंतीची असतात. त्यामुळे त्यांच्यातील काही त्रुटी अनेक वर्षे लक्षातही येत नाहीत," असं कान्हेरे यांनी सांगितलं.

"या त्रुटी नवीन नव्हत्या. त्या शोधण्याची आपली क्षमता वाढली, इतकाच बदल झाला आहे," असं कान्हेरे म्हणाले.

या शोधाची माहिती या आठवड्यात इंटरनेटवर लीक झाली. त्यामुळे पीएचपी तयार करणाऱ्यांना या सुरक्षा त्रुटीची आणि तिच्या मोठ्या धोक्याची माहिती लगेचच जाहीर करावी लागली.

ओपनएआयने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं की, या घटनेतून 'एआयचा वापर करून सायबर सुरक्षेतील त्रुटी शोधता येतात', हे स्पष्ट झालं आहे. परंतु, 'याच तंत्रज्ञानाच्या मदतीने हॅकर्स सायबर हल्ल्यांसाठीची साधनंही वेगाने तयार करू शकतात.'

चॅटजीपीटी तयार करणाऱ्या ओपनएआयने पीएचपी सुरक्षित आहे की नाही, हे तपासण्यासाठी एक प्रोग्राम तयार केला आहे.

क्वीन्सलँड विद्यापीठाच्या सायबर रिसर्च सेंटरमधील रायन को म्हणाले, "पूर्वी सॉफ्टवेअर्स तयार करताना ते व्यवस्थित काम करेल, याकडे जास्त लक्ष दिले जायचे. पण, ते सुरक्षित कसं राहतील, याचा पुरेसा विचार केला जात नव्हता. त्यामुळेच यात अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत."

स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावं?

वेबसाइटच्या मालकांनी पीएचपीची नवीनतम आवृत्ती वापरून आपली वेबसाइट सुरक्षित करावी, असं आवाहन केलं जात आहे.

स्पेन यांनी सांगितलं की, बहुतांश तंत्रज्ञान कंपन्यांसाठी पीएचपीमधील त्रुटी दूर करण्यासाठीचं हे अपडेट (सॉफ्टवेअर पॅच) करणं म्हणजे नेहमीच्या कामाचा एक छोटासा भाग आहे.

अमेरिकेच्या एनएसएने पुढील काही आठवडे 'अधिक सतर्क' राहण्याचं आणि सॉफ्टवेअर कंपन्यांकडून येणाऱ्या अपडेट्सवर बारकाईने लक्ष ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

"या यंत्रणांमधील त्रुटी दूर करणारे अपडेट्स वेळेवर इन्स्टॉल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे," असं संस्थेनं म्हटलं आहे.

कान्हेरे म्हणाले, वेबसाइट सुरक्षित ठेवण्याची मुख्य जबाबदारी वेबसाइट चालवणाऱ्यांची आहे. परंतु, ज्या वेबसाइट्सवर या त्रुटींचा परिणाम झाला आहे, त्यांनी सुरक्षिततेसाठी काही सूचना दिल्यास, युजर्सनीही त्याकडे लक्ष द्यावं. उदाहरणार्थ, पासवर्ड बदलण्यास सांगितल्यास तो बदलावा.

या घटनेची चर्चा सुरू असल्याचा फायदा घेऊन 'फसवणुकीचे' (फिशिंग) मेसेज पाठवले जाऊ शकतात. त्यामुळे अशा मेसेजपासूनही लोकांनी सावध राहावं, असा इशारा त्यांनी दिला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)