तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
'मी सलग 18 तास दारू प्यायचे, आता दारू सोडल्यावर 31 किलो वजन कमी झालं'
- Author, ईली कार्टर
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
आदल्या दिवसापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत जवळपास सलग 18 तास दारू पिण्यात घालवल्यानंतर जेसिका हॅलेट यांची दारूबद्दलची भीती इतकी वाढली की हीच दारू सोडायची वेळ आहे हे त्यांनी मनाशी पक्कं ठरवलं.
गेल्या 10 वर्षांपासून न पिता त्यांनी अगदी एक दिवसही घालवला नव्हता. पण 29 वर्षांच्या या तरुणीला तिला होणारा त्रास ओळखता आला. दारू सोडली नाही तर ख्रिसमसपर्यंतही आपण कदाचित जिवंत राहू शकणार नाही, असं त्यांना वाटलं.
'ड्रींकअवेअर' या दारू उद्योजकांसोबत काम करणाऱ्या एका सेवाभावी संस्थेनं काही नवीन आकडे प्रसिद्ध केलेत. त्यानुसार, वेल्समधल्या दारू पिणाऱ्या लोकांपैकी 89% लोक मद्यपानावर ताबा मिळवण्यासाठी निदान एक तरी मार्ग अवलंबवत आहेत.
त्यांच्या या आकडेवारीत 18 ते 34 या वयोगटातल्या मुलांचा अनेकदा ‘इटरमिटन्ट फास्टिंग’ सारखं ‘इटरमिटन्ट सोबरिटी’ पाळण्याचा कल वाढताना दिसतोय.
काही कालावधीसाठी दारू प्यायची नाही असं काही जण ठरवतात.
"मी स्वतःला फार दमवून घेत होते. दिवसातले अनेक तास मी काम करायचे. त्यानंतर घरी जाण्याऐवजी मी परत बाहेर दारू प्यायला जायचे,” जेस्सी म्हणाल्या.
हँगओव्हर घालवण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दारू प्यायला लागायची.
“अचानक अनेक आठवड्यांनंतर मी दारू न पिता एकही दिवस घालवला नसल्याचं माझ्या लक्षात आलं,” त्या पुढे सांगत होत्या.
कार्डिफमध्ये राहणाऱ्या जेस्सी यांनी तिथल्या जीवनशैलीप्रमाणे तरुण वयातच मित्र-मैत्रिणींसोबत दारू प्यायला सुरूवात केली. पण त्या हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात काम करायला लागल्या तेव्हा त्यांच्या पिण्याच्या सवयी बदलत असल्याचं त्यांना समजलं. त्यांचं काम संपल्यावर त्या रोजच बाहेर दारू पिण्यासाठी जाऊ लागल्या.
त्यानंतर आलेल्या कोविड 19 या साथरोगात तर त्यांचं पिणं अधिकच वाढलं.
“मी त्यावेळी नैराश्यातून जात होते. माझी मानसिक स्थिती अजिबात व्यवस्थित नव्हती,” जेस्सी पुढे म्हणाल्या.
“मला पॅनिक ॲटॅक येत होते, भीती शिगेला पोहोचली होती आणि ते सगळं झाकण्यासाठी ड्रग्स आणि दारू हा एकच पर्याय होता.”
2022 च्या 'बोजोले दिवसा'नंतर तर पाणी डोक्यावरून गेलं होतं.
'बोजोले नोव्हेंबर'मध्ये होणारा द्राक्ष्याची वाईन प्यायचा एक फ्रेंच समारंभ असतो. वेल्समध्ये तो फार प्रसिद्ध आहे.
त्या सांगतात, “मी सलग 18 तास दारू प्यायला लागले होते. संपूर्ण दिवस घराबाहेर काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता मी घरी परत जायचे.”.
“त्यावेळी दारूबद्दलची भीती आणि त्याचाही ताण मनात बसला. तेव्हा मला कळालं, मी दारू सोडली नाही तर कदाचित पुढचा ख्रिसमसही पाहू शकणार नाही.”
दुसऱ्या दिवशी हे सगळं त्यांनी त्यांच्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सांगितलं. त्यावेळी त्यांनी घेतलेला निर्णय किती योग्य असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
“माझ्या जवळच्या एकाही व्यक्तीनं त्यावर आढेवेढे घेतले नाहीत की काही प्रश्न विचारले नाहीत. मी दारू पिण्याच्या सवयीबद्दल काहीतरी केलं पाहिजे हे सगळ्यांनाच कळत होतं. ते सगळं धोक्याची घंटा वाजावी तसंच मला वाटत होतं,” त्या म्हणाल्या.
दारू संपूर्ण सोडल्यानंतर आता दोन वर्षांनी त्यांचंं आयुष्य पुर्णपणे बदलून गेलंय. “मी आत्ता जगत असलेल्या जगण्याचा मी कधी विचारच केला होता. दारू पित असताना माझं आरोग्य अजिबात व्यवस्थित नव्हतं,” जेसी सांगतात.
त्यांनी जवळपास 31 किलो वजन कमी केलंय. आठवड्यातून पाच ते सहा वेळा त्या व्यायामासाठी जीमला जातात. व्यायाम करणं हा जणू त्यांचा नवा छंदच झालाय. त्या दररोज सकाळी पाच वाजता उठतात.
“त्यामुळे माझं कामही अतिशय उत्तम पद्धतीनं चाललंय. दारू सोडल्यापासून माझं आजारी पडणंही कमी झालंय,” जेस्सी सांगतात.
जेस्सी एक सोशल मीडिया कंपनी चालवतात. त्यातले त्यांचे 90% क्लायंट्स हे दारूत बुडालेले असतात. तरीही त्यांना परत दारूची सवय लागलेली नाही.
“मी दारूच्या आसपास असते आणि तरीही दारूला माझ्यावर सत्ता गाजवू देत नाही. ही भावनाही मनात येते तेव्हा फार सबल झाल्यासारखं वाटतं,” त्या सांगतात.
समारंभात दारू न ठेवणं हे आता इंग्लंडमध्ये वाढत चाललंय. विशेषतः विद्यार्थ्यांच्या समारंभात हे खूप पाहायला मिळतं.
तसंच जेन झेड मधल्या ज्यांना दारू कमी करायची आहे पण सोडायची नाही त्यांच्यामध्ये ‘इटरमिटन्ट सोबरिटी’ जेन झेड नवा ट्रेन्ड होत चाललाय.
अब्रेरॉनचा 23 वर्षांचा क्रिस इव्हान्स यानं फॉर फार्डिफ या बिझनेस विकसित करायला मदत करणाऱ्या कंपनीसोबत मिळून ‘माय ड्रिंक, माय चॉईस’ ही मोहीम सुरू केली आहे.
संध्याकाळी दारू प्यायला जाण्याऐवजी आणखी काय करता येईल याबद्दल लोकांना सांगणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर दारू न पिण्याच्या निर्णयाकडे सगळ्यांनी नेहमीसारखं पहावं यासाठीही ही मोहीम प्रयत्न करेल.
“माझ्यासारख्या एका छोट्या शहरातून कार्डिफला येणाऱ्यांना अगदी सहजपणे दारू पिण्याची सवय लागते. विद्यापीठात शिकायला येईपर्यंत मी कधी फारशी दारू प्यायली नव्हती. पण इथं येऊन वाहावत जायला होतं,” क्रिस सांगतो.
क्रिस अजूनही पीत असला तरी लोकं न पिण्याचा निर्णय का घेतात हे त्याचा चांगलच कळतं.
“याआधी दारू न पिऊ शकणारे किंवा न पिण्याचा निर्णय घेतलेल्या आतंरराष्ट्रीय विद्यार्थ्यांबद्दल मी कधी विचारही करत नव्हतो,” तो म्हणाला.
दारू नसलेले समारंभ अशा मुलांसाठी लोकांना भेटण्याची, आत्मविश्वासाने वावरण्याची जागा असू शकतात असं त्याला वाटतं.
अतिरिक्त दारू पिण्याचे काय परिणाम होऊ शकतात हे तरुण मुलांना जास्त चांगल्या पद्धतीने कळतं असं कारमार्थेन्शीरच्या डॉ. वील मॅकीन्तोश यांना वाटतं.
"दारूचा विषय काढला की कुणालाही पटकन लिव्हर खराब होतं एवढंच आठवतं. पण ही नवीन पिढी दारूच्या इतर अनेक घातक गोष्टींविषयी माहिती ठेवून आहे,” असं ते म्हणतात.
लिव्हरचे विकार आयुष्याच्या खूप नंतरच्या टप्प्यावर होतात. पण धोकादायक परिस्थितीत जाणं आणि विचार न करता वागणं अशा लगेचच घडणाऱ्या गोष्टी तरूणांना दिसतात असं डॉ. मॅकीन्तोश पुढे सांगत होते.
दारू सोडायची आहे अशासांठी सोशल मीडियावर जा असा सल्ला जेसी देतात. तिथे तुम्हाला प्रेरित करतीय अशा लोकांना फॉलो करा, त्यांच्या पोस्ट्स तुमच्या फीडवर दिसू द्या.
“गेल्या दोन वर्षांपासून मी दारू न पिल्याचे दिवस मोजतेय. उद्या सकाळी उठल्यावर दिवस कसा असेल मला माहीत नसतं. पण मी दारूच्या नशेत नसेल हे मला नक्की माहीत असतं,” असं त्या सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)