तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
रशिया-युक्रेन संघर्ष : चेर्नोबिल आण्विक केंद्रावर ताबा मिळवण्याचा रशियाचा प्रयत्न, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता युक्रेनची राजधानी कीव्हमधून नागरिकांनी बाहेर पडायला सुरूवात केली आहे.
लाईव्ह कव्हरेज
वोलोदिमीर झेलेन्स्की : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ज्यांनी राजकारणासाठी कॉमेडी करणं सोडलं
युक्रेनच्या ज्या 2 प्रांतात संघर्ष सुरू झालाय ते नेमके कसे आहेत?
रशियन सैन्य राजधानी कीव्हमध्ये शिरण्याच्या टप्प्यावर - झेलेन्स्की
धन्यवाद मंडळी,
या लाईव्ह पेजमध्ये आपण इथंच थांबतोय, या पुढचे अपड्टेस LIVE पाहाण्यासाठी इथं क्लिक करा.
रशिया युक्रेन संघर्ष- आज दिवसभरात काय घडले?
रशियाने युक्रेनवर ‘आक्रमण’ केल्यानंतरजागतिक स्तरावर सातत्याने वेगवाग घडामोडी घडत आहेत. रशियाने असा दावा केला आहे की आज झालेल्या संघर्षात युक्रेनच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. युक्रेनने असा दावा केला आहे की रशियाचे 50 हून अधिक सैनिक या संघर्षात ठार झाले आहेत.
युक्रेनमध्ये विविध ठिकाणी 15,000 विद्यार्थी आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती काळजी घ्यावी अशी विनंती भारताने युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना केली आहे.
रशियाचं सैन्य चेर्नोबिल आण्विक केंद्राचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हे म्हणजे संपूर्ण युरोपवर लादलेलं युद्ध आहे, असं वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी केलं आहे.
युक्रेनची राजधानी क्यीव्हजवळ होस्टोमेल विमानतळ परिसरात लढाईदरम्यान एक रशियन हेलिकॉप्टर पाडण्यात आलं आहे.
संघर्षभूमीवर या सर्व घडामोडी घडत असताना मुत्सद्दी देखील विविध स्तरावर प्रयत्न करताना दिसत आहेत.
"सध्याच्या परिस्थितीत भारताच्या पाठिंब्याची आम्हाला गरज आहे. लोकशाही देशांच्या विरोधात साम्राज्यवादी शक्तींच्या आक्रमणाबाबत भारताने भूमिका घेणं गरजेचं आहे," असं युक्रेनचे भारतातील राजदूत ईगोर पोलिखा यांनी म्हटलं आहे. असे म्हणत त्यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की त्यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलावे.
आज दिवसभरात घडलेल्या घटना तुम्ही बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर विस्तृतपणे पाहू शकता.
आज दिवसभर बीबीसी मराठीने लाइव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ताज्या घडामोडी पोहोचवल्या. आजचे लाइव्ह पेज आम्ही थांबवत आहोत. युक्रेन रशिया संघर्षाबाबतचे व्हीडिओ पाहण्यासाठी बीबीसी मराठीच्या युट्युब चॅनेलला भेटद्या.
धन्यवाद.
मोदींनी युक्रेनविषयी ‘ही’ भूमिका का घेतली आहे? | सोपी गोष्ट 542
रशिया युक्रेन वाद: ‘हे’ देश अमेरिका नाही तर रशियाच्या बाजूने आहेत
युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय, परिस्थितीशी निपटण्यासाठी भारताची मोहीम
युक्रेनमध्ये सुमारे 20 हजार भारतीय नागरीक आहेत. परिस्थितीशी निपटण्यासाठी भारताची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान आवश्यक ते निर्णय घेण्यात येत आहेत, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिली.
युक्रेनमध्ये घडामोडी वेगाने घडत आहेत. या परिस्थितीशी निपटण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. तिथं राहत असलेल्या भारतीयांची नोंद घेण्याचं काम सध्या सुरू आहे. हे काम एका महिन्यापूर्वीच सुरू करण्यात आलं होतं.
ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय राहत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांत 4 हजार भारतीयांना युक्रेन सोडलं आहे.
दिल्ली येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात 980 कॉल आणि 850 ई-मेल प्राप्त झाले आहेत. पुढील दिवसांतही युक्रेनमधील भारताचं काम सुरू राहील, असं श्रृंगला यांनी सांगितलं.
रशियाचं हेलिकॉप्टर युक्रेनने पाडलं
युक्रेनची राजधानी क्यीव्हजवळ होस्टोमेल विमानतळ परिसरात लढाईदरम्यान एक रशियन हेलिकॉप्टर पाडण्यात आलं आहे. बीबीसीने या घटनेची पडताळणी केली असून ही बातमी खरी असल्याचं निदर्शनास आलं आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार युक्रेनचे कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल वालेरी जालुजेनी यांनी याबाबत माहिती दिली.
युक्रेनच्या क्यीव्ह परिसरात विमानतळावर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियन सैन्य हे युक्रेनच्या सैन्याविरुद्ध लढत आहे. होस्टोमेल युक्रेनचं सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ आहे. हे जगातील सर्वात मोठं मालवाहू विमानतळ असल्याचं मानलं जातं.
युक्रेन विरुद्ध रशिया : कुणाची किती ताकद?
युक्रेन आणि रशिया या देशांची लष्करी ताकद नेमकी किती आहे?
चेर्नोबिल आण्विक केंद्रावर ताबा मिळवण्याचा रशियाचा प्रयत्न, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप
रशियाचं सैन्य चेर्नोबिल आण्विक केंद्राचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हे म्हणजे संपूर्ण युरोपवर लादलेलं युद्ध आहे, असं वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी केलं आहे.
याबाबत ट्विट करताना झेलेंस्की म्हणाले, "रशियन सैन्य चेर्नोबिलवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा 1986 च्या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आमचे सैनिक जीवाची बाजी लावत आहेत. आम्ही यासंदर्भात स्वीडनच्या पंतप्रधानांना सूचना दिली आहे. हे संपूर्ण युरोपवर लादलेलं युद्ध आहे."
गुरुवारी सकाळपासूनच रशियाने युक्रेनविरुद्ध हल्ल्याला सुरुवात केली होती. युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली. काही परिसरांमध्ये रशिया आणि युक्रेनच्या सैन्यात थेट लढाई होत आहे.
सोव्हिएत रशियाच्या काळात 1986 साली चेर्नोबिलमध्ये मानवी इतिहासातला सर्वात मोठा आण्विक अपघात झाला होता. 26 एप्रिल 1986 रोजी चेर्नोबिलमध्ये एका आण्विक रिअॅक्टरमध्ये स्फोट झाल्यानंतर धोकादायक रेडिओअॅक्टिव्ह वायू संपूर्ण परिसरात पसरला होता.
या अपघातानंतर हजारो नागरिकांना कॅन्सरची लागण झाली. एक मोठा परिसर यामुळे निर्मनुष्य बनला. या घटनेनंतर चेर्नोबिल आण्विक केंद्राच्या आजूबाजूच्या 2600 चौरस किमी परिसरात लोकांच्या येण्या-जाण्यावर बंदी घालण्यात आली होती.
भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा, युक्रेनच्या राजदूतांची मोदींना विनंती
सध्याच्या परिस्थितीत भारताच्या पाठिंब्याची आम्हाला गरज आहे. लोकशाही देशांच्या विरोधात साम्राज्यवादी शक्तींच्या आक्रमणाबाबत भारताने भूमिका घेणं गरजेचं आहे, असं युक्रेनचे भारतातील राजदूत ईगोर पोलिखा यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले, " पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील शक्तिशाली नेत्यांपैकी एक आहेत. पुतीन हे जगभरातील कोणत्या नेत्यांचं ऐकतील हे मला माहीत नाही. पण मोदींची प्रतिमा लक्षात घेता पुतीन त्यांच्या म्हणण्याबाबत नक्की विचार करतील. भारताकडून युक्रेनला पाठिंबा मिळावा, अशी आमची अपेक्षा आहे."
'घाबरू नको, सारं काही ठीक होईल!'
कीव्हमधल्या मेट्रो स्टेशनवरचं एक जोडपं... कदाचित एकमेकांना धीर देताना... रशियाने युक्रेनवर 'हल्ला' केल्यानंतर आता राजधानी #Kiev मधून नागरीक बाहेर पडायला सुरुवात झालीय.
रशिया-युक्रेन संघर्ष : 'बॉम्ब शेल्टर शोधण्यासाठी गुगल मॅपची मदत घ्या', भारतीय दुतावासाचे निर्देश
बॉम्ब शेल्टर शोधण्यासाठी गुगल मॅपची मदत घ्या, अशी सूचना युक्रेनमधील भारतीय दूतावासाने दिली आहे. भारतीय दूतावासाने युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठीगुरुवारी (24 फेब्रुवारी) तिसरे दिशानिर्देश जाहीर केले. नागरिकांनी जिथं आहे, तिथेच आश्रय घ्यावा, असं यामध्ये सांगण्यात आलं आहे.
दिशानिर्देशांत काय म्हटलं?
- जसं की आपल्याला माहिती आहे, युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दळणवळणावर परिणाम झाला आहे.
- क्यीव्हमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी मोहिम सुरू करण्यात आली आहे. मंत्रालय सरकारी संस्थांच्या संपर्कात आहे.
- तुम्ही अडचणीत असाल तर गूगल मॅपवर जवळच्या बॉम्ब शेल्टरची लिस्ट आहे. हे शेल्टर जमिनीच्या खाली बनवण्यात आले आहेत. मॅपच्या मदतीने शेल्टरचा शोध घेऊन आश्रय घ्यावा.
- खूपच जास्त आवश्यकता नसेल तर आपलं राहतं घर सोडू नका. आपली कागदपत्रे नेहमी आपल्या जवळ ठेवा.
रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान दोन्ही देशांकडून वेगवेगळे दावे
रशियन सैन्याने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईसंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये त्यांच्याकडून अनेक दावे करण्यात आले आहेत. युक्रेनमधील कारवाई ही दॉनबस परिसरातील फुटीरतावादी क्षेत्राच्या संरक्षणासाठी करण्यात आल्याचा पुनरुच्चार या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
या परिसरात युक्रेनच्या सैन्याकडून हल्ला करण्यात आल्याचं रशियाने म्हटलं आहे. हल्ल्यात फक्त सैनिकी ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे. ज्या ठिकाणी उच्च क्षमतेचे शस्त्र वापरण्यात येत आहेत, तिथंच आपण हल्ला करत आहोत, असंही रशियाने म्हटलं.
दरम्यान, युक्रेननेही या प्रकरणात काही दावे केले आहेत. युक्रेनच्या म्हणण्यानुसार त्यांनी 50 सैनिकांना ठार केलं. तसंच काही रशियन जेट लढाऊ विमानांचा पाडाव केल्याचंही युक्रेनने म्हटलं. याशिवाय, ज्या नागरिकांना शस्त्र हाती घ्यायचं आहे, त्यांना शस्त्र दिलं जाईल, असंही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे.
युक्रेन लष्कराचे विमान कोसळले, 5 सैनिक ठार
युक्रेनच्या लष्कराचे विमान कीव्ह भागात कोसळले आहे. या विमानात एकूण 14 जण होते त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त युक्रेनच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने दिले आहे.
रशियाची 'लष्करी कारवाई' हा हल्ला नाही - चीन
युक्रेनवर रशियाने केलेली लष्करी कारवाई हा काय हल्ला नाही, असं मत चीनने नोंदवलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी रशिया-युक्रेन प्रकरणावर आपली बाजू स्पष्ट केली. युक्रेनचा मुद्दा खूपच जटील आहे. त्याची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या संघर्षाला अनेक बाजू आहेत, असं चुनयिंग म्हणाले.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत चुनयिंग यांनी म्हटलं, "चीन आणि पाश्चात्य देशांच्या नागरिकांमध्ये हाच फरक आहे. आम्ही कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यास घाई करत नाही."दरम्यान, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोफ यांच्याशी बातचीत केली. चीन नेहमीच सर्व देशांच्या अखंडता आणि संप्रभुतेचा सन्मान करतो, असं ते म्हणाले.
रशियाने क्रायमियावर असा ताबा मिळवला होता, वाचा संपूर्ण गोष्ट
रशियाकडून 'ऑलिंपिक ट्रूस' उल्लंघन - IOC
रशियानं युक्रेनवर हल्ला करून 'ऑलिंपिक ट्रूस'चं उल्लंघन केलं असल्याची प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं (IOC) दिली आहे.
ऑलिंपिक ट्रूस म्हणजे ऑलिंपिकच्या काळातला युद्धविराम. प्राचीन काळी ग्रीसमधली युद्धविरामाची ही प्रथा IOC नं 1992 पासून पुन्हा लागू केली असून त्याला संयुक्त राष्ट्रांचाही पाठिंबा मिळतो.
बीजिंगमधल्या विंटर ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांनी ऑलिंपिक युद्धविरामाचा ठराव मान्य केला होता. त्यानुसार ऑलिंपिकच्या सात दिवस आधी आणि पॅरालिंपिकसंपल्यावर सात दिवस पूर्ण होईलपर्यंत युद्ध न करण्याचं सर्व देशांनी मान्य केलं होतं.