साडी नेसून अनवाणी धावणाऱ्या कविता देवींचं स्वप्न अपूर्णच राहिलं
होमगार्ड भरतीसाठी कोचिंग सेंटरच्या फ्री ट्रायलमध्ये साडी नेसून अनवाणी धावल्यामुळे व्हायरल झालेल्या कविता देवी पुन्हा एकदा चर्चेत आल्यात.
त्यांच्या शारीरिक चाचणीचा निकाल जाहीर झालाय. झारखंडच्या रामगढमध्ये 25 ऑक्टोबरला झालेल्या चाचणीत त्यांनी 1600 मीटरची शर्यत सहज पूर्ण केली. मात्र हाय जंपचा अडथळा पार करता आला नाही.
4 ऑक्टोबरला कविता यांचा साडी नेसून अनवाणी धावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अंकित यांनी त्यांना ट्रॅकसूट आणि बूट दिले. पाच वर्षांच्या आजारानंतर 2023 मध्ये पतीचं निधन झालं. उपचारासाठी घेतलेल्या कर्जामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडलं. सासू-सासरे आणि मुलगा-मुलीची जबाबदारी कविता यांच्यावर आली.
कुटुंब चालवण्यासाठी त्या कधी वीटभट्टीवर तर कधी शेतात मजुरी करतात. मात्र होमगार्ड भरतीच्या घोषणेनं त्यांच्या डोळ्यांत नवी आशा निर्माण केली होती. कविता यांचा संघर्ष अशा कोट्यवधी महिलांच्या आयुष्याचं जिवंत चित्र आहे, ज्या प्रतिकूल परिस्थितीच्या चक्रव्यूहात अडकूनही हार मानत नाहीत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



