तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
मनीषा भानवाला विश्वविजेती, सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू
कझाकस्तानच्या अस्ताना येथे शुक्रवारी मनीषा भानवालानं नवा इतिहास घडवला आहे. ती वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.
29 वर्षीय मनिषानं 59 किलो वजनी गटाच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात दमदार पुनरागमन करत अमेरिकेच्या अबीगेल नेटचा 8-6 असा पराभव केला.
मनीषानं ऑलिम्पिकेतर वजनी गटातील आपल्या मोहिमेची सुरुवात प्री-क्वार्टर फायनलमध्ये कॅनडाच्या लॉरेन्स ब्युरेगार्ड हिला 'विक्ट्री बाय फॉल'च्या माध्यमातून हरवून केली.
क्वार्टर फायनलमध्ये भारतीय कुस्तीपटूनं मंगोलियाच्या बोलोरतुइया खुरेलखू हिला 6-0 ने पराभूत केलं.
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, त्यानंतर उपांत्य फेरीत हरियाणातील या कुस्तीपटूने स्थानिक खेळाडू अल्टिन शगायेवा हिला तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
या प्रतिष्ठित स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी मनीषा ही दुसरी भारतीय कुस्तीपटू ठरली आहे. तिच्यापूर्वी सुशील कुमारनं 2010 मध्ये मॉस्को येथे 66 किलो वजनी गटात ही कामगिरी केली होती.
सध्याच्या स्पर्धेत मनीषा महिला कुस्तीमध्ये पदक जिंकणारी चौथी भारतीय खेळाडू आहे. तिच्याआधी नीलम सिरोही (रौप्य, 50 किलो), काजल ढोचक (रौप्य, 76 किलो) आणि तनु शर्मा (कांस्य, 72 किलो) यांनी पदके जिंकली आहेत.
मनीषाचं शानदार पुनरागमन
सुरुवातीला प्रतिस्पर्धी कुस्तीपटूच्या दमदार कामगिरीविरुद्ध मनीषानं चांगला प्रतिकार केला.
पराभव स्वीकारण्याऐवजी मनीषानं सामन्यात पुनरागमन करण्यासाठी पूर्ण ताकद लावली.
दुसऱ्या पीरियडमध्ये नव्या जोमानं आणि दृढनिश्चयानं मॅटवर उतरलेल्या मनीषानं उत्कृष्ट खेळी करत सामन्याचे चित्रच पालटलं आणि सलग सात गुण मिळवले.
नेटनं पुन्हा एकदा मनीषाच्या पायांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता, मनिषानं चपळाई दाखवत तिच्या मागे पोहोचून टेकडाउन केला.
अमेरिकन संघानं या निर्णयाला आव्हान दिले. त्यांचा युक्तिवाद असा होता की पंचांनी सामना थांबवण्यासाठी आधीच शिट्टी वाजवली होती.
मात्र, अमेरिकन संघाचे आव्हान फेटाळण्यात आले आणि मनीषाला एक अतिरिक्त गुण मिळाला.
त्यानंतर नेटला पार टेरे स्थितीत ठेवण्यात आले. मनीषानं या संधीचा पुरेपूर फायदा घेत गट रिंच तंत्राच्या साहाय्याने गुण मिळवत स्कोअर 6-6 असा बरोबरीत आणला.
गुणसंख्या बरोबरीत असूनही निकषांच्या आधारे अमेरिकन कुस्तीपटूकडे आघाडी होती, पण आता सामन्यावरील नियंत्रण मनीषाकडे आले होते.
तिने आणखी एक अप्रतिम डाव टाकत दोन गुण मिळवले आणि स्कोअर 8-6 असा केला.
सामना संपण्यासाठी केवळ 27 सेकंद शिल्लक होते. या काळात थकलेल्या नेटविरुद्ध मनीषानं संपूर्ण ताकदीनिशी बचाव करत आपली आघाडी कायम राखली.
अंतिम सायरन वाजताच जे आजवर कोणत्याही भारतीय महिला कुस्तीपटूला जमले नव्हते ते तिनं करुन दाखवलं. भारतीय कुस्तीला तिची पहिली महिला विश्वविजेती मिळाली होती. आनंदानं भारावलेल्या मनीषानं उड्या मारत जल्लोष केला, मॅटसमोर नतमस्तक होत त्याचे चुंबन घेतले.
तिच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय यशाचा साक्षीदार तो मॅट ठरला होता.
वडिलांनीच कुस्तीत पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले
मनीषा हरियाणातील जींद जिल्ह्यातील सीवा गावची रहिवासी आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मनिषाच्या कुटुंबात तिची आई, मोठी बहीण आणि एक भाऊ आहेत. तिच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले.
रोहतकमधील छोटूराम स्टेडियममध्ये तिचे प्रशिक्षक मनदीप सैनी यांनी बीबीसीच्या शिवांगी जायसवाल यांना सांगितले की, मनीषा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी रवाना होत असताना विमानात बसण्याच्या अवघ्या दोन तास आधी तिचे वडील सुरेश यांचे निधन झालं होतं.
या मोठ्या दु:खातही मनीषानं स्पर्धा पूर्ण केली. त्या वर्षी तिने कांस्यपदक जिंकले होते.
गेल्या आठ वर्षांपासून मनीषाला प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक मनदीप सांगतात की, मनीषानं आशियाई वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत तीन कांस्य आणि एक सुवर्णपदक जिंकले आहे.
ती 2022 पासून सलग ही स्पर्धा खेळत होती आणि 2025 मध्ये तिने त्यात सुवर्णपदक जिंकले.
29 वर्षीय मनीषा 2012 पासून रोहतक येथे येऊन कुस्तीचे धडे घेऊ लागली होती. प्रशिक्षक मनदीप यांच्या मते, तिच्या वडिलांनीच तिला कुस्तीत पुढे जाण्यास प्रोत्साहन दिलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)