फटाक्यात काय असतं? फटाका नेमका कसा फुटतो?

संग्रहित छायाचित्र
फोटो कॅप्शन, संग्रहित छायाचित्र
    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

मुंबई महानगर पालिकेनी फटाक्याबाबतच्या जनजागृतीची मोहीम सुरू केली आहे त्यावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या एक्स हँडलवरुन दिया मिर्झाचा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला होता.

पण भाजपच्या टीकेनंतर हा व्हीडिओ आता डिलिट झालाय.

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ट्वीट करत म्हटलं की दिवाळी कशी साजरी करायची याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून नको आहेत. आमच्या परंपरा आमच्या संस्कृतीत रुजलेल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत विविध सेलिब्रिटींनी केलेली आवाहनं पाहायला मिळतात. यात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी मनाई असल्याचं लिहिलंय आणि सोबतच सेलिब्रिटींनी केलेले आवाहनांचे व्हीडिओ आहेत.

दिया मिर्झा
फोटो कॅप्शन, दिया मिर्झा

दिया मिर्झाचा व्हीडिओ 1 नोव्हेंबरला पोस्ट करण्यात आला होता, पण तो आता डिलीट केला गेलाय. यापूर्वी अभिनेत्री माधुरी दीक्षित, निशिगंधा वाड, क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनी अशीच आवाहनं केली आहेत, त्याचे व्हीडिओ मात्र अजूनही MyBMC X हँडलवर शाबूत आहेत.

दरम्यान, फटाके म्हणजे काय, ते फुटण्याची वैज्ञानिक प्रक्रिया काय असते याचे कुतूहल वाचकांकडून वेळोवेळी व्यक्त होताना दिसते. त्यामुळे बीबीसी मराठीकडून या बाबतची वैज्ञानिक माहिती या लेखात देत आहोत.

कागदात गुंडाळलेल्या एका इतक्या लहानशा गोष्टीमुळे इतका मोठा धमाका आणि मोठा फ्लॅश कसा होतो? तोही काही सेकंदांमध्ये? आणि या लहान फटाक्यात असं काय असतं, ज्यामुळे प्रदूषण होतं, तब्येतीवर परिणाम होतो?

शास्त्रीय भाषेत सांगायचं तर आपला हा फटाका एक लहान Pyrotechnic Device आहे.

याचा अर्थ - pyro म्हणजे आग आणि टेक्निक म्हणजे तंत्रज्ञान.

फुलबाजी

एक अशी गोष्ट, ज्यात विशिष्ट रसायनं आहेत आणि याला पेटवल्यावर त्यातून प्रकाश, आवाज, धूर, उष्णता, ठिणग्या किंवा हालचाल असे परिणाम घडतात.

फटाक्यात काय असतं?

या फटाक्यात असं काय असतं? कागद उघडल्यावर यातून येते काळी-राखाडी पूड म्हणजेच दारू. यामध्ये काय असतं?

इंधन (Fuel) - म्हणजे कोळसा आणि सल्फर, जे जळतं.

ऑक्सिडायझर (Oxidizer) - ही एक अशी गोष्ट असते ज्यातून इंधनाला जळण्यासाठी ऑक्सिजन मिळतो. म्हणजे इतर वेळी आग लागते तेव्हा वातावरणातला ऑक्सिजन त्या आगीला चेतना देतो. पण इथे यात ऑक्सिजन आधीपासून असतो. तो मिळतो पोटॅशियम नायट्रेट (Potassium Nitrate) मधून यामुळे होतं काय, या अशा घट्ट आवरणामध्ये असूनही हा फटाका पटकन जळतो.

आवरण (Casing) - घट्ट गुंडाळलेला कागद किंवा कधीकधी पुठ्ठा. यामुळे दाब निर्माण होतो.

फटाक्याची रासायनिक प्रक्रिया

या सगळ्यामुळे होणारी रासायनिक प्रक्रिया कशी असते? ही वात पेटवली की ती ठिणगी या मुख्य घटकांपर्यंत पोहोचते.

ज्वालाग्राही पदार्थ - चारकोल आणि सल्फरला पोटॅशियम नायट्रेटमुळे ऑक्सिजन मिळतो आणि रासायनिक प्रक्रिया होते. त्यातून मोठी उष्णता आणि मोठ्या प्रमाणात गरम वायू बाहेर पडतो. म्हणजे ज्वलनाची (Combustion) प्रक्रिया होते.

पण या सगळ्या गोष्टी या घट्ट बसवलेल्या आवरणाच्या आत होत असतात. आतमध्ये तयार झालेल्या गरम गॅसमुळे दाब कमी वेळात पटकन वाढतो. प्रेशर वाढलं की हे आवरण फुटतं. गॅस अचानक बाहेर पडतो आणि त्यामुळे त्या तीव्र दाबाच्या लहरी - Pressure Waves तयार होतात.

आणि आपल्याला धमाका ऐकू येतो. जळणाऱ्या कणांमुळे आणि गॅसेसमुळे प्रखर उजेड दिसतो.

फुलबाजी

फटाका फुटल्यानंतर वेगवेगळे रंग का दिसतात?

या फटाक्यांमध्ये वेगवेगळी धातूंची संयुगं (Metal Compounds) वापरली की वेगवेगळे रंग तयार होतात.

त्यामध्ये अ‍ॅल्युमिनियम - पांढरा, चंदेरी, तांब्याचं संयुग - निळा, कॅल्शियम संयुग - नारिंगी, बेरियम संयुग - हिरवा, स्ट्रोनियम संयुग - लाल अशा वेगवेगळ्या संयुगांचा समावेश असतो.

फटाके

फटाक्यांमुळे प्रदूषण का होतं?

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पण ज्या केमिस्ट्रीमुळे फटाक्यातून मोठा आवाज येतो, रंग आणि प्रकाश निर्माण होतो, त्यामुळेच ध्वनी, हवा, माती आणि पाण्याचं प्रदूषण होतं.

आपण फटाके लावतो तेव्हा त्यातून अगदी बारीक, खरखरीत सूक्ष्मकण वातावरणात फेकले जातात. यात PM 2.5, PM 10 चा समावेश असतो. शिवाय फटाक्याच्या दारूतून शिसं, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर वायू हवेत सोडले जातात. धातू असणारा धूर आणि धूलिकण उत्सर्जित होतात.

म्हणूनच फटाके लावल्यानंतर Air Quality म्हणजेच हवेचा दर्जा लगेच खराब होतो. दाटीवाटीची वस्ती असणाऱ्या भागात, वारा नसलेल्या ठिकाणी हे प्रदूषण कोंडून राहतं. श्वासाद्वारे हे विषारी कण शरीरात गेले तर ते फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतात. शिवाय फटाक्याच्या धुराचा डोळ्यांना, नाक-तोंडाला, श्वसनमार्गाला त्रास होतो. झोंबल्यासारखं होतं.

शिवाय फटाका फुटल्यानंतर जमिनीवर Residue म्हणजे काही गोष्टी शिल्लक राहतातच. त्या मातीत मिसळतात. तुम्ही फटाके नदी, तलावाजवळ, समुद्रकिनाऱ्यापाशी लावलेत तर मग ही रसायनं पाण्यात मिसळतात.

शिवाय फटाका लावल्यानंतर कानठळ्या बसवणारा आवाज होतो.

गेल्या काही वर्षांमध्ये फटाक्यांमुळे होणाऱ्या आवाजाची पातळी 125 डेसिबल मर्यादेच्या आतली असली तरी त्यातल्या विषारी घटकांचं, विषारी वायू उत्सर्जनाचं प्रमाण कमी झालेलं नसल्याचं ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्या सुमैरा अब्दुलाली यांनी म्हटलंय.

फटाक्यांवर न्यायालयांचे निर्बंध

फटाक्यांमुळे होणाऱ्या या ध्वनी आणि पर्यावरण प्रदूषणाची मुंबई हायकोर्टाने स्वतःहून दखल घेत राज्यात सार्वजनिक ठिकाणी, फुटपाथ, रस्ते, गल्ल्यांमध्ये फटाके वाजवण्यावर पूर्ण बंदी घातलीय.

तर रात्री 10 ते सकाळी 6 या वेळात आवाज करणारे फटाके वाजवण्यावर बंदी आहे.

राजधानी दिल्लीमध्ये फटाक्यांवरच्या बंदीबाबतच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानेही फटाक्यांबद्दल म्हटलंय. आपण फटाक्यांवर पूर्ण बंदी घालत नसलो, तरी आम्हाला कठोर पावलं उचलण्यासाठी भाग पाडू नका, असं सुप्रीम कोर्टाने प्रशासकीय यंत्रणांना सांगितलंय.

फटाक्यांच्या वापराचं नियमन करा, फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यासाठीची जनजागृती करण्यासाठी विराट कोहलीसारख्या सेलिब्रिटीजची मदत घ्या, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.

याचाच अर्थ असा की फटाका पेटवल्यानंतर तो क्षणात फुटतो... पण परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.