शेजाऱ्यांबरोबर सुट्टीवर गेले, परतल्यावर बदलले जोडीदार; फॅमिली स्वॅप'चा मुलांवर परिणाम

फोटो स्रोत, Rachel Stone
- Author, एमिली डौटी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
आई-वडिलांनी आपल्या कुटुंबाला शेजारी राहणाऱ्या कुटुंबासोबत वेल्समध्ये कॅरव्हॅनमधून सुट्टीसाठी नेलं तेव्हा रेचल स्टोन पाच वर्षांची आणि तिचा भाऊ इयान 10 वर्षांचा होता.
त्यांनी दोन आठवडे एकत्र मजेत घालवले. पण घरी परतल्यानंतर दोन्ही कुटुंबं अक्षरशः दोन भागांत विभागली गेली आणि त्यांनी एकमेकांची घरं बदलून घेतली.
रेचल आणि तिची आई के (Kay) शेजारी एडी (Eddie) आणि त्याची मुलगी अॅलिसन (Alison) यांच्यासोबत राहायला गेल्या.
एडीची पत्नी आयरीन (Irene) आणि त्यांची मुलगी डॉन (Dawn) रेचलचे वडील रेक्स (Rex) आणि तिचा भाऊ इयान यांच्यासोबत राहायला गेल्या.
रेचलने रेडिओ 4 च्या लाइफ चेंजिंग (Life Changing) पॉडकास्टच्या सूत्रसंचालक डॉ. सियन विल्यम्स यांच्याशी बोलताना, तिचं कुटुंब तुटल्याने झालेला आघात, त्यानंतर निर्माण झालेला गोंधळ आणि अखेरीस तिनं आपल्या आई-वडिलांना कसं माफ केलं, याबद्दल सांगितलं.
नवीन कुटुंब शेजारी राहायला आलं तेव्हा रेचल आणि इयान खूप खुश झाले होते.

फोटो स्रोत, Rachel Stone
"आमचं चौघांशी लगेच जुळलं."
एकत्र सुट्टीला जाणार असल्यामुळे ते खूप उत्साहित होते.
आजही दोन कॅरव्हॅन एकमेकांच्या शेजारी उभे असल्याची आणि स्नोडन पर्वतावर गेलेली सहज रेचलला आजही नीट आठवते.
पण घरी परतण्याची वेळ आली तेव्हा सगळंच गोंधळलेलं होतं. लोक चुकीच्या गाड्यांमध्ये बसत होते.
रेचल सांगते तिची आई समोरील सीटवरून मागे वळली आणि म्हणाली. "आता आपलं नवीन कुटुंब असणार आहे. आपण एडी आणि अॅलिसनसोबत नंबर 8 मध्ये राहणार आहोत. अॅलिसन तुझी नवीन बहीण असणार आहे.
आणि तुझे बाबा आणि तुझा भाऊ अजूनही नंबर 10 मध्ये राहतील. आयरीन काकू आणि डॉन तिथे राहायला जातील. आणि डॉन तुझ्या भावाची नवीन बहीण असेल."
हे ऐकताच रेचलला "प्रचंड घाबरल्यासारखं, अस्वस्थ आणि दुःखी" वाटलं आणि ती रडू लागली.
गाडी पुढे जात असताना तिला "काय चाललंय हेच समजत नव्हतं, पण थोडी उत्सुकताही होती". तिला अॅलिसन आवडत होती आणि तिला नेहमीच एक बहीण हवी होती.
त्या रात्री अॅलिसनने तिला तिच्या वरच्या बंक बेडवर झोपू दिलं. दुसऱ्या दिवशी मोठ्यांनी आयल ऑफ शेपी इथं असलेल्या दोन्ही घरांमधील सामानाची अदलाबदल केली.

फोटो स्रोत, Rachel Stone
रेचल सांगते की ती पूर्णपणे गोंधळून गेली होती.
"तुमच्या मनात नकळत असं येत राहतं की कदाचित ही तुमचीच चूक असेल."
आता ती ज्या नंबर 8 च्या घरात राहू लागली होती, तिथलं आयुष्य नंबर 10 मधल्या जुन्या घरापेक्षा खूप वेगळं होतं. तिचं जुनं घर स्वच्छ होतं, तर या घरात "कुत्र्याचे केस, तेलकट वस्तू, कारशी संबंधित सामान" सगळीकडे पडलेलं असायचं.
ती तिच्या आईचं वर्णन "कडक पण न्याय्य" आणि अत्यंत व्यावहारिक व्यक्ती म्हणून करते.
तिचे सावत्र वडील एडी "माझ्याशी कधी वाईट वागत नसत, पण मी त्यांना कधी बाबा म्हटलं नाही. मी त्यांची मुलगी नव्हते."
तिला तिच्या भावाची, इयानची, खूप आठवण यायची.
"मला त्याचा खूप अभिमान वाटायचा. तो माझा मोठा भाऊ होता.
मी लहान असताना तो शाळेतून घरी यायचा, तेव्हा मी पुढच्या बागेत उभी राहून त्याची वाट पाहायचे."
न्यायालय, घटस्फोट आणि नवीन विवाह
रेचल सात वर्षांची असताना दोन्ही जोडपी एकत्र न्यायालयात गेली आणि त्यांनी घटस्फोट घेतला.
नंतर त्यांनी आपापल्या नवीन जोडीदारांसोबत साध्या नोंदणी कार्यालयातील समारंभात लग्न केलं.
आपल्या वडिलांनी आयरीनशी लग्न केलं आहे, हे सुद्धा रेचलला माहित नव्हतं. तिनं लग्नाचा फोटो पाहिल्यावर तिला कळलं.

फोटो स्रोत, Rachel Stone
ती सुमारे 11 किंवा 12 वर्षांची असताना तिच्या जुन्या घरी जाणं कमी झालं. तिला तिच्या वडिलांना भेटायला जाणं कठीण वाटायचं आणि तिचं आयरीनशीही फारसं पटत नव्हतं.
दरम्यान, तिची आई के आणि एडी यांच्यासोबतचं आयुष्य मात्र गोंधळलेलं होतं.
"[एडी] खूप मालकी हक्क गाजवणारे आणि नियंत्रित करणारे होते. मी 13 वर्षांची झाल्यावर आई म्हणाली, 'हे असं चालू शकत नाही. आपण अशा प्रकारे राहू शकत नाही.'"
शिक्षण हा आधार
रेचलसाठी शाळा म्हणजे एक प्रकारची 'सुटका' होती.
तिला चांगले गुण मिळाले आणि ती पुढं शिक्षिका झाली.
तिने लग्न केलं, तिला दोन मुलं झाली. मात्र सध्या ती विभक्त राहते आणि व्यवसाय प्रशिक्षक (बिझनेस कोच) म्हणून काम करते.
तिच्या आयुष्यभर तिची आई या कुटुंबबदलाच्या घटनेबद्दल कधीच बोलली नाही.
"मी खूप प्रश्न विचारले. पण आई फक्त एवढंच म्हणायची की हे सगळं खूप गुंतागुंतीचं होतं."
आईची कबुली
अनेक दशकांनंतर स्वतःच्या मुलांसोबत सुट्टीवर असताना रेचलनं पुन्हा एकदा आईला त्याबद्दल विचारलं.
"मी आईला म्हटलं, 'जोसेफ आता 10 वर्षांचा झाला आहे... आणि इयान 10 वर्षांचा होता, जेव्हा तुम्ही त्याला बाबा आणि आयरीनसोबत राहायला जाऊ दिलंत.'"
रेचल सांगते की हे ऐकून तिची आई "अपराधीपणानं आणि संकोचानं पूर्णपणे कोसळून गेली होती... तिच्या स्वार्थी निर्णयांबद्दल तिला प्रचंड पश्चात्ताप होता."

फोटो स्रोत, Rachel Stone
"अनेक वर्षांनी आईनं मला ते शब्दही सांगितले जे मी आयुष्यभर ऐकण्याची वाट पाहत होते. ती म्हणाली, 'मला खूप वाईट वाटतं की मी तुला निराश केलं. आणि मला ते भरून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे.'"
रेचल सांगते की या क्षणापासून तिचं आणि तिच्या आईचं नातं पुन्हा नव्यानं उभं राहू लागलं आणि आज त्यांचं नातं "अतिशय सुंदर" आहे.
वडिलांबद्दलची भावना
मात्र वडिलांसोबत तिचं कधीच जवळचं नातं निर्माण झालं नाही.
"त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांच्यासमोर पत्नी आणि मुलं यांच्यापैकी एकाची निवड करण्याचा प्रश्न होता. दुर्दैवानं, माझ्याऐवजी त्यांनी पत्नीची निवड केली."
त्यांचे वडील आणि आयरीन त्यांच्या मृत्यूपर्यंत एकत्र राहिले. त्यांचं निधन 81 व्या वर्षी झालं.
पण वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी बोलताना मात्र रेचलला वाटलं की, माफी मागायची असेल तर ती तिनंच मागायला हवी.
"माझ्यापासून हिरावून घेतलेल्या एका परिपूर्ण वडिलांची प्रतिमा मी मनात उभी केली होती. मी त्यांच्याबाबत अशा व्यक्तीची कल्पना केली होती जी प्रत्येक गोष्ट उत्तम प्रकारे करू शकेल, माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकेल.
मला ते खरोखर तसेच असावेत असं वाटायचं. पण कालांतराने मला जाणवलं की लोकांनी ते जसे आहेत तसे स्वीकारायला हवं.
माझ्या मते, आई-वडील त्यांच्या परीनं सर्वोत्तम प्रयत्न करत असतात. ते परिपूर्ण नसतात. त्यामुळे ते जसे नाहीत, तसं असण्याची अपेक्षा आपण त्यांच्याकडून करू शकत नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)





















