पोलीस ठाण्यात महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप, तीन पोलीस कर्मचारी अटकेत; 12 जण निलंबित

फोटो स्रोत, Sartaj Alam
- Author, मोहम्मद सरताज आलम
- Role, बीबीसी न्यूज हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
झारखंडमधील सरायकेला जिल्ह्यातील गम्हरिया पोलीस ठाण्याच्या आवारात एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वायरलेस ऑपरेटर आहे. त्याच्यासह या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज स्वर्गियारी यांनी या कारवाईबद्दल बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना म्हटलं की, या प्रकरणी एकूण 15 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
त्यांनी पुढं म्हटलं की, "कर्तव्य बजावताना गंभीर निष्काळजीपणा, दिरंगाई आणि शिस्तभंग केल्याच्या आरोपाखाली 12 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे."
पतीसोबत काही कारणावरून वाद झाल्यानंतर मदत मागण्यासाठी संबंधित महिला गम्हरिया पोलीस ठाण्यात आली होती. तिला ज्या खोलीत थांबविण्यात आलं होतं, त्याच खोलीत पोलीस ठाण्यातील वायरलेस ऑपरेटरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला.
या आरोपाबाबत पोलीस अधीक्षकांनी म्हटलं, "या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आलं आहे. ते सर्व बाबींची सखोल चौकशी करत आहे. अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल."
वैद्यकीय अहवालातून बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, "वैद्यकीय तपासणी झाली आहे, मात्र अहवाल आलेला नाही. सध्या अहवालाची प्रतीक्षा आहे."
झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, "सरायकेलामधील गम्हरिया पोलीस ठाण्याच्या आवारात एका महिलेवर पोलीस कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची घटना अत्यंत लज्जास्पद आणि चिंताजनक आहे."
त्यांनी पुढे म्हटलं, "जेव्हा रक्षकच भक्षक बनतात, तेव्हा महिलांच्या सुरक्षेची अपेक्षा नेमकी कोणाकडून करायची?"
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)





















