फारुख अब्दुल्ला यांच्या विधानावरुन गदारोळ, भाजपने काय दिली प्रतिक्रिया?

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
फोटो कॅप्शन, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीरबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानानंतर भाजपने त्यांच्या विधानाला 'भारतविरोधी' म्हटलं आहे.

काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात नॅशनल कॉन्फरन्सच्या एका कार्यक्रमात बोलताना फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानचं नाव न घेता म्हटलं, की 'ते आपलं रक्षण करत आहेत.'

फारुख अब्दुल्ला यांच्या या विधानावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनीही फारुख अब्दुल्ला यांनी असं विधान करायला नको होतं, असं म्हटलं आहे.

अनेक मुस्लीम धर्मगुरूंनीही फारुख अब्दुल्ला यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

तसेच जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी देखील या विधानाचा निषेध केला आहे.

फारुख अब्दुल्ला नेमकं काय म्हणाले?

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे शनिवारी, 24 ऑक्टोबर रोजी बारामुल्ला येथे एका कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

आपल्या भाषणात अब्दुल्ला यांनी कलम 370 अंतर्गत काश्मीरला मिळालेला विशेष दर्जा रद्द केल्याचा आणि मतदारसंघ पुनर्रचनेचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी भाजपने मुस्लिमांशी भेदभाव केल्याचा आरोप केला.

ते म्हणाले, "तुम्ही दिल्लीकडून काय अपेक्षा करू शकता? ते न्याय करतील? अरे, त्यांचा सामना करण्यासाठी हिंमत ठेवा. हिंमत ठेवली नाही, तर तुमचं अस्तित्व मिटून जाईल, तुमचं नावही शिल्लक उरणार नाही. आज जगभरातून आवाज उठवला जात आहे. आपला शेजारीही त्यांच्या मागे हात धुवून लागला आहे. तो प्रत्येक ठिकाणी पोहोचतो आणि काश्मीरचा प्रश्न अजून सुटलेला नाही, असं सांगतो. ते आपलं रक्षण करत आहेत."

बारामुल्ला येथील एका कार्यक्रमात फारुख अब्दुल्ला
फोटो कॅप्शन, बारामुल्ला येथील एका कार्यक्रमात फारुख अब्दुल्ला

"त्यांचा हेतू चांगला नाही. ते बोलतात एक आणि करतात अगदी उलट. सत्य जाणून घेण्याची ताकद ठेवा. खरं बोलणं सोपं नसतं," असं अब्दुल्ला म्हणाले.

पुढे ते म्हणाले, "जम्मू-काश्मीरमधील लोकांसाठी अडचणी निर्माण करण्याचा प्रत्येक प्रकारे प्रयत्न करण्यात आला. आपण आपल्या पायावर उभे राहू शकणार नाहीत, त्यांच्यासमोर हात पसरू अशी परिस्थिती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय कधीही आपला सन्मान परत मिळवू शकणार नाही. माझं हे बोलणं लक्षात ठेवा."

आपण आपल्या भाषणात आपण भारतीय नाही, असं कधीही म्हटलं नसल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले. ते म्हणाले, आपण महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मौलाना आझाद यांच्या भारतात सहभागी झालो, असं आपण वारंवार सांगत आलो आहोत.

भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मुस्लिमांशी भेदभाव होत असल्याचा आरोप करत ते म्हणाले, "असा काळ येईल, जेव्हा केवळ सत्तेसाठी मुस्लीम आणि हिंदूंना एकमेकांविरुद्ध लढवलं जाईल, अशी अपेक्षा मला कधीच नव्हती. भारताची परिस्थिती बिघडवण्यात आली आहे."

भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरमधील भाजपचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी अब्दुल्ला यांच्या विधानाला भारतविरोधी म्हटलं. नॅशनल कॉन्फरन्सची भूमिका नेहमीच भारतविरोधी राहिली आहे, असा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले, "हे देशाविरोधात पुकारलेलं बंड आहे. त्यांचं हे विधान देशाच्या एकता आणि अखंडतेच्या विरोधात आहे. नॅशनल कॉन्फरन्स नेहमीच देशविरोधी राहिला आहे. फारुख अब्दुल्ला यांनी केलेलं विधान पूर्णपणे देशविरोधी आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे."

भाजपचे प्रवक्ते आर. पी. सिंह म्हणाले, "फारुख अब्दुल्ला ज्या पाकिस्तानची स्तुती करत आहेत, त्या पाकिस्तानने काश्मीरच्या या भागाला काय दिलं? दहशतवाद, फुटीरतावाद आणि लोकांना दगडफेक करायला लावण्याचं काम."

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांचीही प्रतिक्रिया

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

काँग्रेसच्या नेत्यांनीही अब्दुल्ला यांच्या विधानावर टीका केली आहे.

सहारनपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूद म्हणाले, "पाकिस्तानला स्वतःचं रक्षण करता येत नाही. पाकिस्तान चांगला असता, तर पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये काश्मिरी लोकांना चांगली वागणूक दिली गेली असती. पाकिस्तान हा धूर्त देश आहे. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. फारुख अब्दुल्ला यांनी असं विधान का केलं, हे मला समजलं नाही. शेख अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला ते ओमर अब्दुल्ला यांच्यापर्यंत त्यांचं धोरण नेहमीच भारताच्या बाजूने राहिलं आहे."

मसूद म्हणाले की, फारुख अब्दुल्ला यांनी कोणत्या संदर्भात हे विधान केलं, हे त्यांना माहीत नाही. मात्र, त्यांनी असं विधान केलं असेल, तर आपण त्याचं समर्थन करू शकत नाही.

काँग्रेस नेते उदित राज म्हणाले, "आजपर्यंत फारुख अब्दुल्ला यांच्याकडून असं विधान ऐकायला मिळालं नव्हतं. त्यांनी यापूर्वी कधीही असं विधान केलं नाही. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील लोक किती त्रस्त आहेत, हे पाहा. त्यांना भारतात सामील व्हायचं आहे. पाकिस्तानमध्ये ते सुखी असते, तर भारतात सामील होण्यासाठी त्यांनी संघर्ष केला असता का?"

समाजवादी पक्षाचे खासदार मोहिबुल्ला नदवी म्हणाले, "काश्मीरही आपला आहे आणि काश्मिरी लोकही आपले आहेत. आम्ही समाजवादी विचारांचे लोक सर्वांना सन्मान देण्याबाबत बोलतो. काश्मीरमध्ये जी अशांतता राहिली आहे, त्यामागे पाकिस्तानचा हस्तक्षेप आणि त्याची चुकीची धोरणं आहेत. त्यामुळे काश्मिरी संस्कृतीचं नुकसान झालं आहे. काश्मिरी मुस्लिमांचं, पंडितांचं आणि शीखांचंही नुकसान झालं आहे."

फारुख अब्दुल्ला असं विधान कोणत्या कारणामुळे करत आहेत, हे माहीत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

देवबंदी धर्मगुरू कारी इशाक गोरा म्हणाले, "फारुख अब्दुल्ला यांचं विधान निषेधार्ह आहे. त्यांनी भारतातील लोकांची माफी मागितली पाहिजे."

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे कार्यकारी सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी महली म्हणाले, "जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यात शंका नाही. या संपूर्ण प्रदेशाची सुरक्षा आपल्या सुरक्षा दलांनी नेहमीच सुनिश्चित केली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेसाठी तिथे लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्यासह मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत."

इम्रान मसूद (फाइल फोटो)
फोटो कॅप्शन, इम्रान मसूद (फाइल फोटो)

"तिथे सुरक्षित राहता यावं यासाठी अनेक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत, यात शंका नाही. त्यामुळे दुसरा देश जम्मू-काश्मीरचं रक्षण करत आहे, असं म्हणणं पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. हे विधान आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहे. ज्यांनी हे विधान केलं आहे, त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलं पाहिजे."

केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून काश्मीर मुख्य प्रवाहाशी जोडला गेला आहे आणि तिथे गुंतवणूक येत आहे, असंही त्यांनी सांगितलं. काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली असल्याचंही ते म्हणाले.

भाजप नेते रवींद्र रैना म्हणाले, "डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीर आणि पाकिस्तानच्या संदर्भात केलेलं विधान अत्यंत निषेधार्ह आणि बेजबाबदार आहे. त्यांनी पुन्हा एकदा देशद्रोह केला आहे. पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या जनतेचा हितचिंतक कसा असू शकेल? तो कधीच असणार नाही."

फारुख अब्दुल्ला यांच्या विधानावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, "मी फारुख साहेबांचा आदर करतो, पण त्यांचं हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. भारत आणि जम्मू-काश्मीरमधील जनतेचा कोणी शत्रू असेल, तर तो पाकिस्तान आहे."

आझाद म्हणाले, "आज पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये (पीओके) काय परिस्थिती आहे? तिथे किती लोक मारले गेले आहेत? तेथील लोकांना भारताचा भाग म्हणून राहण्याची इच्छा आहे.

गुलाम नबी आझाद म्हणाले की, 1947 पासून जम्मू-काश्मीरमध्ये जो काही विकास झाला आहे, तो केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा परिणाम आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)