ब्राझीलमध्ये उजव्या विचारसरणीच्या राजकारणाला मोठा धक्का; लुला चौथ्यांदा होणार राष्ट्राध्यक्ष

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी रविवार, 25 ऑक्टोबर 2026 रोजी साओ पावलो राज्यातील साओ बर्नार्डो इथं निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर समर्थकांना अभिवादन केलं.
फोटो कॅप्शन, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी रविवार, 25 ऑक्टोबर 2026 रोजी साओ पावलो राज्यातील साओ बर्नार्डो इथं निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर समर्थकांना अभिवादन केलं.
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

ब्राझीलचे नेते लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी शानदार पुनरागमन करत अध्यक्षीय निवडणूक जिंकली आहे.

या विजयामुळे 80 वर्षीय लुला यांना चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे.

त्यांनी देशाच्या अध्यक्षीय निवडणुकीत कट्टर उजव्या विचारसरणीचे प्रतिस्पर्धी फ्लाविओ बोल्सोनारो यांचा थोड्या फरकानं पराभव केला.

जवळपास सर्व मतांची मोजणी पूर्ण झाल्यावर, रविवारी लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठ्या लोकशाही देशात झालेल्या निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत लुला यांना 51.76 टक्के मते मिळाली, तर तुरुंगात असलेले माजी राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांचे पुत्र फ्लाविओ बोल्सोनारो यांना 48.24 टक्के मते मिळाली.

लुला यांचा विजय हा बोल्सोनारो यांना किंचित आघाडी देणाऱ्या अनेक जनमत चाचण्यांच्या निष्कर्षांच्या विरुद्ध जाणारा आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत, 45 वर्षीय सिनेटर फ्लाविओ बोल्सोनारो सुमारे दोन टक्के मतांनी आघाडीवर होते.

लुला दा सिल्वा यांचे समर्थक
फोटो कॅप्शन, लुला दा सिल्वा यांचे समर्थक

डाव्या विचारसरणीचे नेते लुला यांनी यापूर्वी 2003 ते 2010 या काळात ब्राझीलचं अध्यक्षपद भूषवलं होतं. चार वर्षांपूर्वी त्यांनी तिसऱ्यांदा अध्यक्षपद जिंकलं.

मात्र, रविवारची मतदान प्रक्रिया वादानं गाजली. मतदान केंद्रं बंद होण्याची वेळ जवळ येत असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी दोन तासांची मुदतवाढ देण्याचे आदेश दिले.

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या समस्यांबद्दल लुला यांच्या आघाडीनं तक्रार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. कारण, याच राज्यांमध्ये अनेक ब्राझिलियन नागरिक मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असतात.

लॅटिन अमेरिकेत उजव्या विचारसरणीच्या पक्षांचा निवडणुकीत विजय होईल, हा कल उलटवून लावल्यामुळे या प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्याच्या अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षेला धक्का बसला आहे, असं म्हटलं जात आहे.

कधी काळी मेटल वर्कर असलेल्या लुला यांनी 1989 मध्ये पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. तेव्हापासून ते ब्राझीलमधील डाव्या विचारसरणीचे सर्वात प्रमुख नेते राहिले आहेत. असं असूनही, आता त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

त्यांचा नवीन कार्यकाळ 5 जानेवारी 2027 रोजी सुरू होणार आहे.

हा कार्यकाळ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाराजीसह, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरावरील महत्त्वपूर्ण आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सुरू होईल.

ट्रम्प यांनी लुला यांचे प्रतिस्पर्धी, फ्लाविओ बोल्सोनारो यांना थेट पाठिंबा दिलेला नाहीये. मात्र, त्यांनी कोलंबिया आणि होंडुरासमध्ये अध्यक्षीय निवडणुका जिंकलेल्या उजव्या विचारसरणीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. असं असलं तरी, 21.3 कोटी लोकसंख्या असलेल्या ब्राझीलमध्ये एक पुराणमतवादी नेता सत्तेवर असावा, अशी अमेरिकन प्रशासनाची इच्छा असते, यात फारशी शंका नाही.

व्हाईट हाऊस लॅटिन अमेरिकेला अमेरिकेच्या प्रभावाचं क्षेत्र मानतं. ट्रम्प प्रशासनाला या प्रदेशात असे नेते हवे आहेत, जे संरक्षण, सुरक्षा आणि व्यापार यांसारख्या विविध मुद्द्यांवर त्यांच्या धोरणांना पाठिंबा देतील.

अमेरिकेला धक्का?

माजी कामगार संघटनेचे नेते असलेल्या लुला यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे, तर बोल्सोनारो यांनी व्हाईट हाऊसमधील आपल्या वैचारिक सहकाऱ्यासोबत अधिक घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याचं आश्वासन दिलं आहे.

गेल्या वर्षापासून अमेरिकेनं ब्राझीलवर व्यापार शुल्क आणि इतर निर्बंध लादले आहेत.

सुरुवातीच्या निष्प्रभ प्रचार मोहिमेनंतर, लुला यांनी मतदानाच्या पहिल्या फेरीनंतर कर्जमाफी, शनिवार-रविवारी मोफत सार्वजनिक वाहतूक आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत यांसारख्या अनेक दिलासादायक उपाययोजना जाहीर केल्या.

विरोधी पक्षानं विद्यमान अध्यक्ष लुला यांच्यावर मते विकत घेतल्याचा आरोप केला आणि म्हटलं की या उपाययोजनांमुळे सरकारची आर्थिक परिस्थिती आणखी बिघडेल.

2022 ची अध्यक्षीय निवडणूक जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर, फ्लाविओ बोल्सोनारो यांचे वडील, जायर बोल्सोनारो, यांना गेल्या वर्षी सत्तापालटाचा कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं.

जायर बोल्सोनारो सध्या 27 वर्षांची शिक्षा भोगत असून प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा समर्थकांना अभिवादन करताना
फोटो कॅप्शन, लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा समर्थकांना अभिवादन करताना

संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन देण्यासोबतच, फ्लाविओ बोल्सोनारो यांनी सरकारी खर्चात कपात करण्याचं आणि कर कमी करण्याचंही आश्वासन दिलं होतं.

पहिल्या फेरीच्या निकालानंतर, गुंतवणूकदारांनी बोल्सोनारो यांच्या व्यवसाय-स्नेही धोरणांच्या शक्यतेचं स्वागत केलं.

सर्व प्रतिकूल परिस्थितींवर मात करून, लुला यांच्या विजयानं आधुनिक ब्राझीलच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली राजकारण्यांमध्ये त्यांचं स्थान पक्कं केलं आहे.

सार्वजनिक जीवनातील जवळपास पाच दशकांनंतर, हा विजय त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

धातू उद्योगात काम केलेल्या लुला यांनी 2003 ते 2010 या काळात देशाच्या सरकारचे नेतृत्व केलं. या काळात त्यांनी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या, ज्यामुळे गरिबी कमी होण्यास मदत झाली.

नंतर त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आलं. मात्र, नंतर त्याची सुटका झाली.

चार वर्षांपूर्वी, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांचा पराभव करून ते पुन्हा सक्रिय राजकारणात परतले.

विरोधी उमेदवार फ्लाविओ बोल्सोनारो यांचा पराभव हा, त्यांच्या वडिलांनी सुमारे दशकभरापूर्वी सुरू केलेल्या कट्टर लोकवादी राजकीय चळवळीला एक मोठा धक्का आहे. ही चळवळ आता ब्राझीलच्या राजकारणातील उजव्या विचारसरणीचा सर्वात प्रभावशाली असा गट बनली आहे.

लुला यांचं आश्वासन

ब्राझील हा तेलसंपन्न देश असून, इथं दुर्मिळ मृदा खनिजांचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे साठे आहेत.

दक्षिण अमेरिकेतील ब्राझील हा एकमेव प्रमुख देश आहे, जिथं उजव्या विचारसरणीचा नेता सत्तेवर नाही. लुला यांना चीन-स्नेही भूमिका घेणारे नेते म्हणून मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते.

फ्लॅविओ बोल्सोनारो यांनी ब्राझीलला अमेरिकेच्या जवळ आणण्याचं वचन दिलं होतं. दरम्यान, लुला यांनी अमेरिकेला निवडणुकीत हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिला. ब्राझील कधीही कोणाचं बाहुलं बनणार नाही, असा त्यांनी ठामपणे दावा केला.

लुला यांच्या विजयामुळे व्हाईट हाऊसला निराशा झाली असली तरी, पर्यावरण कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत केलं आहे.

लुला यांच्या विजयामुळे व्हाईट हाऊसला निराशा झाली असली तरी, पर्यावरण कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत केलं आहे.
फोटो कॅप्शन, लुला यांच्या विजयामुळे व्हाईट हाऊसला निराशा झाली असली तरी, पर्यावरण कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत केलं आहे.

कारण, या पर्यावरण कार्यकर्त्यांना भीती होती की बोल्सोनारो यांच्या विजयामुळे ब्राझीलच्या प्रभावशाली कृषी-उद्योग आणि खाण क्षेत्रांची शक्ती अधिक मजबूत झाली असती.

त्यांनी जायर बोल्सोनारो यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत ॲमेझॉनमध्ये झालेल्या विक्रमी जंगलतोड आणि वणव्यांचा दाखला दिला. त्यांनी असा युक्तिवाद केला की, कनिष्ठ बोल्सोनारो सत्तेवर आल्यास पर्यावरणीय नियमांमध्ये शिथिलता येऊ शकते. त्यामुळे या महत्त्वपूर्ण परिसंस्थेचं आणखी नुकसान होईल.

निवडणुकीत बोल्सोनारो यांच्या लिबरल पार्टीने सर्वात मोठी आघाडी घेतली.

असं असूनही, लुला यांच्या वर्कर्स पार्टीनं मतदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या दरम्यान मोठ्या सभा आयोजित करून पक्षाला असलेला मजबूत तळागाळातील पाठिंबा दाखवून दिला.

निवडणुकीपूर्वी, लुला यांनी या स्पर्धेचं वर्णन 'ब्राझीलसाठी एक महत्त्वाचा टप्पा' असं केलं होतं.

त्यांनी नव्या शासनपद्धतीद्वारे ब्राझीलमधील परस्परविरोधी राजकीय विचारप्रणालींमधील दरी मिटवण्याचं आश्वासन दिलं. निवडणुकीपूर्वी व्हॉट्सॲपवरील थेट प्रक्षेपणादरम्यान ते म्हणाले की, देश पूर्वीसारखा राहणार नाही.

त्यांनी या नव्या शासनव्यवस्थेबद्दल अधिकचा तपशील दिला नसला तरी, त्यांनी यावर जोर दिला की ते एका अधिक न्यायपूर्ण देशासाठी लढा देत राहतील. जिथं प्रत्येकाला संधी मिळतील आणि धोरणं लोकांच्या गरजांना प्रतिसाद देतील.

परंतु, संसदेत व्यापक विरोधाला सामोरं जात असलेल्या लुला यांना त्यांच्या मागील तीन कार्यकाळांपेक्षा अधिक कठीण लढाईला सामोरं जावं लागू शकतं. त्यांच्या चौथ्या कार्यकाळाच्या अखेरीस ते 85 वर्षांचे होतील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)