शाळेत तुमच्याकडे दुर्लक्ष झालं होतं? तेव्हाची 'कूल' मुलं आज कुठं आहेत?

    • Author, लॉरी क्लर्क
  • Published
  • वाचन वेळ: 15 मिनिटे

"आपण लहान असताना किंवा शाळेत-कॉलेजात असताना ज्या वातावरणात वाढलो, ज्या मित्रांमध्ये राहिलो, त्याचा आपल्या पूर्ण आयुष्यावर खोलवर ठसा उमटतो. पण त्या भूतकाळातून आपल्या आजच्या आणि उद्याच्या जगण्याला कसा आकार द्यायचा, हे आपल्या हातात असते."

जॉर्जियाशी मैत्री होण्याआधी मला तिची भीती वाटायची.

या दिवसांतला एक किस्सा आजही माझ्या डोक्यात पक्का कोरला गेलाय. तेव्हा आम्ही जेमतेम 14 वर्षांचे असू. माझ्या त्यावेळच्या बेस्ट फ्रेंडनं एक मस्त पार्टी ठेवली होती.

नेहमीप्रमाणे एका चर्चच्या भाड्याने घेतलेल्या कम्युनिटी हॉलमध्ये अख्ख्या बॅचची सगळी पोरं गोळा होणार होती. पण एक असा ग्रुप होता, ज्याला पार्टीचे आमंत्रण द्यायचे माझी मैत्रीण साफ विसरून गेली.

प्लेग्राऊंड ओलांडून जॉर्जिया आणि तिची गँग थेट आमच्या दिशेने मोठ्या तोऱ्यात चालत येऊ लागली. आजूबाजूची पोरंही थबकून त्यांच्याकडेच टक लावून बघत होती.

जॉर्जियाचा तो अवतारच धडकी भरवणारा होता. अंगावर कृत्रिम टॅन, हायड्रोजन पेरॉक्साइडनं सोनेरी केलेले लांबलचक हेअर एक्स्टेंशन्स आणि भडक रंगांचे स्पोर्ट्सवेअर. आमच्यासारख्या साध्यासुध्या मुलांकडे तिला असं काय काम असू शकतं?

ती येऊन आमच्यासमोर उभी ठाकली आणि आमची तर भीतीनं गाळणच उडाली.

"आम्हीही तुझ्या पार्टीला येणार आहोत, बरोबर ना?" जॉर्जियाने माझ्या मैत्रिणीवर एकदम हक्क गाजवत विचारले.

" हो, अर्थातच!" माझ्या मैत्रिणीच्या तोंडातून कसेबसे शब्द फुटले.

समाधान झाल्यासारखी जॉर्जिया तिथून गिरकी घेऊन एका झटक्यात मागे फिरली आणि निघून गेली. बाजूलाच उभी असलेली दुसरी पोरगी हळूच कुजबुजली, "तुझ्या मनात नसेल तर तिला अजिबात बोलवू नकोस."

पण तिथं उभ्या असलेल्या आम्हा सगळ्यांना पक्कं माहीत होतं. तिला नाही म्हणण्याची हिंमत कोणातच नव्हती, तिला आमंत्रण द्यावंच लागणार होतं.

शाळेच्या अशा काही आठवणी तुमच्याही आहेत?

शाळेतल्या दिवसातल्या अशा काही आठवणी आपल्या सगळ्यांच्याच मनात नक्कीच दडलेल्या असतील. जिथं मैदानातल्या त्या गटबाजीचा फटका कधीतरी तुम्हालाही बसला असेल.

तुमच्याही शाळेत अशी एखादी व्यक्ती नक्कीच असेल, जिचा वर्गात असा काही दरारा असायचा की तिनं नुसतं रोखून पाहिलं तरी सगळ्यांची बोलती बंद होत असेल.

...किंवा कोण जाणे, त्या वयात कदाचित तुम्ही स्वतःच असा दरारा गाजवणारे जॉर्जिया असाल!

तुम्ही कोणत्याही बाजूला असलात, तरी ते दिवस आज इतक्या वर्षांनंतरही चांगलेच लक्षात असतील. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनातील मानसशास्त्राचे प्राध्यापक मिच प्रिन्सटीन यांनी शेकडो लोकांशी त्यांच्या शालेय दिवसांबद्दल मनमोकळा संवाद साधला. तेव्हा एक गोष्ट त्यांच्या ठळकपणे लक्षात आली.

शाळेच्या कॉरिडॉरवर एकेकाळी हुकमत गाजवणारी, भाव खाऊन जाणारी ती मुलं, वर्गावर राज्य करणाऱ्या त्या पुढारी मुली आणि मैदानावर चमकणारे स्टार खेळाडू, या सगळ्यांच्या आठवणी लोकांच्या मनात आजही तितक्याच जिवंत आणि खोलवर घर करून आहेत.

शाळा सोडून अनेक दशकं उलटून गेली, तरी त्या काळात अख्ख्या शाळेत ज्याचा किंवा जिचा सर्वात जास्त बोलबाला होता, त्या मुलाचं नाव लोक आजही क्षणात आणि अगदी सहज आठवू शकतात. प्रिन्सटीन यांनी 2017 मधील आपल्या 'पॉप्युलर: द पॉवर ऑफ लाईकेबिलिटी इन अ स्टेटस-ऑब्सेस्ड वर्ल्ड' या पुस्तकात लिहिलं आहे की, आपण त्या वेळच्या शिक्षकांची किंवा इतर वर्गमित्रांची नावं कदाचित विसरू, पण शाळेत हवा करणाऱ्या त्या एका मुलाचं नाव मात्र लोकांच्या डोक्यात कायमचं कोरलेलं असतं.

आणि मुद्दा फक्त त्या आठवणी मनात रेंगाळण्यापुरता मर्यादित नाही.

शाळेचा उंबरठा एकदा कायमचा ओलांडला की तिथं चालणारी ती वर्चस्वाची चढाओढ आणि गटबाजी मागेच सुटते, असा आपला एक गोड गैरसमज असतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की, त्या वयातल्या वातावरणाचा एक विचित्र आणि न संपणारा प्रभाव पुढची कित्येक वर्षे कायम राहतो.

किशोरवयात असताना आपण आपल्या मित्रांमध्ये किती प्रसिद्ध होतो आणि लोक आपल्याला किती मानायचे, याचा परिणाम पुढची कित्येक वर्षे आपल्या अख्ख्या जगण्यावर राहतो, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

चारचौघांत आपण कसे मिसळतो आणि लोकांच्या वागण्याचा काय अर्थ काढतो इथपासून ते आपले प्रेमसंबंध, आयुष्यातले समाधान आणि अगदी आपल्या आरोग्यावरही त्या दिवसांचा खोलवर प्रभाव पडत असतो.

लोकप्रियतेचा नव्याने विचार

अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जॉन कोई यांनी या विषयाकडे बघण्याचा संशोधकांचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला.

1980 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी केलेल्या एका क्रांतिकारी अभ्यासाची सुरुवात फार रंजक होती. त्यांनी शाळेतल्या मुलांना त्यांच्या वर्गमित्रांबद्दल फक्त 2 साधे प्रश्न विचारले की, 'तुम्हाला वर्गात कोण सर्वात जास्त आवडतं?' आणि 'कोण सर्वात कमी आवडतं?'

कागदांच्या शेकडो चिठ्ठ्यांवर मुलांच्या त्या वेड्यावाकड्या हस्ताक्षरात आलेल्या उत्तरांमधून, माणसाच्या सामाजिक वागणुकीचे आणि स्वभावाचे काही थक्क करणारे नवे पैलू कोई यांच्या समोर उलगडत गेले.

एखादं मूल शाळेत सगळ्यांना खूप आवडतं किंवा कोणालाच आवडत नाही, असंच आपल्याला सहसा वाटतं. पण कोई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मात्र काही वेगळंच दिसून आलं.

एकाच मुलाबद्दल वेगवेगळ्या मुलांची मतं पूर्णपणे वेगवेगळी असू शकतात. काही मुले अशी असतात जी काहींना खूप आवडतात तर काहींना मुळीच आवडत नाहीत. किंवा काहींबाबत मुलं अगदी तटस्थ असतात, म्हणजे आवडणंही नाही आणि नावडणंही नाही.

यातली काही मुलं तर अशी होती ज्यांची नावं वर्गातल्या जवळपास प्रत्येकाच्या तोंडावर असायची... जणू ते त्या वर्गातले छोटेखानी 'सेलिब्रिटी'च होते, सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच खिळलेल्या असायच्या. तर याउलट, काही मुलं इतकी शांत आणि दुर्लक्षित असायची की त्यांचं नावही क्वचितच घेतलं जायचं.

मुलांच्या या उत्तरांच्या आधारे जॉन कोई यांनी पहिल्यांदाच मुलांच्या स्वभावाचे 5 वेगवेगळे गट तयार केले.

ज्यांना वर्गातले बहुतांश सगळेच पसंत करायचे त्यांना 'आवडते' म्हणजेच सगळ्यांचे लाडके आणि जे कोणालाच आवडायचे नाहीत त्यांना 'नावडते' या गटात.

ज्यांच्या वाट्याला भरभरून प्रेम आणि तितकाच टोकाचा राग एकाच वेळी यायचा, त्यांना 'वादग्रस्त' या गटात टाकले. चौथ्या प्रकारात ज्यांचा उल्लेख चांगल्या किंवा वाईट कशातच झाला नाही, त्यांना 'दुर्लक्षित' ठरवलं गेलं. आणि शेवटी उरली जी कोणत्याही एका टोकाला न जाता अगदी मधोमध असायची त्यांना 'सरासरी' मुलांच्या श्रेणीत ठेवलं गेलं. तरीही त्यांचा कल कुठल्या ना कुठल्या एका बाजूला थोडाफार असायचाच.

मुलांचे हे वर्गीकरण किती उपयुक्त आहे, हे अनेक अभ्यासांतून स्पष्ट झालंय. या संशोधनांनुसार साधारण 40% मुलं ही 'सरासरी' गटात येतात, तर उरलेली 60% मुले उर्वरित चारपैकी एखाद्या गटामध्ये मोडतात.

वर्गात सगळ्यांना आवडणारी मुले ही प्रेमळ, इतरांना उभारी देणारी आणि मदत करणारी म्हणून ओळखली जातात; तर ज्यांच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही अशी 'दुर्लक्षित' मुलं सहसा अबोल आणि स्वतःच्या कोशात राहणारी असतात.

'नाकारलेली' मुलं एकतर जास्त आक्रमक असतात आणि दुसऱ्यांवर दादागिरी करतात, किंवा मग ती दबलेली, चारचौघांत मिसळायला घाबरणारी आणि स्वतःच इतरांच्या दादागिरीची शिकार झालेली असतात.

सगळ्यात कमी आढळणारा गट म्हणजे 'वादग्रस्त' मुलांचा; या मुलांबद्दल वर्गात दोन तट पडतात. काहींना ती वर्गात हशा पिकवणारी वाटतात, तर काहींना ती नियम मोडणारी बंडखोर मुले वाटतात.

यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, या मुलांना जेव्हा अगदी नवीन मित्रांच्या ग्रुपमध्ये पाठवलं गेलं, तेव्हाही त्यांची ही ओळख फारशी बदलली नाही, असं कोई यांना दिसून आलं. हे सुरुवातीचं संशोधन जरी प्राथमिक शाळेतील लहान मुलांवर झालं होतं, तरी नंतरच्या अनेक अभ्यासांत किशोरवयीन मुलांमध्येही हेच निष्कर्ष दिसून आले.

एका संशोधनानुसार, प्राथमिक शाळेत मुलांवर जो शिक्का बसला होता, त्यातल्या जवळपास निम्म्या मुलांच्या बाबतीत 5 वर्षांनंतर मोठ्या वर्गांत गेल्यावरही तो तसाच टिकून राहिला.

"प्राथमिक शाळेत असताना माझ्या वाट्याला खूप वाईट अनुभव आले होते. माझी आई नेहमी मला धीर देत म्हणायची, 'मोठ्या शाळेत जाशील तेव्हा सगळं चांगलं होईल'; तिचे हे शब्द मला आजही आठवतात," हायस्कूलच्या दिवसांबद्दल बोलताना कॉनी या माझ्या दुसऱ्या मैत्रिणीने सांगितले.

"पण मला वाटतं, एकदा जर तुम्हाला कोणी टार्गेट केलं किंवा तुमच्यात इतरांपेक्षा वेगळं दिसणारं असं काही असेल तर पुढेही मुलं तुम्हाला अगदी सहज टार्गेट करतात."

उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यांतच काही मुलांनी कॉनीला त्रास देण्यास सुरुवात केली. श्वेतवर्णीय मुलांचं प्रमाण जास्त असलेल्या त्या शाळेत तिचं वांशिक वेगळेपण हे यामागचं एक मुख्य कारण होतं.

या त्रासाला कंटाळून तिनं शेवटी शाळा बदलली खरी पण दुर्दैवानं नवीन शाळेत गेल्यावरही तिच्या वाट्याला अगदी तसाच अनुभव आला. (दादागिरी आणि छळवणुकीला तोंड देण्यासाठी शोधल्या जात असलेल्या नव्या प्रभावी उपायांबद्दल वाचा. )

'रेजिना जॉर्ज इफेक्ट'

मुलांवरचे शिक्के बदलत नसले, तरी प्राथमिक शाळा आणि हायस्कूलमधली सामाजिक समीकरणं मात्र पूर्णपणे उलटीपालथी होतात.

प्राथमिक शाळेत असताना 'लोकप्रिय' मुलं म्हणजे सहसा सगळ्यांची लाडकी असणारी मुलं असतात जी शिस्तप्रिय आणि अभ्यासात हुशार असतात. कारण त्या वयात मुलांची विचारसरणी मोठ्या माणसांच्या किंवा शिक्षकांच्या नियमांनुसारच चालत असते.

मोठ्या वर्गांत गेल्यावर मात्र हे गणित पूर्ण पालटून जाते. मोठी माणसं आणि त्यांचे नियम यांपासून मुलं अंतर ठेवायला बघतात. अशा वेळी नियमांचं पालन करणाऱ्या आणि अभ्यासात नेहमी पुढे असणाऱ्या प्रामाणिक मुलाला मुलं अचानक 'अभ्यासू किडा' ठरवून बाजूला सारतात तर दुसरीकडे, शाळेत गडबड-गोंधळ घालणाऱ्या आणि मुलांचे गट पाडणाऱ्या आगाऊ मुलाचा मात्र शाळेत अचानक भाव वधारतो.

एकेकाळी शाळेत सगळ्यांना घाबरवून सोडणारी आणि आज माझी खास मैत्रीण झालेली जॉर्जिया...तिच्याशी फोनवर बोलताना मी विचारलं, 'हायस्कूलमध्ये असताना तू स्वतःला लोकप्रिय समजायची का?' त्यावर ती म्हणाली, तिने स्वतःचा कधी तसा विचारच केला नव्हता.

"लोकप्रिय म्हटलं की असं वाटतं लोक तुमच्यावर प्रेम करतात. पण आम्ही सगळ्यांना आवडायचोच असं मला अजिबात वाटत नाही," असं ती सांगते. "लोकांचं लक्ष वेधून घेणारे आणि उगाच गोंधळ घालणारे म्हणून एक प्रकारे आमची बदनामी किंवा कुप्रसिद्धीच जास्त होती."

अगदी सुरुवातीच्या टीनएजमध्ये जॉर्जिया म्हणजे शाळेतल्या एका 'वादग्रस्त' पात्रासारखीच होती. तिचा स्वभाव आक्रमक होता आणि वर्गात ती सतत काही ना काही गडबड गोंधळ घालायची. तिच्यावर जीव ओवाळून टाकणारे जितके मित्र होते, तितकेच तिचा तिरस्कार करणारेही कमी नव्हते. एका काळात मी स्वतःसुद्धा तिला प्रचंड घाबरायचे, हे मी तिला बोलून दाखवलं. पण या सगळ्या वागण्यामुळे आपण शाळेत 'लोकप्रिय' नव्हतो, हा तिचा अंदाज मात्र अगदीच फोल आहे.

"शाळेत कोणाला सर्वात जास्त भाव मिळतोय, कोणाचा जास्त दरारा आहे किंवा कोण जास्त 'कूल' आहे, याकडे आपण बारीक लक्ष देऊ लागतो," असं प्रिन्स्टीन स्पष्ट करतात.

"जी मुलं व्यक्तिमत्त्वानं अधिक देखणी दिसू लागतात, मित्रांच्या ग्रुपमधल्या ट्रेंडमध्ये अगदी फिट बसतात, जसे की छान स्टायलिश कपडे घालणारी किंवा खेळात हुशार असणारी मुलं… त्यांच्याकडे सगळ्यांचे डोळे वळतात."

आपल्यापेक्षा मोठ्या मुलांसारखे किंवा थेट मोठ्या माणसांसारखे वागण्याचा आव आणणं, हा मित्रांमध्ये स्वतःचा तोरा मिरवण्याचा आणखी एक शॉर्टकट असतो. सिगारेट-दारू पिणे, ड्रग्जच्या आहारी जाणे किंवा वयाच्या मानाने जरा लवकरच रिलेशनशिप्समध्ये पडणे अशा गोष्टी करणारी मुले मित्रांमध्ये अधिक 'लोकप्रिय' समजली जातात.

पण अर्थात काही काळापुरतीच. वयाच्या साधारण 15 व्या वर्षानंतर अशा वागण्यातून मिळणारा भाव आपोआप कमी होऊ लागतो.

मुलं जसजशी समजूतदार होतात, तसतसा उगीचच भाव खाण्याचा किंवा स्वतःचा मोठेपणा मिरवण्याचा हा प्रयत्न मित्रांमध्ये फारसा चालत नाही. आणि चारचौघांना 'आपल्यातलं' वाटणे हेच खरं तर लोकांच्या नजरेत मान मिळवून देण्यास कारणीभूत ठरते. पण कोवळ्या वयातील त्या टोकाच्या गटबाजी, हेवेदावे आणि मानापमानाचे पडसाद मात्र पुढच्या आयुष्यातही खूप दूरवर उमटत राहतात.

प्रिन्स्टीन स्पष्ट करतात, "शाळेच्या दिवसांत आपण कसे होतो, चारचौघांना मनापासून आवडणारे होतो, मित्रांमध्ये लोकप्रिय होतो की आपला एक वेगळाच दरारा होता…या लहानपणीच्या अनुभवांची सावली पुढची 40 वर्षे आपल्या सोबत चालत राहते. लोकांच्या मनाला भावणे आणि नुसताच तोरा किंवा स्टेटस मिरवणे, या दोन्हींचे परिणाम एकमेकांच्या अगदी उलटे असतात. सर्वांचे लाडके असणे कधीही भारीच… कारण त्यामुळे माणसाचे आरोग्य, करिअर, शिक्षण आणि मनःशांती या सगळ्याच आघाड्यांवर अतिशय चांगले आणि सकारात्मक फायदे मिळतात."

"पण उगीचच तोरा किंवा स्टेटस मिरवण्याचे परिणाम मात्र याच्या अगदी उलटे होऊ शकतात."

ग्रुप करून राहण्याची संस्कृती

पूर्वी संशोधकांना वाटायचे की शाळेतली मुलं ही फक्त मोठ्या माणसांची नक्कल करत असतात. पण 1960 च्या सुमारास त्यांच्या लक्षात आलं की, मुलांचे हे 'फ्रेंड सर्कल' आणि त्यांची ही संस्कृती खूपच वेगळी आहे. स्वतःच्याच अतरंगी नियमांवर आणि लहरींवर चालणारे ते एक समांतर जगच असते.

शाळेतली ही सामाजिक रचना म्हणजे आपापल्या छोट्या-छोट्या टोळ्यांचे, गँग्सचे एक वेगळेच जाळे विणलेले असते. लोकप्रिय संस्कृतीत 'अमेरिकन पाय'पासून ते 'द ब्रेकफास्ट क्लब'सारख्या सिनेमांमध्ये काही ठरलेले चेहरे नेहमीच दिसतात जसे की, वर्गातले प्रसिद्ध मुलं, बिघडलेली उनाड पोरं, दुर्लक्षित किंवा नाकारलेले गट, आणि जाड चष्मा लावणारे अभ्यासू किडे.

शाळेच्या सुरुवातीच्या वर्षांत या वेगवेगळ्या ग्रुप्सची आपापली वर्तुळं फार घट्ट असतात. जर्मन-अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ एरिक एरिक्सन यांनी 1959 मध्ये आलेल्या त्यांच्या 'आयडेंटिटी अँड द लाइफ सायकल' या पुस्तकात लिहिलं होतं की, "त्या वयातील मुलं कमालीची संकुचित वृत्तीची बनतात. आपल्यापेक्षा जरा वेगळ्या असणाऱ्या मुलांना आपल्यात सामावून न घेता दूर लोटताना ती अत्यंत निष्ठुर आणि कठोर वागू शकतात."

एरिक्सन यांच्या मते, मुलांचा हा कठोरपणा किंवा दुसऱ्यांना सामावून न घेणं म्हणजे एक प्रकारचं 'संरक्षण कवच' असू शकतं. लहानपणी असलेली स्वतःची ओळख हळूहळू सुटत चाललेली असते, शरीरात हार्मोन्सची अनाकलनीय उलथापालथ सुरू असते. आणि दुसऱ्या बाजूला भविष्यात काय करायचं याचं भयंकर दडपण डोक्यावर असतं.

या सगळ्या मानसिक गोंधळातून मार्ग काढण्यासाठी ही मुलं आपले स्वतंत्र गट बनवून आणि स्वतःलाच एका विशिष्ट साच्यात बांधून घेतात," असं एरिक्सन यांनी स्पष्ट केलं. अशा प्रकारे स्वतःची वर्गवारी निश्चित केल्यामुळे त्यांना आपल्या मित्रपरिवारात वावरणं सोपं जातं. कारण समोरच्या मुलाचा 'ग्रुप' कोणता आहे, यावरूनच त्याच्याशी कशी मैत्री करायची किंवा त्याला कशी वागणूक द्यायची हे ठरून जाते.

पण या सगळ्या चर्चांमध्ये एका फार मोठ्या मुलांच्या ग्रुपकडे दुर्लक्ष होतं, ते म्हणजे कुठल्याच ठराविक ग्रुप किंवा साच्यामध्ये न मोडणारी मुलं... 1985 च्या एका अभ्यासात समोर आलं आहे की, हायस्कूलमधल्या तब्बल 45% मुलांनी स्वतःला 'सरासरी' म्हटलं. वर्गातली भारी आणि लोकप्रिय मुलं 'छान दिसणं आणि पार्ट्या करणं' यातच फुशारकी मिरवत असताना, ही साधी मुलं मात्र बिनधास्त सांगायची की, "मी केवळ एक सर्वसाधारण किशोरवयीन आहे."

जरा वेगळं दिसणं किंवा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत येणं, हे एखाद्यासाठी सामाजिक पातळीवर खूपच घातक ठरू शकते. कॉनीला तिच्या वयाच्या तेराव्या वर्षी नवीन शाळेत गेल्याचे दिवस अजूनही स्पष्ट आठवतात. त्या अनोळखी शाळेत आधीपासूनच तयार असलेल्या मुलांच्या त्या घट्ट ग्रुप्समध्ये स्वतःची जागा बनवणं तिला अशक्य होऊन बसलं होतं. कोणत्यातरी ग्रुपमध्ये आपल्याला थारा मिळावा आणि आपण त्यांच्यातलेच एक वाटावं, म्हणून स्वतःच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू कसे बदलून किंवा उगाच मोठे करून दाखवण्याचा प्रयत्न तिने केला, हे ती सांगते.

मला आठवतं, मी त्या अभ्यासू मुलींशी मैत्री करायचा प्रयत्न केला. मग त्या भुरळ घालणाऱ्या, सगळ्यांच्या लाडक्या असणाऱ्या मुलींशीही जुळवून घ्यायचा प्रयत्न केला," असं ती सांगते.

"सुरुवातीला ' मला वाचायला खूप आवडतं, मी माझा सगळा गृहपाठ वेळेत करते,' असं मला वाटायचं. पण जेव्हा त्याचं काही जमेना, तेव्हा मी वेगळाच आव आणला, 'हे बघा, मी पण छान मेकअप करते, छान हेअरस्टाईल करते.' पुढे म्युझिकची आवड असणाऱ्या मुलांमध्ये स्वतःची जागा शोधण्यासाठी मी चक्क ट्रम्पेट वाजवायलाही शिकू लागले."

पण या सगळ्या खटाटोपाचा काहीच फायदा झाला नाही. "माझं मन कुठेतरी मला आतून सांगतच होतं की हे काही जमत नाही," असं ती सांगते. "माझ्यासाठी कुठल्याच ग्रुपमध्ये जागा नव्हती. आणि शेवटी तर अशी वेळ आली की शाळेत सगळ्यांनीच मला पार दुर्लक्षित करून टाकलं."

शाळकरी मुलांची समज वाढते, तशी परिस्थिती बदलते

शाळेची शेवटची वर्षं जवळ येतात तसा त्या मुलांमधला तो जाचक श्रेष्ठ-कनिष्ठपणा आणि एकमेकांना दाबण्याचा कल थोडा निवळत जातो.

1990 च्या सुरुवातीच्या काळात, संशोधक डेव्हिड किनी यांनी एक प्रत्यक्ष निरीक्षण अभ्यास केला.

मुलांच्या ग्रुपबाजीत होणारे हे बदल अगदी जवळून टिपण्यासाठी ते स्वतः एका शाळेत मुलांच्या दैनंदिन विश्वात मिसळून राहिले. तिथे त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, एकेकाळी ज्यांना सगळे फक्त 'अभ्यासू किडे' म्हणून हिणवायचे, ती मुलं हळूहळू इतरांमध्ये मिसळून सर्वांसारखी 'सामान्य मुलं' बनण्यात कशी यशस्वी झाली, या प्रवासाचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला.

शाळेच्या सुरुवातीच्या काळात मुलांमधली ही घट्ट गटबाजी कदाचित त्यांच्या त्या वयातील अपुऱ्या समजुतीमुळे असू शकते, असं त्यांनी सांगितलं.

त्या कोवळ्या वयातली मुलं स्वतःचा विचार करायला तर शिकतात, पण त्यांच्यात एका गोष्टीची समज अजून आलेली नसते. आपण स्वतःबद्दल जितका अहोरात्र विचार करत असतो (जो अर्थातच खूप जास्त असतो), तितका बाकीचे लोक आपल्याबद्दल अजिबात करत नसतात, हा साधा फरक त्यांना त्या वयात ओळखताच येत नाही.

कॉनी यांनी ज्या अभ्यासू मुलांबद्दल सांगितलं, त्यांच्या बाबतीत हेच घडलं. ते स्वतःबद्दलच इतका अतिविचार करायचे की चारचौघांत मिसळताना त्यांचा आत्मविश्वास पार डळमळीत व्हायचा आणि ते अक्षरशः गप्पगार पडायचे. पण पुढे जसजशी समज आणि वय वाढले, तसतशी या मुलांची लोकांबद्दलची भीती कमी झाली. त्यांनी स्वतःला कमी लेखणे थांबवले आणि आपल्याला समजून घेणाऱ्या आणि ज्यांच्याकडून त्यांना सतत चांगला पाठिंबा आणि सकारात्मक ऊर्जा मिळू लागली.

मुलं जसजसे समजूतदार होतात, तसे 'सगळे करतात तसंच आपणही करायचं' हा हट्ट आणि ग्रुपचे कडक नियम सैल पडू लागतात. एवढेच नाही तर शाळेतल्या 'लोकप्रिय' मुलांनाही वेगळा मार्ग निवडणाऱ्या बंडखोर पोरांकडून थेट आव्हान मिळू लागते. किनी यांच्या संशोधनात समोर आलं आहे की, मोठ्या वर्गांत गेल्यावर अशा फॅशन मिरवणाऱ्या 'ट्रेंडी' मुलांना भन्नाट किंवा अतरंगी स्टाईल आणि बिनधास्त वागणाऱ्या पोरांनी चांगलीच टक्कर दिली आणि संपूर्ण शाळेत आपले वजन पाडण्यासाठी ही मुले त्यांच्याशी बरोबरीने स्पर्धा करू लागली.

तब्बल 20 वर्षांनंतर मी आजवर कधी न विचारलेला एक प्रश्न जॉर्जियाला विचारला, 'तुला नेमकी माझ्याशी मैत्री का करावीशी वाटली?' मला वाटत होतं, माझ्या कुठल्या भारी गुणाने तिचं लक्ष वेधून घेतलं असेल...माझा हजरजबाबीपणा की माझे आकर्षक व्यक्तिमत्त्व? पण ती जरा चाचरत म्हणाली, "मला वाटतं आपल्या सगळ्यांतच एक अतरंगीपणा सारखाच होता... म्हणजे खरं सांगायचं तर आपल्या ग्रुपमध्ये कोणीच 'सामान्य' नव्हतं!"

शाळा, मिलिटरी आणि थेट तुरुंग!

शाळेतल्या दिवसांचे अतरंगी नियम कितीही वेगळे असले, तरी मोठी माणसंही आपल्या आजूबाजूच्या जगाकडे पाहण्यासाठी शाळेतल्या त्याच अनुभवांचा संदर्भ कसा काय देतात, हे खरंच नवल वाटावं असं आहे. युकेमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्रज्ञ आणि 'कमिंग ऑफ एज: हाऊ ॲडोलेसन्स शेप्स अस' या पुस्तकाच्या लेखिका ल्युसी फोक्स यांनी जेव्हा 'मीन गर्ल' इफेक्टबद्दल (मुलींमधील हेवेदावे आणि टोमणेबाजीची वृत्ती) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली तेव्हा लोकांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी आपले अनुभव अगदी असेच असल्याचं सांगत सहमती दर्शवली.

"अनेक लोकांचं म्हणणं होतं की, ही वृत्ती केवळ किशोरवयीन मुलांपुरतीच मर्यादित नाही. आम्ही कामाच्या ठिकाणीही हेच पाहतो. शाळेच्या गेटवर भेटणाऱ्या इतर आयांमध्येही आम्हाला हेच दिसून येतं," असं फोक्स सांगतात. "काही लोक इतरांवर स्वतःचा रुबाब आणि वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात, हा मानवी स्वभावच आहे. फरक एवढाच की, किशोरवयात या वृत्तीचे स्वरूप विशेषतः अधिक तीव्र आणि टोकाचे असते."

फाउल्क्स एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात की, शाळेच्या दिवसांत मुलं कित्येक वर्षं दररोज त्याच त्याच लोकांच्या गराड्यात असतात.

"लष्कर किंवा तुरुंग सोडलं, तर मोठेपणी अशा प्रकारचं वातावरण सहसा कोणाच्याच वाट्याला येत नाही. त्यामुळे त्या वयात मुलांच्या डोक्यात जे काही सुरू असतं त्यापेक्षाही तिथल्या त्या रोजच्या वातावरणाचा दबाव आणि तीव्रता कितीतरी पटीने जास्त असते."

प्रिन्सटीन यांच्या मते, याच तीव्रतेमुळे त्या आठवणी आणि अनुभव आपल्या मनात आयुष्यभरासाठी घट्ट रुतून बसतात. आणि आपण मोठे झाल्यावरही चारचौघांत लोकांशी कसं वागायचं, त्यांच्या नजरांचा किंवा बोलण्याचा काय अर्थ काढायचा हे नकळत याच अनुभवांवरून ठरत राहतं.

प्रिन्स्टीन म्हणतात, "आपण जेव्हा मोठेपणी जगाकडे पाहतो तेव्हा वयाच्या 14 व्या वर्षी जे काही अनुभवलं, त्याच चष्म्यातून आजूबाजूच्या जगाचं मूल्यमापन करत असतो." ते अशा अनेक अभ्यासांचा संदर्भ देतात ज्यातून हे सिद्ध झाले आहे की, समाजात कसं वावरायचं याची मानसिक चौकट आपल्या बालपणातच तयार व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा जेव्हा आपण सामाजिक वर्तणुकीचा विचार करत असतो, तेव्हा आपल्या मेंदूचा आठवणी साठवून ठेवणारा भाग एकदम ॲक्टिव्ह होतो.

"शाळेतल्या त्या सगळ्या जुन्या आठवणी आपण आजही नकळत सतत समोर आणत असतो."

शाळेतले ते 'कूल' विद्यार्थी आता कुठे आहेत?

आपल्या शाळेतल्या त्या 'कूल' किंवा भाव खाणाऱ्या मुलांचं पुढे काय झालं असेल, असा विचार आपल्यापैकी कित्येकांच्या मनात कधी ना कधी आलाच असेल. 2015 मधील एका अभ्यासात, अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाचे मानसशास्त्राचे प्राध्यापक जोसेफ ॲलन यांनी याच प्रश्नाचं उत्तर शोधून काढायचं ठरवलं. पण त्यांचे निष्कर्ष एकेकाळी लोकप्रिय राहिलेल्या या मुलांसाठी फारसे चांगले नव्हते.

दक्षिण-पूर्व अमेरिकेतील 13 ते 23 या वयोगटातल्या 184 मुलांचा मागोवा घेत ॲलन यांनी पाहिले की, किशोरवयात लोकप्रियतेच्या मागे धावणारी आणि मोठ्यांसारखा आव आणणारी ही मुले पुढे जाऊन जवळच्या नात्यांमधील समस्या, इतकंच नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याचा धोकाही त्यांच्यात जास्त दिसून आला.

लहान वयातच दारू किंवा अमली पदार्थांची लागलेली चटक ही पुढे जाऊन व्यसनाधीनतेच्या आणि नशेकडे ओढले जाण्याच्या मोठ्या धोक्याशी जोडलेली आढळली. आणि अगदी कमी वयात केवळ स्टेटस आणि स्वतःच्या लोकप्रियतेवर भर दिल्यामुळे त्यांचे नातेसंबंध घट्ट होऊ शकले नाहीत. त्यामुळेच पुढे चालून मनापासूनची मैत्री किंवा प्रेमाची नाती दीर्घकाळ टिकवून ठेवणं त्यांना जड गेलं.

इतरांकडून नाकारले जाण्याचा अनुभवही मनावर खोल ओरखडे उमटवू शकतो. प्रिन्सटीन यांच्या संशोधनात असं दिसून आलं की, शाळेच्या दिवसांत ज्या मुलांना नेहमी डावललं गेलं, ती मुलं काळाच्या ओघात अधिक खोल नैराश्यात जाण्याची दाट शक्यता होती. त्यांनी असा अंदाज लावला की इथे एक नकारात्मक चक्र काम करत असते. नाकारले गेल्यामुळे व्यक्ती चारचौघांतून स्वतःला मागे खेचून एकटी राहू लागते आणि जितकी ती एकटी पडते, तितकीच 'आपल्याला कोणी स्वीकारत नाही' ही भावना अधिक तीव्र होत जाते.

याउलट शाळेच्या दिवसांत आणि एकंदरीतच आयुष्यात लोकांचे 'आवडते असणे' म्हणजेच चारचौघांनी आपल्याला 'स्वीकारणे' हे पुढे जाऊन यशस्वी करिअर, उत्तम आरोग्य आणि घट्ट नातेसंबंध मिळण्याच्या दृष्टीने सर्वात मोठा संकेत मानले जाते. अगदी बुद्धिमत्ता आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी या गोष्टींपेक्षाही याचा प्रभाव जास्त दिसून येतो.

असे असले तरी ज्यांना कधी नाकारले जाण्याचा अनुभव आला आहे त्यांच्यात काही महत्त्वाच्या गुणांची भर पडू शकते. उदाहरणार्थ- इतरांच्या मनात काय चालले आहे हे ओळखण्यात ते अधिक सक्षम बनतात. किंवा कोणावर अन्याय होत असेल तर ते अधिक संवेदनशीलतेने पाहू शकतात. हीच भावनिक समज पुढे जाऊन वैयक्तिक नाती टिकवण्यासाठी आणि ऑफिस किंवा करिअरच्या जगात मार्ग काढण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

शिवाय मोठे झाल्यावर उत्तम सामाजिक आयुष्य जगण्यासाठी शाळेच्या दिवसांत प्रत्येकाने सगळ्यांचे लाडका किंवा 'स्वीकारलेले' असायलाच हवे असे काही नाही. संशोधनातून हे समोर आलं आहे की, किशोरवयात आपल्यासोबत फक्त 1 किंवा 2 चांगले मित्र असले तरीही ते एका ढालीसारखे काम करते आणि पुढच्या आयुष्यातील नातेसंबंध अधिक मजबूत बनवते.

आपली जुनी मानसिकता बदलणे शक्य आहे

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लहानपणीच्या या अनुभवांचा आपल्यावर किती आणि कसा प्रभाव पडू द्यायचा, हे बदलणे आपल्या स्वतःच्या हातात आहे.

प्रिन्स्टीन यांच्या मते, शाळेच्या दिवसांत डोक्यात पक्के झालेले हे सामाजिक नियम पुढे जाऊन आपल्या वर्तनाचा असा पॅटर्न बनतात जो स्वतःच तशा घटना घडवून आणतो. ते सांगतात, "चारचौघांत जाताना आपल्या मनातल्या सर्वात वाईट भीतीला खतपाणी देणाऱ्या गोष्टींवरच आपण नकळत लक्ष केंद्रित करतो. आणि मग आपणही तसेच वागायला लागतो ज्यामुळे शेवटी अधिक नकारात्मक अनुभवच आपल्या वाट्याला येतात."

हा जुना दृष्टिकोन जाणीवपूर्वक बदलून आपण स्वतःचे अनुभव सुधारू शकतो, असं ते सांगतात. उदाहरणार्थ- एखाद्या मित्राच्या अस्पष्ट बोलण्याने लगेच गैरसमज करून न घेता, 'त्याचा हेतू आपल्याला दुखवण्याचा नव्हता' असा विचार करणे यामुळे पुढे घडणारे प्रसंग आपल्याला नक्कीच अधिक आनंद देऊ शकतात.

लहानपणापासूनच धाडसी, जोखमीच्या गोष्टी करणारी आणि मोठ्यांसारखा आव आणणारी जॉर्जिया, जी एकेकाळी शाळेत स्वतःचा वेगळा रुबाब राखून होती. ती आता सांगते, "माझ्या त्या लहान वयातल्या रूपाचा विचार केला की मला कुठेतरी वाईट वाटतं, कारण इतरांसारखं एक सर्वसामान्य मूल म्हणून जगणं माझ्या कधी वाट्याला आलंच नाही."

ती सांगते की, लहान असतानाच एका मित्राला बेदम मारहाण होताना पाहणे आणि घरातून मिळालेली अपमानास्पद वागणूक, या दोन्ही गोष्टींमुळे तिच्या मनात एकच विचार पक्का बसला होता की, आपल्याला कोणीही त्रास देऊ शकत नाही' हे चारचौघांना दाखवून देण्यासाठी स्वतः आक्रमकपणे वागणेच गरजेचे आहे.

वयाच्या त्या टप्प्यावर कोणाचा पाठिंबा मिळण्याऐवजी शिक्षकांनीच आपल्यावर 'बिघडलेलं मूल' असा लेबल लावला, याचं तिला आजही वाईट वाटतं. ती म्हणते, "या एकाच गोष्टीने माझ्या संपूर्ण करिअरची दिशा ठरवली. आणि आज मी गरजू आणि असुरक्षित लोकांच्या बाजूने इतक्या ठामपणे का उभी राहते, याचं कारणही तोच अनुभव आहे."

दुसरीकडे कॉनी सांगते की, शाळेच्या काळात इतरांनी नाकारल्यामुळे तिच्यात स्वतःचेच नुकसान करून घेण्याची सवय जडत गेली. ती म्हणते, "मला वाटतं अनेक पातळ्यांवर मी स्वतःकडूनच अपेक्षा सोडून दिल्या होत्या. माझ्या वागण्यात स्वतःचे नुकसान करून घेण्याची इतकी सवय जडली होती की लोकांसोबत मैत्री टिकवणंही अशक्य होऊन बसलं होतं." याचा परिणाम म्हणून किशोरवयाच्या शेवटी शेवटी ती एका मोठ्या मानसिक संकटात सापडली, ज्यातून बाहेर पडण्यासाठी तिने पुढच्या काळात खूप मेहनत घेतली.

आज 10 हून अधिक वर्षांनंतर तिला नेमकं काय आवडतं हे तिने शोधून काढले आहे. ज्यात तिची स्वतःची कला आणि समाधान देणारे करिअर समाविष्ट आहे. आणि आता शाळेच्या त्या दिवसांची आठवणही तिला फार क्वचितच येते, असं ती आवर्जून सांगते.

शाळेच्या दिवसांत आपल्यावर जे लेबल लागले, ते म्हणजे काही आयुष्यभराची शिक्षा नव्हे. कॉनी आणि जॉर्जिया या दोघींचे आयुष्य या गोष्टीची साक्ष देते.

प्रिन्स्टीनही या मताशी सहमत होत सांगतात की, "लोक या जुन्या चौकटी नक्कीच पूर्णपणे बदलू शकतात. खरी अडचण ही आहे की आपण याबद्दल फारसे उघडपणे बोलतच नाही. आणि त्यामुळेच आपण पुन्हा पुन्हा त्याच जुन्या चुका आणि वागण्याचे पॅटर्न नकळत चालू ठेवतो."

(येथे उल्लेख केलेली नावं बदलली आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)