फुटबॉल सामन्यात गोलरक्षकासोबत जोरदार धडक, 30 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू

ज्येसुस डी मिगुएल (उजवीकडे)
फोटो कॅप्शन, ज्येसुस डी मिगुएल ( निळ्या जर्सीत)
    • Author, टिमोथी अब्राहम आणि शॉन किर्न्स
    • Role, बीबीसी स्पोर्ट
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

स्पेनमध्ये फुटबॉलचा सामना सुरू असताना गोलरक्षकासोबत (गोलकीपर) झालेल्या जोरदार धडकेत टेनेरिफ संघाचा स्ट्रायकर हेसुस डी मिगुएल गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो 30 वर्षांचा होता.

सोमवारी (2 नोव्हेंबर) अँडोराविरुद्ध सामना सुरू असताना डी मिगुएलची गोलरक्षक हेसुस ओवोनोशी जोरदार धडक झाली. यात त्याच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली. या धडकेमुळे गोलरक्षकाला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठवण्यात आलं होतं.

सोमवारी डी मिगुएलची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे सांगण्यात आलं होतं. परंतु, मंगळवारी सकाळी त्याची प्रकृती आणखी खालावली. स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12.30 वाजता) त्याचं निधन झालं.

क्लबने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, "या बातमीने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. आमचं मन दुःखाने भरून आलं आहे. हेसुस डी मिगुएल अलामेडाच्या निधनाची बातमी देताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे."

निवेदनात पुढे म्हटलं आहे, "त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. या दुःखाला हलकं करू शकेल असं काहीही नाही. या दुःखातून त्यांना सावरणं खूप कठीण आहे. या कठीण प्रसंगी आम्ही त्याच्या कुटुंबीयांसोबत, जवळच्या व्यक्तींसोबत आणि टेनेरिफमधील सर्व नागरिकांसोबत आहोत."

क्लबने सांगितलं, "हेसुस डी मिगुएलच्या कुटुंबीयांनी त्यांना मिळालेल्या सर्व संदेशांबद्दल आणि मदतीबद्दल आभार मानले आहेत. त्याशिवाय, या कठीण काळात त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करावा, अशी विनंतीही केली आहे."

खेळाडूंमध्ये शोककळा

बार्सिलोनाचा माजी बचावपटू जेरार्ड पिकेची सहमालकी असलेल्या अँडोरा संघानेही निवेदन जारी करून दुःख व्यक्त केलं आहे.

संघानं म्हटलं आहे, "या घटनेनं आम्हाला खूप दुःख झालं आहे. हेसुस डी मिगुएलच्या कुटुंबीयांचे, सहकाऱ्यांचे, मित्रांचे आणि सीडी टेनेरिफ क्लब यांच्याप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो."

मंगळवारी सकाळी हेसुस डी मिगुएलला भेटण्यासाठी त्याच्या सीडी टेनेरिफ संघातील एक सदस्य रुग्णालयात पोहोचला.
फोटो कॅप्शन, मंगळवारी सकाळी हेसुस डी मिगुएलला भेटण्यासाठी त्याच्या सीडी टेनेरिफ संघातील एक सदस्य रुग्णालयात पोहोचला.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ही घटना घडली, त्यावेळी टेनेरिफ आणि अँडोरा यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत होता. सामन्याचा अतिरिक्त वेळ (इंज्युरी टाइम) संपायला 7 मिनिटे बाकी असताना हा अपघात झाला.

गोलरक्षक ओवोनो लांबून आलेला चेंडू दूर मारण्यासाठी मैदानाच्या मध्यभागी धावला. त्यावेळी त्याच्या गुडघ्याची डी मिगुएलला जोरदार धडक बसल्याचे दिसून आले.

डी मिगुएल मैदानावर बेशुद्ध अवस्थेत पडून होता. वैद्यकीय पथकाने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्याला टेनेरिफच्या एस्टाडिओ हेलिओडोरो रोड्रिगेज लोपेझ स्टेडियममधून रुग्णालयात नेण्यात आलं.

या घटनेमुळे दोन्ही संघांतील खेळाडूंना मोठा धक्का बसला. डी मिगुएलचे अनेक सहकारी रडताना दिसले.

रेफ्रीने ओवोनोला थेट रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठवलं. त्यानंतर सामना रद्द करण्यात आला.

स्पेनमधील मार्कासह इतर माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णवाहिकेत असताना डी मिगुएलला हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात नेत असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सीपीआर देऊन त्याचं हृदय पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला.

टेनेरिफ क्लबने सोमवारी रात्री डी मिगुएलची प्रकृती 'गंभीर असली तरी स्थिर' असल्याचे सांगितलं होतं. परंतु, मंगळवारी सकाळी जारी केलेल्या निवेदनात त्याची मेंदू आणि मज्जासंस्थेची स्थिती आणखी खालावल्याचे सांगण्यात आलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)