तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
8 वर्षांच्या मुलाची 6 वर्षांच्या मुलीला मारहाण; जखमी मुलगी दोन तास वर्गातच पडून राहिली
- Author, नवजोत कौर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
हरियाणातील पंचकुला येथील एका शाळेतल्या वर्गात आत 6 वर्षांच्या मुलीवर 8 वर्षांच्या मुलानं मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकांसह तिघांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, ही घटना 28 ऑक्टोबर 2026 रोजी पंचकुला येथील एका शाळेत घडली.
पोलिसांनी शनिवारी या प्रकरणात ज्युवेनाइल जस्टिस अॅक्ट, 2015 च्या कलम 75 आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 125(बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि चौकीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, पंचकुला येथील या शाळेत 6 वर्षांच्या विद्यार्थिनीवर 28 ऑक्टोबर 2026 रोजी हल्ला करण्यात आला होता.
शाळेत तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचं वय 8 वर्षे असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानं शाळेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत मुलीला मारहाण केली. त्यानंतर मुलगी गंभीर जखमी झाली.
तक्रारदारांचा आरोप आहे की ही घटना शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, इतर कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडली.
शाळेची वेळ संपल्यानंतरही जखमी मुलगी सुमारे दोन तास त्या खोलीतच पडून होती, असाही त्यांचा आरोप आहे.
मुलीच्या वडिलांनी बीबीसीला काय सांगितलं?
मुलीच्या वडिलांनी बीबीसी न्यूज पंजाबीला सांगितलं, "28 ऑक्टोबर रोजी शाळा सुटल्यानंतरही मुलगी सापडली नाही, तेव्हा आम्ही तिला शाळेच्या परिसरात शोधायला गेलो. तिथं कोणालाही ती कुठेय याची कल्पना नव्हती"
"यानंतर एका लहान मुलानंच मला सांगितलं की ती वरच्या एका वर्गखोलीत आहे. मी तिथं गेलो तर मुलगी आत होती आणि खोलीला कुलूप लावलेलं होतं.मग कुलूप उघडून मुलीला बाहेर काढण्यात आलं."
त्यांनी सांगितलं, गंभीर जखमी झालेल्या मुलीवर हल्ल्यानंतर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला चंदिगडच्या पीजीआयमध्ये पाठवण्यात आलं.
माहितीनुसार, तिचा धोका टळला आहे, परंतु तिला अजूनही बरीच दुखापत झाली आहे.
मात्र, या प्रकरणात पीजीआयनं मुलीच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही.
पोलिसांनी काय कारवाई केली?
पंचकुला पोलिसांच्या डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलिस (डीसीपी) अदिती सिंह यांनी जारी केलेल्या व्हीडिओ निवेदनानुसार, "विद्यार्थिनी पीजीआयमध्ये दाखल आहे आणि सध्या धोका टळलेला आहे.
"या प्रकरणात 8 वर्षांचा एक अल्पवयीन विद्यार्थी सहभागी आहे. ज्युवेनाइल जस्टिस अॅक्टअंतर्गत तज्ज्ञांकडून त्याचं मूल्यमापन करण्यात येत आहे. त्याच्या आधारेच पुढील कारवाई केली जाईल."
त्या म्हणाल्या, "मुलीला मारहाण झाल्याच्या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत शाळा व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे."
पंचकुलाचे डीसीपी (क्राइम) अमरिंदर सिंह यांनी सांगितले की भारतीय कायद्यानुसार 8 वर्षांच्या मुलाला शिक्षा दिली जाऊ शकत नाही आणि त्याला तुरुंगातही पाठवलं जाऊ शकत नाही.
अशा प्रकरणांमध्ये मुलाविरोधात दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्याच्या सुधारणा आणि समुपदेशनावर भर दिला जातो.
त्यामुळे या प्रकरणात मुलाची मानसिक स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अमरिंदर सिंह यांनी सांगितलं की ज्युवेनाइल जस्टिस बोर्डाने मुलाला ऑब्झर्वेशन होममध्ये पाठवलं आहे.
शिक्षणमंत्री आणि हरियाणा मानवाधिकार आयोगानं काय सांगितलं?
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हरियाणा सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. शिक्षणमंत्री महिपाल ढांडा यांनी सांगितले की चौकशीत कोणाचाही निष्काळजीपणा समोर आल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
याशिवाय, हरियाणा राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत पंचकुलाच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.
आयोगाने शिक्षकांची ड्युटी, सीसीटीव्ही फुटेज, उपस्थितीची नोंद आणि शाळेने केलेल्या कारवाईचा तपशील मागवला आहे.
आयोगाच्या अध्यक्षा तृप्ती हरिपाल श्योराण यांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि तिच्या प्रकृतीची माहिती घेतली.
हरियाणा मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ललित बत्रा यांनीही शाळेला भेट दिली. त्यांनी सांगितलं की कोणतेही शिक्षक, मुख्याध्यापक किंवा इतर अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आल्यास सरकारकडे कारवाईची शिफारस केली जाईल.
शिक्षण विभागानेही जिल्हास्तरावर एक चौकशी समिती स्थापन केली आहे. तिला दोन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)