तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
सरकारी शाळेत भरवर्गात घुसून 10वीच्या मुलीवर इलेक्ट्रिक करवतीने हल्ला, आंध्र प्रदेशमध्ये नेमकं काय घडलं?
- Author, तुलसी प्रसाद रेड्डी
- Role, बीबीसीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील राप्ताडू येथील सरकारी शाळेत 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर इलेक्ट्रिक करवतीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. आरोपीचा शोध सुरू असल्याचं अनंतपूरचे पोलीस अधीक्षक जगदीश यांनी बीबीसीला सांगितलं.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.
राप्ताडू मंडळाच्या मुख्यालयातील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत ही घटना घडली. वर्ग सुरू असतानाच एक व्यक्ती वर्गात घुसला आणि त्याने या विद्यार्थिनीवर हल्ला केला. तिला वाचवण्याचा प्रयत्न करताना अन्य एक विद्यार्थिनीदेखील जखमी झाली.
जखमी विद्यार्थिनीवर अनंतपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनंतपूरचे जिल्हाधिकारी ओ. आनंद यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थीनीची भेट घेतली.
या विद्यार्थिनीला अधिक चांगले उपचार मिळावेत यासाठी विशेष डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णवाहिकेतून तिला बंगळुरुला हलवण्यात येत असल्याचं रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. मल्लेश्वरी यांनी बीबीसीला सांगितलं.
'इलेक्ट्रिक करवत घेऊन वर्गात शिरला आरोपी'
घटनेची माहिती मिळताच राप्ताडू पोलिसांनी शाळेत धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.30च्या सुमारास 10वीचा वर्ग सुरू असताना एक व्यक्ती झाडे तोडण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक करवत घेऊन शाळेत शिरला आणि त्याने विद्यार्थिनीवर हल्ला केला.
शाळेत दुरुस्तीची कामे सुरू असल्यामुळे हल्लेखोर काही शिक्षक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामगार वाटला. त्यामुळे त्यांनी त्याची चौकशी न करताच त्याला शाळेत प्रवेश दिला, असंही पोलिसांनी सांगितलं.
या हल्ल्यात विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर, गळ्यावर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तिच्या उजव्या हातालाही मोठी दुखापत झाली असून तिला वाचवण्याचा प्रयत्न करणारी आणखी एक विद्यार्थिनीही जखमी झाली असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, दोन्ही गंभीर जखमी विद्यार्थिनींना अनंतपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुख्य पीडित विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर आपत्कालीन विभागात उपचार करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती लक्षात घेता तिला अधिकच्या उपचारांसाठी मंत्री सत्यकुमार यांच्या देखरेखीखाली बंगळुरूला हलवण्यात येत आहे.
बंगळुरूतील मणिपाल रुग्णालयात या विद्यार्थिनीला सर्वोत्तम उपचार देण्याची विनंती मंत्री नारा लोकेश यांनी डॉक्टरांना केली आहे. तसेच विद्यार्थिनीला रुग्णालयात लवकर पोहोचवण्यासाठी 'ग्रीन कॉरिडॉर' उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी कर्नाटक सरकारला केली.
आरोपीबाबत पोलिसांनी काय सांगितलं?
या हल्ल्यातील आरोपीचे नाव हेमंत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो श्री सत्यसाई जिल्ह्यातील धर्मवरम मंडळाच्या नागुलूर परिसरातील रहिवासी आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
ते म्हणाले, "प्राथमिक तपासात आरोपी हा पीडित विद्यार्थिनीचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थिनी शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब नोंदवून, त्यांच्यात काही प्रेमसंबंध होते किंवा अन्य काही वाद होता का, याचा तपास केला जाईल. हल्ल्यानंतर आरोपी शाळेतून पळून गेला. मात्र, पोलिसांनी त्याला धर्मावरम रेल्वे स्थानकाजवळून ताब्यात घेतलं असल्याची माहिती खोटी आहे", असंही त्यांनी सांगितलं.
'आमची मुलगी खूप साधी आहे'
या घटनेमुळे पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
इलेक्ट्रिक करवत घेऊन एक व्यक्ती शाळेच्या आवारात शिरला आणि थेट वर्गात जाऊन विद्यार्थिनीवर हल्ला करेपर्यंत शाळेतील सुरक्षा व्यवस्था काय करत होती, असा प्रश्न पीडित विद्यार्थिनीच्या मावशीनी उपस्थित केला.
त्या म्हणाल्या, "तिच्यावर कोणी आणि कसा हल्ला केला, हे आम्हाला अजून समजलेलं नाही. आमची मुलगी खूप साधी आहे. ती सकाळी 08.30 वाजता शाळेत जाते. ही घटना शाळेतच घडली. तिच्या गळ्यावर, पायांवर आणि हातांवर जखमा झाल्या आहेत. आता आम्ही तिला एका मोठ्या रुग्णालयात आणले आहे."
"आमची मुलगी अय्यावरिपल्लीहून रोज ऑटोने शाळेत येते. आरोपीही त्याच गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. मग तो लाकूड कापण्याची मशीन घेऊन शाळेत घुसला, तेव्हा तिथे सुरक्षा कर्मचारी नव्हते का?", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
'हल्ल्यावेळी शाळेत फक्त 5 शिक्षक होते'
"दुसऱ्या तासाच्यावेळी एक व्यक्ती वर्गात घुसला. तो एकटाच आला आणि त्याने अचानक हल्ला केला. त्यामुळे विद्यार्थी घाबरून पळाले. त्यांना काय करावे हे सुचत नव्हते," असे वर्गशिक्षिका राजेश्वरी यांनी सांगितले.
राप्ताडू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका राजेश्वरी यांनी सांगितले की, त्यावेळी शाळेत फक्त 5 शिक्षक होते.
"वर्ग चालू होता. मुले किंचाळत बाहेर आली. त्यावेळी नक्कीच काहीतरी घडले आहे, असे आम्हाला वाटले. जेव्हा आम्ही वर्गात गेलो, तेव्हा आम्ही पाहिले की ती मुलगी गंभीर जखमी झाली होती. तो मुलगा पळून गेला होता. आम्ही त्या मुलीला रुग्णालयात नेले. ती एक हुशार विद्यार्थिनी होती. हल्लेखोराला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या पायाला दुखापत झाली. आम्ही त्या मुलीलाही रुग्णालयात नेले," अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू काय म्हणाले?
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले, "राप्ताडू झेडपी हायस्कूलमध्ये इयत्ता 10 वीच्या विद्यार्थिनीवर तिच्या वर्गातच झालेल्या क्रूर हल्ल्यामुळे मी अत्यंत अस्वस्थ आणि संतप्त आहे. ज्या हल्लेखोरांनी शाळेच्या आवारात तरुण मुलींना लक्ष्य केले, त्यांना आपल्या समाजात अजिबात स्थान नाही."
"मी स्वतः तिच्या प्रकृतीच्ये सुधारणेवर लक्ष ठेवून आहे आणि वैद्यकीय पथकाला तिला सर्वोच्च प्राधान्याने उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. या कृत्याला जबाबदार असलेल्या नराधमाला शोधून काढावे आणि त्याला लवकरात लवकर कठोर कायदेशीर शिक्षा द्यावी, असे आदेश मी पोलिसांना दिले आहेत", असंही त्यांनी नमूद केलं.
शिक्षणमंत्री नारा लोकेश यांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली.
वर्गात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलींना पाहून अश्रू थांबत नाहीत. सरकार मुली आणि महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. मुलींच्या सुरक्षेची हेळसांड करणाऱ्यांवरही आम्ही कारवाई करू, असा इशारा लोकेश यांनी दिला.
माजी मुख्यमंत्री आणि वाय. एस. आर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबद्दल सरकारला प्रश्न विचारले. एका माणसाने इलेक्ट्रिक करवत घेऊन सरकारी शाळेत प्रवेश केला आणि विद्यार्थीनीवर हल्ला का केला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याऐवजी राजकीय फायद्यांवर लक्ष केंद्रित केल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली.
त्यांनी जखमी विद्यार्थ्यांसाठी तात्काळ आणि उत्तम वैद्यकीय उपचारांची, घटनेच्या पारदर्शक चौकशीची आणि राज्यभरातील शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेच्या पुनरावलोकनाची मागणी केली.
'आता मुलांना शाळेत कसे पाठवणार?'
शाळांमधील मुलांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी कारवाई करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.
"ते रोज अय्यावरिपल्लीहून ऑटोने येतात. सगळे शाळेत होते, तरी शाळेत असं घडत असेल, तर ते काय करत होते? सरकारी शाळेत असं घडत असेल तर आम्ही उद्या सकाळी आमच्या मुलांना शाळेत कसं पाठवणार?" असा प्रश्न स्थानिकांनी विचारला आहे.
पीडितेची भेट घेतलेल्या राप्ताडूच्या आमदार परिताला सुनिथा म्हणाल्या की, दोषीला कठोर शिक्षा दिली जाईल.
"शाळेत अशी घटना घडत आहे हे अत्यंत दुःखद आहे. त्यांनी शाळेत जाऊन करवतीने हल्ला केला हे खूपच वाईट आहे. त्या मुलीसोबतच हल्लेखोराला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्या मुलीलाही मारहाण करण्यात आली. आम्ही यावर गंभीर कारवाई करू," असे परिताला सुनिथा म्हणाल्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)