तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
'लहान भाऊ समजून विषय सोडून द्या', अभिजीत दिपके यांनी दिलजीत दोसांझची माफी मागत काय म्हटलं?
कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझबद्दल केलेल्या टीकेबद्दल जाहीरपणे माफी मागितली आहे.
दिल्लीतील नीट पेपरफुटीनंतर झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान आवाज न उठवल्याबद्दल त्यांनी दिलजीत दोसांझवर टीका केली होती.
शुक्रवारी (30 ऑक्टोबर) संध्याकाळी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या कॉन्सर्टदरम्यान दिलजीत दोसांझने या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर दिपके यांनी माफी मागितली.
दिलजीत दोसांझने दिपके किंवा सीजेपीचे नाव न घेता लढा कसा द्यायचा हे पंजाबींना कोणी शिकवण्याची गरज नाही, असं म्हटलं. तसेच दोसांझ अभिनीत चित्रपट 'सतलुज'ची मंचावर खिल्ली का उडवण्यात आली, असा प्रश्नही विचारला.
यानंतर दिपकेंनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत दिलजीत दोसांझला हा वाद संपवण्याचं आवाहन केलं. मला तुमचा छोटा भाऊ समजून आता हा विषय सोडून द्या, असं लिहित दिलगिरी व्यक्त केली.
दिलजीत दोसांझ नेमकं काय म्हणाला?
कॉन्सर्टदरम्यान नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाबाबत एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर दिलजीतने आपल्या पूर्वीच्या प्रतिक्रियेचे समर्थन केले.
गेल्यावेळी या प्रकरणावर बोलताना त्याने "मी फक्त एक कलाकार आहे", अशी प्रतिक्रिया दिली होती. दिलजीतच्या या विधानावर बरीच टीका झाली होती. टीका करणाऱ्यांमध्ये अभिजीत दिपकेंचाही समावेश होता.
दिलजीत यांच्यावर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप दिपकेंनी केला होता. 'सतलुज'सारख्या राजकीय विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये काम करणारे दिलजीत विद्यार्थी आंदोलनाला मात्र पाठिंबा देत नाहीत, असं दिपकेंचं म्हणणं होतं.
कॉन्सर्टमध्ये दिलजीतने कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव न घेता प्रेक्षकांना उद्देशून म्हटलं, "मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो, कारण मी एक कलाकार आहे. मी शांत आहे, तर मला शांत राहू द्या. मी तुम्हा सर्वांना पाठिंबा देतो. मात्र, पंजाबींना लढा कसा द्यायचा ते शिकवू नका."
तो पुढे म्हणाला, "ज्या चित्रपटाची तुम्ही मंचावर खिल्ली उडवत आहात, त्या जसवंत सिंह खालरा यांच्या चित्रपटासाठी आम्ही बराच काळ संघर्ष केला आहे. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. कुणी आमचा द्वेष करत असेल, तर हरकत नाही. पण माझं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे."
दिलजीत यांच्या या वक्तव्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
'छोटा भाऊ समजून हा वाद संपवून टाका', अशी प्रतिक्रिया अभिजीत दिपकेंनी दिली.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिपकेंनी लिहिलं, "पाजी, जूनमध्ये आम्ही आंदोलन करत होतो, तेव्हा तुमच्या वक्तव्यामुळे मला थोडं वाईट वाटलं होतं. त्यामागे तुमच्याबद्दल माझ्या मनात काही वैयक्तिक राग होता, असं नाही. तर एखाद्या मुद्द्यावर आवाज उठवणारी व्यक्ती म्हणून मी नेहमीच तुमच्याकडे पाहिलं आहे. तुम्ही स्वतःही तसं म्हटलं होतं."
"माझ्याबाबतीत एक गोष्ट सांगायची तर मी नेहमीच तुमचा चाहता राहिलो आहे आणि आजही आहे. आजही मी तुमची गाणी ऐकतो. खरं तर भारतात परतण्यापूर्वी याच वर्षी मे महिन्यात मी शिकागोमधील तुमच्या कॉन्सर्टलाही आलो होतो. केवळ तुमच्या संगीतासाठीच नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मनात असलेल्या आदरापोटीही मी तिथे आलो होतो," असंही दिपके यांनी नमूद केलं.
दिपकेंनी दिलजीत दोसांझची प्रशंसा केली
अभिजीत दिपकेंनी दिलजीत दोसांझच्या धाडसाचे, त्यांच्या अस्सल व्यक्तिमत्त्वाचे आणि आपल्या मुळांशी जोडलेले राहून भारतीय संस्कृतीला जागतिक मंचावर पोहोचवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले.
ते म्हणाले, "कदाचित म्हणूनच तुमच्या वक्तव्यामुळे मला थोडं वाईट वाटलं. कारण माझ्या मनात नेहमीच तुमच्याप्रती मानाचं स्थान आहे. मात्र, एखाद्या मुद्द्यावर झालेल्या मतभेदामुळे किंवा गैरसमजामुळे तुमच्याबद्दलचा माझा आदर आणि कौतुक कमी होणार नाही."
आपल्या पोस्टच्या शेवटी दिपकेंनी सलोख्याचा संदेश देत लिहिलं, "बाकी पाजी, तुमचा छोटा भाऊ समजून माफ करा. शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की, 'गबरू ता वैरी नूं वी मिठा बोलदा, नी तू तां फेर जट्ट दा प्यार गोरिए.' (मी माझ्या शत्रूशीही प्रेमाने बोलतो, मग तू तर माझं प्रेम आहेस.)"
अभिजीत दिपके आणि दिलजीत दोसांझ यांच्यातील नेमका वाद काय होता?
या वादाची सुरुवात जून महिन्यात झाली होती. त्यावेळेस परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि नीट पेपरफुटीविरोधात जंतरमंतरवर आंदोलन सुरू होते. मात्र, दिलजीत दोसांझने या आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवलं होतं.
इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान एका चाहत्याने दिलजीतला या आंदोलनात सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर दिलजीतने, "मला या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवा. मी एक कलाकार आहे, मित्रा.. मी काही राजकारणी नाही. तुम्ही मला नेमकं काय समजता, तेच कळत नाही," असं उत्तर दिलं होतं.
यानंतर दिलजीतने गुरु ग्रंथ साहिबमधील एका ओळीचा उल्लेख केला होता. "नानक दुखिया सब संसार, सो सुखिया जिस नाम आधार." (म्हणजेच, संपूर्ण जग दुःख, चिंता आणि संकटांनी वेढलेलं आहे. ज्याने ईश्वराला आपल्या जीवनाचा आधार बनवलं, तोच खरा सुखी आहे.)
दिलजीत म्हणाला होता, "पाहा, या जगात सगळंच कधीच योग्य असू शकत नाही. त्यामुळे जे लोक आंदोलन करत आहेत, त्यांना शुभेच्छा आणि ज्यांच्यासाठी आंदोलन केलं जात आहे, त्यांनाही शुभेच्छा. कारण मला याबद्दल काहीच माहिती नाही."
दिलजीतच्या या प्रतिक्रियेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. 2020 मधील शेतकरी आंदोलनावेळी दिलजीतने घेतलेल्या भूमिकेशी त्याच्या आताच्या प्रतिक्रियेची तुलना करण्यात आली होती. त्यावेळी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलजीतने जाहीरपणे पाठिंबा दिला होता. पुढे हे कायदे मागे घेण्यात आले होते.
दरम्यान, मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या जीवनावर आधारित 'सतलुज' हा चित्रपट काही काळासाठी झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, नंतर तो हटवण्यात आला.
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) कथितरित्या प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे चित्रपटाला प्रदर्शित व्हायला जवळपास 3 वर्षं लागली.
या चित्रपटात जसवंत सिंह खालरा यांची कथा मांडण्यात आली आहे. 1980 च्या दशकाच्या अखेरीस आणि 1990 च्या सुरुवातीला पंजाबमध्ये कथित बेकायदेशीर हत्या आणि गुप्तपणे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची प्रकरणं उघडकीस आणली होती.
राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता आणि या चित्रपटाचा वापर देशविरोधी घटकांकडून केला जाऊ शकतो, असे कारण देत सरकारने हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)