जेव्हा सेहवाग म्हणाला, 'षटकार मारायचा', तेव्हा क्षेत्ररक्षकाला पुढे बोलावणारा इंझमाम-उल-हक

    • Author, रशीद शकूर
    • Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार
    • Reporting from, कराची
  • Published
  • वाचन वेळ: 10 मिनिटे

विचार करा, वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी एखाद्या तरुण क्रिकेटपटूला किती वाईट वाटलं असेल, जेव्हा त्याच संघातील एका वरिष्ठ खेळाडूने त्याला शिवीगाळ करत, 'तू केवळ शिफारशीमुळे संघात आला आहेस,' असं सुनावलं होतं.

पण त्यानंतर अवघ्या काही दिवसांत याच तरुण क्रिकेटपटूने शानदार फलंदाजी करत आपल्या संघाला थेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवलं. ही गोष्ट दुसऱ्या कोणाची नसून इंजमाम-उल-हकची आहे. हा सगळा प्रकार 1992 च्या विश्वचषकादरम्यान घडला होता.

याच विश्वचषकात इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने विजेतेपद मिळवलं होतं. इंजमाम-उल-हकने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात 60 धावा, तर अंतिम सामन्यात 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

या खेळींमधून इंजमाम-उल-हक हा त्या काळातील सर्वोत्तम युवा फलंदाज आहे, हे इम्रान खान यांचं वक्तव्य खरं ठरलं. मग असं काय घडलं की, पाकिस्तान संघातील एका वरिष्ठ खेळाडूने इंजमामवर शिफारशीमुळे संघात आल्याचा आरोप केला आणि त्याला शिवीगाळ केली?

'शिफारशीमुळे संघात आलास', वरिष्ठाचे टोमणे

इंजमाम-उल-हकने मला एका मुलाखतीत हा प्रसंग सांगितला, तेव्हा मीही विचारात पडलो. असंही काही घडू शकतं, यावर माझा विश्वासच बसत नव्हता.

इंजमामने सांगितलं, "विश्वचषकात पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धचा साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकला होता. त्या सामन्यात मला केवळ 5 धावा करता आल्या होत्या."

"त्यानंतर आम्ही सर्व खेळाडू आनंदी मूडमध्ये आंघोळ करत होतो. त्याच वेळी संघातील एक वरिष्ठ क्रिकेटपटू अचानक माझ्याजवळ आले आणि मला शिवीगाळ करू लागले. त्यांचं नाव घेणं मला योग्य वाटत नाही. ते मला म्हणाले, 'तू शिफारशीमुळे संघात आला आहेस.' त्यांचं हे बोलणं मला इतकं लागलं की, शॉवरखाली उभा राहून मी बराच वेळ रडत होतो."

इंजमाम म्हणतो, "मी विचार करत होतो की, नेमक्या कोणत्या शिफारशीमुळे माझी संघात निवड झाली होती?"

"विश्वचषकात खेळायला येण्याआधी मी श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2 शतके झळकावली होती. पाकिस्तानमधील दोन देशांतर्गत हंगामांतही मी 10 शतकं केली होती."

"त्या वरिष्ठ क्रिकेटपटूबद्दल माझ्या मनात आजही खूप आदर आहे. पण इतकी वर्षे उलटून गेली, तरी त्यांनी बोललेले ते शब्द मी विसरू शकलेलो नाही."

त्याच विश्वचषकातील आणखी एक प्रसंगही इंजमामच्या लक्षात आहे.

या घटनेवरून समजतं की, संघात नव्याने आलेल्या खेळाडूचे काही वरिष्ठ खेळाडू सहजपणे स्वागत करत नाहीत. काही वेळा त्यांच्या वागण्यातून मत्सरही दिसून येतो.

इंजमाम सांगतो, "विश्वचषकादरम्यान पाकिस्तानचा संघ एका मेजवानीला गेला होता. तिथे इम्रान खान यांनी माझ्याकडे बोट दाखवत आयोजकांना म्हटलं होतं की, हा तरुण अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे."

"ते म्हणाले, मला खात्री आहे की ज्या दिवशी याची बॅट चालेल, त्या दिवशी हा आपल्याला सामना जिंकून देईल."

"मला आजही आठवतं, इम्रान खान यांचं हे बोलणं काही क्रिकेटपटूंना आवडलं नव्हतं. त्यांनी माझ्याकडे अत्यंत रागानं पाहिलं होतं."

हे फार कमी लोकांना माहीत असेल की, विश्वचषकासाठी संघ निवडताना एका निवडकर्त्याचा इंजमामला संघात घेण्याला तीव्र विरोध होता.

त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता.

परंतु, इम्रान खान इंजमामच्या फलंदाजीमुळे प्रभावित झाले होते. कोणत्याही परिस्थितीत त्याला संघात घ्यायचं, असा इम्रान यांचा आग्रह होता.

इंजमाम यांच्यावर इम्रान खान यांचा किती विश्वास होता, हे ज्येष्ठ भारतीय क्रीडा पत्रकार अयाझ मेमन यांच्या बोलण्यातूनही समजतं.

दमदार फलंदाजीमुळे इंजमाम चर्चेत

अयाझ मेमन यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं, "1992 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी आम्हाला इंजमाम-उल-हकबद्दल फारशी माहिती नव्हती. पण न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने शानदार फलंदाजी केली आणि तो चर्चेत आला."

"अंतिम सामन्यापूर्वी मेलबर्नमध्ये आम्ही इम्रान खानला भेटलो होतो. तेव्हा त्यांनी सांगितलं की, इंजमाम हा सध्या जगातील सर्वोत्तम युवा क्रिकेटपटू आहे. आम्हाला वाटलं की कर्णधार त्याचं जरा जास्तच कौतुक करत आहे. कारण तोपर्यंत इंजमामने फारसे सामने खेळले नव्हते."

"परंतु, अंतिम सामन्यात त्याने जेव्हा 42 धावांची महत्त्वाची खेळी केली आणि आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली. तेव्हा आम्हाला त्याच्या प्रतिभेची खरी जाणीव झाली."

अयाझ मेमन पुढे म्हणाले, "त्याच्यात प्रतिभेसोबतच खेळासाठी आवश्यक असलेला संयमही मला दिसून आला."

"त्यावेळी सचिन तेंडुलकर हाही एक गुणवान आणि जागतिक दर्जाचा फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावारुपास आला होता. त्याचाही तो पहिलाच विश्वचषक होता."

"प्रत्येक खेळाडूची स्वतःची वेगळी ओळख आणि स्थान असतं. दोघांचीही कारकीर्द खूप चांगली राहिली आणि त्यांनी अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं."

भारतीय क्रिकेटपटूंनाही इंजमामबद्दल आदर

इंजमामच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैदानावर जोरदार चुरस पाहायला मिळत असत.

परंतु, मैदानाबाहेर दोन्ही देशांच्या खेळाडूंच्या मनात एकमेकांबद्दल आदर आणि आपुलकीची भावना होती.

या बाबतीत इंजमामचं स्थान वेगळं होतं. त्याच्याविरुद्ध खेळणारे भारतीय क्रिकेटपटू त्याचा खूप आदर करत असत. इंजमामच्याही मनात भारतीय खेळाडूंबद्दल असाच आदर होता.

2004 च्या मालिकेदरम्यान घडलेला तो प्रसंग कोण विसरू शकेल? इंजमाम आपल्या मुलाला, इब्तिसाम-उल-हकला सचिन तेंडुलकरची भेट घडवून आणण्यासाठी स्टेडियममध्ये घेऊन गेला होता.

त्याने सचिनला म्हटलं होतं, "हा मुलगा तर माझा आहे, पण चाहता तुझा आहे."

सचिन तेंडुलकरने एका वाहिनीवरील कार्यक्रमात या प्रसंगाचा उल्लेख केला होता.

त्यानं असंही म्हटलं होतं की, इंजमाम हा त्याच्यासाठी नेहमीच एक आदरणीय क्रिकेटपटू राहिला आहे.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानेही एका कार्यक्रमात इंजमामसमोरच त्याचं भरभरून कौतुक केलं होतं.

तो म्हणाला होता, "इन्जीभाई आमच्याविरुद्ध खेळताना शतकापेक्षा कमी धावा करण्याचा विचारच करत नसत. तो जणू झोपेतून उठून यायचा आणि सहज शतक ठोकायचा. शतक करणं ही त्याच्यासाठी काही मोठी गोष्टच नव्हती, असं वाटायचं."

भारताचा आणखी एक माजी कर्णधार राहुल द्रविडनेही आयपीएलच्या एका कार्यक्रमात इंजमामचं कौतुक केलं होतं. तो म्हणाला होता की, इंजमाम हा जगातील मधल्या फळीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होता.

इंजमामपेक्षा मोठा मधल्या फळीतील फलंदाज दुसरा कोणी नव्हता, असं त्याचं मत होतं.

राहुल द्रविडने सांगितलं होतं की, 2004 मध्ये कराची येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात इंजमामने भारताविरुद्ध शतक झळकावलं होतं. त्या खेळीचे रेकॉर्डिंग त्याने हॉटेलमध्ये परतल्यानंतर तब्बल 3 वेळा पाहिले होते.

वीरेंद्र सेहवागनेही एका टीव्ही कार्यक्रमात इंजमामला आशियातील मधल्या फळीतील सर्वोत्तम फलंदाज म्हटलं होतं. याच कार्यक्रमात त्याने मैदानावर इंजमामसोबत घडलेला एक मजेशीर प्रसंगही सांगितला होता.

त्याने सांगितलं, "मी दानिश कनेरियाच्या गोलंदाजीवर फलंदाजी करत होतो. तेव्हा मी इंजमामला म्हणालो, 'इन्जीभाई, सीमारेषेवर उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाला थोडं पुढे बोलवा. मला षटकार मारायची इच्छा झाली आहे.'"

"त्यावर इंजमामने त्या क्षेत्ररक्षकाला पुढं बोलावलं. त्यानंतर मी पुढच्याच चेंडूवर षटकार मारला. त्यामुळे कनेरिया खूप नाराज झाला होता."

अशा घटनांवरून भारतीय क्रिकेटपटूंमध्ये इंजमाम किती लोकप्रिय होता, हे लक्षात येतं.

इंजमामने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 1992 च्या विश्वचषकानंतर इंग्लंड दौऱ्यावर त्याला उसळते चेंडू खेळताना अडचण येत होती.

त्यावेळी सुनील गावस्कर त्याच्यासोबत इंग्लंडमध्ये एका चॅरिटी सामन्यात खेळत होते. इंजमामने त्यांच्याकडे मदत मागितली.

इंजमामच्या म्हणण्यानुसार, सुनील गावस्कर यांनी दिलेल्या सल्ल्याचं पालन केल्यामुळे त्याची ही अडचण दूर झाली होती.

कसं होतं इंजमामचं बालपण?

आता इंजमामच्या बालपणाबद्दल आपण जाणून घेऊया. त्याचे सुरुवातीचे दिवस कसे होते, हे समजून घेण्यासाठी मी काही काळापूर्वी त्याचे वडील, शाळेतील शिक्षक आणि मित्रांशी संवाद साधला होता.

इंजमामचे वडील पीर इंतजाम-उल-हक यांनी मला सांगितलं होतं, "इंजमाम भावंडांमध्ये सर्वात लहान होता. त्यामुळे तो सर्वांचा लाडका होता. तरी तो खूप आज्ञाधारकही होता."

"भाऊ इंतिसार-उल-हक याच्याशी त्याचे छोटे-मोठे खटके उडायचे. पण मस्करी करतानाही ते एकमेकांशी मर्यादा पाळत."

ते पुढे म्हणाले "माझा मोठा मुलगा इंतजार-उल-हक इंजमामच्या क्रिकेटकडे नेहमी लक्ष देत असत. तो त्याला क्लब क्रिकेट खेळायला घेऊन जात असे. इंजमाम मुलतानमध्ये क्लब क्रिकेट खेळत होता, तो काळही मला आठवतो. तेव्हा त्याच्या संघाच्या प्रभारी व्यक्तीने मला म्हटलं होतं, 'पीर साहेब, हा खूप चांगलं क्रिकेट खेळतो. पण इथे त्याची प्रतिभा वाया जाईल. त्यामुळे त्याला लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून द्या.'"

"त्यानंतर मी इंजमामला तिथे पाठवलं. तिथे त्याने चांगली फलंदाजी केली आणि मग त्याची प्रगती होत गेली."

'अक्षर वाईट, पण फलंदाजी दमदार'

इंजमामच्या शाळेतील शिक्षक मोहम्मद हाशिम खान यांनी मला सांगितलं होतं, "अभ्यासात इंजमाम फार हुशार विद्यार्थी नव्हता. त्याचे अक्षरही चांगलं नव्हतं. पण, तो शिक्षकांचा खूप आदर करत असे."

"त्याला क्रिकेटची खूप आवड होती. एके दिवशी आमचे मुख्याध्यापक वसीम अहमद यांनी इंजमामचे मजबूत हात पाहिले."

"ते म्हणाले की, तुझी बॅटवरची पकड चांगली आहे. तू एक चांगला फलंदाज होऊ शकतोस. त्यानंतर इंजमाम शाळेच्या संघाकडून खेळू लागला."

मुस्लीम हायस्कूल आणि जिल्हा क्रीडा मैदान यांच्यामध्ये केवळ एकच रस्ता होता.

या मैदानाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला मुलतानचे लोक 'चाचा बरकत' म्हणून ओळखत असत.

मी त्यांना भेटलो, तेव्हा त्यांचं वय 70 वर्षांपेक्षा जास्त झालं होतं. पण इंजमाम यांच्या बालपणाचा विषय काढताच ते एखाद्या लहान मुलासारखे आनंदी आणि उत्साही झाले.

चाचा बरकत यांनी मला सांगितलं, "इंजमाम रोज शाळा सुटल्यानंतर मैदानावर यायचा आणि आम्हाला खेळू देण्याची विनंती करायचा."

"त्यावेळी इंजमाम खूप लहान होता. त्यामुळे त्याच्यापेक्षा मोठी मुलं त्याला फलंदाजीची संधी द्यायला टाळाटाळ करायचे. पण तरीही त्याची क्रिकेट खेळण्याची आवड कमी झाली नाही."

"लहानपणीही इंजमाम थोडा जाडजूड होता, पण त्याचा खेळ खूप चांगला होता."

शालेय क्रिकेटच्या काळात इलियास पीरू हे इंजमामच्या संघाचे कर्णधार होते.

इलियास सांगतात, "इंजमाम अष्टपैलू खेळाडू होता. तो फलंदाजीत अप्रतिम कामगिरी करायचा. ज्या दिवशी त्याची बॅट चालायची नाही, त्या दिवशी डावखुऱ्या गोलंदाजीच्या जोरावर संघाला सामना जिंकून द्यायचा."

इंजमामला जगभरात एक दर्जेदार फलंदाज म्हणून ओळख मिळाल्यानंतर इलियास पीरू त्याला भेटायला गेले होते. तो प्रसंग त्यांना आजही स्पष्टपणे आठवतो.

इंजमामच्या घरी आलेल्या पाहुण्यांनी त्याला इलियास यांची ओळख करून देण्यास सांगितलं.

त्यावर इंजमाम म्हणाला, "हा माझ्या शाळेच्या दिवसांतील कर्णधार आहे."

हे ऐकून इलियास यांना खूप आनंद झाला. कारण इंजमाम आपले जुने दिवस विसरला नव्हता.

मित्रांसाठी ऑम्लेट बनवायचा

इंजमामचा विनोदी स्वभाव खूप प्रसिद्ध आहे. पत्रकार परिषदांमध्येही त्याने अनेकदा त्याची झलक दाखवली आहे. पण मित्रांमध्ये असताना त्याचे रूप पूर्णपणे वेगळे असायचे.

इंजमाम आणि मुजतबा खोखर यांची मैत्री खूप जुनी आणि घट्ट होती. मुजतबा हे सलून चालवत असत आणि लोकांचे केस कापत असत. पण त्यांच्या या व्यवसायाचा त्यांच्या मैत्रीवर कधीही परिणाम झाला नाही.

काय ते दिवस होते, इंजमाम आणि मुजतबा रात्रभर एकत्र बसून गप्पा मारायचे. यावेळी इंजमाम ऑम्लेट बनवायचा, तर मुजतबाकडे रोटी बनवण्याची जबाबदारी असायची.

विश्वचषक जिंकल्यानंतर इंजमाम मुलतानला परतला, तेव्हा मुजतबा त्याच्या स्वागतासाठी गेले नव्हते.

पण इंजमामचा मोठेपणा पाहा. त्याच्या स्वागतासाठी निघालेला ताफा मुजतबाच्या दुकानासमोरून जात असताना त्याने गाडी थांबवली आणि स्वतः जाऊन मुजतबाची भेट घेतली.

हाशिम खान, चाचा बरकत आणि मुजतबा खोखर हे तिघेही आता हयात नाहीत. मुजतबा खोखर यांचं फेब्रुवारी 2024 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं.

झोपेची आवड आणि विसरभोळा स्वभाव

पाकिस्तानच्या प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये इसहाक पटेल हे एक प्रसिद्ध नाव आहे.

त्यांनी अनेक क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले होतं. त्यावेळी या खेळाडूंना कोणी ओळखतही नव्हतं. इंजमाम हाही त्यांच्यापैकीच एक होता.

इसहाक पटेल यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं, "त्यावेळची गोष्ट आहे. इंजमाम अंडर-19 क्रिकेट खेळत होते. तेव्हा मी त्याला युनायटेड बँक लिमिटेडच्या (यूबीएल) संघात खेळण्याची ऑफर दिली. पण मी मस्करी करत आहे, असंच त्याला वाटलं."

"मी त्याला कराचीला बोलावून घेतलं आणि माझ्या घरी राहण्याची व्यवस्था केली. तिथे तो यूबीएलच्या संघाकडून खेळण्यासोबतच मियां अजमत प्रोफेशनल क्लबकडूनही क्लब क्रिकेट खेळत होता. त्या क्लबची जबाबदारी माझ्याकडे होती."

इसहाक पटेल सांगतात, "त्या काळात रमजानच्या महिन्यात कराचीमध्ये भरपूर क्रिकेट खेळले जायचे. इंजमाम सलग 3 वर्षे रमजानमध्ये होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळला. स्पर्धा संपली की, तो ईद साजरी करण्यासाठी आपल्या गावी परत जायचा."

"एका स्पर्धेत त्याला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' हा पुरस्कारही मिळाला होता. बक्षीस म्हणून त्याला लंडनला जाण्या-येण्याचे विमानाचे तिकीट मिळाले होते."

इसहाक पटेल सांगतात, "इंजमाम झोपेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नसत. रमजानच्या महिन्यात अनेकदा त्याला पहाटेच्या जेवणासाठी (सहरी) उठवता उठवता फजरची अजान व्हायची, तरीही तो उठत नसत. मात्र, काहीही न खाता-पिता तो रोजा पाळत असत."

"इंजमामला गोष्टी विसरण्याचीही सवय होती. एकदा कपड्यांना इस्त्री करण्यासाठी त्याने फ्रीजचं प्लग काढलं. पण कपड्यांना इस्त्री केल्यानंतर ते प्लग पुन्हा लावायला तो विसरला."

"त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेला सगळा बर्फ वितळला आणि घरातल्या फरशीवर पाणीच पाणी झालं. अनेकदा तो कुठे गेला की घराची चावी तिथेच विसरून परत यायचा. पण, या सर्व गोष्टी असल्या तरी इंजमाम मोठ्यांचा आदर करणारा तरुण होता."

क्रिकेटपटूंशी जुनी मैत्री

क्रिकेटपटूंमध्ये इंजमामची सर्वांत जुनी मैत्री लेग स्पिनर मुश्ताक अहमद याच्याशी होती.

ते अंडर-14 क्रिकेट खेळत होते तेव्हाच या दोघांची मैत्री सुरू झाली होती. पुढे वकार युनूसही त्यांच्या मित्रांच्या गटात सामील झाला.

मुश्ताक अहमदने बीबीसी न्यूज हिंदीला जुन्या आठवणी सांगताना म्हटलं, "इंजमाम सुरुवातीपासूनच गुणी क्रिकेटपटू होता. त्याचा विनोदी स्वभावही तेव्हापासूनच होता. मात्र, तो प्रत्येकाशी मस्करी करत नसत. ज्या लोकांशी त्याची चांगली ओळख होती आणि ज्यांच्यासोबत तो मोकळेपणाने वागू शकत होता, त्यांच्याशीच तो मस्करी करत असत."

"इंजमामचा विनोदी स्वभाव समजून घ्यायचा असेल, तर त्याला जवळून ओळखणं गरजेचं आहे. क्रिकेटपटू म्हणून त्याला खेळाची चांगली समज होती. तो धावफलक पाहून आपल्या खेळाची दिशा ठरवत असत."

"इंजमामने केलेल्या बहुतेक शतकांमुळे त्याच्या संघाला विजय मिळाला होता. तो नेहमी मोठे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून क्रिकेट खेळायचा. जावेद मियांदाद यांच्या सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची त्याची इच्छा होती आणि त्यासाठी त्याने प्रयत्नही केले. परंतु, काही धावा कमी पडल्याने त्याला हा विक्रम मोडता आला नाही."

"तो कधीही नेट प्रॅक्टिस टाळत नसत. नेटमध्ये तो वकार युनूस, वसीम अक्रम आणि शोएब अख्तर यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांचा सामना करत असत."

"आजकाल अनेक खेळाडू चेंडू लागण्याच्या भीतीने नेट प्रॅक्टिसमध्ये अशा गोलंदाजांचा सामना करणे टाळतात."

"इंजमाम ज्या सहजतेने वेगवान गोलंदाजांचा सामना करायचा, त्याच सहजतेने तो फिरकी गोलंदाजांनाही खेळायचा."

"फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवरही तो आत्मविश्वासाने बॅकफूटवर जाऊन कट, पुल आणि स्वीपसारखे फटके मारत असत."

'इंजमामची संयमी फलंदाजी'

अयाज मेमन सांगतात, "इंजमामची फलंदाजी खूप शांत आणि संयमी असायची. फटके मारण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ असल्यासारखे वाटायचं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, तो फलंदाजी अगदी सोपी करून दाखवायचा. वेगवान गोलंदाजांविरुद्ध तो सुरुवातीपासूनच चांगलं खेळायचा. पण फिरकी गोलंदाजांविरुद्धही त्याची फलंदाजी तितकीच अप्रतिम होती."

"त्याचं व्यक्तिमत्त्व खूप शांत आणि सुसंस्कृत होते. त्याचा विनोदी स्वभावही छान होता. पत्रकार परिषदेत तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हसत-खेळत द्यायचा. दबावाच्या परिस्थितीतही मी त्याला कधी घाबरलेलं पाहिलेलं नाही. मैदानावरही तो कधी कोणाशी गैरवर्तन करताना दिसला नाही."

आंतरराष्ट्रीय पंच अलीम दार यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं, "पंच म्हणून काम करताना तुमचं संपूर्ण लक्ष खेळावर असतं. पण जेव्हा तुम्ही स्क्वेअर लेगला उभे असता, तेव्हा पूर्ण लक्ष कामावर असूनही काही क्षण असे मिळतात, जेव्हा तुम्ही फलंदाज आणि गोलंदाजाकडे पाहू शकता, त्यांचं निरीक्षण करू शकता."

"माझ्या करिअरमध्ये ज्या फलंदाजांची फलंदाजी पाहण्याचा आनंद मला मिळाला, त्यात इंजमामचाही समावेश आहे."

"इंजमामने अनेक संस्मरणीय खेळी केल्या. परंतु, बांगलादेशविरुद्ध मुलतान कसोटीत केलेली 138 धावांची खेळी मी कधीही विसरू शकत नाही. त्या खेळीच्या जोरावर त्याने एकट्याने पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. त्या कसोटी सामन्यात मी टीव्ही पंच म्हणून काम पाहत होतो," असं ते नमूद करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)