रामायण : चेहऱ्यांवरील मुरुमांसह सिनेमात पदार्पण करणारी साई पल्लवी सीतेच्या भूमिकेमुळे का होतीये ट्रोल?

    • Author, नंदिनी वेल्लास्वामी
    • Role, बीबीसी तमीळ
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्यातील कलाकारांची निवड आणि चित्रपटाचं बजेट यांसह अनेक मुद्दे सातत्याने चर्चेत आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर श्रीरामांच्या, यश रावणाच्या, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहेत.

चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीची निवड का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली.

'एक्स'सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी याबद्दलच्या पोस्ट लिहिल्या आहेत.

'सीतेऐवजी साई पल्लवीला दुसऱ्या कोणत्या तरी भूमिकेत घेता आलं असतं,' अशा उपरोधिक तसंच विनोदी कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.

साई पल्लवी सीतेच्या भूमिकेसाठी योग्य नसल्याचं काही जणांनी म्हटलं तर रामायणावर आधारित मालिका आणि चित्रपटांमध्ये यापूर्वी काम केलेल्या अभिनेत्री या भूमिकेसाठी अधिक योग्य ठरल्या असत्या, अशाही प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

या सगळ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर साई पल्लवीचे जुने चित्रपट, तिचं सौंदर्य आणि मेकअपबद्दल तिने केलेल्या काही विधानांची पुन्हा चर्चा व्हायला लागली.

साई पल्लवीशी संबंधित या वादाबद्दल जाणून घेण्यापूर्वी तिच्याबद्दल जाणून घेऊया.

चेहऱ्यावरील मुरुमांसह पदार्पण करणारी अभिनेत्री

साई पल्लवी तिच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका तसंच कमीत कमी किंवा अजिबात मेकअप न करण्यासाठी ओळखली जाते.

तामिळनाडूतल्या कोइंबतूरमध्ये जन्मलेल्या आणि तिथेच लहानाच्या मोठ्या झालेल्या साई पल्लवीने जॉर्जियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलं. तिचे वडील पदुकर समाजातील आहेत. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, तिचे वडील पदुकर भाषा बोलतात, तर तिची आई तामिळ भाषक आहे.

अनेकजण आपल्याला चुकून मल्याळी समजत असल्याचंही तिने सांगितलं होतं.

2008 मध्ये एका तामिळ टीव्ही चॅनेलवरील नृत्याच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर साई पल्लवी चर्चेत आली. तिने तेलुगूमधील एका डान्स शोमध्येही भाग घेतला होता. नृत्यामुळेच तिला चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याची संधी मिळाली. अनेक मुलाखतींमध्ये तिने आपली नृत्याविषयीची आवड व्यक्त केली आहे.

आजही साई पल्लवीच्या अनेक गाजलेल्या डान्स परफॉर्मन्सची चर्चा होते. विशेषतः 'मारी 2' या चित्रपटातील धनुषसोबतचं 'राउडी बेबी' हे गाणं तिच्या डान्स परफॉर्मन्समुळे गाजलं होतं. 'श्याम सिंघा रॉय' या तेलुगू सिनेमात साई पल्लवीने देवदासीची भूमिका साकारली होती. त्यातही तिचं नृत्यकौशल्य ठळकपणे समोर आलं होतं.

केवळ नृत्यच नव्हे, तर साई पल्लवीने निवडलेल्या भूमिका आणि त्यांचं स्वरूपही व्यावसायिक चित्रपटांतील ठराविक साच्यापेक्षा वेगळं असल्याचं दिसून येतं.

सुरूवातीला काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्यानंतर अल्फोन्स पुथ्रेन दिग्दर्शित 'प्रेमम' या मल्याळम सिनेमात साई पल्लवीला प्रमुख भूमिका मिळाली. 2015 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट साई पल्लवीच्या करिअरमधला पहिला हिट ठरला. चेहऱ्यावर मुरुम असतानाही मेकअप न करताच पडद्यावर दिसलेल्या साई पल्लवीची 'मलर' ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली.

साई पल्लवीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'प्रेमम' हा चित्रपट चेन्नईमध्ये जवळपास 300 दिवस चालला होता.

पत्रकार बरखा दत्त यांच्याशी झालेल्या चर्चेत तिने म्हटलं होतं, "प्रेमम प्रदर्शित झाला, तेव्हा लोक माझी तुलना सिमरन, त्रिशाशी करतील आणि मी त्यांच्यासारखी दिसत नसल्यामुळे माझ्यावर टीका करतील, अशी भीती मला वाटत होती. पण लोकांनी मला आहे तसं स्वीकारलं, याचा मला आनंद आहे. हा मल्याळम चित्रपट असल्यामुळे लोकांनी माझे केस आणि माझा चेहरा एवढं पुरेसं असल्याचं म्हटलं.

'प्रेमम' प्रदर्शित झाल्यानंतर साई पल्लवीने अनेक मुलाखतींमध्ये मेकअप न करता किंवा अगदी कमी मेकअप करून अभिनय करण्याबद्दल सविस्तर भाष्य केलं.

'तुम्ही मेकअप का करत नाही?'

2022 मध्ये एका ऑनलाइन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत साई पल्लवीने मेकअप न करण्यामागचं कारण सांगितलं होतं.

तिने म्हटलं होतं, "लोक मला मेकअपबद्दल विचारतात, तेव्हा मला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. मी एक सामान्य मुलगी आहे. माझ्या चेहऱ्यावर मुरुम आहेत. मलाही काही गोष्टींचा गंड किंवा भीती असू शकते. 'प्रेमम' चित्रपटानंतर काही दिग्दर्शकांनी मला थोडासा मेकअप करण्यास सांगितलं. पण मेकअप करून अभिनय केल्यानंतरही ते म्हणायचे की, मी मेकअप न करताच अभिनय केल्याचं स्पष्ट दिसतं. विशेषतः, मला राग आल्यावर माझे गाल लाल होतात. त्यांना ते आवडायचं. एखाद्याच्या बाह्य रूपावरून त्याच्या सौंदर्याबद्दल मत बनवू नयेत. त्याचं आंतरिक सौंदर्य महत्त्वाचं असतं.

साई पल्लवी आजही फार तर डोळ्यांना आयलायनर लावणं पसंत करते. तिचे डोळे मोठे दिसतात, हे त्यामागचं कारण असल्याचं तिनं सांगितलं आहे.

'विराट पर्वम' या चित्रपटात तर तिने आयलायनरही लावला नव्हता. केवळ चेहरा धुऊन ती कॅमेऱ्यासमोर आली होती.

यामुळे मला अभिनय करताना खूप मोकळं वाटत असल्याचं तिने म्हटलं होतं.

"माझ्या पहिल्या चित्रपटानंतर ('प्रेमम') मला जाणवलं की, तुम्ही किती सुंदर दिसता किंवा कोणते कपडे घालता, हा मुद्दा महत्त्वाचा नसतो. तुम्ही साकारत असलेली व्यक्तिरेखा महत्त्वाची असते. प्रेक्षकांवर सर्वाधिक प्रभाव त्याचाच पडतो," असंही तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

भूमिकांची निवड

साई पल्लवीने ग्लॅमरस, आकर्षक भूमिका साकारण्याबद्दलही वेळोवेळी आपली मतं मांडली आहेत.

याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना साई पल्लवीने म्हटलं होतं, "मला सहज, कम्फर्टेबल न वाटणाऱ्या परिस्थितीत मी स्वतःला पाहू शकेन की नाही हे माहीत नाही."

मुलाखतकाराने तिला असाही प्रश्न विचारला होता की, अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, पण त्यासाठी ग्लॅमरस कपडे घालावे लागले, तर ही संधी नाकारणार का?

त्यावर साई पल्लवीने म्हटलं होतं की, "मी ही संधी नाकारेन की नाही, हे मला माहीत नाही. पण श्रीदेवी त्यांचं सौंदर्य आणि अभिनया यांसाठी ओळखल्या जातात. अशा व्यक्तिरेखेसाठी कोणते, कसे कपडे निवडायचे, याचं स्वातंत्र्य मला मिळेल."

साई पल्लवीने सौंदर्यप्रसाधनांबाबतही वेळोवेळी टीकात्मक मतं मांडली आहेत.

तिने म्हटलं होतं, "फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अनेक जण माझ्या चेहऱ्यावरील मुरुमांबद्दलच बोलायचे. माझी बहीणही रंग उजळावा म्हणून तिला न आवडणारी फळं आणि भाज्या खायची. केवळ त्वचेचा रंग उजळावा म्हणून एवढं करण्याची काय गरज आहे? आरोग्यासाठी फळं आणि भाज्या खाणं चांगलंच आहे. पण त्वचेचा रंग उजळावा म्हणून एखादी व्यक्ती स्वतःला न आवडणाऱ्या गोष्टीही करू लागली, तर ती स्वतःला स्वीकारत नसते. अशा वेळी मी तिच्या पाठीशी उभं राहायला हवं, असं मला वाटलं. 'प्रेमम' चित्रपटानंतर लोकांनीच मला आहे तसं स्वीकारलं. त्यामुळे मला स्वतःबद्दल सहजता वाटते. ही माझी वैयक्तिक निवड आहे."

'गार्गी' आणि 'श्याम सिंघा रॉय' यांसारख्या चित्रपटांमधून स्त्रीकेंद्री भूमिका साकारणाऱ्या साई पल्लवीने व्यावसायिक चित्रपटांमधूनही आपली छाप पाडली आहे.

'मारी 2', 'एनजीके' आणि 'अमरन' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. आता ती 'रामायण' या आगामी चित्रपटात सीतेची भूमिका साकारत आहे.

काही भूमिकांमधला तिचा अभिनय लक्षवेधी ठरला आहे. उदाहरणार्थ- 'गार्गी' चित्रपटात आपल्या वडिलांनी एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समजल्यानंतर तिची व्यक्तिरेखा जी भूमिका घेते, त्यातून अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात.

सीतेची भूमिकेबद्दल काय म्हटलं?

अभिनय आणि व्यक्तिरेखांच्या निवडीबद्दल बोलताना साई पल्लवीने एका मुलाखतीत सांगितलं होतं, "मी आधीपासून तयारी करून अभिनय करण्यापेक्षा उत्स्फूर्तपणे अभिनय करणं पसंत करते. माझ्यासमोरचे कलाकार ज्या पद्धतीने व्यक्त होतात, त्यानुसार माझा अभिनय घडत जातो."

आपला स्वभाव लाजाळू असून आपल्याला शांत राहायला, कमी बोलायला आवडतं; असंही तिने अनेकदा सांगितलं आहे.

साई पल्लवीने काही कार्यक्रमांमध्ये 'रामायण' चित्रपटातील सीतेच्या भूमिकेबद्दलही भाष्य केलं आहे.

चित्रपटाशी संबंधित एका कार्यक्रमात तिने म्हटलं होतं, "प्रत्येक कलाकाराला अशा प्रकारच्या भूमिका साकारण्याची संधी मिळत नाही. देवाची भूमिका साकारणं सोपं नसतं, कारण तुमची भूमिका इतिहासाचा भाग बनून राहते. ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. माझे विचार शक्य तितके शुद्ध ठेवण्याचा मी प्रयत्न करते."

अमिताभ बच्चन यांच्याशी बोलतानाही तिने या भूमिकेबद्दल म्हटलं होतं, "इतर चित्रपटांमधील व्यक्तिरेखा साकारताना मी ती भूमिका कशी आत्मसात करेन याचा खूप विचार करते. पण या भूमिकेसाठी मी व्यक्तिरेखेतून मला काय शिकायला मिळेल, याचाही मी विचार केला."

लेखिका दीपा जानकीरामन यांनी 'स्टोरी अँड स्क्रीनप्ले' आणि 'लाइट डिझायनर्स' यांसह अनेक चित्रपटविषयक पुस्तकं लिहिली आहेत.

त्यांनी म्हटलं की, "सीता ही पौराणिक व्यक्तिरेखा आहे. ती अशीच आहे, हे आपण ठामपणे नाही सांगू शकत. प्रत्येकाला समाधानी करणं शक्य नाही. रामाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांबाबत कधीच अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. मात्र, सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींनाच नेहमी अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. संबंधित अभिनेत्रीने ही भूमिका किती चांगल्या प्रकारे साकारली आहे, एवढंच आपण पाहायला हवं."

साई पल्लवी एक उत्तम अभिनेत्री आहे, तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असून ती आपल्याला दिलेल्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारू शकते, असंही दीपा यांनी म्हटलं..

ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक रोहित खिलनानी यांनी म्हटलं की, "साई पल्लवीला सीतेच्या भूमिकेत पाहायला मी खूप उत्सुक आहे. चित्रपटाबद्दल टीका करायची किंवा कौतुक करायचं असेल, तर ते चित्रपट पाहिल्यानंतरच व्हायला हवं. एखादी व्यक्ती सेलिब्रिटी असो किंवा सामान्य नागरिक, कोणाच्याही दिसण्यावरून तिची खिल्ली उडवणं कधीही योग्य नाही."

"साई पल्लवी एक अत्यंत गुणी अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाच्या आधारेच तिचं मूल्यमापन व्हायला हवं आणि तिच्यातील कौशल्य दाखवण्याची योग्य संधी तिला मिळायला हवी, असं मला वाटतं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)