मध्ययुगीन काळातली पहिली महिला चित्रकार, तिने साकारलेली महिलांची 'न्यूड' चित्रं का होती धाडसी?

    • Author, कॅथ पाउंड
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

प्रबोधनकाळाच्या उत्तरार्धात पहिली महिला व्यावसायिक न्यूड आर्टिस्ट या लेव्हिनिया फाँटेना होत्या. त्यांनी काढलेली महिलांची काही नग्न चित्रं तत्कालीन पुरुष कलाकारांच्या चित्रांहून अधिक सूचक असल्याचं आढळतं.

त्यांची ही चित्रं त्यांच्या अत्यंत कडक शिस्तीच्या वडिलांविरोधातले बंड होते की, ती एक व्यावसायिक निवड होती की, ही चित्रं त्यांच्या अंतर्मनाची झलक होत्या?

या क्षेत्रातील अध्वर्यू मानल्या जाणाऱ्या लेव्हिनिया फाँटेना यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन बाजू होत्या. पहिली बाजू त्यांनी स्वतःचे जे चित्र काढले आहे त्यात दिसते. या चित्रात त्या स्पिनेट या वाद्याजवळ बसलेल्या आहेत. त्यांनी सुंदर पोशाख आणि दागिने परिधान केले आहेत. एका संपन्न, सुसंस्कृत आणि सद्गुणी इटालियन मुलीचं हे प्रतीक वाटतं.

त्यांना पहिली महिला व्यावसायिक चित्रकार मानलं जात होतं. व्यक्तिचित्रकार म्हणून त्यांना मागणी होती आणि त्यांना त्या काळात महत्त्वपूर्ण कामे मिळाली. त्या काळात अशी समजूत होती की, महिलांना अशा कामासाठी नियुक्त देखील केलं जाणार नाही, त्यांनी ती कामे पूर्ण करून देणं तर दूरच राहिलं. त्यांनी या समजुतीला छेद दिला.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू त्यांनी काढलेल्या 'मिनर्व्हा इन द अॅक्ट ऑफ ड्रेसिंग' या ऐतिहासिक चित्रात दिसते.

ग्रीक मिथकांनुसार मिनर्वा ही विद्या आणि न्यायाची देवता मानली जाते. मिनर्वा देवी नग्नावस्थेत आहे आणि ती उंची, भरजरी गाऊन परिधान करण्याच्या तयारीत आहे आणि अचानक तिच्यावर कुणाची नजर पडली आहे, ती देखील परत त्या व्यक्तीकडे पाहत आहे असे भाव आहेत.

तिने आपला गाऊन अत्यंत काळजीपूर्वक आपल्या हातात पकडला आहे आणि त्या व्यक्तिकडे पाहत आहे. तिच्या नजरेत एकाच वेळी लज्जा आणि सूचक हावभाव असल्याचे दिसते.

फाँटेना यांच्या मृत्यूच्या 1 वर्ष आधी म्हणजे 1613 साली त्यांनी हे चित्र धर्मगुरू स्किपिओन बर्गीज यांच्यासाठी रेखाटले होते. हे चित्र एका महिलेने काढले आहे म्हटल्यावर पाहणाऱ्यांसाठी ते नक्कीच आकर्षणाचं केंद्र असणार.

अशा प्रकारची चित्रं काढण्यात फाँटेना यांचे नाव गाजले होते. त्यांनी काढलेली अनेक चित्रं आता समोर येत आहेत.

गेल्या काही वर्षांत फाँटेना यांची अनेक चित्रं पुढे येत आहेत यातून हे लक्षात आले की महिलांची नग्न चित्रं रेखाटणाऱ्या त्या पहिल्या महिला व्यावसायिक चित्रकार होत्या.

केवळ एवढेच नाही तर त्यांच्या चित्रांचे विषय हे तत्कालीन पुरुष कलाकारांहून अधिक धाडसी होते.

"पहिल्यांदा पाहिलं की, असं वाटू शकेल की, या 2 परस्परविरोधी गोष्टी एकाच वेळी कशा अस्तित्वात असतील. त्यांचे सेल्फ पोट्रेट अतिशय सुसंस्कृत आहे. त्यात भानगडीचा लवलेशही नाही. आपण विचार करू लागतो की, आपण एका अत्यंत शिस्तप्रिय महिलेकडे पाहत आहोत, पण कदाचित नाही," असं पॅट्रिझिया कव्वाझिनी यांना वाटतं.

पॅट्रिझिया या नॅशनल म्युझियम ऑफ ओस्लो या ठिकाणी महिला कलाकारांच्या कलाकृतीच्या क्युरेटर आहेत. याच संग्रहालयात फाँटेना यांचे सेल्फ पोट्रेट आणि मिनर्वा ही दोन्ही चित्रं प्रदर्शनात आहेत.

कला इतिहासाच्या अभ्यासक एलिझाबेथ क्रॉपर यांच्या मते, "सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठित व्यक्तीच्या खासगी आयुष्यात लैंगिक इच्छा किंवा कामुकतेला स्थान नसतं, असं आपण गृहीत धरायला नको."

"आधुनिक काळाच्या सुरुवातीच्या कालखंडातील स्त्रियांकडे पाहताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुंतागुंतही समजून घ्यायला हवी," असं त्या बीबीसीला सांगतात.

'फॉर्चुना' चित्रात मिनर्व्हा देवी नग्नावस्थेत, वस्त्र परिधान करण्याच्या तयारीत आणि प्रेक्षकांकडे पाहताना दाखवण्यात आलं आहे. (छायाचित्र : गॅलेरिया बोर्गेझे / मौरो कोएन)

या चित्रांतून फाँटेना यांच्या वैयक्तिक इच्छा व्यक्त होतात की नाही, हा प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवू. तरीही फॉन्टाना यांनी धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष अशा दोन्ही प्रकारची चित्रं रंगवण्यामागे काही विशिष्ट व्यावसायिक आणि उद्योजकीय कारणं होती, असं 'लेव्हिनिया फाँटेना: इरॉटिक पेंटिंग्ज' या पुस्तकाचे लेखक एन्ऱिको मारिया दाल पोझोलो यांना वाटतं.

"त्यांना आपलं वेगळेपण सिद्ध करायचं होतं आणि आपल्या कलाकृतीमधील धाडसाकडे लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं होतं," असं त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.

पारदर्शक वस्त्रातील व्हिनस

फाँटेना यांचं सर्वांत जुनं ज्ञात असलेलं 'एरॉटिका' म्हणजे 'व्हिनस अँड क्युपिड'. हे चित्र त्यांनी 1585 ते 1590 या काळात रंगवलं.

कलेच्या इतिहासात व्हिनसचं नग्न चित्रण ही काही फार वेगळी गोष्ट नाही. मात्र, फाँटेना यांनी दागिने, पडदे आणि मोत्यांचा वापर करून या चित्रातील कामुकता अधिक ठळक केली.

काही वर्षांनंतर त्यांनी याच प्रकारची चित्ररचना पुन्हा केली. यावेळी त्यांनी इसाबेल रुईनी नावाच्या घरंदाज स्त्रीचं चित्र व्हिनसच्या रुपात रंगवलं. हे अर्ध्या पुरुष उंचीचं चित्र खासगी प्रदर्शनासाठीच होतं. यात व्हिनसच्या रुपात असलेल्या इसाबेलच्या अंगावर अतिशय पारदर्शक, जाळीदार वस्त्र होतं. त्यातून तिचे स्तन स्पष्टपणे दिसत होते.

त्या काळात फ्लोरेन्स आणि रोममध्ये सुंदर स्त्रियांच्या चित्रांसाठी स्वतंत्र दालनं होती. फाँटेना यांचं मूळ शहर असलेल्या बोलोन्यातही स्त्रियांमध्ये स्पर्धा होती.

अनेक कवींनी या स्त्रियांविषयी लिहिलं. त्यांनी या स्त्रियांची क्रमवारी लावली, त्यांच्यामध्ये सर्वांत सुंदर कोण हे सांगितलं. त्यामुळे स्त्रियांच्या सौंदर्याचं कौतुक करण्याच्या त्या काळातील संस्कृतीतूनच या चित्रांची प्रेरणा मिळाली असल्याचं कावाझिनी म्हणतात.

थ्री फिमेल न्यूड्स

या प्रकारातील फाँटेना यांचं सर्वांत देखणं चित्र म्हणजे 'थ्री फिमेल न्यूड्स .' अलीकडेच हे चित्र त्यांचंच असल्याचं मान्य करण्यात आलं आहे. यात तीन घरंदाज स्त्रिया दिसतात. त्यांच्या अंगावर पातळ, पारदर्शक वस्त्रं आहेत. त्यांनी घातलेले दागिने अत्यंत बारकाईने रंगवण्यात आले आहेत.

दाल पोझोलो यांच्या मते, हे चित्र त्या काळातील जजमेंट ऑफ पॅरिस असावं. ग्रीक पुराणकथेवर आधारित या कथेत पॅरिसला हेरा, ॲफ्रोडाइट आणि अथेना या 3 देवतांपैकी सर्वांत सुंदर कोण, हे ठरवण्यास सांगितलं जातं.

चित्राच्या डाव्या बाजूला असलेली स्त्री म्हणजे क्लेलिया फार्नेसे असावी, असा अंदाज आहे. ती इटलीतील सर्वांत देखण्या स्त्रियांपैकी एक मानली जात असे.

उजव्या बाजूला असलेल्या स्त्रीची ओळख पटलेली नाही. ती मध्यभागी असलेल्या स्त्रीकडे हात दाखवत आहे. मध्यभागी असलेली स्त्री या स्पर्धेतली स्पष्ट विजेती आहे. ती मारिया दे मेदिची असावी, असं मानलं जातं.

हे चित्र स्लेटच्या दगडावर रंगवण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्या पृष्ठभागावरून प्रकाश परावर्तित होतो. हे चित्र बनवून घेणाऱ्या पॅरिसची प्रतिमा चित्रात उमटत असावं. आपल्या खासगी दालनात बसून तो या चित्राकडे पाहत असताना त्याला स्वतःचं प्रतिबिंबही दिसत असावं.

त्या काळात अशा प्रकारची चित्रं रंगवणं हे निःसंशय धाडसाचं काम होतं. विशेषतः काउंटर रिफॉर्मेशन (प्रति) काळात बोलोन्या शहरात राहणाऱ्या एका स्त्रीसाठी हे अधिकच धाडसाचं होतं.

त्या वेळी शहराचे कठोर स्वभावाचे आर्चबिशप, कार्डिनल गॅब्रिएले पालेओत्ती, कॅथलिक चर्चची नैतिकतेविषयीची कठोर भूमिका चित्रकलेच्या क्षेत्रातही लागू करण्यासाठी प्रयत्नशील होते.

फाँटेना यांचे वडील आणि चित्रकार प्रॉस्पेरो यांनी आपल्या 'डिस्कोर्सो देले पित्तुरे' या पुस्तकात म्हटलं होतं की, ख्रिश्चन चित्रकाराने निषिद्ध विषयांचं चित्रण टाळायला हवं, कारण ते पाप ठरू शकतं. आर्थिक कारणांमुळे कलाकारांना अशा चित्रांची कामं स्वीकारावी लागू शकतात, असाही युक्तिवाद त्यांनी केला.

अशा चित्रांची मागणी करणाऱ्यांना चर्चने कबुलीजबाबाच्या वेळी त्यांच्या कृत्यांबद्दल जाब विचारावा, असंही त्यांनी म्हटलं होतं.

प्रॉस्पेरो यांची ही संदिग्ध भूमिका कदाचित त्यांच्या स्वतःच्या परिस्थितीमुळे असावी. त्यांनी आपल्या मुलीला चित्रकलेचं प्रशिक्षण दिलं आणि तिला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकणाऱ्या कारकिर्दीची दिशा दाखवली. मात्र, कालांतराने स्वतःची लोकप्रियता कमी झाल्यानंतर त्यांनी मुलीसोबतच एक करार केला. आपल्या मृत्यूपर्यंत तिने तिच्या कमाईतील सर्व पैसे त्यांच्याकडे जमा करायचे, असं त्यांनी म्हटलं होतं.

स्त्रियांच्या नितंबावर भर देणारी धाडसी चित्रं

प्रॉस्पेरो यांच्या मृत्यूपूर्वीच्या काही वर्षांत आणि 1597 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर फाँटेना यांची सर्वाधिक धाडसी चित्रं रंगवली गेली, हा कदाचित निव्वळ योगायोग नसावा. वडिलांची बंधनं कमी होऊ लागल्यानंतरचा हा काळ.

या चित्रांपैकी सर्वाधिक धाडसी चित्रांमध्ये स्त्रियांच्या नितंबांवर विशेष भर देण्यात आला आहे. यामागचं एक कारण म्हणजे 'व्हिनस कॅलिपिजे' (सुंदर नितंबांची व्हिनस) या संकल्पनेत नव्याने निर्माण झालेला रस. अलीकडेच सापडलेल्या व्हिनसच्या या रोमन पुतळ्यात देवी आपलं वस्त्र वर उचलून नितंब उघड करताना दिसते.

जिओर्जिओने, टिशियन आणि व्हेरोनेझ यांच्यासह अनेक पुरुष चित्रकारांनीही या संकल्पनेचा वापर आपल्या चित्रांमध्ये केला होता. मात्र, 'या चित्रकारांनी देवीच्या नितंबांना स्पर्श होत असल्याचं दाखवण्याचं धाडस केलं नव्हतं,' असं दाल पोझोलो सांगतात. 1594-95 च्या दरम्यान रंगवलेल्या 'मार्स अँड व्हिनस' या चित्रात लेव्हिनिया यांनी मात्र ही मर्यादा ओलांडली.

"एका महिला चित्रकाराने ही मर्यादा ओलांडली, यामागे स्वतःची ओळख आणि प्रसिद्धी वाढवण्याचा हेतू असावा, असं मला वाटतं," दाल पोझोलो म्हणतात.

या चित्रात अनिर्बंध कामेच्छेचं असामान्य चित्रण पाहायला मिळतं. मार्स व्हिनसच्या नितंबांना स्पर्श करताना दिसतो. तो तिच्याकडे झुकलेला आहे. त्याच्या पायाशी असलेल्या ढालीवरचा टोकदार उभा भाग आणि व्हिनसच्या पायांमधून जाणारी तलवार यांमुळे मार्सची उत्तेजित अवस्था लक्षात येते. व्हिनस मागे वळून पाहत स्मितहास्य करताना दिसते.

अनेक पैलू असलेलं व्यक्तिमत्त्व

1604 मधे रोमला स्थलांतर केल्यानंतर फॉर्चुना यांनी मिनर्व्हाचं एक नग्न चित्र रंगवलं. या चित्रात पुन्हा एकदा स्त्रीच्या नितंबांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. मात्र, या चित्रातील देवीचा चेहराही महत्त्वाचा आहे. हा चेहरा स्वतः फाँटेना यांचाच असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हा अंदाज करण्याचं कारण म्हणजे 1605 मधे लिहिलेली एक कविता आहे. या कवितेत फाँटेना यांच्या चित्रकार म्हणून असलेल्या कौशल्याची प्रशंसा करण्यात आलीय. सद्गुण आणि सौंदर्य यांचं एकाचवेळी चित्रण करण्यासाठी त्यांना केवळ एका मॉडेलची गरज होती आणि ती मॉडेल त्या स्वतःचं होत्या, असा काहीसा अर्थ या कवितेचा आहे.

"या चित्रातील स्त्रीचा चेहरा लेव्हिनिया यांच्यासारखा दिसतो किंवा नाही, हा प्रश्न वेगळा. मात्र, तिची ओळख लेव्हिनिया यांच्याशी जोडली गेलीय. महिला चित्रकारांच्या बाबतीत असं अनेकदा घडतं," असं क्रॉपर सांगतात.

एकीकडे सुसंस्कृत, सुशिक्षित आणि कुशल महिला चित्रकार; तर दुसरीकडे कामुक चित्रांच्या निर्मितीतही रस घेणारी कलाकार, अशी फाँटेना यांची दुहेरी ओळख होती. याचमुळे प्रसिद्ध कला संग्राहक आणि कलांचे आश्रयदाते असलेल्या कार्डिनल स्किपिओने बोर्गेझे यांनी 1613 मध्ये त्यांच्याकडून मिनर्व्हाचं चित्र रंगवून घेतलं असावं. रोममधील व्हिला बोर्गेझेच्या भिंतींवर या चित्राला मानाचं स्थान देण्यात आलं होतं.

"एवढं मोठं चित्र लपवून ठेवणं शक्य नाही. विशेषतः जेव्हा रोममधील सर्वांत प्रसिद्ध चित्रकाराकडून शहरातील सर्वांत मोठ्या कला संग्रहाकाने ते रंगवून घेतलेलं असतं," असं दाल पोझोलो सांगतात.

आपल्या चित्राची प्रशंसा करू शकतील अशा प्रत्येकाला ते हे चित्र दाखवत असतील.

त्याकाळात हे चित्र पाहण्याची संधी प्रामुख्याने उच्चभ्रू समाजातील पुरूषांनाच मिळत असावी. मात्र, आज या असामान्य आणि प्रस्थापित मर्यादा ओलांडणाऱ्या स्त्रीच्या कलाकृतीचा आस्वाद घेण्याचं स्वातंत्र्य आपल्या सर्वांना आहे. स्वतःचंच प्रतिबिंब दाखवणाऱ्या चित्रातील तिच्या गूढ हास्यामागे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दडलेले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)