तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
ऑस्ट्रेलियन ओपन : टेनिसस्टार नोवाक जोकोविच जिंकला नवव्यांदा अजिंक्यपद
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
सर्बियाचा टेनिसस्टार नोवाक जोकोविचनं यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचं अजिंक्यपद मिळवलं.
अंतिम फेरीत त्यानं रशियाच्या दानिल मेदवेदेव्हवर 7-5, 6-2, 6-2 अशी मात केली.
जोकोविचनं तब्बल नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदाची ट्रॉफी उचलली आहे. आजवर सर्वाधिक वेळा ही ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम जोकोविचच्याच नावावर आहे.
जोकोविचचं हे कारकीर्दीतलं एकूण अठरावं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमधल्या नऊ विजयांशिवाय जोकोविचनं आजवर पाच वेळा विम्बल्डन, तीन वेळा यूएस ओपन आणि एकदा फ्रेन्च ओपन जिंकलं होतं.
टेनिसच्या पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या बाबतीत जोकोविच जगात तिसऱ्या स्थानावर आहे. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दोघांच्या खात्यात प्रत्येकी वीस ग्रँड स्लॅम विजेतेपदं आहेत.
असा रंगला सामना
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोविचला चौथ्या स्थानावर असलेला दानिल मेदवेदेव्ह कडवी टक्कर देईल अशी अपेक्षा होती. अगदी तशीच या सामन्याची सुरुवात झाली.
पण नंतर दबावाखाली खेळताना मेदवेदेव्हनं केलेल्या चुका त्याला भोवल्या. पहिला सेट जिंकण्यासाठी जोकोविचला झुंजावं लागलं. पण दुसरा सेट त्यानं काहीसा सहजपणे जिंकला.
तिसऱ्या सेटमध्ये मेदवेदेव्हनं झुंज दिली. पण तोवर सामना त्याच्या हातून निसटला होता.
मेदवेदेव्ह नव्या पिढीचा शिलेदार
25 वर्षीय मेदवेदेव्हला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं असलं, तरी या स्पर्धेत त्याच्या खेळाची सगळेच प्रशंसा करत आहेत. मेदवेदेव्हनं याआधी 2019 साली यूएस ओपनमध्येही अंतिम फेरी गाठली होती, पण चुरशीच्या झालेल्या त्या सामन्यात त्याला राफेल नदालकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
येत्या काळातही मेदवेदेव्हच्या कामगिरीवर टेनिस चाहत्यांची नजर राहील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)