तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
ओन्ड्रेय सुरी: सायबर हल्ल्याच्या संकटात इंटरनेटचा 'हिरो' ठरलेला तंत्रज्ञ
- Author, शिओना मॅकलम
- Role, सिनिअर टेक्नॉलॉजी रिपोर्टर
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ओन्ड्रेय सुरी हे आपल्या मोकळ्या वेळेत जगभरातील वेबसाइट्स सुरक्षितपणे सुरू राहाव्यात, यासाठी पडद्यामागे राहून काम करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे सुरी यांचं काम फारसं लोकांसमोर आलेलं नाही.
ते लिनक्सच्या दोन लोकप्रिय प्रकारांसाठी स्वेच्छेने सॉफ्टवेअरची देखभाल करतात. लिनक्स ही विंडोजसारखी कॉम्प्युटर सिस्टम आहे. लिनक्सच्या वापर मोफत करता येतो. तिचा वापर अनेकदा वेबसाइट चालवणाऱ्या सर्व्हरसाठी केला जातो.
यामध्ये जगातील अनेक वेबसाइट्स चालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीएचपी या प्रोग्रामिंग भाषेची नवीन आवृत्ती उपलब्ध करून देणे आणि ती अद्ययावत ठेवणे, हे काम प्रामुख्याने केलं जातं.
परंतु, या आठवड्यात त्यांचं काम अचानक खूपच वाढलं, ते प्रचंड व्यग्र होते.
एआयच्या मदतीने या प्रोग्रामिंग भाषेतील सायबर सुरक्षेशी संबंधित 2 मोठ्या त्रुटी शोधण्यात आल्या. त्यानंतर पीएचपी फाउंडेशनने त्या दुरुस्त करण्यासाठी अपडेट जारी केले.
परंतु, या दुरुस्त्या संगणकावर कशा इन्स्टॉल करायच्या, हे सामान्य लोकांना कळणं कठीण होतं. त्यामुळे सुरी यांनी आपलं बाकीचं काम बाजूला ठेवलं आणि या दुरुस्त्या सहज इन्स्टॉल करता येतील अशी सॉफ्टवेअर पॅकेजेस मोफत तयार केली. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही खास तांत्रिक ज्ञानाची गरज नव्हती.
"या सर्व लोकांची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी त्यांचा विश्वास तोडू शकत नाही, असं मला वाटतं," असं त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं.
पीएचपी मधील या त्रुटींमुळे सायबर गुन्हेगार त्यांचा गैरफायदा घेऊ शकतात, अशी भीती निर्माण झाली. त्यामुळे जगभरात या त्रुटी दूर करणारी सुरक्षा अपडेट्स तातडीने इन्स्टॉल करण्याची एकच धावपळ सुरू झाली.
या सुरक्षा अपडेट्सवर काम करणाऱ्या मोजक्या सॉफ्टवेअर तज्ज्ञांपैकी सुरी हे एक आहेत.
इंटरनेट सुरक्षित ठेवण्याचं काम पूर्णवेळ करावं लागेल, असं वाटू शकतं. परंतु, प्रत्यक्षात सुरी हे काम त्यांच्या मुख्य नोकरीसोबत करतात.
ते अमेरिकेतील 'इंटरनेट सिस्टिम्स कन्सोर्टियम' या ना-नफा संस्थेत (एनजीओ) डीएनएस इंजिनिअरिंग विभागाचे संचालक म्हणून काम करतात.
मात्र, आपल्या मोकळ्या वेळेत ते गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक काळ डेबियन आणि उबंटू या लिनक्सच्या दोन प्रकारांसाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर पॅकेजेसची देखभाल मोफत करत आहेत.
पीएचपी प्रकल्पातून उपलब्ध होणारा मूळ (सोर्स) कोड घेऊन सुरी त्याची अशी सॉफ्टवेअर पॅकेजेस तयार करतात, जी वेबसाइट चालवणारे लोक आपल्या सर्व्हरवर सहजपणे इन्स्टॉल करू शकतात.
या आठवड्यात इंटरनेट 'वाचवण्यात' मदत करणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणून काही जणांनी सुरी यांचा उल्लेख केला. याबद्दल विचारलं असता, यावर त्यांनी मात्र अत्यंत नम्रपणे उत्तर दिलं.
"माझ्या कामामागे एक उद्देश आहे, असं मला वाटतं. त्यामुळे हे काम केल्याचं मला समाधान मिळतं," असं ते म्हणाले.
"त्याच वेळी, या कामात सहभागी असलेल्या इतर लोकांना, विशेषतः पीएचपी प्रकल्पातील लोकांना, त्यांच्या कामाचं पुरेसं श्रेय मिळालेलं नाही, असंही मला वाटतं," असं त्यांनी म्हटलं.
मात्र, आपली जबाबदारी किती मोठी आहे, याचीही त्यांना जाणीव आहे.
वेळेविरुद्धची शर्यत
पीएचपी प्रकल्पाने सुरी यांना या त्रुटींबद्दल आधीच माहिती दिली होती. परंतु, या त्रुटींची माहिती इंटरनेटवर लीक झाल्यानंतर नियोजित वेळेआधीच अपडेट जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कामाचा वेग वाढला आणि लगबग सुरू झाली.
"या त्रुटी किती गंभीर आहेत, हे माझ्या लक्षात आलं. लोकांना वापरता यावं म्हणून पीएचपीची सॉफ्टवेअर पॅकेजेस तयार करण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नव्हता," असं ते म्हणाले.
काम तातडीचं असलं, तरी आपला अनुभव आणि आधी केलेली तयारी यामुळे आपण हे काम पूर्ण करू शकू, असा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं.
सुरक्षा दुरुस्त्या (पॅचेस) लोकांपर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी जगभरातील इतर सॉफ्टवेअर तज्ज्ञही काम करत होते. यावरून इंटरनेट सुरळीत सुरू ठेवण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या यंत्रणांची जबाबदारी काही समर्पित तज्ज्ञांवर म्हणजेच डेव्हलपर्सवर किती अवलंबून असते, हे दिसून येतं.
एका आठवड्यात वर्षभराचा निधी
या आठवड्यात सुरी यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअर पॅकेजेसचा वापर करणाऱ्या अनेकांनी त्यांना मोठ्याप्रमाणात मदत केली, असं त्यांनी सांगितलं.
अवघ्या काही दिवसांत त्यांना देणगीच्या किंवा रक्कम स्वरूपात 10 हजार डॉलरपेक्षा (सुमारे 9 लाख 52 हजार रुपये) अधिक रक्कम मिळाली, असं त्यांनी सांगितलं.
"यापूर्वी मला वर्षभरात जेवढे पैसे मिळायचे, तेवढीच रक्कम या एका आठवड्यात मिळाली," असं त्यांनी सांगितलं.
ज्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरवर मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या अवलंबून आहेत, त्यांना आधार देण्यासाठी त्यांनी अधिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
"माझ्या मते, त्यांनी अधिक जबाबदारी घ्यायला हवी," असं ते म्हणाले.
"तुम्ही केवळ घेत राहिलात आणि त्या बदल्यात काहीच दिलं नाही, तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील."
सुरी यांचाही विचार सुरू आहे की, भविष्यात त्यांना स्वतःहून या सॉफ्टवेअर पॅकेजेसची देखभाल सुरू ठेवणं शक्य झालं नाही, तर काय होईल.
सॉफ्टवेअर कंपनी 'फ्रीक्सियन'मधील त्यांचे सहकारी हे काम पुढे करू शकतील, असं त्यांनी सांगितलं. पण, त्यांच्याकडे सुरी यांच्याइतका अनेक वर्षांचा अनुभव अद्याप नाही.
या कामाची मोठी जबाबदारी शेवटी तुमच्यावरच आहे का, असं विचारल्यावर ते म्हणाले, "हो, बऱ्यापैकी तसंच आहे."
परंतु, एआयमुळे सॉफ्टवेअरमधील सुरक्षा त्रुटी शोधण्याचा वेग वाढू शकतो, अशी सुरी यांना चिंता आहे. याचा फायदा सायबर गुन्हेगारांनाही होऊ शकतो आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही.
"गेल्या काही वर्षांतील ही सर्वात गंभीर घटना होती, असं मला वाटतं. परंतु, सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात एआय अधिक सक्षम होत असल्यामुळे, अशा घटना भविष्यातही घडू शकतात," असा इशाराही त्यांनी दिला.
"भविष्यात, कदाचित लवकरच, अशा घटना पुन्हा घडू शकतात. त्यामुळे लोकांनी यापुढेही अशाच वेगानं काम करण्यासाठी तयार राहायला हवं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)