अर्णब चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशात 7 जणांचा मृत्यू; विजेचे 6 हजार खांब कोसळले

    • Author, गरिकापती उमाकांत
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ अर्णब बुधवारी (28 ऑक्टोबर) पहाटे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले.

या चक्रीवादळामुळे राज्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दिली.

अर्णब चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणाच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक आढावा घेण्याचं काम सुरू आहे.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितलं की, अर्णब चक्रीवादळ आता कमकुवत झाले आहे. गेल्या 6 तासांत ते ताशी सुमारे 15 किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकले. आता त्याचे रूपांतर 'कमी दाबाच्या क्षेत्रात' झाले आहे.

हवामान विभागाने 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 2.49 ला ट्विट केले होते त्यात सांगितलं की, 28 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता या चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशजवळ होते. दक्षिण ओडिशा, दक्षिण छत्तीसगड आणि तेलंगणाच्या ईशान्य भागाला लागून असलेल्या परिसरात याचे केंद्र होते.

या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशात सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांसह काकीनाडा, कोनासीमा आणि पूर्व गोदावरी जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडत आहे.

आंध्र प्रदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य संचालक प्रखर जैन यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

हवामान विभागाने सायंकाळी 4.42 ला ट्विट करून सांगितले की अर्णब वादळामुळे छत्तीसगड, दक्षिण ओडिशात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

खांब कोसळले, झाडे उन्मळून पडली

आंध्र प्रदेशच्या वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या आढावा बैठकीत सांगितलं की, अर्णब चक्रीवादळामुळे कोनासीमा जिल्ह्यात सुमारे 6 हजार विजेचे खांब कोसळले आहेत. काकिनाडा आणि उत्तर आंध्र प्रदेशातील जिल्ह्यांमध्येही शेकडो विजेचे खांब पडले आहेत.

उत्तर आंध्र प्रदेशातील किनारपट्टीच्या अनेक भागांत विजेच्या तारा आणि वीजवाहिन्या पूर्णपणे तुटल्या आहेत. त्यामुळे किनारपट्टीवरील अनेक गावांमध्ये आणि शहरांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

आता तेलंगणाच्या वीज मंत्र्यांकडे मदत मागण्यात आली आहे.

बीबीसीशी बोलताना मंत्री गोट्टीपती रविकुमार यांनी सांगितलं की, अर्णब चक्रीवादळामुळे वीज यंत्रणेचं मोठं नुकसान झालं आहे. ही यंत्रणा सुरळित होण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरू आहे.

आंध्र प्रदेश सरकारने यासाठी तेलंगणा सरकारकडे अतिरिक्त कर्मचारी आणि उपकरणे पाठवण्याची विनंती केली आहे. मंत्री रविकुमार यांनी सांगितलं की, त्यांनी तेलंगणाच्या वीज विभागाचे विशेष मुख्य सचिव नवीन मित्तल यांच्याशी फोनवरून याबाबत चर्चा केली आहे.

तेलंगणा सरकारने या मागणीला सहमती दिली आहे. अतिरिक्त कर्मचारी आणि उपकरणे पाठवण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे, असं त्यांनी सांगितलं.

मंत्र्यांनी सांगितलं की, खबरदारीचा उपाय म्हणून चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांत हजारो विजेचे खांब पाठवण्यात आले आहेत. पाऊस थांबल्यानंतर काही तासांतच वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल, असंही ते म्हणाले.

पिकांचे मोठे नुकसान

चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये भातशेतीचे, कोनासीमा जिल्ह्यात नारळाच्या पिकाचे, तर गोदावरी खोऱ्यात केळी आणि मत्स्यपालनाचे मोठे नुकसान झाले आहे.

मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि पूरस्थितीमुळे हजारो एकरांवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

चक्रीवादळामुळे राज्यातील शेती मोठ्या संकटात सापडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कमी पावसामुळे शेतकरी आधीच अडचणीत होते. त्यात आता हजारो एकरांवरील कापणीला आलेले भातपीक वाया गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, यंदाच्या खरीप हंगामात आंध्र प्रदेशात 37.53 लाख एकरांवर भाताची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी 26 लाख एकरांवरील शेतीला चक्रीवादळाचा फटका बसला आहे.

केंद्र सरकारकडे मदतीची मागणी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अर्णब चक्रीवादळामुळे राज्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितलं आहे.

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पथके पाठवावीत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

चक्रीवादळग्रस्त भागांत मदतकार्य करण्यासाठी 14 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) 16 आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) 11 पथकांना तैनात करण्यात आलं आहे, असंही पत्रात म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार 180 घरांचं नुकसान झाले असून 220 हून अधिक झाडे रस्त्यांवर कोसळली आहेत. अनेक किनारपट्टी भागांतील रस्ते खराब झाले आहेत आणि वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पत्रात म्हटलं आहे की, कोनासीमा, काकिनाडा, पूर्व आणि पश्चिम गोदावरी, अनाकापल्ले आणि कृष्णा या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे.

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर पाहणी केल्यानंतर केंद्र सरकारला अहवाल सादर केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तसेच, मदतकार्यासाठी एनडीआरएफ आणि इतर केंद्रीय यंत्रणांचे सहकार्य सुरू ठेवण्याची विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली आहे.

नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर पथक पाठवावे, अशी विनंती केंद्रीय मंत्री अमित शहा यांना करण्यात आली आहे.

अर्णब चक्रीवादळ आता कुठे आहे? त्याचा काय परिणाम झाला?

अर्णब चक्रीवादळ आता कमकुवत झाले असून, त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या हे कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या दक्षिण ओडिशामध्ये आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आज सायंकाळपर्यंत उत्तरेकडे सरकून उत्तर छत्तीसगड आणि लगतच्या वायव्य ओडिशाच्या भागात आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेश, तेलंगणाच्या ईशान्य भागातील काही जिल्हे, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत आज अनेक ठिकाणी पाऊस पडला.

आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशातील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. काही भागांत 21 सेंटीमीटर किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद झाली. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागांत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)