करीना कपूरने दिवाळीत हार परिधान केल्यानं आली कायदेशीर नोटीस; 'हे' आहे त्यामागचं कारण

फोटो स्रोत, Rhea Kapoor/instagram
दिवाळीची तयारी करत असताना बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानला कल्पनाही नसेल की, आपल्या गळ्यातील हारामुळे ती कायदेशीर वादात अडकू शकेल.
करीनाने या दिवशी 30 कॅरेटचा नीलमजडित हार घातला होता. या हारावर कुराणातील 'आयतुल कुर्सी' ही आयत कोरलेली होती.
या कार्यक्रमाचे फोटो समोर आल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय माध्यम समन्वयक अब्बास हाफीज यांनी करीनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये कुराणातील ही आयत ज्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे, त्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे.
ही कायदेशीर नोटीस केवळ अभिनेत्री करीना कपूरलाच नाही, तर तिची स्टायलिस्ट रिया कपूरलाही पाठवण्यात आली आहे.
या नोटिसीत संबंधित फोटो, व्हीडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, सार्वजनिकरीत्या माफी मागावी आणि भविष्यात कुराणातील या पवित्र आयतीचा आदर राखूनच ती दाखवली जाईल, अशी हमी द्यावी, असंही म्हटलं आहे.
करीना कपूर खानने नुकतेच दिवाळीनिमित्त शाही पोशाखातील आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
दिवाळीच्या या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामधील खास लूकमधील फोटो करीनाने सोशल मीडियावर शेअर केले होते.
करीनाला हा खास लूक देणाऱ्या रिया कपूरनेही हे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यासोबत तिने लिहिलं होतं, "खरी फिल्मस्टार, अस्सल चांदी, कुटुंबाचा खरा वारसा आणि कपडे परिधान करण्याची स्वतःची खास शैली."
या पोस्टमध्ये रिया कपूरने आणखी माहिती देताना लिहिलं होतं, "करीनाने पुनीत बालाने डिझाइन केलेला शुद्ध चांदीचा काफ्तान आणि पगडी घातली आहे. तसेच, भोपाळच्या नवाबांची 200 वर्षे जुनी कलगी आणि भोपाळच्या बेगमांचा 30 कॅरेटचा नीलमही घातला आहे. या नीलमवर कुराणातील 'आयतुल कुर्सी' कोरलेली आहे."

फोटो स्रोत, Kareena Kapoor Khan/Instagaram
हे दागिने भोपाळच्या राजघराण्यात अनेक पिढ्यांपासून जपून ठेवलेला वारसा असल्याचेही तिने सांगितलं.
हे ऐतिहासिक दागिने सैफ अली खानच्या कुटुंबाकडून करीनाला मिळाले आहेत. सैफच्या आजी साजिदा सुलतान या भोपाळच्या शेवटच्या नवाबांच्या मुलगी होत्या, असंही तिने सांगितलं.
कायदेशीर नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
काँग्रेसचे प्रवक्ते अब्बास हाफीज यांचे वकील मोहम्मद जफर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, पवित्र आयत असलेले फोटो सोशल मीडियावरून हटवावेत, अशी त्यांच्या अशिलाची मागणी आहे.
ते म्हणाले, "बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने हे पेंडंट घातले, याला आमचा विरोध नाही. मात्र, या पेंडंटवर जे लिखाण कोरलेलं आहे, त्यावर आमचा आक्षेप आहे."
ते म्हणाले, "या पेंडंटवर कुराणातील एक पवित्र आयत कोरलेली आहे. या आयतीला अत्यंत पवित्र मानलं जातं."
"यामुळे संपूर्ण मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असे माझे अशील आणि आमचं मत आहे."
वकील मोहम्मद जफर म्हणाले, "आमच्या परंपरेनुसार, कुराणातील या आयतीचे पठण करण्यापूर्वी किंवा पवित्र कुराणाला स्पर्श करण्यापूर्वी वजू करणं आवश्यक मानलं जातं. वजू म्हणजे हात, पाय आणि तोंड धुण्याची धार्मिक पद्धत. सोशल मीडियावर ही आयत ज्या पद्धतीने दाखवली आहे, त्यावर आमचा मुख्य आक्षेप आहे."
ते पुढे म्हणाले, "म्हणूनच आम्ही ही कायदेशीर नोटीस पाठवली असून संबंधित फोटो हटवण्याची मागणी केली आहे."
'सणांचा खरा आनंद कमी करण्याचा प्रयत्न'
दिवाळीत करीनाने कुराणातील आयत कोरलेला हार घातल्याचे पाहून सोशल मीडियावरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
करीना कपूर आणि रिया कपूर यांच्या सोशल मीडिया पोस्टवर काही जणांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी विचारलं होतं, "करीनाने खरंच आयतुल कुर्सी कोरलेलं पेंडंट घातलं आहे का?"
फहिमा नावाच्या एका युजरने लिहिलं होतं, "कृपया आयतुल कुर्सीचा अनादर करू नका. ही आपल्या पवित्र कुराणातील आयत आहे."

फोटो स्रोत, Rhea Kapoor/instagram
कुराणातील आयत असलेले दागिने घालण्यावर काही लोक आक्षेप घेत आहेत. तर दुसरीकडे, हिंदू धर्माचे अनुयायीही याबाबत आक्षेप नोंदवताना दिसत आहेत.
शीतल गुप्ता यांनी लिहिलं होतं, "करीना कपूर दिवाळीच्या कार्यक्रमाला इस्लामी पद्धतीचे कपडे आणि कथितरीत्या कुराणातील आयत कोरलेले दागिने घालून आली होती. आपल्या संस्कृतीचा आणि सणांच्या खऱ्या अर्थाचा विसर पाडण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. आपल्या सणांची खरी ओळख बदलण्याचे प्रयत्न थांबवा. सनातन संस्कृती केवळ वरवरच्या सन्मानाची नाही, तर तिचा मनापासून आदर केला पाहिजे."
परंतु, काही युजर्सच्या मते, यावरून इतका गदारोळ करण्यासारखी ही काही मोठी गोष्ट नव्हती.
आरोही रेड्डी यांनी लिहिलं, "करीना कपूरची एवढीच चूक होती की, तिने दिवाळीच्या कार्यक्रमात भोपाळच्या बेगमांचा ऐतिहासिक हार घातला होता... काही लोकांच्या धार्मिक भावना किती छोट्या छोट्या गोष्टींमुळे दुखावल्या जातात, याचा विचार करा!"
"हिंदू धर्माशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टींवरही लगेच आवाज उठवणारे डावे आणि उदारमतवादी गट आज मात्र पूर्णपणे शांत आहेत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
























