दर आठवड्याला मुंबईहून 600 किलोमीटरचा प्रवास; गावासाठी तलाव खोदणाऱ्या IRS अधिकाऱ्याची गोष्ट

फोटो स्रोत, UGC
- Author, अमरेंद्र यारलागड्डा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
तब्बल 600 किलोमीटरचा प्रवास करून शेततळी खोदणाऱ्या एका तरुण आयआरएस अधिकाऱ्याची ही गोष्ट आहे.
पी. सुधाकर नाईक आठवड्याच्या शेवटी मुंबईहून आपल्या नारायणखेड या गावी येत असत. तिथे ते सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होत असत.
ते सध्या प्राप्तिकर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून काम करतात.
प्रत्येक आठवड्याच्या शेवटी ते असं कोणतं सामाजिक कार्य करतात? ही कामं करण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली? त्यांच्या प्रयत्नांमुळे कोणते बदल घडून आले?
पी. सुधाकर नाईक हे तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील नारायणखेडजवळच्या पीरलातांडा भागातील रहिवासी आहेत.
ते मुंबईत प्राप्तिकर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून काम करत होते. नुकतीच त्यांची बदली हैदराबादला झाली आहे.
त्यांना सामाजिक जनजागृतीच्या कामात पूर्वीपासूनच रस होता. आपल्या गावासाठीही काहीतरी करावं, अशी त्यांची इच्छा होती.
वीकेंडला 600 किलोमीटरचा प्रवास
मुंबईत नोकरी करत असताना ते दर आठवड्याच्या शेवटी नारायणखेडला येत असत.
दर शुक्रवारी ते रात्री बसने मुंबईहून निघत. शनिवारी सकाळी संगारेड्डीला पोहोचल्यानंतर तिथून कारने नारायणखेडला जात असत.
शनिवार आणि रविवारी ते गावांमध्ये होणाऱ्या सामाजिक जनजागृतीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असत.
रविवारी रात्री ते पुन्हा मुंबईला परतत असत आणि सोमवारी नेहमीप्रमाणे कामावर रुजू होत असत, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
त्यांच्यासोबत काम करणारे पर्यावरणप्रेमी बालतुका ज्ञानेश्वर यांनी बीबीसीला सांगितलं की, यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत पी. सुधाकर नाईक यांनी सलग 8 आठवडे मुंबईहून नारायणखेडपर्यंत 600 किलोमीटरचा प्रवास केला.
"शेकडो किलोमीटरचा प्रवास करून ते गावात येत असल्याचे पाहून आम्हालाही प्रेरणा मिळाली. गावातील लोकांनीही पुढाकार घेत त्यांना मदत केली," असं ज्ञानेश्वर यांनी सांगितलं.
सहा ठिकाणी जलाशय खोदले
तलाव खोदणे हा पी. सुधाकर नाईक यांच्या प्रमुख उपक्रमांपैकी एक आहे.
"नारायणखेड, नागिलीदिक्टा यांसारख्या काही भागांत शेकडो फूट खोल बोअरवेल खोदूनही पाणी मिळत नव्हते. पावसाचं पाणी साठवून ते जमिनीत मुरवलं, तर त्याचा चांगला फायदा होईल, असा विचार करून सुधाकर नाईक यांनी तलाव खोदले. आता पीरलातांडा भागातील बोअरवेलना पाणी मिळू लागले आहे," असं ज्ञानेश्वर यांनी सांगितलं.
सुधाकर नाईक यांनी एकूण 6 मोठे तलाव खोदले आहेत.
आठवड्याच्या शेवटी गावी आल्यावर ते रात्रीच्या वेळीही काम करत असत, असं स्थानिक लोकांनी सांगितलं.
"या तलावांचा आम्हाला खूप फायदा होत आहे. तलाव खोदल्यामुळे आमची पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. आमच्या गायी, शेळ्या आणि मेंढ्यांना या तलावांमधून पाणी मिळत आहे," असे पीरलातांडा येथील बनोथू सेवादास यांनी बीबीसीला सांगितलं.

पी. सुधाकर नाईक यांनी पीरलातांडा, चित्रा तांडा, पूसलपाडा आणि मुक्तापूर या गावांमध्ये एकूण 6 तलाव खोदले आहेत.
"2019 मध्ये पी. सुधाकर नाईक यांनी आमच्या भागात वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू केला. या कामात त्यांनी तरुणांनाही सहभागी करून घेतले. तेव्हापासून आम्ही त्यांच्यासोबत मिळून विविध उपक्रम राबवत आहोत," असं ज्ञानेश्वर यांनी सांगितलं.
परंतु, तलावांबरोबरच छोटे बंधारेही बांधावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पी. सुधाकर नाईक यांच्या वडिलांनी काय म्हटलं?
बीबीसीने पी. सुधाकर नाईक यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते काम करत असलेल्या विभागाच्या नियमांमुळे ते बोलू शकले नाहीत.
मात्र, बीबीसीने पीरलातांडा येथे त्यांचे वडील जीवला नाईक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काही माहिती दिली.

शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा परतणं कठीण असतानाही पी. सुधाकर नाईक यांनी कोणतीही तक्रार न करता सामाजिक कार्य सुरू ठेवलं, असं त्यांच्या वडिलांनी सांगितलं.
"नोकरी कितीही कठीण असली, तरी 2 दिवसांची सुट्टी काढून लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने तो गावी येत असत. हे काम त्याने एकट्याने केलं नाही. सर्वांची मदत घेऊनच त्याने हे उपक्रम राबवले," असे जीवला नाईक यांनी सांगितलं.

तलाव खोदण्याव्यतिरिक्त 32 ग्रंथालयंही सुरू करण्यात आली आहेत.
विद्यार्थी या ग्रंथालयांमध्ये जाऊन आवडीने पुस्तके वाचतात.
पी. सुधाकर नाईक यांचे सर्व सामाजिक उपक्रम सर्वोदय ग्राम सेवा ट्रस्टच्या माध्यमातून राबवले जातात, अशी माहिती त्यांचे वडील जीवला नायक यांनी दिली.
"सुधाकरचे मित्र आणि अधिकारीही या ट्रस्टला मदत करत आहेत," असं त्यांनी सांगितलं.
पी. सुधाकर नाईक यांना सामाजिक कामांची प्रेरणा देणारी आणखी एक व्यक्ती होती. त्यांचं नाव आर. के. पालीवाल. ते प्राप्तिकर विभागात नोकरी करून निवृत्त झाले आहेत.
आर. के. पालीवाल यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळेच आपल्या मुलाने ही सामाजिक कामे सुरू केली, असे जीवला नाईक यांनी सांगितलं.
सध्या भोपाळमध्ये राहणाऱ्या आर. के. पालीवाल यांची बीबीसीने मुलाखत घेतली.
संगारेड्डी जिल्ह्यातील गोंगलूर भागात सर्वप्रथम सामाजिक कामांना सुरुवात झाली, असे त्यांनी सांगितलं.
"गोंगलूरमधील बचत गटातील महिलांनी कर्ज घेऊन 'सर्वोदय मंजिरा' नावाची संस्था सुरू केली. आता या महिला स्वावलंबी झाल्या आहेत. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. तेलापासून साबणापर्यंत विविध वस्तू तयार करून त्यांची विक्री करत आहेत," असं त्यांनी सांगितलं.

सुरुवातीला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये सामाजिक कामं करण्यात आली. त्यानंतरच संगारेड्डी जिल्ह्यातील गोंगलूर भागात अशा कामांना सुरुवात झाली, असं आर. के. पालीवाल यांनी सांगितलं.
इतरांच्या मदतीने ही सामाजिक कामं नारायणखेड परिसरातही विस्तारत आहेत, याचा आनंद असल्याचे पी. सुधाकर नाईक यांनी म्हटलं.
"2018 ते 2020 या काळात मी हैदराबादमध्ये काम करत होतो. 2023-24 मध्ये तिथे गेलो असताना या कामांमध्ये चांगली प्रगती झाल्याचे मला दिसून आले. आम्ही जेव्हा ही कामं सुरू केली होती, त्यापेक्षा आता सुधाकर नाईक आणि ग्रामस्थांनी ती अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत. हे पाहून मला खूप समाधान वाटले," असे आर. के. पालीवाल यांनी बीबीसीला सांगितलं.
विशेषतः ग्रंथालये सुरू करण्यामागची कारणेही पालीवाल यांनी बीबीसीला सांगितली.
"शहरांमधील प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात आधुनिक सुविधांनी युक्त ग्रंथालये आहेत. परंतु, ग्रामीण भागातील गरीब लोक आणि विद्यार्थी ज्ञानाच्या बाबतीत मागे का राहतात, असा विचार केला. त्यावेळी त्यांना पुस्तके वाचण्याची पुरेशी संधी मिळत नाही, हे एक महत्त्वाचं कारण असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सर्व प्रकारची पुस्तके वाचायला मिळावीत, या उद्देशाने आम्ही गावांमध्ये ग्रंथालये सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला," असे त्यांनी स्पष्ट केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























