स्पेनमध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणं इतकं सामान्य का मानलं जातं?

स्पेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांचं चुंबन घेणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. (प्रतिकात्मक फोटो)
    • Author, लुसी लव्हेल
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

स्पेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना चुंबन घेणं किंवा किस करणं ही अगदी रोजची गोष्ट आहे. परंतु, प्रेम व्यक्त करण्याबाबत स्पेनमधील हे मोकळं वातावरण पाहिलं तर त्यामागे दडपशाही आणि त्याविरोधात झालेल्या बंडाचा एक आश्चर्यकारक इतिहास दिसून येतो.

स्पेनमध्ये सगळीकडे लोक एकमेकांना चुंबन घेताना दिसतात. एखाद्याला भेटल्यावर दोन्ही गालांवर आलटून-पालटून चुंबन घेणं ही तिथली सामान्य पद्धत आहे. याशिवाय, प्रेम व्यक्त करण्यासाठीही लोक एकमेकांचे चुंबन घेताना दिसतात.

एकदा शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर माझ्या पुढे जाणारं मध्यमवयीन जोडपं अचानक थांबलं आणि एकमेकांचं चुंबन घेऊन लागलं. सूर्यप्रकाशाने उजळलेल्या उद्यानांमध्ये तरुणांना एकमेकांना किस करताना पाहिलं की मला माझ्या जुन्या दिवसांची आठवण होते.

स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे होणाऱ्या 'लास फायस' उत्सवात फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना नशेत असलेले लोक एकमेकांना मिठी मारून प्रेम व्यक्त करताना मी पाहिले आहेत. इतकंच नाही, तर माझी अकाउंटंटही ईमेलच्या शेवटी 'बेसोस' (चुंबन) असं लिहिते.

Caption- स्पेनमधील अशा चौकांमध्ये लोक एकत्र येतात. हे चौक तिथल्या लोकांच्या सामाजिक जीवनाचे महत्त्वाचे केंद्र आहेत.
फोटो कॅप्शन, स्पेनमधील अशा चौकांमध्ये लोक एकत्र येतात. हे चौक तिथल्या लोकांच्या सामाजिक जीवनाचे महत्त्वाचे केंद्र आहेत.

मी आता 6 वर्षांहून अधिक काळापासून स्पेनमध्ये राहत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत आता मला सवयीची झाली आहे. पण माझी एक मैत्रीण जपानला जाऊन व्हॅलेन्सियाला आली, तेव्हा तिचं या गोष्टींकडे लगेचच लक्ष गेलं.

रेल्वे स्टेशनच्या बाहेर येताच तिला एका बाकावर बसून एकमेकांना किस करणारं जोडपं दिसलं. सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याची अशी दृश्यं क्वचितच पाहायला मिळतात, अशा देशात काही काळ घालवल्यानंतर हे दृश्य पाहून तिला जरा बरं वाटलं.

यामुळे माझ्या मनात 2 प्रश्न निर्माण झाले. स्पेनमध्ये खरंच लोक सार्वजनिक ठिकाणी खुलेपणाने चुंबन किंवा किस करतात का? आणि प्रेम व्यक्त करण्याच्या या मोकळ्या पद्धतीवरून तिथली संस्कृती आणि इतिहास याबद्दल काय समजतं?

यामागचं एक कारण म्हणजे स्पेनमधील लोक सार्वजनिक ठिकाणांचा वापर कशा प्रकारे करतात, हे असू शकतं. देशाच्या अनेक भागांमध्ये लोकांचं दैनंदिन जीवन घराबाहेर, गजबजलेले रस्ते, कॅफे आणि उद्यानांमध्ये जातं.

वॉरिक विद्यापीठाच्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीला भेटताना एकमेकांपासून कमी अंतर ठेवणाऱ्या देशांमध्ये स्पेनचा समावेश होतो.

हे अंतर ग्रीस, इटली आणि पोर्तुगालपेक्षाही कमी आहे. स्पेनमधील गजबजलेल्या चौकांमध्ये हे सहज पाहायला मिळतं. तिथल्या मोकळ्या जागांमध्ये लोक मित्रांसोबत गटाने एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून बसलेले आणि उन्हात बिअर पिताना दिसतात.

माद्रिदमधील कॉम्प्लुटेन्स विद्यापीठातील समाजशास्त्राच्या प्राध्यापिका अम्पारो लासेन सांगतात की, उत्तर युरोपमधील लोकांच्या तुलनेत स्पेनमधील लोक आपल्या भावना व्यक्त करताना शारीरिक हावभावांचा जास्त वापर करतात.

त्या म्हणतात, "नॉर्डिक देश किंवा इंग्लंडमधील लोकांशी तुलना केली, तर हा फरक अधिक स्पष्टपणे दिसून येतो."

घरांची वाढती टंचाई

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कदाचित स्पेनमधील लोक इतर देशांतील लोकांपेक्षा जास्त प्रेमळ नसतील, परंतु प्रेम व्यक्त करताना ते अधिक मोकळे असतात. सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणं म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची ही काही मोठी गोष्ट नाही. त्यांच्या दैनंदिन जीवनात ही एक सहज स्वीकारलेली गोष्ट आहे.

राहणीमानाचाही यामध्ये वाटा असू शकतो. स्पेनमधील जवळपास 65 टक्के लोक फ्लॅटमध्ये राहतात. युरोपीय संघातील देशांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. घरांच्या वाढत्या किमतींमुळे तरुणांना आपल्या कुटुंबाचं घर सोडून वेगळं राहणं दिवसेंदिवस कठीण होत चालेलं आहे.

स्पेनमध्ये चुंबन घेण्याबाबतची सर्वात खास गोष्ट म्हणजे आता तिथे ती अगदी सामान्य गोष्ट झाली आहे.

लासेन यांच्या मते, घरात एकांतपणा किंवा खासगीपणा कमी असल्यामुळे लोक प्रेमाचे खासगी क्षण सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करू शकतात.

त्या म्हणतात, "स्पेनमध्ये घरांची मोठी समस्या आहे. त्यामुळे लोक मित्रांना घरी बोलावण्याऐवजी बाहेर भेटणं पसंत करतात. ते बार आणि रेस्टॉरंटमध्ये जातात. जोडप्यांनाही एकमेकांसोबत काही वेळ एकांतात घालवण्यासाठी रिकामा बाक शोधावा लागतो. निदान अशी एखादी जागा तरी शोधावी लागते, जिथे त्यांच्या जवळपास फारसं कोणी नसेल."

परंतु, सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्यामागचं खरं कारण घरांची समस्या नाही, असं लासेन सांगतात.

Caption- स्पेनमधील बहुतांश लोक फ्लॅटमध्ये राहतात. त्यामुळे त्यांना खासगीपणा किंवा एकांत कमी मिळतो. (प्रतिकात्मक फोटो)
फोटो कॅप्शन, स्पेनमधील बहुतांश लोक फ्लॅटमध्ये राहतात. त्यामुळे त्यांना खासगीपणा किंवा एकांत कमी मिळतो. (प्रतिकात्मक फोटो)

यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबाबत स्पेनमधील लोकांचा मोकळा दृष्टिकोन.

त्या म्हणतात, "लोक तुमच्याकडे रोखून पाहत नाहीत किंवा तुम्ही त्याची पर्वा करत नसाल, तर सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे प्रेम व्यक्त करणं सहज शक्य होतं."

28 वर्षीय इसाबेल नीएतो तूस 3 वर्षे परदेशात राहून आपल्या आई-वडिलांच्या घरी परतली आहे. खासगीपणा मिळत नसताना एखाद्याला डेट करणं किती अवघड असतं, याचा अनुभव तिला माहीत आहे.

ती म्हणाली, "मी कोणाच्या घरी राहायला जात आहे, हे मला आई-वडिलांना सांगायचं नव्हतं. कारण ते थोडं अवघडल्यासारखं आणि विचित्र वाटलं असतं. त्यामुळे मी त्यांना मैत्रिणीच्या घरी राहायला जात असल्याचं सांगायचे."

जपान, फ्रान्स, जर्मनी आणि ट्युनिशियामध्ये राहिलेल्या तूसच्या मते, स्पेनमध्ये डेटिंग करण्याची पद्धत इतर देशांपेक्षा वेगळी आहे.

तिच्या मते, सुरुवातीपासूनच लोक एकमेकांशी आपुलकीने आणि मोकळेपणाने वागतात.

ती म्हणते, "लोक एकमेकांच्या खूप लवकर जवळ येतात आणि एकमेकांशी मोकळेपणाने वागू लागतात. कदाचित तुमचं एखाद्यासोबत नातं असेल, पण त्या नात्याला काही ठरलेलं नाव नसेल. तुम्ही त्या व्यक्तीला केवळ दोनदाच भेटला असाल, तरी सार्वजनिक ठिकाणी तिचा हात हातात घेऊ लागता आणि तिच्या खूप जवळ जाता."

"माझ्या मते, सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणं ही तिथे अगदी सामान्य आणि स्वीकारलेली गोष्ट आहे. घरात आणि घराबाहेर कसं वागावं, याबाबत वेगळे नियम नाहीत. लोक घरातही तितक्याच मोकळेपणाने वागतात, जितके सार्वजनिक ठिकाणी वागतात," असं ती नमूद करते.

बंडाचा आश्चर्यकारक इतिहास

स्पेनमध्ये एक काळ असा होता, जेव्हा हे सर्व इतकं सामान्य नव्हतं.

फ्रान्सिस्को फ्रँको यांच्या हुकूमशाहीच्या काळात (1939 ते 1975) कॅथलिक धर्मातील पारंपरिक मूल्यं आणि कडक कायद्यांनुसार लोकांनी कसं वागावं, हे ठरवलं जात होतं.

समलैंगिकतेला गुन्हा मानलं जात होतं. सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणाऱ्यांवरही नजर ठेवली जात होती. इतकंच नाही, तर सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतल्याबद्दल जोडप्यांना दंडही होऊ शकत होता.

1975 मध्ये फ्रँको यांच्या मृत्यूनंतर स्पेनमध्ये सांस्कृतिक बदल घडू लागले. माद्रिदमध्ये 'ला मोविदा माद्रिलेना' नावाची चळवळ सुरू झाली. या चळवळीतून लोकांनी स्वातंत्र्य आणि स्वतःच्या भावना मोकळेपणाने (स्व-अभिव्यक्ती) व्यक्त करण्याच्या अधिकाराचा उत्सव साजरा केला.

Caption- संपूर्ण स्पेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोक एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतात.
फोटो कॅप्शन, संपूर्ण स्पेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोक एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतात.

पेद्रो अल्मोदवार यांच्यासारख्या चित्रपट दिग्दर्शकांनी जुन्या काळातील पारंपरिक विचारांना आव्हान दिलं. ही चळवळ जसजशी पुढे गेली, तसतसं सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याचं प्रमाणही वाढू लागलं.

परंतु, हा मोठा बदल आपोआप झाला नव्हता. एलजीबीटी समुदायाच्या हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते अनेक वर्षांपासून आंदोलन करत होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे समाज अधिक मोकळा होण्याचा मार्गही तयार झाला होता.

असंच एक महत्त्वाचं आंदोलन 23 फेब्रुवारी 1987 रोजी माद्रिदमध्ये झालं होतं. त्याच्या 1 वर्ष आधी, माद्रिदमधील पुएर्ता देल सोल या चौकात एकमेकींना चुंबन दिल्यामुळे 2 महिलांना अटक करण्यात आली होती.

त्यांना 'सार्वजनिक उपद्रव' (एस्कान्दालो पुब्लिकों) या कायद्याखाली 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं.

त्या महिलांना अटक केल्यानंतर या घटनेकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना चुंबन घेण्याचं आंदोलन केलं.

त्या वर्षापासून 1990 च्या दशकापर्यंत माद्रिदमध्ये होणाऱ्या प्रत्येक प्राइड परेडचा शेवट पुएर्ता देल सोल चौकात एकमेकांना किस करून केला जात असत.

रस्त्यावर एकमेकांना चुंबन देणं हा शांततेच्या मार्गाने विरोध करण्याचा एक प्रभावी मार्ग बनला होता. 1988 मध्ये 'सार्वजनिक उपद्रव' हा गुन्हाही कायद्यातून रद्द करण्यात आला.

स्पेनचा मुक्त समाज

आज स्पेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोक एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना सर्वत्र दिसतात. परंतु, या मोकळेपणाचा अनुभव प्रत्येकाला सारखाच येतो असं नाही.

लासेन यांच्या मते, सार्वजनिक ठिकाणी बाकावर बसून चुंबन घेणाऱ्या वृद्ध जोडप्याकडे लोकांचं जास्त लक्ष जाऊ शकतं. तर समलैंगिक जोडप्यांना लोकांच्या नजरांना आणि प्रश्नांना अधिक सामोरं जावं लागण्याची शक्यता असते.

त्या म्हणतात, "प्रत्येकाला आपलं नातं सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने व्यक्त करणं सहज शक्य होतंच असं नाही."

Caption- स्पेनमध्ये वयस्कर लोकही सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना किस करताना दिसतात. (प्रतीकात्मक फोटो)
फोटो कॅप्शन, स्पेनमध्ये वयस्कर लोकही सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना किस करताना दिसतात. (प्रतीकात्मक फोटो)

व्हॅलेन्सियामध्ये लग्नाचे फोटो काढण्याचं काम केलेल्या पाउला फुरियोच्या मते, चुंबन घेणं ही खूप मोठा अर्थ सांगणारी गोष्ट आहे.

ती म्हणते, "आणखी खूप काही करण्याची गरज आहे. पण एकूणच स्पेनमधील समाज खूप मुक्त आहे. चुंबन घेणं ही तर केवळ सुरुवात आहे. स्पेनमध्ये किती मोकळेपणाने जगता येतं, याची कल्पना यावरून येते. चुंबन घेणं हे स्वातंत्र्य व्यक्त करण्याची एक पद्धत आहे."

हे वाचून मला जपानहून परतलेल्या माझ्या मैत्रिणीची आठवण झाली. एका बाकावर बसलेल्या जोडप्याला एकमेकांचं चुंबन घेताना पाहून तिला किती बरं वाटलं होतं, हेही आठवलं.

कदाचित तिला केवळ घरी परतल्याचा आनंद नव्हता, तर अशा देशात परतल्याचाही आनंद होता, जिथे वरवरच्या शिष्टाचारापेक्षा मोकळेपणाने आणि मनापासून वागण्याला जास्त महत्त्व दिलं जातं.

कदाचित स्पेनमध्ये चुंबन घेण्याबाबतची सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, आता ती अगदी सामान्य बाब झाली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)